चालू घडामोडी - २० ऑगस्ट २०१५ [Current Affairs - August 20, 2015]

सायनाचा ओ. एस. कंपनीसोबत २५ कोटी रुपयांचा करार

    Saina Nehwal
  • बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी पोहोचलेल्या सायना नेहवालने ओ. एस. या स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीसोबत दोन वर्षांसाठी २५ कोटी रुपयांचा करार केला आहे.
  • या करारामुळे वर्षाला १२.५० कोटी प्रमाणे दोन वर्षात सायना नेहवाल २५ कोटी रुपयांची कमाई करणार आहे.
  • क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोणी आणि विराट कोहली पाठोपाठ आता मोठ्या रकमेचा करार करणाऱ्या भारतीय क्रीडपटूंमध्ये सायनाचा समावेश झाला आहे.
 आय. ओ. एस. स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनी 
  • आय. ओ. एस. स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनी क्रीडापटूंना करारबद्ध करते आणि त्यांना विविध उत्पादन आणि सेवांच्या जाहिराती मिळवून देते.
  • आतापर्यंत आय. ओ. एस. स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीने क्रिकेटपटू सुरेश रैना, बॉक्सर मेरी कोम आणि विजेंदर सिंग, कुस्तीपटू सुशीलकुमार यांना करारबद्ध केले आहे.

बँकांना दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी

  • महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी मिळावी, ही बँक कर्मचाऱ्यांची प्रदीर्घ काळापासूनची मागणी अखेर मान्य झाली असून, येत्या सप्टेंबर महिन्यापासून देशातील सर्व प्रकारच्या बँकांसाठी ती लागू होणार आहे.
  • मात्र पहिल्या, तिसऱ्या व असल्यास पाचव्या शनिवारी मात्र बँकांतील व्यवहार पूर्ण दिवस सुरू राहतील. 
  • केंद्रीय आर्थिक सेवा विभागाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली. त्यानुसार रिझर्व्ह बँक कायदा, १९३४च्या दुसऱ्या परिशिष्टात येणाऱ्या सर्व, म्हणजे सरकारी, सहकारी, खासगी, ग्रामीण प्रादेशिक बँकांतील कर्मचाऱ्यांना या दोन शनिवारची सुट्टी मिळेल.

अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी सेबॅस्टियन को

    Sebastian Coe
  • आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स संघटना महासंघाच्या निवडणुकीत इंग्लंडच्या सेबॅस्टियन को यांची अध्यक्षपदी निवड झाली. को यांनी सर्जेय बुब्का यांच्यावर मात केली. बुब्का यांच्या ९२ मतांच्या तुलनेत को यांना ११५ मते मिळाली.
  • अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेले बुब्का उपाध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत विजयी झाले. बुब्का यांच्यासह कतारचे दहलान अल हमाद, कॅमेरूनचे हमाद कलकाबा मलबौम आणि क्युबाचे अल्बटरे ज्युआनटोरेना उपाध्यक्ष म्हणून कार्यभार पाहणार आहेत.
  • अ‍ॅथलेटिक्स क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या कथित उत्तेजक सेवन प्रकरण को यांच्यासाठी अध्यक्ष म्हणून पहिले आव्हान असणार आहे.
 महासंघाच्या कार्यकारिणी सदस्यपदी भारताचे सुमारीवाला 
  • भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांची आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स संघटना महासंघाच्या कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.
  • बीजिंग, चीन येथे झालेल्या महासंघाच्या ५०व्या बैठकीत कार्यकारिणी समितीसाठी निवडणुका झाल्या. कार्यकारिणी सदस्य म्हणून नऊ सदस्यांची निवड झाली. माजी अ‍ॅथलिट सुमारीवाला यापैकी एक असणार आहेत.
  • सदस्यपदासाठीच्या निवडणुकीत सुमारीवाला यांना ६१ मते मिळाली. आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या कार्यकारिणीत नियुक्ती होणारे सुमारीवाला पहिले भारतीय आहेत.
  • भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष सुरेश कलमाडी २००१ ते २०१३ या कालावधीत आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या कार्यकारिणी सदस्यपदी होते. मात्र भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्ष या नात्याने त्यांना ही संधी मिळाली होती.

श्रीलंकेत विक्रमसिंघे आघाडी सरकारचे पंतप्रधान

    Ranil Wickremesinghe
  • श्रीलंकेमध्ये १८ ऑगस्ट रोजी झालेल्या संसदीय निवडणुकीत विजय मिळवणारे रानील विक्रमसिंघे यांनी कोलंबोतील अध्यक्ष सचिवालयात चौथ्यांदा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
  • शपथविधीनंतर लगेचच विक्रमसिंघे यांची युनायटेड नॅशनल पार्टी (यूएनपी) आणि श्रीलंकेचे अध्यक्ष सिरिसेना मैत्रीपाल यांची श्रीलंका फ्रीडम पार्टी (एसएलएफपी) यांनी सत्तेसाठी एकत्र येत ऐतिहासिक करार केला. 
  • श्रीलंकेच प्रथमच दोन प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांनी देशाची सत्ता सांभाळण्यासाठी हातमिळवणी केली आहे.
  • श्रीलंकेचे माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्या पुन्हा सत्तासंपादनाच्या आशा धुळीस मिळवत विक्रमसिंघे यांनी संसदीय निवडणुकीत २२५ सदस्यांच्या सभागृहात १०६ जागांवर विजय मिळवला. साध्या बहुमतासाठी त्यांना ७ जागा कमी पडल्या. त्यामुळे एसएलएफपी पक्षाची मदत घेण्यात आली.
  • सरकारने तमिळ नागरिकांसह सर्व अल्पसंख्याकांना सामावून घेण्यासाठी वांशिक सलोखा जपणारी नवीन राज्यघटना तयार करण्यास नवीन आपली कटिबद्धता व्यक्त केली.
  • सध्याच्या निवडणुकीतील प्रमाणानुसार प्रतिनिधित्वाची यंत्रणा रद्द करून निवडणूक सुधारणा करण्याची ग्वाहीदेखील नवीन सरकारने दिली.

ख्रिस रॉजर्स अ‍ॅशेस मालिकेनंतर निवृत्त

  • ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ख्रिस रॉजर्सने अ‍ॅशेस मालिकेनंतर निवृत्तीची औपचारिक घोषणा केली. अ‍ॅशेस मालिकेतील ओव्हल येथे होणारी पाचवी कसोटी ३७ वर्षीय रॉजर्सचा शेवटचा सामना असणार आहे.
  • इंग्लंड दौऱ्यात डोक्यावर चेंडू आदळल्याने रॉजर्सला चक्कर जाणवली होती. मात्र तरीही लॉर्ड्स कसोटीत खेळताना त्याने शानदार शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली होती.
  • २००८ मध्ये रॉजर्सने भारताविरुद्ध पर्थ कसोटीत पदार्पण केले. त्यानंतर पुन्हा संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला ५ वर्ष प्रतीक्षा करावी लागली. मात्र पस्तिशीनंतरही त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली.
  • २४ कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्त्व करताना रॉजर्सने ४२.८६च्या सरासरीने १९७२ धावा केल्या आहेत. यामध्ये ५ शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे.
  • याआधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क याने देखील अ‍ॅशेस मालिकेनंतर निवृत्ती घेण्याचे घोषणा केली आहे.

टाटा समूहाची ‘उबर’मध्ये गुंतवणूक

  • वैयक्तिक गुंतवणुकीद्वारे ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये रस दाखविणाऱ्या प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या टाटा समूहातील खासगी समभाग निधी गटाने उबर या टॅक्सी सेवा कंपनीत हिस्सा खरेदी केली आहे.
  • उबर ही मूळची अमेरिकेतील टॅक्सी सेवा कंपनी असून गेल्या काही महिन्यांपासून ती मोबाइल व्यासपीठावर व्यवसाय विस्तार करत आहे. उबरमध्ये यापूर्वी एका आघाडीच्या प्रसारमाध्यम समूहानेही गुंतवणूक केली आहे.
  • भारतीय प्रवासी वाहतूक क्षेत्रात उबरने दोन वर्षांपूर्वी सुरुवात केली. कंपनीच्या १८ शहरांमध्ये टॅक्सी धावत असून तिच्याबरोबर १.५० लाख चालक जोडले गेले आहेत.
  • कंपनीच्या ग्राहकसंख्येत महिन्याला ४० टक्के वाढ नोंदली जात आहे. कंपनीकडे सध्या ३५ टक्के बाजारहिस्सा आहे.
  • उबर ही काही दिवसांपूर्वी टाटा यांनी वैयक्तिक गुंतवणूक केलेल्या ओलाची स्पर्धक कंपनी आहे.
  • रतन टाटा यांची वैयक्तिक स्वरूपात अल्टाएरोज एनर्जीज, स्नॅपडील, ब्ल्यूस्टोन, स्वास्थ्य इंडिया, अर्बनलॅडर, कारदेखो.कॉम, ग्रामीण कॅपिटल, पेटीएम, शिओमी व कार्या या १० कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे.

लाचखोर मेव्हणा अटकेत

  • गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मेव्हणा दिलीप माळवणकर याला एक लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अटक केली आहे. 
  • तो गोवा स्टेट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (जीआयडीसी) मध्ये कामाला आहे.
  • 'तुएम औद्योगिक इस्टेट'मधील एका प्लॉटच्या भूसंपादनात मदत करू, असे सांगून मालवणकर याने उद्योजक संजय कुमावत यांच्याकडे लाचेची मागणी केली होती.
  • मालवणकरसह 'जीआयडिसी'शी संबंधित अजित गौनेकर या अधिकाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे
Previous Post Next Post