चालू घडामोडी - १६ जुलै २०१५ [Current Affairs - July 16, 2015]

सय्यद हैदर रजा यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

    Sayed Haider Raza
  • आधुनिक भारतीय चित्रकार सय्यद हैदर रजा यांना ‘द लिजन ऑफ ऑनर’ या फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चित्रकलेतील अनोख्या उपलब्धींबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.
  • फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनानिमित्त १४ जुलै रोजी फ्रान्सच्या दिल्लीतील दूतावासात आयोजित कार्यक्रमात राजदूत फ्रेंकोई रिचियर यांनी हा पुरस्कार रजा यांना प्रदान केला.
  • यावेळी रजा यांच्या जीवनावरील दोन भाषांमधील पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. त्यातील एक पुस्तक २००३ मध्ये मूळ फ्रेंच भाषेत लिहिले गेले असून त्याचा इंग्रजीत अनुवाद झाला आहे. ‘येट अगेन’ या अशोक वाजपेयी यांनी संपादित केलेल्या अन्य एका पुस्तकाचाही त्यात समावेश होता.

‘द लिजन ऑफ ऑनर’

  • १८०२ मध्ये नेपोलियन बोनापार्ट यांनी या पुरस्काराची सुरुवात केली होती. कोणत्याही देशाचे नागरिकत्व असले तरी उत्कृष्ट सेवेसाठी हा पुरस्कार दिला जातो.
  • ज्यांनी जगाला सुंदर बनविण्यात योगदान दिले अशा व्यक्तींना हा पुरस्कार फ्रान्सच्या राष्ट्रपतींकडून बहाल केला जातो. 

‘नेट न्युट्रॅलिटी‘बाबत समितीचा अहवाल प्रसिद्ध

  • बहुचर्चित ‘नेट न्युट्रॅलिटी’बाबत स्थापन करण्यात आलेली समिती देशातील ‘नेट न्युट्रॅलिटी‘बाबत अनुकूल असून समितीने दूरसंचार मंत्रालयाकडे सोपविलेला अहवाल १६ जुलै रोजी दूरसंचार विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
अहवालातील ठळक बाबी
    Net neutrality
  • अभिव्यक्ती स्वातंत्र्याद्वारे युजरला कोणत्याही अधिकृत संकेतस्थळाला कोणत्याही अडथळ्याविना वापरता येईल.
  • कोणत्याही अधिकृत मजकूराला ब्लॉक करता येणार नाही.
  • स्पर्धेला प्रोत्साहन दिले जाईल मात्र त्यातून सेवेमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करता येणार नाही
  • कायदेशीर गरज नसताना युजरच्या परवानगीशिवाय त्याची माहिती उघड करता येणार नाही.
  • मेसेजिंग सेवेवर निर्बंध लादण्याची दूरसंचार कंपन्यांची मागणी अहवालाद्वारे फेटाळून लावली आहे. 
  • इंटरनेटद्वारे करण्यात येणाऱ्या व्हॉइस कॉलमुळे वर्तमान व्हॉईस कॉल पद्धतीचा अडथळा निर्माण करत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. तसेच इंटरनेटद्वारे व्हॉईस कॉलच्या सेवांवर निर्बंध लादण्याची शिफारस करण्यात आली आहे.
  • एखाद्या संकेतस्थळाची ट्रॅफिक वाढविण्यासाठी अन्यायकारक किंवा स्पर्धेला विरोध करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना परवानगी नाकारण्यात आली आहे.
‘नेट न्युट्रॅलिटी’ म्हणजे काय?
  • इंटरनेटवरील प्रत्येक बाइट हा सारखा असतो, मग तो तुम्ही यू ट्यूबसाठी वापरा, नाहीतर एखादे वर्तमानपत्र वाचण्यासाठी किंवा इंटरनेटवर सिनेमा पाहण्यासाठी वापरा, नाहीतर विकिपिडियावरील काही माहिती डाउनलोड करण्यासाठी वापरा. 
  • विजेचा प्रवाह घेतला आणि त्याचा वापर खोली प्रकाशमान करण्यासाठी वापरता की एखादे होम अप्लायन्स किंवा विद्युत उपकरण चालवण्यासाठी वापरता, याच्याशी वीज कंपनीला काही देणेघेणे नसते. त्याला दर सारखाच असतो. अगदी त्याच प्रकारे इंटरनेटच्या वापराला नियम पाहिजे, यालाच ‘नेट न्युट्रॅलिटी’ म्हणतात.
एअरटेल झीरोमुळे वाद
  • एअरटेल झीरोअंतर्गत वेबसाईटच्या माध्यमातून मुक्तसंचार सुरू झाल्यानंतर देशात नेट न्यूट्रॅलिटीचा वाद छेडला गेला. या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कंपन्यांना ही सुविधा देण्यासाठी एअरटेलने पैसा मागितल्यानंतर दूरसंचार कंपन्यांच्या संघर्षात भर पडली.
  • त्यानंतर फेसबुक इंटरनेट ऑर्गकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांवर सदर समितीने चर्चा केली. इंटरनेट ऑर्ग युझर्सना एप्रिल २०१५ पर्यंत काही मोजक्या वेबसाईटच्या माध्यमातून मुक्त संचाराची मुभा देण्यात आली.

याकूब मेमनला ३० जुलैला फाशी

  • मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवलेला आरोपी याकूब मेमनला ३० जुलैला नागपूर तुरुंगात फाशी देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 
  • मेमनची दया याचिका सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपतींनी यापूर्वीच फेटाळून लावली आहे. तरीही शिक्षेचा फेरविचार करण्यासाठी त्याने दाखल केलेल्या याचिकेवर (क्युरेटिव्ह अपील) सर्वोच्च न्यायालयात २१ जुलैला निर्णय होणार आहे. मात्र, हा केवळ एक सोपस्कार असेल.
  • देशाला हादरविणाऱ्या १२ मार्च १९९३ च्या भीषण बॉम्बस्फोटांचा कट आखणे, तसेच तो पूर्णत्वास नेल्याप्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने मेमनला दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली. या बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी फाशी झालेला याकूब हा पहिलाच दोषी आहे. 
  • फाशीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही केंद्र सरकारने माहिती दिली आहे. कायद्यानुसार याकूबच्या कुटुंबीयांनाही याबद्दल कळवण्यात आले आहे. 
  • याकूब मेमनची फाशीची तारीख सरकारने जाहीर केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. क्युरेटिव्ह अपिलावर निर्णय येण्यापूर्वी त्याच्या फाशीची तारीख जाहीर करण्यात आल्याने त्यास आक्षेप घेण्यात आला आहे. 
१९९३च्या भीषण बॉम्बस्फोटांचा सूत्रधार
  • अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने आयएसआयच्या मदतीने घडवलेल्या या साखळी बॉम्बस्फोटांत २५७ जणांचे बळी गेले होते; तर ७०० हून अधिक जण जखमी झाले होते.
  • या घटनेनंतर भारताबाहेर पळून गेलेल्या याकूबला सीबीआयने काठमांडूतून अटक केली होती. दाऊदचा विश्वासू हस्तक आणि साखळी बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड टायगर मेमनचा भाऊ असलेला याकूब त्याच्या कुटुंबात सर्वांत सुशिक्षित आहे.

गुरु या ग्रहाशी साधर्म्य असलेल्या अन्य एका ग्रहाचा शोध

  • सौर मालिकेमधील गुरु या ग्रहाशी साधर्म्य असलेल्या अन्य एका ग्रहाचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले आहे. या ग्रहाचे वस्तुमान साधारणत: गुरुइतकेच आहे. याशिवाय, गुरु व सूर्यामधील अंतराइतकेच अंतर हा ग्रह फिरत असलेल्या ताऱ्यामध्ये व या ग्रहामध्ये असल्याचेही निष्पन्न झाले आहे. 
  • याचबरोबर, हा ग्रह फिरत असलेल्या ‘एचआयपी ११९१५’ या ताऱ्यामध्ये व सूर्यामध्येही कमालीचे साधर्म्य दिसून आले आहे. ‘एचआयपी ११९१५’ ताऱ्याचे वयही सूर्याइतकेच असल्याचेही आढळून आले आहे. 
  • पृथ्वी असलेल्या सौर मालिकेमध्ये गुरु ग्रहाचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. गुरुमुळेच ही सौरमालिका अस्तित्वात येऊ शकल्याचे संसोधकांचे मत आहे. यामुळे विश्वात आपल्या सौरमालिकेशी साधर्म्य असलेल्या सौरमालिकेचा शोध घेण्याच्या प्रक्रियेमध्ये (अर्थ २.०) गुरुच्या या जुळ्या ग्रहाचा शोध लागण्याची घटना संशोधकांसाठी अत्यंत उत्साहवर्धक मानली जात आहे.

‘पिपाव्हेव डिफेन्स’ने नुकताच रशियन सरकारसोबत करार

  • भारतीय नौदलासाठी युद्धनौका बांधण्यासाठी ‘पिपाव्हेव डिफेन्स’ने नुकताच रशियन सरकारसोबत एक करार केला आहे. हा करार सुमारे ३ अब्ज डॉलरचा असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे.
  • युद्धनौका बांधण्यासाठी खाजगी क्षेत्रातील कंपनीला मिळालेला आतापर्यंतचा सर्वात मोठा करार आहे. ‘रिलायन्स इन्फ्रा‘ने काही दिवसांपूर्वी ‘पिपाव्हेव डिफेन्स‘ची खरेदी केली आहे.
  • रशियन सरकाने भारतीय नौदलासाठी युद्धनौका बनविण्यासाठी उत्सुकता दर्शविली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया‘ मोहिमेअंतर्गत सहभाग नोंदवण्यासाठी रशियाने प्रकल्प चालवण्यासाठी भारतीय भागीदार निवडला आहे. 
  • विविध भारतीय जहाजबांधणी बनविणाऱ्या कंपन्यांचे आणि त्यांच्या क्षमतेचे परीक्षण केल्यानंतर रशियन सरकाने ‘पिपाव्हेव डिफेन्स’ची निवड केली आहे.

सबसिडी सरेंडरमध्ये महाराष्ट्र दुसरा

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत घरगुती गॅस सिलेंडरवरील सबसिडी सरेंडर करणाऱ्या नागरिकांची संख्या १० लाखांच्या पुढे गेली आहे.
  • या योजनेत उत्तर प्रदेशने पहिला क्रमांक पटकावला असून महाराष्ट्र दुसऱ्या तर दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर आहे. कर्नाटक आणि तामिळनाडू अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे.
  • उत्तर प्रदेशातील २ लाख १२ हजार, महाराष्ट्रातील १ लाख ५४ हजार, दिल्लीतील १ लाख १५ हजार, कर्नाटक ८० हजार आणि तामिळनाडूतील ६८ हजार नागरिकांनी घरगुती गॅसवरील सबसिडी सरेंडर केली आहे.
  • सबसिडी सरेंडर करणाऱ्या नागरिकांमध्ये सर्वाधिक व्यावसायिकांचा समावेश आहे. दिल्लीत साधारण ४५ लाख एलपीजी ग्राहक आहेत. यापैकी १ लाख १५ हजार ग्राहकांनी सबसिडी सोडली आहे.

स्थलांतरितांना बॅँक खाते उघडण्याचा अधिकार

  • पाकिस्तानातून भारतात आलेल्या हिंदू स्थलांतरितांना लवकरच बॅँक खाते उघडण्याचा तसेच स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचा अधिकार मिळणार आहे. केंद्र सरकार याबाबत आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करीत आहे. 
  • पाकिस्तानातून आलेले स्थलांतरित भारतात दीर्घ मुदतीच्या व्हिसावर राहतात. त्यांना आता बॅँक खाते उघडता येईल किंवा मालमत्ताही खरेदी करता येईल.
  • जर हा धोरणात्मक निर्णय झाला तर, अफगाणिस्तान किंवा आशियातील अन्य देशांतून भारतात आलेल्या हिंदूनाही त्याचे लाभ मिळतील.
रिझर्व्ह बॅँकेची परवानगी
  • पाकिस्तानातून आलेल्या स्थलांतरितांना बॅँक खाते उघडता येत नाही. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भारतीय रिझर्व्ह बॅँकेची त्यासाठी पूर्व परवानगी लागते.
  • तूर्त नॉन रेसिडेंट ऑर्डिनरी (एनआरओ) बॅँकेच्या परवानगीशिवाय उघडण्यास केंद्र सरकार परवानगी देणार आहे. 
  • वास्तविक, भारताबाहेर वास्तव्य करणारे नागरिक भारतात बॅँकखाते उघडू शकतात मात्र, पाकिस्तान व बांगलादेशातून स्थलांतरित झालेल्यांच्या बाबतीत नियमावली कडक आहे.

जगन्नाथ यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी विमा

  • लाखोंच्या संख्येने जगन्नाथांच्या यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी पाच लाखांपर्यंतचा अपघाती विमा उतरविण्याचा निर्णय ओडिशा सरकारने घेतला असून याचा लाभ भक्तांसह, देवस्थानचे पुजारी, मंदिराचे कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. संपूर्ण पुरी शहरांतर्गत काहीही अनुचित घटना घडल्यास संबंधित व्यक्तीस विमा लागू होणार आहे. 
  • अनेकदा यात्रेच्या निमित्ताने होणारी चेंगराचेंगरी, अपघाती मृत्यू, पाण्यात बुडून मृत्यू, दहशतवादी हल्ला आदी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मागील वर्षी हा निर्णय घेतला होता. परंतु, विम्याची रक्कम ही केवळ एक लाखांपर्यंत मर्यादित होती. तसेच, गुंडिया मुख्य मंदिर आणि ग्रॅँड रोड या भागासाठीच केवळ विमा लागू करण्यात आला होता. 
  • परंतु, यंदा तो संपूर्ण पुरी शहरासाठी लागू करण्यात आला असून विम्याची रक्कमही पाच लाखांपर्यंत वाढविण्यात आली. 
  • पुरीमध्ये येणाऱ्या प्रत्येक भक्तासाठी तसेच पुरीत राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबासाठी पाच लाखांपर्यंत विमा उतरविला जाणार आहे. यासाठी मंदिर प्रशासनाने न्यू इंडिया अॅशुरन्स या विमा कंपनीशी करार केला आहे. 
  • १७ जुलै रोजी होणाऱ्या नेत्रोत्सव ते निलाद्री विजे या उत्सवासाठी हा विमा लागू होणार आहे.

भारतातील कंपन्यांची अमेरिकेत १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक

  • भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय) आणि ग्रँट थॉर्नटनच्या (जीटी) ‘इंडियन रुटस्, अमेरिकन सॉईल’ नावाच्या या अहवालानुसार भारतातील मोठ्या १०० कंपन्यांनी अमेरिकेतील ३५ राज्यांत वेगवेगळ्या क्षेत्रांत १५ अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करून ९१ हजारांपेक्षाही जास्त नव्या नोकऱ्या निर्माण केल्या आहेत.
  • अमेरिकेत दक्षिणेकडील टेक्सास राज्यात सर्वाधिक ३.८४ अब्ज डॉलर्स गुंतवणूक झाली असून पेनसिल्वानियात ३.५६ अब्ज, मिनेसोटात १.८ अब्ज, न्यूयॉर्कमध्ये १.०१ अब्ज, न्यूजर्सीत १ अब्ज या प्रमाणे गुंतवणूक करण्यात आली आहे.
  • अमेरिकेच्या ५० राज्यांत भारतीय कंपन्यांनी केलेली गुंतवणूक ही सरासरी ४४.३ अब्ज डॉलरची झाली आहे. अमेरिकेमध्ये वेगाने थेट विदेशी गुंतवणूक करीत असलेल्या देशांत भारत हा चौथा देश बनला आहे.
  • या अहवालानुसार भारतीय कंपन्यांनी न्यू जर्सीमध्ये ९३००, कॅलिफोर्नियामध्ये ८४००, टेक्सास ६२००, इलिनॉईसमध्ये ४८०० आणि न्यूयॉर्कमध्ये ४१०० नोकऱ्या तयार केल्या आहेत. ही राज्ये भारतीय कंपन्यांकडून नोकऱ्या तयार करणाऱ्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत.
Previous Post Next Post