चालू घडामोडी - १८ जून २०१५ [Current Affairs - June 18, 2015]

श्रीनिवासन सलग १४व्यांदा टीएनसीएच्या अध्यक्षपदी

  • बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि आयसीसीचे चेअरमन एन. श्रीनिवासन हे तामिळनाडू क्रिकेट संघटनेच्या (टीएनसीए) अध्यक्षपदी १२ जून २०१५ रोजी सलग १४व्यांदा निर्वाचित झाले. श्रीनिवासन यांना पुढील एका वर्षासाठी अध्यक्ष निवडण्यात आले आहे.
  • श्रीनिवासन हे २००२-०३ पासून टीएनसीएचे अध्यक्ष आहेत. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष ए. सी. मुथय्या यांचा पराभव करीत ते पदावर आले होते.
  • आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात नाव आल्यानंतर श्रीनिवासन यांना बीसीसीआय अध्यक्षपदी कायम राहण्यास सुप्रीम कोर्टाने मनाई केली होती. मार्चमध्ये झालेल्या बीसीसीआय अध्यक्षपदाच्या उमेदवारीतून त्यांना प्रतिबंधित करण्यात आले होते. श्रीनिवासन २०१६ पर्यंत मात्र आयसीसी चेअरमनपदावर कायम राहणार आहेत.

नथुला खिंड पुन्हा खुली करण्यात आली

  • भारतातून कैलास पर्वत व मानसरोवराला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी ५३ वर्षानंतर नथुला खिंड (सिक्कीम) १६ जून २०१५ रोजी पुन्हा खुली करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पर्यटकांच्या पहिल्या तुकडीला दिल्ली येथून रवाना केले.
  • मानसरोवर तिबेटमध्ये नैऋत्य भागात आहे. हा संपूर्ण प्रदेश चीन प्रजासत्ताकच्या अंतर्गत एक स्वायत्त भाग आहे.
  • १९६२च्या भारत-चीन युद्धानंतर नथुला खिंड चीनने बंद केली होती. सप्टेंबर २०१४मध्ये भारताच्या दौऱ्यावर आलेल्या चीनच्या राष्ट्रपती  शी जिनपिंग यांनी हा मार्ग खुला करण्यास सहमती दर्शवली होती. व्यापारासाठी हा मार्ग २००६मध्ये खुला करण्यात आला होता.

अमेरिकेची व्हिसा प्रदान प्रक्रिया बाधित

    USA Visa System
  • अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयामधील संगणक प्रणालीमध्ये उद्भवलेल्या समस्येमुळे या देशाचा व्हिसा प्रदान करण्यासंदर्भातील जगभरातील प्रक्रियेस मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
  • वॉशिंग्टन येथील संगणक प्रणालीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील अमेरिकेचा व्हिसा प्रदान करण्यासंदर्भातील प्रक्रिया बाधित झाली आहे.
  • या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. व्यवस्थेमध्ये झालेल्या बिघाडामुळे व्हिसा देण्यासाठी आवश्यक असलेली सुरक्षाविषयक माहिती मिळविण्यामध्ये अडचणी येत आहेत. 
  • सार्वजनिक व खासगी क्षेत्रामधील शंभरपेक्षाही जास्त संगणक तज्ज्ञ यासंदर्भात प्रयत्न करत आहेत. व्हिसा प्रदान व्यवस्था पुढील आठवड्यामध्ये सुरळित होण्याची शक्यता आहे.

मध्यम पल्ल्याचे धावपटू रॉन क्लार्क यांचे निधन

  • ऑस्ट्रेलियाचे मध्यम पल्ल्याचे अव्वल धावपटू रॉन क्लार्क यांचे १७ जून २०१५ रोजी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. 
  • क्लार्क यांनी १९६०च्या दशकांत मध्यम पल्ल्याच्या शर्यतीत १७ विश्वविक्रमांची नोंद केली होती. हादेखील एक विक्रम ठरला होता. मात्र, त्यांना एकदाही ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकता आले नाही.
  • १९६४च्या ऑलिंपिक स्पर्धेत त्यांनी १० हजार मीटर शर्यतीत ब्राँझपदक पटकाविले होते. त्यानंतर १९६८च्या मेक्सिको ऑलिंपिक स्पर्धेत ते ५ हजार मीटर शर्यतीत पाचव्या आणि १० हजार मीटर शर्यतीत सहाव्या स्थानावर राहिले होते.
  • क्लार्क यांनी १९६५ चे वर्ष मात्र आपल्या एकामागून एक विक्रमांनी गाजवले होते. त्यांनी दोन मैलाची स्पर्धा तासाभरात जिंकली होती. १० हजार मीटर शर्यत २८ मिनिटांत जिंकणारे ते पहिले धावपटू होते. 
  • त्यांच्या यशस्वी १९६५ व्या वर्षाच्या कामगिरीने त्यांना वर्षातील सर्वोत्कृष्ट धावपटू म्हणून गौरविण्यात आले.
  • कारकिर्दीत १७ विश्‍वविक्रम करणाऱ्या रॉन क्लार्क यांना ऑलिपिंक सुवर्णपदक कधीही जिंकता आले नाही. त्यामुळे प्रसिद्ध ॲथलेटिक्स इतिहासकार रॉबर्तो क्विर्सेतानी यांनी आपल्या ‘ए वर्ल्ड हिस्ट्री ऑफ लाँग डिस्टंस रनिंग’ या पुस्तकात त्यांच्यावर एक विशेष प्रकरण लिहले आहे. या प्रकरणाचे शिर्षक त्यांनी ‘Ron Clarke--magnanimous King Without A Crown’ असे दिले आहे.

‘दि राइट ब्रदर्स’

  • पुलित्झर पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इतिहास संशोधक डेव्हिड मॅककुलॉघ यांनी ‘दि राइट ब्रदर्स’ नावाचे पुस्तक लिहिले असून  त्यामध्ये विमानाचा शोध लावणाऱ्या राइट बंधूंची कथा नव्या रूपात मांडण्यात आली आहे.
  • प्रत्यक्षात राइट बंधूंना विमानाची कल्पना कधी सुचली. कसलेही आधुनिक तंत्रज्ञान हाताशी नसताना त्यांनी कशा पद्धतीने विमानाची चाचणी घेतली आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनातील नाट्यमयता या नव्या पुस्तकातून लोकांसमोर येणार आहे.
  • ‘सिमन अँड शुश्टर’ या प्रकाशन संस्थेने ही राइट बंधूंची संशोधन गाथा प्रसिद्ध केली आहे. या ग्रंथाच्या लेखनासाठी मॅककुलाघ यांनी राइट बंधूंच्या खासगी डायऱ्या, वह्या, स्क्रॅपबुक आणि त्यांनी परस्परांना लिहिलेली शेकडो पत्रे चाळली. त्यातून एक नवे भावविश्व त्यांच्या हाती लागले. आता हीच संशोधनगाथा पुस्तक रूपाने वाचकांच्या हाती येईल.

एनएल बेनो जेफिन - देशातील पहिली अंध आयएफएस अधिकारी

  • तामिळनाडूची एनएल बेनो जेफिन देशाची पहिली दृष्टिहीन आयएफएस अधिकारी बनली आहे. बेनोने देशातील सगळ्यात कठिण यूपीएससी परिक्षेत ३५३ रँक मिळविला आहे.
  • सध्या बेनो स्टेट बँक ऑफ इंडियात प्रोबेशनरी अधिकारीच्या पदावर काम करत आहे. गेल्या काही वर्ष बेनो या परीक्षेची तयारी करत होती. २०१३च्या परिक्षेच्या निकालाचे परिणाम आल्यावर बेनोने नवीन इतिहास रचला आहे.
  • बेनो तामिळनाडू भारतियार यूनिवर्सिटीतून इंग्रजीमध्ये पीएचडी करत आहे. पीएचडी चालू असताना बेनोने सिविल सर्विसची तयारी सुद्धा केली.
१,००० बाहूंच्या बुद्ध मूर्तीचा जीर्णोद्धार
  • चीनच्या तज्ञांनी गौतम बुद्ध यांच्या सहस्त्र बाहूंच्या दुर्मिळ व ८०० वर्षे जुन्या मूर्तीला मूळ रूप प्राप्त करून देण्याचे काम पूर्ण केले आहे. 
  • सिचुआन प्रांतातील दाजू परगण्यात असलेल्या या मूर्तीच्या जीर्णोद्धाराचे काम २००८ साली सुरू झाले होते. सुमारे ९८ लाख डॉलर खर्च करून हे काम पूर्ण करण्यात आले. 
  • आता लोक एक हजार हातांची ही बुद्धमूर्ती नव्या रूपात पाहू शकतात. एखाद्या मूर्तीच्या जिर्णोद्धाराचा हा सर्वात मोठा प्रकल्प होता. या कामासाठी कामगारांनी मूर्तीची ८३० हात पुन्हा तयार केले व या कामासाठी २२७ उपकरणांचा वापर करण्यात आला.

!!! जय महाराष्ट्र !!!

Previous Post Next Post