चालू घडामोडी - ०३ नोव्हेंबर २०१५ [Current Affairs - November 03, 2015]

अंटार्क्‍टिका खंडावरील हिमसाठ्यांमध्ये मोठी वाढ

  • अंटार्क्‍टिका खंडावरील हिमसाठ्यांमध्ये मोठी वाढ होत असल्याचा निष्कर्ष अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था "नासा"ने काढला आहे.
  • सुमारे दहा हजार वर्षांच्या जुन्या प्रक्रियेंतर्गत येथील हिमसाठ्यांमध्ये वाढ होत असल्याचे "नासा"ने म्हटले आहे.
  • हवामान बदलासंदर्भातील जागतिक पातळीवरील संस्था असलेल्या आयपीसीसीसहित इतर संस्थांनी अंटार्क्‍टिकावरील हिमसाठे कमी होत असल्याचा अभ्यास अहवाल प्रसिद्ध केला होता.
  • उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीच्या पृथ:करणाच्या आधारे येथील हिमसाठ्यांत 1992 ते 2001 या काळात प्रतिवर्षी 112 अब्ज टन इतकी वाढ झाल्याचे "नासा"ने म्हटले आहे.
  • याचबरोबर, 2003 ते 2008 या काळात अंटार्क्‍टिका येथे प्रतिवर्षी 82 अब्ज टन हिमसाठा झाल्याचे आढळून आले आहे. या प्रक्रियेमुळे पूर्व अंटार्क्‍टिका आणि पश्‍चिम अंटार्क्‍टिका भागामधील अंतर्गत भागातील हिमपातळीमध्ये दरवर्षी सरासरी 0.7 इंचांनी वाढ होत असल्याचेही निष्पन्न झाले आहे.
  • जागतिक हवामान बदलावर चर्चा करण्यासाठी पॅरिस येथे या महिन्याच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय परिषद होणार असून, या पार्श्‍वभूमीवर प्रसिद्ध झालेला हा अहवाल अत्यंत महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.

इंडोनेशियाबरोबर भारताने दोन सामंजस्य करार केले

  • दक्षिण आशियातील क्रमांक दोनचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार असलेल्या इंडोनेशियाबरोबर भारताने दोन सामंजस्य करार केले.
  • ऊर्जा आणि सांस्कृतिक क्षेत्रात सहकार्य करण्यासंदर्भात हे करार झाले आहेत.
  • भारताचे उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी हे सध्या इंडोनेशियाच्या दौऱ्यावर असून, त्यांच्या उपस्थितीतच दोन्ही करारांवर स्वाक्षरी झाली.
  • दोन करार झाले असले तरी कुख्यात गुंड छोटा राजनला अटक झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर अपेक्षित असलेला गुन्हेगार हस्तांतर करार मात्र आज होऊ शकला नाही.
  • हा करार चार वर्षांपूर्वीच झाला असला, तरी त्यांची अंमलबजावणी सुरू झाली नव्हती.

भीमाबाई आंबेडकर पुरस्कार यंदा मुक्ता दाभोलकर यांना जाहीर

  • संबोधी प्रतिष्ठानतर्फे भीमाबाई आंबेडकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार यंदा सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांना जाहीर झाला आहे.
  • रोख रक्कम पाच हजार, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • येत्या सहा डिसेंबरला दुपारी चार वाजता स्काऊट-गाइड जिल्हा कार्यालयाच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते त्याचे वितरण होईल.
  • परिवर्तनाची चळवळ, साहित्य, कला आदी क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांच्या गौरवार्थ हा पुरस्कार दिला जातो.
  • यंदा पुरस्काराचे 18 वर्ष आहे.
  • यापूर्वी डॉ. ज्योती लांजेवर, प्रा.पुष्पा भावे, मेधा पाटकर, संध्या नरे-पवार आदींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
  • अंधश्रद्धा निमूर्लन समितीच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांनी सन 1996 पासून डॉ. पी.व्ही. मंडलिक ट्रस्ट बरोबर पंचायत राज प्रशिक्षणामध्ये काम केले आहे.

संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या करारावर स्वाक्षरी

  • रशियाच्या दौऱ्यावर असलेल्या संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी भारतासाठी क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा आणि अणू पाणबुडी घेण्याच्या दृष्टीने वाटाघाटी केल्या आणि उभय देशांतील संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली.
  • भारत रशियाकडून ‘एस-400 ट्राएम्फ’ ही क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा विकत घेण्याचा तसेच आणखी एक अणू पाणबुडी भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रयत्न करत आहे.
  • येत्या डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉस्कोला जाणार आहेत.
  • त्या भेटीत या कराराला अंतिम स्वरूप मिळण्याची अपेक्षा आहे.
  • रशियाने आजवर ही प्रणाली केवळ चीनलाच विकली आहे.
  • चीनने त्यासाठी 3 अब्ज डॉलर मोजले आहेत.
  • जर मोदी यांच्या भेटीत करार झाला तर भारत ही प्रणाली घेणारा दुसरा देश असेल.
  • रशियन सुरक्षा दलांमध्ये 2007 पासून ही प्रणाली कार्यान्वित आहे.
  • भारताकडे यापूर्वीच असलेल्या ‘एस 300’ या रशियन क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेची ही सुधारित आवृत्ती आहे.
  • ‘एस-400 ट्राएम्फ’ शत्रूची विमाने, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेतच 400 किलोमीटर अंतरावर नष्ट करू शकते.
  • ती आपल्या दिशेने येणाऱ्या लक्ष्यांच्या दिशेने तीन प्रकारची वेगवेगळ्या क्षेपणास्त्रे डागू शकते.
  • एकाच वेळी 36 लक्ष्यांचा वेध घेऊ शकते.
  • भारताने रशियाकडून 2012 मध्ये चक्र ही अणू पाणबुडी भाडेतत्त्वावर घेतली होती.
  • रशियाच्या कामोव्ह-226टी या प्रकराच्या 200 हेलिकॉप्टर्सचे भारतात उत्पादन करण्याचा प्रस्ताव आहे.
  • शिवाय सुखोई-30 एमकेआय या लढाऊ विमानांच्या देखभाल-दुरुस्ती संदर्भातही वाटागाटी झाल्या.
 दिनविशेष : 
  • पनामा, डॉमिनिका, मायक्रोनेशिया स्वातंत्र्य दिन
  • जपान संस्कृती दिन
  • 1838 : द टाइम्स ऑफ इंडिया ची द बॉम्बे टाइम्स ॲण्ड जर्नल ऑफ कॉमर्स या नावाने स्थापना.
  • 1903 : शेव्हरोले ची स्थापना
  • 1918 : पोलंड रशीया पासून स्वतंत्र
Previous Post Next Post