चालू घडामोडी - ३ जून २०१५ [Current Affairs - June 3, 2015]

इब्राहिम पश्चिम आशियासाठी भारताचे विशेष दूत

    Syed Asif Ibrahim
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुप्तवार्ता विभागाचे (इंटेलिजन्स ब्युरो) माजी प्रमुख सईद असिफ इब्राहिम यांची पश्चिम आशिया आणि अफगाण-पाकिस्तान प्रदेशासाठी विशेष दूत म्हणून नेमणूक केली आहे. 
  • इब्राहिम यांचाराष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयामध्येही (एनएससीएस) समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल हे त्यांच्या कामाचा आढावा घेतील.
  • पश्चिम आशियातील विविध घडामोडी, बंडाळी, इस्लामिक स्टेटचा सीरिया-इराक भागात वाढता प्रभाव, तसेच अफ-पाक भागातील घुसखोरी याबद्दल भारताची भूमिका मांडण्याची जबाबदारी इब्राहिम यांच्यावर असेल. 
  • ‘आयबी‘च्या प्रमुख पदावरून इब्राहिम हे ३१ डिसेंबर २०१४ रोजी निवृत्त झाले.

महाराष्ट्रात खुल्या सिगारेटच्या विक्रीस बंदी

  • खुल्या सिगारेटवरील विक्रीवर सरकारकडून पुन्हा एकदा कठोर भूमिका घेण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने १ जून २०१५ पासून खुल्या सिगारेटच्या विक्रीवर बंदी घातली आहे. 
  • सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ हे केवळ आरोग्यासाठी घातक नसून त्यामुळे महाराष्ट्र राज्यात कर्करोगाच्या रुग्णांत वाढ होत आहे. म्हणून तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
  • देशात सर्व प्रथम पंजाब आणि हरियाणाची राजधानी असणाऱ्या चंदीगडमध्ये खुल्या सिगारेटच्या विक्रीस बंदी घालण्यात आली होती. 
  • आयटीसीच्या विक्रीवर आता या निर्णयाचा मोठा परिणाम होणार आहे. आयटीसीच्या सिगारेट विक्रीत महराष्ट्र राज्याचा ९ टक्के हिस्सा आहे. बंदीमुळे त्यात एक टक्का घट होण्याची शक्यता आहे.

दीपिकाकुमारीला तिरंदाजीचे ब्राँझ

  • अंताल्या, टर्की येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषकात दीपिका कुमारीने कांस्यपदकाची कमाई केली. महिला रिकर्व्ह प्रकारात दीपिकाने दक्षिण कोरियाच्या चांग ह्य़ू जिन वर ६-२ अशी मात करत दीपिकाने हे यश मिळवले.
  • कोरियाच्या खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्यपदकावर शिक्कामोर्तब केले. भारताचे डोला बॅनर्जी, सतबीर कौर व स्नेहल दिवाकर पहिल्याच फेरीत पराभूत झाले. 
  • तिरंदाजी विश्वचषकातले दीपिकाचे हे दुसरे पदक आहे. याआधी २०१३ मध्ये शांघाय येथे झालेल्या विश्वचषकात दीपिकाने रौप्यपदकाची कमाई केली होती.
  • रिओ ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर, सर्वच भारतीय तिरंदाजपटूंचा सराव सुरू झाला आहे. 

मोहन बागान क्लबला प्रथमच विजेतेपद

  • कोलकात्याच्या मोहन बागान क्लबने आय-लीग फुटबॉल स्पर्धेचे प्रथमच विजेतेपद पटकावले.
  • मोहन बागान आणि गतविजेता बेंगळुरु क्लब यांच्यात झालेली मोसमातील अखेरची साखळी लढत १-१ अशी बरोबरीत सुटली.
  • मोहन बागानने ३९ गुणांसह जेतेपदाच्या करंडकावर आपले नाव कोरले, तर बेंगळुरू क्लबला ३७ गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
  • स्पर्धेतील १९ सामन्यांअखेर मोहन बागान क्लबचे ३८ गुण झाले होते, तर बेंगळुरू क्लबचे ३६ गुण होते. 
  • या लढतीत जो विजय नोंदवेल त्याचे विजेतेपद निश्चित होते. लढत बरोबरीत सुटल्यास मोहन बागान संघाचे विजेतेपद निश्चित होते. कारण लढत बरोबरीत सुटल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळणार होता.

ज्योती प्रसाद राजखोवा अरुणाचल प्रदेशचे १९वे राज्यपाल

  • ज्योती प्रसाद राजखोवा यांनी अरुणाचल प्रदेशचे १९वे राज्यपाल म्हणून १ जून २०१५ रोजी पदभार स्वीकारला. त्यांना गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश (कार्यवाहू) श्रीधर राव यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 
  • ज्योती प्रसाद राजखोवा निवृत्त लेफ्टनंट जनरल निर्भय शर्मा यांची जागा घेतील.
  • निर्भय शर्मा यांची मिझोरमच्या राज्यपालपदी नियुक्ती केल्यामुळे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी १२ मे २०१५ रोजी राजखोवा यांची अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली.
  • ज्योती प्रसाद राजखोवा आसामचे माजी मुख्य सचिव आणि १९६८च्या बॅचचे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत

अमेरिकेचे संरक्षणमंत्री कार्टर भारतात

  • अमेरिकेचे संरक्षणमंत्री डॉ. ऍस्टन कार्टर तीन दिवसांच्या भारतभेटीवर आले आहेत. भारत-अमेरिका संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापार पुढाकार (इंडो-यूएस डिफेन्स टेक्नॉलॉजी अँड ट्रेड इनिशिएटिव्ह) या कराराचे शिल्पकार म्हणून मानल्या जाणाऱ्या कार्टर यांची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जाते.
  • कार्टर यांचे२ जूनला प्रथम विशाखापट्टण येथे आगमन झाले. तेथील नौदलाच्या पूर्व विभागाच्या तळास भेट दिल्यानंतर त्यांचे दिल्लीत आगमन झाले. संरक्षणमंत्री या नात्याने कार्टर यांची ही पहिलीच भारतभेट आहे. यापूर्वी जुलै २०१५ व त्यानंतर सप्टेंबर २०१३ मध्ये संरक्षण उपमंत्री या नात्याने त्यांनी भारताला भेट दिली होती.
  • उपमंत्री या नात्याने कार्टर हे भारत-अमेरिकेदरम्यानच्या महत्त्वपूर्ण अशा संरक्षण तंत्रज्ञान व व्यापारविषयक पुढाकार कराराचे प्रमुख शिल्पकार मानले जातात.

गारपीटग्रस्तांना २०० कोटींची मदत

  • फेब्रुवारी व मार्च (२०१४) महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या आपद्‌ग्रस्तांना विशेष बाब म्हणून मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. 
  • आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना द्यावयाच्या मदतीसाठी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना २०० कोटींचा निधीदेण्यात आला असून, तो आता शेतकऱ्यांना तातडीने वितरित करण्यात येणार आहे.
  • या निधीतून कोकण विभागाला ६९ कोटी ८५ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. प्रामुख्याने कोकणातील आपद्‌ग्रस्त आंबा आणि काजूउत्पादकांनाही मदत मिळणार आहे.
  • याशिवाय रब्बी हंगाम २०१४-१५ मधील बाधित शेतकऱ्यांना कृषी पिके व फळपिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी अर्थसाह्य करण्यासाठी विभागीय आयुक्त, नाशिक, पुणे, औरंगाबाद व नागपूर यांना ३६४.२८ कोटी निधीचे वितरण करण्यात आले आहे. शासनाच्या या मदतीमुळे सर्व बाधित शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे.

कृषी क्षेत्रासाठी लवकरच नवे धोरण

  • दुष्काळाच्या गर्तेमध्ये अडकलेल्या कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पुढाकार घेतला असून, लवकरच कृषी क्षेत्रासाठी नवे धोरण आखले जाणार आहे.
  • या अनुषंगाने मोदी यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, कृषिमंत्री राधामोहनसिंह, गुजरातमधील वरिष्ठ भाजप नेते नितीन पटेल आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.
  • प्रस्तावित नव्या कृषी धोरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची धुरा नितीन पटेल यांच्याकडेच सोपविण्यात आली आहे.

काश्मीरमधील पूरग्रस्तांना ४७ रुपयांचे धनादेश

  • जम्मू काश्मीरमध्ये आलेल्या भीषणपूरात नुकसान झालेल्या नागरिकांना सरकारकडून अवघे ४७ रुपयांचे धनादेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी हे धनादेश सरकारला परत केले आहेत.
  • कृषी मंत्रालयाने जम्मूजवळील सरुरा गावातील शेतकऱ्यांना पूरात नुकसान झाल्याने ४७ रुपयांपासून ३७८ रुपयांपर्यंतचे धनादेश देण्यात आले आहेत.
  • काश्मीरमध्ये गेल्यावर्षी आलेल्या भीषण पुरात ३०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. पुरात श्रीनगर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते.
  • केंद्र सरकारने काश्मीरमधील पूरग्रस्तांसाठी ४०० कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे.

भारतीय कुस्तीपटूंना आठ सुवर्ण

  • योगेश्वर दत्तसह भारताच्या कुस्तीपटूंनी इटली येथील सस्सारी शहरात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत आठ सुवर्णपदकांसह एकूण नऊ पदकांची कमाई केली.
  • अमितकुमार (५७ किलो),योगेश्वर दत्त (६५ किलो), प्रवीण राणा (७० किलो), नरसिंग यादव (७४ किलो), सोनू (६१ किलो), सोमवीर (८६ किलो), मौसम खत्री (९७ किलो) व हितेंदर (१२५ किलो) यांनी भारतास सुवर्णयश मिळवून दिले. रजनीशकुमार याला मात्र ६५ किलो गटांत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
  • याआधी या स्पर्धेत जागतिक कुस्ती महासंघाने २०१३ सालच्या अखेरीस विविध वजनी गटांचा समावेश केला. त्यामुळे योगेश्वरला ६० किलो वजनी गटातून ६५ किलो वजनी गटात खेळावे लागले.
  • २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वरने ६० किलो वजनी गटात कांस्य जिंकले होते. वजनी गटातील बदलांनंतर योगेश्वरने आत्तापर्यंत सहभाग घेतलेल्या चारही स्पर्धामध्ये सुवर्ण जिंकण्यात यश मिळवले आहे.
  • योगेश्वरने गतवर्षी याच स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर त्याने ग्लास्गोत झालेल्या राष्ट्रकुल आणि इंचियोनमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले होते.

एशियन अॅथलेटिक्समध्ये भारताच्या इंद्रजित सिंगला सुवर्णपदक

    Indrajit Singh
  • सिनिअर एशियन अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये भारताच्या इंद्रजित सिंग याने गोळाफेकमध्ये २०.४१ मीटर लांब गोळा फेकत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.इंद्रजित सिंग २०१६ मध्ये होणाऱ्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी याआधीच पात्र ठरला आहे.
  • एशियन अॅथलेटिक्स स्पर्धेत याच प्रकारात चीनच्या चॅंग मिंग-हुआंग याने रौप्य तर चीनच्याच तिआन झिझॉंग याने कास्य पदक मिळवले.
  • २६ वर्षांच्या इंद्रजित सिंगने गतवर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते तर २०१३ मध्ये त्याने जागतिक आंतरविद्यापीठ स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले होते.

सेप ब्लॅटर यांचा राजीनामा

  • फुटबॉल विश्वाला काळिमा लावणाऱ्या महाघोटाळ्याप्रकरणी चहूबाजूंनी दबाव वाढल्याने चारच दिवसांपूर्वी ‘फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन’ अर्थात फिफाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या सेप ब्लॅटर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
  • विश्वचषक स्पर्धेचे आयोजन, विपणन आणि प्रसारण हक्कांसंदर्भात पैशाचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी अमेरिकेने सुरू केलेल्या चौकशीचा भाग म्हणून स्वित्झर्लंड पोलिसांनी फिफाच्या चौदा पदाधिकाऱ्यांना अटक केली.
  • अटकसत्रानंतर फिफाचे अध्यक्ष ब्लाटर यांनी राजीनामा द्यावा या मागणीने जोर धरला. मात्र संघटनेवर हूकूमत गाजवणाऱ्या ब्लाटर यांची ३० मे रोजी अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली होती.
  • परंतु फुटबॉलविश्वात आपल्याविरोधात वाढता असंतोष पाहता ब्लॅटर यांनी राजीनामा दिला. फिफाच्या अध्यक्षपदासाठी आता विशेष सभेत नव्याने निवडणुका घेतल्या जातील असंही ब्लॅटर यांनी जाहीर केलं.
  • या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे अमेरिका फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष सुनील गुलाटी यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे.
  • गुलाटी हे सलग तिसऱ्यांदा अमेरिका फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष बनले आहेत. ब्लॅटर यांच्या राजीनाम्याबाबत अमेरिकेने दबाव आणला होता. गेल्या तीन दशकांत गुलाटी यांनी अमेरिका फुटबॉलमध्ये अमुलाग्र बदल केलेला आहे. ५५ वर्ष वय असलेल्या गुलाटी यांचा जन्म अलाहाबाद येथे झाला होता.

उबेर इंडियाच्या प्रमुखपदी अमित जैन

    Amit Jain
  • अमेरिकेतील ॲप आधारित टॅक्सी सेवा देणारी कंपनी उबेरच्या भारतीय शाखेच्या प्रमुखपदी अमित जैनयांची नियुक्ती करण्यात आली आहे.जैन याआधी रेंट डॉट कॉंमचे अध्यक्ष होते.
  • अमित जैन यांच्याकडे कंपनीची भारतातील ध्येय धोरणे, जागतिक बाजारात विकास, त्या अनुषंगाने व्यवहारिक जबाबदारी सांभाळतील.
  • उबेर कंपनीने भारतात १९ महिन्यांपूर्वी पदार्पण केले आणि आता भारत उबेरसाठी अमेरिकेनंतर सर्वांत मोठे आणि तेजीने वाढता बाजार आहे.
  • नुकतेच सरकारने इंटरनेट सेवा देणाऱ्या ॲप आधारित टॅक्सी कंपन्या उबेर, टॅक्स फारस्योर आणि ओला कॅबचे संकेतस्थळ बंद करण्यास सांगितलेआहे.
  • उबेर कॅबच्या एका चालकाने महिला प्रवाशासोबत बलात्कार केल्याची घटना झाल्यानंतरराजधानी दिल्लीत सर्व ॲप आधारित कॅब सेवांवर बंदीघालण्यात आली आहे.

मीना हेमचंद्र आरबीआयच्या कार्यकारी संचालक

  • मीना हेमचंद्र यांना १ जून २०१५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) कार्यकारी संचालक (ईडी) म्हणून नियुक्त करण्यात आले. कार्यकारी संचालक म्हणून त्या बँकिंग पर्यवेक्षण विभाग, सहकारी बँकिंग पर्यवेक्षण विभाग तसेच गैरबँकिंग पर्यवेक्षण विभागावर लक्ष देतील.
  • त्या चंदन सिन्हा यांची जागा घेतील.यापूर्वी हेमचंद्र रिझर्व्ह बँकेच्या पर्यवेक्षण विभागाच्या प्रभारी होत्या. तसेच त्या रिझर्व्ह बँकेच्या कृषी महाविद्यालयाच्या (पुणे) मुख्य प्राचार्य देखील होत्या.

!!! जय महाराष्ट्र !!!

Previous Post Next Post