लेटेस्ट चालू घडामोडी

Wednesday, October 07, 2015

चालू घडामोडी - ०७ ऑक्टोंबर २०१५ [Current Affairs - October 07, 2015]

सुवर्ण ठेव योजना आणि सुवर्ण रोखे सुरू करण्याची शक्यता

 • केंद्र सरकार पुढील महिन्यात (नोव्हेंबर) सुवर्ण ठेव योजना आणि सुवर्ण रोखे सुरू करण्याची शक्यता आहे.
 • सोन्याची मागणी आणि आयात आटोक्यात आणण्यासाठी लवकरच ही योजना सादर करू शकते.
 • "सुवर्ण ठेव योजना आणि सुवर्ण रोखे (गोल्ड बॉंड)" अश्या दोन योजना आहेत.
 • तसेच सरकार लवकरच अशोक चक्राचे चिन्ह असलेली सोन्याची नाणी विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे.
 • देशातील नागरिकांकडे विविध संस्थांकडे सुमारे 60 लाख कोटी रुपये मूल्याचा सोन्याचा साठा पडून आहे.
 • हा साठा चलनात आणण्यासाठी सरकारने सोने रोखेच्या (गोल्ड बॉण्ड) माध्यमातून नवीन योजना आणली आहे.
 • या योजनेंतर्गत एक व्यक्ती वर्षभरात जास्तीत जास्त 500 ग्रॅम गोल्ड बॉण्ड खरेदी करू शकणार आहे. ज्यावर सरकारकडून व्याज देण्यात येणार आहे, तसेच हे व्याज करमुक्त असणार आहे, अशी माहिती जेटली यांनी दिली आहे.
 • या योजनेअंतर्गत सोने जमा करणाऱ्यास 2.5 टक्के दराने व्याज देण्यात येणार आहे.

भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर

 • विश्‍वात सापडणाऱ्या अतिलघू अशा न्यूट्रिनो कणांना वस्तुमान असते, असा शोध लावणारे जपानचे संशोधक तकाकी काजिता आणि कॅनडाचे संशोधक आर्थर बी मॅक्‌डोनाल्ड यांना या वर्षीचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे.
 • न्यूट्रिनो कणांना वस्तुमान असते या शोधामुळे पदार्थाच्या सगळ्यात छोट्या कणाचे कार्य कसे चालते, याची कल्पना जगाला आली आणि त्याचबरोबर जगाच्या मूलभूत प्रवृत्तीच्या अभ्यासाचे नवे दालन खुले झाले, असे रॉयल स्वीडीश ऍकॅडमी ऑफ सायन्सने म्हटले आहे.
 • पोटान्सच्या खालोखाल न्यूट्रिनो कण सर्वाधिक प्रमाणात आढळतात.
 • हजारो न्यूट्रिनो कण आपल्या शरीरातून प्रवाहित होत असतात. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबतची अत्यंत कमी माहिती आपल्याला होती.
 • तकाकी काजिता आणि आर्थर बी मॅक्‌डोनाल्ड यांनी "न्यूट्रिनो ऑस्सिलेशन"ची पद्धत शोधून काढली. त्यातून त्या कणांची अधिक माहिती मिळण्यास मदत झाली.
 • मॅक्‌डोनाल्ड हे कॅनडातील किंग्स्टनमधील क्विन्स विद्यापीठात "प्रार्टिकल फिजिक्‍स"चे प्राध्यापक आहेत.
 • नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ते म्हणाले, माझ्या संशोधनात अनेक सहकाऱ्यांचा हातभार आहे. त्यांना हा पुरस्कार समर्पित आहे.

अंबागड आणि नगरधन जीपीएसने जोडणार

 • किल्ल्यांवर पर्यटन वाढावे, पुरातत्त्वीय महत्त्व जपले जावे, यासाठी राज्यातील 25 किल्ले ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिमद्वारे (जीपीएस) जोडण्यात येणार आहेत.
 • यामध्ये तुमसरचा अंबागड आणि रामटेकच्या नगरधन किल्ल्याचा समावेश आहे.
 • जीपीएसमुळे जगात कुठेही बसून, गुगलवरून या किल्ल्यांची स्थिती आणि माहिती प्राप्त करता येणार आहे.

महाराष्ट्र विधिमंडळाचे कामकाज झाले ऑनलाइन

 • महाराष्ट्र विधिमंडळाच्या कामकाज आता ऑनलाइन झाले आहे.
 • विधानसभा आणि विधान परिषदेतील भाषणे प्रोसिडिंगच्या स्वरूपात एका क्लिकवर उपलब्ध होणार असून, यापुढे आमदारांना आपले प्रश्न, लक्षवेधी आदी विधिमंडळ सचिवालयाकडे देण्याची गरज भासणार नाही.
 • प्रश्न विचारण्याचीदेखील ऑनलाइन सोय झाली आहे.
 • संपूर्ण कामकाज पेपरलेस करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
 • ऑनलाइन पद्धती
 • आमदारांना लॉगिन नेम आणि पासवर्ड दिला जाईल.
 • तारांकित, अतारांकित प्रश्न, अर्धा तास चर्चा, अल्प सूचना, अशासकीय ठराव, लक्षवेधी सूचना या गोष्टी ऑनलाइन देता येतील.
 • एखाद्या सदस्याला एकापेक्षा जास्त प्रश्न विचारायचे असतील तर त्यासाठी 'बल्क पूटअप'चा पर्याय निवडता येईल. प्रश्नांचे क्रमही आमदारांना ठरवता येतील.

'स्मार्ट सिटी' सल्लागारांची नावे केली जाहीर

 • 'स्मार्ट सिटी' म्हणून विकसित करण्यासाठी निवड झालेल्या देशभरातील 98 शहरांपैकी 88 शहरांसाठी नेमलेल्या 37 सल्लागारांची नावे केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने जाहीर केली.
 • यानुसार महाराष्ट्रातील 10 'स्मार्ट सिटीं'चे आराखडे तयार करण्यासाठी पाच सल्लागार नेमण्यात आले आहेत.
 • निवड झालेल्या प्रत्येक शहराला 'स्मार्ट सिटी'चा संकल्प आराखडा तयार करण्यासाटी केंद्र सरकारने याआधीच दोन कोटी रुपये दिले आहेत.
 • आता हे सल्लागार त्या त्या शहरांचा विद्यमान विकास आराखडा विचारात घेऊन स्थानिक महापालिका व राज्य सरकारच्या देखरेखीखाली 'स्मार्ट सिटी'चे आराखडे तयार करतील.
 • शहरे व त्यांचे सल्लागार :
 1. बृहन्मुंबई : अलिया कन्सल्टिंग सोल्युशन्स प्रा. लि. व जेनेसिस फिन.
 2. पुणे : मॅक्किन्सी कन्सलन्टंट्स
 3. नाशिक : क्रिसिल
 4. औरंगाबाद : नाईट फ्रँक (इं) प्रा. लि, फोर्ट्रेस इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस व पीएसपी फिनान्शियल कन्सल्टंट्स प्रा. लि.
 5. नागपूर: क्रिसिल
 6. नवी मुंबई : टंडन अर्बन सोल्युशन्स प्रा. लि., स्पॅटियल डिसिजन्स व महा इन्फोटेक प्रा. लि.
 7. ठाणे : क्रिसिल
 8. कल्याण-डोंबिवली : क्रिसिल
 9. सोलापूर : क्रिसिल
 10. अमरावती : क्रिसिल

भारत-पाकिस्तान सीमेचे अवकाशातून टिपलेले चित्र नासाने केले शेअर

 • भारत-पाकिस्तान सीमेचे अवकाशातून टिपलेले एक अद्भूत छायाचित्र नासाने शेअर केले आहे.
 • सीमारेषेवर सुरक्षेच्या कारणास्तव लावण्यात आलेल्या दिव्यांमुळे रात्रीच्या काळोखात भारत-पाक सीमारेषा या छायाचित्रात अगदी स्पष्ट उठून दिसते.
 • नासाच्या एका अंतराळवीराने निकॉन डी4 डिजिटल कॅमेरातून 28 मिलिमीटर लेन्सच्या साहाय्याने हे छायाचित्र टीपले असून ते पाकमधील सिंधू नदीपात्रापासून उत्तर दिशेकडे पाहताना टिपण्यात आले आहे.
 • छायाचित्रात भारत-पाक सीमा रेषा केशरी रंगात अतिशय ठळकपणे आपल्याला पाहायला मिळते.
 • तसेच पाकिस्तानातील कराची हे शहर या छायाचित्रात दिव्यांच्या प्रकाशामुळे उजळून निघालेले दिसते.
 • सिंधू नदीपात्र आणि हिमालयाचाही भाग या छायाचित्रात नमूद करण्यात आला आहे.

Tuesday, October 06, 2015

चालू घडामोडी - ०६ ऑक्टोंबर २०१५ [Current Affairs - October 06, 2015]

वैद्यकशास्त्राचे नोबेल जाहीर

 • मानवी शरीरामध्ये असलेल्या परजीवी कृमींवर उपचार शोधून काढणारे आर्यलडचे विल्यम कॅम्पबेल, जपानचे सातोशी ओमुरा आणि मलेरियाच्या परोपजिवी जंतूवर उपाय शोधणाऱ्या चीनच्या श्रीमती योउयू तू यांना वैद्यकशास्त्राचे नोबेल जाहीर करण्यात आले आहे.
 • मानवी शरीरातील गोल कृमींवर उपचारपद्धती कॅम्पबेल व ओमुरा यांनी शोधून काढली, तर तू यांनी मलेरियावर (हिवताप) उपचार शोधले आहेत, त्यांच्या या योगदानासाठी त्यांची निवड करण्यात आली असल्याचे स्वीडनच्या कॅरोलिन्स्का इन्स्टिटय़ूटने म्हटले आहे.
 • या दोन्ही शोधांनी मानवाला रोगांशी लढण्याचे मोठे शस्त्र मिळाले आहे, हजारो-लाखो लोकांना या रोगांचा प्रादुर्भाव दर वर्षी होतो.
 • त्यांना आता चांगले उपचार मिळतील असे नोबेल समितीने म्हटले आहे.
 • नोबेलची रक्कम  ९ लाख ५० हजार डॉलर आहे.
 • विल्यम कॅम्पबेल यांचा जन्म आर्यलडमध्ये सन १९३० मध्ये झाला.
 • ते अमेरिकेतील न्यूजर्सी येथे ड्रय़ू विद्यापीठात कार्यरत आहेत, तर सातोशी ओमुरा यांचा जन्म १९३५ मध्ये जपानमध्ये झाला असून ते टोकियोतील किटासाटो विद्यापीठात संशोधन करीत आहेत.
 • चीनच्या श्रीमती योउयू तू या 'चायना अ‍ॅकॅडमी ऑफ ट्रॅडिशनल चायनीज मेडिसीन' या संस्थेत काम करीत आहेत.
 • कॅम्पबेल व ओमुरा यांनी अवेरमेकटिन नावाचे औषध तयार केले असून, रिव्हर ब्लाइंडनेस व लिंफॅटिक फिलॅरियासिस (हत्तीरोग) या रोगांवर त्याचा उपयोग होतो.
 • रिव्हर ब्लाइंडनेसमध्ये त्वचाविकार होतो व त्याच्या संसर्गजन्य जंतूने अंधत्व येते. तू यांनी आर्टेमिसिनिन हे मलेरियावरचे औषध शोधले आहे.

जर्मनी व भारत यांच्यात समझोता करारांवर स्वाक्षऱ्या

 • जर्मन कंपन्यांच्या उद्योगांना ताबडतोब मान्यता व १ अब्ज युरोचा सौरऊर्जा निधी यासह एकूण १८ करारांवर जर्मनी व भारत यांच्यात समझोता करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी व जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल यांच्यात चर्चा झाल्यानंतर हे करार करण्यात आले.
 • भारत-जर्मनी यांच्यात आंतर सरकारी सल्लामसलतीच्या तिसऱ्या शिखर बैठकीत मोदी व मर्केल यांनी संरक्षण, सुरक्षा, गुप्तचर, रेल्वे, व्यापार, गुंतवणूक, स्वच्छ ऊर्जा या विषयांवर चर्चा केली.
 • जर्मनीत आधुनिक भारतीय भाषांना उत्तेजन, भारतात परदेशी भाषा शिक्षणात जर्मन भाषेला मोठे स्थान देणे याबाबतही करार झाले.
 • तसेच संरक्षण उत्पादन तंत्रज्ञान, गुप्तचर माहिती व दहशतवाद, मूलतत्त्ववादाचा मुकाबला या मुद्दय़ांवर दोन्ही देश सहकार्य करणार आहेत.

कोलंबिया विद्यापीठाचे संशोधन

 • आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यापासून जवळच फोगो ज्वालामुखीचे स्खलन झाले होते व त्यानंतर तेथून ५५ कि.मी. अंतरावर असलेल्या केप वेर्दी बेटांवर ७३ हजार वर्षांपूर्वी ८०० फूट उंचीच्या त्सुनामी लाटा उसळल्या होत्या याचे पुरावे वैज्ञानिकांना मिळाले आहेत.
 • आता या अॅटलांटिकमधील या ज्वालामुखीच्या २,८२९ मीटर उंचीवर असलेल्या शिखराचे स्खलन होण्याची शक्यता असून त्यात २००४ मधील त्सुनामीच्या ११ पट अधिक लोक मरू शकतात.
 • २००४ मध्ये २ लाख ८० हजार लोक आग्नेय आशियात मरण पावले होते.
 • आताच्या लाटा २७० मीटर उंचीच्या असतील असेही सांगण्यात आले, कारण समुद्रसपाटीपासूनची पातळी कमी झाली आहे.
 • केप वेर्दी बेटांवरील सँटियागो या आफ्रिकेतील पश्चिम किनारी भागात संशोधन करण्यात आले.
 • रामलो व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मते सँटियागो येथे २००० फुटांचे दगड सापडले असून ते समुद्र सपाटीपासून ६५० फूट अंतरावर होते.
 • काही दगड हे २५ फूट रुंद व ७७० टन वजनाचे होते.

भारतीय तरुणाने मोडला चिनी युवकाचा गेल्या दहा वर्षांचा विक्रम 

 • गणितातील 'पाय'च्या किमतीतील दशांशानंतरच्या ७० हजार स्थानांवरील आकडे तोंडपाठ करणाऱ्या २१ वर्षे वयाच्या एका भारतीय तरुणाने चिनी युवकाचा गेल्या दहा वर्षांचा विक्रम मोडून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे.
 • राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्य़ातील मोहोचा खेडय़ात राहणारा राजीव मीणा याने गेल्या मार्च महिन्यात 'पाय'च्या किमतीच्या दशांशानंतरचे ७० हजार आकडे ९ तास २७ मिनिटांत म्हणून दाखवत हा रेकॉर्ड स्थापित केला होता.
 • यासाठी त्याला गिनीज बुकचे स्मरणशक्तीसाठीचे प्रमाणपत्र १ ऑक्टोबरला देण्यात आले.
 • पायची लक्षात ठेवलेली दशांशानंतरची सर्वाधिक स्थाने ७० हजार असून, भारतातील वेल्लोरच्या व्हीआयटी विद्यापीठात शिकणाऱ्या राजीव मीणा याने हे २१ मार्च २०१५ रोजी हे साध्य केले आहे.
 • हे आकडे म्हणण्यासाठी लागलेले सुमारे १० तास तो डोळ्यांवर पट्टी बांधून होता.

इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ प्रमाणपत्र व पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणार

 • माहिती अधिकार कायद्याचे सामाजिक महत्त्व लक्षात घेऊन इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ त्या विषयात प्रमाणपत्र व पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणार आहे.
 • केंद्रीय माहिती आयुक्तालयाच्या माध्यमातून हे अभ्यासक्रम तयार करून ते राबवले जाणार आहेत.
 • सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना या अभ्यासक्रमाच्या परीक्षा उत्तीर्ण होणे सक्तीचे राहील.
 • यासाठी कैद्यांनाही प्रवेश खुला आहे.
 • पत्रकारही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतील.

जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या गोमांस बंदीवर स्थगिती

 • जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या गोमांस बंदी लागू करण्याच्या आदेशास सर्वोच्च न्यायालयाने दोन महिने स्थगिती दिली.
 • किंबहुना हा आदेश निलंबित ठेवण्यात येणार आहे.
 • दरम्यान गोमांस बंदीबाबत काश्मीरमधील खंडपीठांनी परस्परविरोधी निर्णय दिल्याच्या प्रकरणी तीन सदस्यांचे खास पीठ स्थापन करण्याचा आदेश जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना दिला आहे.
 • सरन्यायाधीश एच.एल.दत्तू यांनी गोमांस बंदी आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या उच्च न्यायालयाच्या ८ सप्टेंबरच्या आदेशास दोन महिने स्थगिती दिली आहे.
 • रणबीर दंड संहितेच्या आधारे जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या जम्मू पीठाने गोमांस बंदीची अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला होता तर श्रीनगर खंडपीठाने गोमांस बंदी लागू करता येणार नाही असा निकाल दिला होता.

"स्मार्ट सिटी"च्या आराखड्यातील लोकसहभागाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू

 • मनामनांतील स्मार्ट शहराची संकल्पना साकारण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या "स्मार्ट सिटी"च्या आराखड्यातील लोकसहभागाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होत आहे.
 • वाहतूक, पाणी, घनकचरा, पर्यावरण, सुरक्षितता आदी विषयांवर ऑनलाइन पद्धतीने पुणेकरांचा कौल घेऊन शहर "नंबर वन" करण्यासाठी महापालिका पावले टाकणार आहे.
 • सुमारे सव्वातीन लाखांहून अधिक कुटुंबांनी त्यात "स्मार्ट सिटी"ची कल्पना कशी असावी, हे स्पष्ट करणारे फॉर्म भरून महापालिकेला दिले.
 • या सर्वेक्षणातून वाहतूक आणि दळणवळण, पाणी व मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण, सुरक्षितता, ऊर्जा व वीजपुरवठा हे विभाग स्मार्ट सिटीसाठी अत्यावश्‍यक असल्याचे पुणेकरांनी म्हटले आहे.
 • राष्ट्रीय सेवा योजनेतील युवक, बचत गटांच्या समूह संघटिका, सिंबायोसिससह अन्य महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि महापालिका कर्मचारी आदी सुमारे ८०० जण या सर्वेक्षणात सहभागी होणार आहेत.
 • त्याशिवाय नागरिकांना ते राहत असलेल्या भागात नजीकच्या महा-ई-सेवा केंद्रातील संगणकांवर, महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांतही www.punesmartcity.in या संकेतस्थळावर मत व्यक्त करता येणार आहे.
 • ऑनलाइन सर्वेक्षणाची मोहीम १२ ऑक्‍टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

"किसान ऍप" हा नवा प्रकल्प चाचणी तत्त्वावर सुरू

 • दुष्काळ व गारपिटीच्या अस्मानी संकटाने भरडलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी विम्याची रक्कम लवकरात लवकर व पारदर्शीपणे मिळावी, यासाठी केंद्र सरकारने नुकसानाचे शास्त्रशुद्ध मूल्यमापन करणारा "किसान ऍप" हा नवा प्रकल्प चाचणी तत्त्वावर सुरू केला.याच्या पहिल्याचार लाभार्थी जिल्ह्यांत यवतमाळचा समावेश आहे, असे केंद्रीय कृषी राज्यमंत्री संजीवकुमार बालियान यांनी आज सांगितले.
 • हे नवे ऍप अँड्रॉइड प्रणालीने कार्यरत राहील.
 • या नव्या ऍपमुळे नैसर्गिक संकटात नुकसान सोसावे लागलेल्या व अनेकदा मरण कवटाळणाऱ्या शेतकऱ्याला विमा रकमेची भरपाई त्वरित; म्हणजे शक्‍यतो त्याच हंगामात मिळू शकेल.
 • हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), नॅशनल क्रॉप फोरकास्ट सेंटर, भारतीय हवामानशास्त्र विभाग, केंद्र व राज्यांची कृषी मंत्रालये व कृषी विभाग, रिमोट सेन्सिंग सेंटर्स, कृषी व अन्नसुरक्षा विभाग (सीसीएएफएस) या विभागांच्या मार्फत संयुक्तरीत्या राबविण्यात येईल.
 • हे किसान ऍप शेतकरीही आपल्या मोबाईलवर डाउनलोड करू शकतील.
 • सरकारने चार लाभार्थी जिल्हे आज जाहीर केले असले तरी पहिल्या टप्प्यात सरकारने आठ जिल्हे निवडले असून, घोषणा न झालेल्यांत यवतमाळसह राज्यातील नगर व सोलापूर जिल्ह्यांचाही समावेश करण्यात आल्याचे समजते.

स्वित्झर्लंड लवकरच नागरिकांच्या खात्यांची सूची जाहीर करणार

 • स्वित्झर्लंड लवकरच गेल्या ६० वर्षांत कोणताही हक्क न सांगितलेल्या भारतीय तसेच इतर देशांच्या नागरिकांच्या खात्यांची सूची जाहीर करणार आहे.
 • स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये असलेल्या अश्या खात्यांची सूची डिसेंबरमध्ये जाहीर करण्यात येणार आहे.
 • स्वित्झर्लंडने अश्या खातेधारकांचा तपशील गेल्या अनेक वर्षांपासून गुप्त ठेवला आहे.
 • मात्र, आता तेथील खात्यांचा तपशील जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 • सर्व स्वित्झर्लंडच्या बँकांकडून माहिती संकलित केल्यानंतर स्विस बॅंकिंग लोकपाल सर्व तपशिल जाहीर करणार आहे.
 • तसेच त्या खात्यांच्या हक्कदारांना (लाभार्थी) हक्क सादर करण्यासाठी संधी दिली जाणार आहे.
 • ही खाती १९५५ पासून निष्क्रिय पडून आहेत.
 • स्विस बँकर्स असोसिएशन, स्वित्झर्लंडमधील हक्क न सांगितलेल्या खात्यांच्या तपशीलात खातेधारकाचे आडनाव, नाव, जन्म तारीख, राष्ट्रीयत्व व खातेदाराचा त्यावेळचा ज्ञात पत्त्याचा समावेश असणार आहे.
 • परंतू डिसेंबरमध्ये जाहीर करण्यात येणार्‍या सूचीमध्ये खात्यातील संपत्ती, बॅंकेचे नाव जाहीर करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस हॉनररी डॉक्टरेट या पदवीने सन्मान करणार

 • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जपानमधील ओसाका सिटी विद्यापीठ हॉनररी डॉक्टरेट या पदवीने सन्मान करणार आहे.
 • हा या विद्यापीठाचा सर्वोच्च सन्मान असून या पुरस्काराने गौरवण्यात येणारे फडणवीस हे पहिले भारतीय आहेत.
 • ओसामा सिटी विद्यापीठाला १२० वर्षांची परंपरा असून आत्तापर्यंत या विद्यापीठाने जगातील अवघ्या १० व्यक्तिंना हॉनररी डॉक्टरेट पदवीने गौरवलेले आहे.
 • महाराष्ट्रात सामाजिक व आर्थिक विकासासाठी सुधारणांची प्रक्रिया सुरू करण्याचे काम फडणवीसांनी सुरू केल्यामुळे त्यांना गौरवण्यात येत असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.
 • विद्यापीठाने हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी तसेच विद्यापीठामध्ये आपले विचार मांडण्यासाठी आणि विद्यार्थी व जपानी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित केले आहे.

Monday, October 05, 2015

चालू घडामोडी - ०५ ऑक्टोंबर २०१५ [Current Affairs - October 05, 2015]

पॅरिसमध्ये डिसेंबरमध्ये हवामान बदल परिषद

 • पॅरिसमध्ये डिसेंबरमध्ये हवामान बदल परिषद होत असून त्यात नवा हवामान करार होण्याची शक्‍यता आहे.
 • भारतातील हरितवायूंची उत्सर्जन तीव्रता २०३० पर्यंत ३३ ते ३५ टक्के कमी करण्याचे उद्दिष्ट आहे.
 • अमेरिका आणि चीन या जगातील दोन मोठ्या प्रदूषकांच्या पंक्तीत भारताला बसविण्यात आले आहे.
 • याचवेळी भारताने मोठ्या कंपन्यांना स्वच्छ आणि हरित तंत्रज्ञानासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.
 • मोदी आणि ओबामा यांच्या तिसऱ्या भेटीत अनेक व्यापक विषयांवर चर्चा झाली.
 • तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीचे कायम सदस्यत्व मिळावे यासाठी जी-4 देशांच्या (जपान, भारत, जर्मनी, ब्राझील) बैठकीने योग्य वेळ साधली.
 • निरीक्षकांच्या मते सुरक्षा समितीत सुधारणा नोव्हेंबरपासून सुरू होणे अपेक्षित आहे.
 • सुरक्षा समितीत मतभेद होण्याआधी त्या सुधारणा करण्याची अमेरिकेची भूमिका असणार आहे.
 • जर्मनी आणि जपान यांनी भारताला नकाराधिकाराशिवाय कायम सदस्यत्व दिले जाण्यास तयारी दर्शविली आहे.
 • तसेच अमेरिकी संरक्षण सामग्री आणि शस्त्रास्त्रांवरील भर वाढविण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.
 • भारताला २२ 'एएच-६४ ई' अपाचे आणि १५ 'सीएच-४७ एफ' चिनूक हेलिकॉप्टर अमेरिकेकडून २०१८ पर्यंत मिळणार आहेत.
 • सध्याच्या एमआय- ३५ आणि एम- २६ या रशियन हेलिकॉप्टरची जागा ते घेतील.

केंद्र सरकारचा भूसंपादन कायदा संमत

 • केंद्र सरकारचा भूसंपादन कायदा संमत झाला असता तर नवीन कायद्यानुसार जमिनींचे व्यवहार करता आले असते.
 • मात्र, नवा भूसंपादन कायदाच न आल्याने सर्वच राज्यांना मूळ कायद्याच्या आधारेच जमिनींचे व्यवहार करावे लागणार आहेत.
 • संपूर्ण देशाचा विचार केला तर केवळ महाराष्ट्रातच शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करताना त्याला बाजारभावाप्रमाणे पाचपट मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 भूसंपादन : 
 • शेतकऱ्यांना जमिनीचा संपूर्ण मोबदला एकरकमी देणे किंवा ५० टक्‍के मोबदला देऊन उर्वरित ५० टक्‍क्‍यांची रक्‍कम काही वर्षांच्या हप्त्याने देणे
 • मोबदला ठरविण्यासाठी गठित केलेल्या समितीत जलसंपदा किंवा सार्वजनिक बांधकाम विभागांचे अधीक्षक अभियंता महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
 • काही जिल्ह्यात अधीक्षक अभियंता दर्जाचे पद नसेल तर शेजारच्या जिल्ह्यातील अधिकारी जमिनीचे मूल्यांकन करणार
 • जमिनीची कागदपत्रे तपासण्यासाठी सरकारी वकिलाची समितीत नियुक्ती.
 • वैधानिक विकास मंडळाचे वकीलही काम पूर्ण करू शकतात

जगाचा नकाशाही बदलत असल्याचे संशोधन

 • जागतिक तापमानवाढीमुळे होणाऱ्या दुष्पपरिणांमध्ये आणखी एका गोष्टीची भर पडली असून, यामुळे जगाचा नकाशाही बदलत असल्याचे ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासावरून स्पष्ट झाले आहे.
 • तुलनात्मकदृष्ट्या, जगातील सर्वांत वेगाने उष्ण होत चाललेला प्रदेश म्हणून कॅनडियन आर्क्‍टिक हा भाग ओळखला जातो.
 • येथे जागतिक तापमानवाढीचा बदल थेट दिसून येत आहे.
 • गेल्या पन्नास वर्षांमध्ये या भागाचे तापमान चार अंश सेल्सिअसने वाढले असून, येथील तापमान शून्य अंशांच्या वर गेल्यास हिमनद्या शंभर पट अधिक वेगाने वाहत आहेत.
 • मिशेल कूप्स या संशोधकाने पेटॅगोनिया आणि अंटार्क्‍टिक किनाऱ्यावरील हिमनद्यांची तुलना करून याचे विश्‍लेषण केले आहे.
 • या अभ्यासानुसार, तापमानवाढ आणि वेगाने वितळणाऱ्या बर्फामुळे पेटॅगोनियामधील हिमनद्या अधिक वेगाने वाहत आहेत.
 • यामुळे हिमनद्यांचे तळ सरकत आहेत. हा सर्व भाग एकाच भूप्रतलाचा असला, तरी येथील वातावरणांमध्ये फरक आहे.
 • पेटॅगोनियामधील वेगाने वाहणाऱ्या हिमनद्यांमुळे किनाऱ्याच्या भागाची मोठ्या प्रमाणावर झीज होत आहे.
 • यामुळे मोठ्या हिमपर्वतांचा भाग मूळ भागापासून वेगळा होण्याची शक्‍यता असून, काही हिमतुकडे आधीच वेगळे झाले आहेत.
 • ध्रुवापासून दूर जसजसे दूर जाऊ, तसे हिमनद्यांचा वेग वाढत आहे. तापमानवाढीमुळे हा बदल होत असून, त्याचा परिणाम म्हणून झीज वाढणे, पाण्याचे प्रमाण वाढणे आणि हिमनगांची जागा बदलणे असा होत आहे.

एफआयआर ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा

 • गुन्ह्याबाबतचा प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा ओडिशामध्ये सुरु करण्यात आली असून मुख्यमंत्री नवीन पटनायईक यांनी शनिवारी या सेवेचे उद्‌घाटन केले आहे.
 • केंद्र पुरस्कृत क्राइम ऍण्ड क्राईम ट्रॅकिंग नेटवर्क ऍण्ड सिस्टीम्स्‌ (सीसीटीएनएस) प्रकल्पांतर्गत "ई-एफआयआर"ची सुविधेचा प्रारंभ करण्यात आला आहे.
 • या सुविधेमुळे राज्यातील तंत्रशिक्षितांना ऑनलाईन एफआयआर दाखल करता येणे शक्‍य होणार आहे.
 • त्यासाठी राज्यातील ५३१ पोलिस स्थानकांचे संगणकीकरण करण्यात आले आहे.
 • "www.citizenportal-op.gov.in" या संकेतस्थळावरून लोकांना तक्रारी दाखल करणे, एफआयआरची प्रतीची मागणी करणे, भाडेकरूची तपासणी करणे, परवान्यासाठी अर्ज, आंदोलन-अर्जासाठी परवाना, चारित्र्य प्रमाणपत्रासाठी अर्ज, कर्मचाऱ्यांची पडताळणी, हरवलेल्या व्यक्तींची तसेच वस्तूंची तक्रार दाखल करता येणार आहे.

राज्यातील सहा साहित्यिकांनी साहित्य पुरस्कार परत करण्याचा निर्णय

 • विचारवंत व साहित्यिक डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना महिन्यानंतरही पकडण्यात अपयश आल्याच्या निषेधार्थ राज्यातील सहा साहित्यिकांनी "बीएमटीसी अरळु साहित्य पुरस्कार" परत करण्याचा निर्णय घेतला.
 • वीरण्णा मडिवाळर (बेळगाव), टी. सतीश जवरेगौडा (मंड्या), संगमेश मेणसीनकाई (धारवाड), हणमंत हालिगेरी (बागलकोट), श्रीदेवी आलूर (बळ्ळारी) आणि चिदानंद साली (रायचूर) अशी त्या साहित्यिकांची नावे आहेत.
 • डॉ. कलबुर्गी यांची ३० ऑगस्टला धारवाडमधील त्यांच्या राहत्या घरात हत्या झाली. गुन्हे अन्वेषण विभागाकडून त्यांच्या हत्येचा तपास सुरू आहे.
 • कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुंडलिक हालंबी यांनी पुरस्कार परत करण्यात येत असल्याबद्दल जाहीर केले.

सानिया आणि मार्टिना वर्षातील सातवे विजेतेपद

 • सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस यांनी आपला धडाका कायम ठेवत या वर्षातील सातवे विजेतेपद पटकाविले आहे.
 • सानिया व मार्टिन यांच्या जोडीने वुहान ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत इरिना कॅमेलिया बेगू-मोनिका निकुलेस्कू या जोडीचा ६-२, ६-३ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करत विजेतेपद पटकाविले.
 • अमेरिकन ओपन स्पर्धेचे विजेतेपद मिळविल्यानंतर या जोडीने सलग दोन डब्लूटीए स्पर्धांत महिला दुहेरीचे विजेतेपद मिळविले आहे.
 • सानिया व मार्टिनाच्या जोडीचे हे या वर्षातील सातवे विजेतेपद आहे.
 • या दोघींनी उपांत्य फेरीच्या लढतीत तैवानच्या चौथ्या मानांकित चिंग चॅन-युंह यान चान जोडीचा ५३ मिनिटांत ६-२, ६-१ असा पराभव केला होता.

मॅजिक क्यूब नावाचा महासंगणक तयार

 • पृथ्वीचे भवितव्य काय असेल तसेच हवामान व जैविक प्रणालींमध्ये काय बदल होतील या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी चीनने एक योजना आखली असून त्यात मॅजिक क्यूब नावाचा एक दोन मजली महासंगणक तयार करण्यात आला आहे.
 • त्याचा खर्च १.४ कोटी डॉलर्स इतका आहे.
 • चीनच्या वैज्ञानिकांनी असे म्हटले आहे की, पृथ्वीवरील नैसर्गिक प्रणालीत होणारे बदल शोधले जाऊ शकतात किंवा त्याची नोंद करता येईल.
 • अगदी ढगांच्या निर्मितीतील बदलांपासून सर्व बाबतीत आगामी काळात होणाऱ्या बदलांचे भाकित करता येतील.
 • चायनीज अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या या योजनेत अनेक संस्था सहभागी होत असून एक खास महासंगणक त्यासाठी तयार करण्यात आला आहे.
 • अर्थ सिस्टीम न्युमरिकल सिम्युलेटर अँड सॉफ्टवेअरचे प्राथमिक रूप असलेल्या या महासंगणकाला सीएएस अर्थ सिस्टीम मॉडेल १.० असे नाव देण्यात आले आहे.
 • त्याचे नाव ब्लू मॅजिक क्यूब असून तो उत्तर बीजिंगमध्ये झोंगुआनकुन सॉफ्टवेअर पार्कमध्ये ठेवण्यात आला आहे. त्यात ९ कोटी युआन म्हणजे १.४ कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
 • त्याची क्षमता १ पेंटाफ्लॉप असून तो चीनमधील दहा शक्तिमान महासंगणकांपैकी एक असणार आहे.
 • त्याची साठवण क्षमता ५ पीबी आहे.
 • आगामी प्रगत मॅजिक क्युबच्या एक दशांश आकाराचा हा महासंगणक आहे.
 • सध्या त्याच्या मदतीने हवा प्रदूषण व हवामान अंदाज कमी काळाकरिता दिले जातील.

नरेंद्र मोदी व चान्सलर अँगेला मर्केल हे व्यापक चर्चा करणार

 • प्रमुख क्षेत्रांमध्ये भारत व जर्मनीतील द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व जर्मनीच्या चान्सलर अँगेला मर्केल हे आज व्यापक चर्चा करणार असून त्यात व्यापार, सुरक्षा व संरक्षणविषयक संबंध वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.
 • संरक्षण, शिक्षण, नविनीकरणीय ऊर्जा, उच्च तंत्रज्ञान, कौशल्य विकास, विज्ञान व तंत्रज्ञान, रेल्वे, पाणी आणि कचरा व्यवस्थापन, नागरी विकास आणि कृषी या क्षेत्रांमधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यावर या बोलण्यांमध्ये भर दिला जाण्याची अपेक्षा आहे.
 • भारत व जर्मनी हे २००१ सालापासून महत्त्वाचे भागीदार आहेत.
 • मोदी यांच्या जर्मनी दौऱ्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी मर्केल या तीन दिवसांच्या भारत भेटीवर येत आहेत.

इंग्लंड राजदूतपदी अजय शर्मा यांची नियुक्ती

 • इंग्लंड सरकारने कतारमधील राजदूतपदी भारतीय वंशाचे राजदूत अजय शर्मा यांची नियुक्ती केली आहे.
 • शर्मा हे इराणमध्ये परराष्ट्र आणि राष्ट्रकुल विभागाचे प्रमुखपदी आहेत.
 • नोव्हेंबरमध्ये ते कतारमधील जबाबदारी स्वीकारतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
 • निकोलस हॉप्टन यांची दुसऱ्या पदावर नियुक्ती करण्यात आल्याने शर्मा यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे.

जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल भारतात

 • जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल भारतात आल्या असून त्यांच्यासमवेच अनेक वरिष्ठ मंत्री व अधिकारी असणार आहेत.
 • व्यापार व सुरक्षा या मुद्दय़ांवर चर्चा करण्यासाठी येत असून दोन्ही देशांच्या मंत्रिमंडळाची संयुक्त बैठक होत आहे.
 • मर्केल व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी संयुक्तपणे आंतर सरकारी सल्लामसलत बैठकीचे नेतृत्व करतील.
 • त्या बंगळुरू येथील रॉबर्ट बॉश्च कंपनीला भेट देणार असून त्यावेळी मोदी त्यांच्यासमवेत असणार आहेत.
 • भारत व जर्मनीच्या उद्योजकांची एकत्र बैठक बंगळुरू येथे होणार आहे.

शशांक मनोहर बीसीसीआय अध्यक्षपदी

 • नागपूर येथील ज्येष्ठ वकील शशांक मनोहर यांची रविवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
 • नामांकन अर्ज सादर करण्याची मुदत शनिवारी संपल्यानंतर मनोहर यांचा एकमेव अर्ज होता.
 • जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी पोटनिवडणूक घेणे आवश्यक होते.
 • मनोहर यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ २०१७ मध्ये संपणार आहे.

व्याघ्रदूत अमिताभ बच्चन यांच्या हस्ते सन्मान

 • वन्यजीवांचे संरक्षण, वनगुन्ह्यांचा तपास आदी कार्याचा गौरव म्हणून वनविभागातील अधिकारी, कर्मचारी आणि संस्था प्रतिनिधींना व्याघ्रदूत अमिताभ बच्चन यांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे.
 • येत्या मंगळवारी बोरीवली (मुंबई) येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात हा कार्यक्रम घेतला जाणार आहे.
 • विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वनविभागाने पुरस्कार जाहीर केले आहेत.
 • शहापूर इको विकास समिती व राखीव व्याघ्र प्रकल्प अमरावतीचे अध्यक्ष व्यंकट मुडे व सचिव प्रतिभा तुरक आणि बफर डिव्हिजन चंद्रपूरचे अध्यक्ष रमेश गेडाम आणि सचिव डी.एम. कुळमेथे यांना पुरस्कृत केले जाणार आहे.
 • 'वन्यजीव व्यवस्थापन-2015' या विषयात वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित माने यांचा सन्मान केला जाणार आहे.

गांधीजींच्या संकेतस्थळावर १ लाख हिट्सची वाढ

 • दोन दिवसांत या संकेतस्थळाला २ लाख नागरिकांनी भेट दिली असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा यामध्ये 1 लाख हिट्सची वाढ झाली आहे.
 • देशासह जगभरातून या संकेतस्थळाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
 • गांधीयन ऑर्गनायझेशन, बॉम्बे सर्वोदय मंडळ आणि मुंबई आणि गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव या संस्थांमार्फत www.mkgandhi.org हे संकेतस्थळ गेल्या १५ वर्षांपासून चालविण्यात येत आहे.
 • ते दररोज अपडेट करण्यात येते. सहा विविध आत्मचरित्रं, गांधी यांच्या कार्याचे १०० भाग, यासह ऑनलाइन बुक, ५०० फोटो, विविध विषयांवरील ८०० लेख असे साहित्य मोफत उपलब्ध आहे.

ज्येष्ठ नागरिकांना धान्य व साखर योजना

 • राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना रेशनवर प्रत्येकी ३५ किलो धान्य व साखर देण्यासाठी राज्य शासनाचा विचार सुरू असून आगामी सहा महिन्यांत ही योजना सुरू केली
  जाणार असल्याची घोषणा अन्न व नागरीपुरवठामंत्री गिरीष बापट यांनी शनिवारी केली.
 • तसेच ज्या वृद्धांना मुलेसांभाळत नाहीत, त्यांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मानधन देण्यासाठीही शासकीय पातळीवर विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

'चेरॉन' या सर्वात मोठ्या चंद्राची छायाचित्रे

 • नासाच्या न्यू होरायझन यानाने प्लुटोच्या 'चेरॉन' या सर्वात मोठ्या चंद्राची आजवरची सर्वात सुस्पष्ट छायाचित्रे टिपली आहेत.
 • त्यामुळे प्लुटोच्या अनेक भूगर्भीय रहस्यांचा उलगडा होण्यास मदत होणार असल्याचा आणि प्लुटोच्या गहन आणि भीषण इतिहासावर प्रकाश पडणार असल्याचा दावा 'नासा'तर्फे करण्यात आला आहे.
 • प्लुटो या सूर्यमालेतील ग्रहाबद्दल फारशी माहिती नाही.
 • प्लुटोचा 'चेरॉन' हा सर्वात मोठा चंद्र प्लुटोच्या व्यासाच्या निम्म्या आकाराचा येतो.
 • 'चेरॉन' हा चंद्र केवळ पर्वतीय आणि ओबडधोबड असल्याचा समज होता पण तो पर्वतीय, उंच शिखरे, सपाट भूप्रदेश आणि भूपृष्ठावर वेगवेगळे रंग असणारा असल्याचे नव्या चित्रावरून दिसून येते.
 • 'न्यू होरायझन' यानाने १४ जुलै रोजी प्लुटोभोवती फेरी मारली आणि त्यावेळी टिपलेली छायाचित्रे २१ सप्टेंबर रोजी पाठविली.
 • त्यात या चंद्राच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर ओबडधोबड, पर्वतीय भाग दिसतो.
 दिनविशेष : 
 • पोर्तुगाल प्रजासत्ताक दिन
 • १९१० : पोर्तुगाल प्रजासत्ताक झाले.

Saturday, October 03, 2015

चालू घडामोडी - ०३ ऑक्टोंबर २०१५ [Current Affairs - October 03, 2015]

मोबाईल फोन्समध्ये पॅनिक बटणाची सुविधा आणण्याचा सरकारचा विचार

 • महिला सुरक्षेसाठी मोबाईल फोन्समध्ये पॅनिक बटणाची सुविधा आणण्याचा सरकारचा विचार आहे.
 • यासाठी सर्व मोबाईल कंपन्यांना विचारणा करण्यात आली असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी आज दिली.
 • यामध्ये विशेष नेकलेस, ब्रेसलेट्‌स आणि अंगठ्या आदींसह अनेक कल्पक आणि नावीन्यपूर्ण कल्पनांचा समावेश होता.
 • सध्या असलेल्या एसओएस मेसेज सिस्टिमद्वारे या माध्यमातून मुलगी असुरक्षित असताना संदेश पोचवून तिची मदत करता येऊ शकते हे आपल्याला ठाऊक आहेच.
 • नेकलेस किंवा अन्य गोष्टी नेहमीच जवळ बाळगणे सोईस्कर नसल्याने अखेर "स्मार्ट" फोनचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 • फोनमध्ये देण्यात येणारे हे पॅनिक बटण दाबताच सिस्टिममध्ये फीड असलेल्या काही मोजक्‍या लोकांना तत्काळ त्या मुलीच्या ठिकाणाविषयीची माहिती मिळेल आणि तिला मदत करणे शक्‍य होईल.
 • याबाबत सर्व मोबाईल कंपन्यांशी चर्चा सुरू असून, लवकरच फोनमध्ये हे बटण दिसेल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

भारत आणि चीनदरम्यान सीमा अधिकारांची बैठक

 • भारत आणि चीनदरम्यान सीमा अधिकारांची बैठक तवाम्ग जिल्ह्यातील बुमला येथे आयोजित करण्यात आली आहे.
 • चीनच्या राष्ट्रीय दिवसानिमित्त आयोजित या बैठकीला दोन्ही देशांची शिष्टमंडळे उपस्थित राहणार असून, या वेळी विविध मुद्यांवर चर्चा होणार आहे.

मंगळावर अगदी वाहते पाणी

 • मंगळ या पृथ्वीच्या शेजाऱ्याकडे मायंदाळ पाणी असल्याचे सुखद वृत्त 'नासा' या अमेरिकी अवकाश संशोधन संस्थेने नुकतेच दिले.
 • मंगळावर बर्फाच्या टोप्या घातलेली उत्तुंग शिखरे आहेत, पण तिथे पाणी असल्याचा ठाम दावा आजवर कधी झाला नव्हता.
 • पण किमान चार भक्‍कम वैश्‍विक पुरावे हाती ठेवून नासाच्या संशोधकांनी निर्वाळा दिला आहे की मंगळावर पाणी आहे, अगदी वाहते पाणी आहे.
 • तिथल्या लाल पृष्ठभागावर ज्या ठळक निळ्या रेघोट्या दिसताहेत, त्या प्रत्यक्षात नद्या आहेत.
 • मंगळावरच्या जलसाठ्यांचे हे गुपित फोडले 'क्‍युरिऑसिटी रोव्हर' या 'नासा'ने 2011 च्या नोव्हेंबरात पाठवलेल्या अंतराळयानाने.
 • खरे तर हे यान म्हणजे संपूर्णपणे स्वयंचलित आणि सुसज्ज असे वाहनच आहे.
 • सध्या ते तिथल्या पृष्ठभूमीवर हिंडून दगड, मातीचे नमुने गोळा करते आहे.
 • जमेल तितके त्यांचे विश्‍लेषण करून त्याचा तपशीलही पाठवते आहे.
 • रोव्हरने आजवर मंगळभूमीची हजारो छायाचित्रे पाठवली आहेत.
 • १९६७ मध्ये संयुक्‍त राष्ट्रांनी एक बाह्य अंतराळविषयक करार केला आहे.
 • 'आऊटर स्पेस ट्रिटी' या नावाने तो ओळखला जातो.
 • या करारानुसार भविष्यात अशी शक्‍यता उद्‌भवलीच, तर पृथ्वीवरील जीवजंतूंची वैश्‍विक निर्यात संपूर्णपणे टाळण्यासाठी सर्व संबंधित राष्ट्रे वचनबद्ध असतील.
 • हा करार जवळपास साठ वर्षांपूर्वीचा असला तरी आम्ही त्यास बांधील आहोत, असे 'नासा'च्या मंगळ संशोधन प्रकल्पाच्या प्रमुखांनी स्पष्ट केले आहे.

फुटबॉल जागतिक क्रमवारीमध्ये अर्जेंटिना अग्रस्थानी

 • फुटबॉल क्षेत्रामधील शिखर संस्था असलेल्या फिफाने प्रसिद्ध केलेल्या जागतिक क्रमवारीमध्ये अर्जेंटिना अग्रस्थानी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 • जर्मनीने बेल्जियमला मागे टाकत या क्रमवारीमध्ये द्वितीय स्थान मिळविले आहे.
 • जर्मनीचे एकूण १,४०१ गुण आहेत.
 • यामुळे आता अर्जेंटिना व जर्मनीमध्ये अवघ्या १८ गुणांचा फरक आहे.
 • या क्रमवारीमध्ये पोर्तुगाल (क्रमांक चार), स्पेन (क्रमांक सहा), कोलंबिया (क्रमांक आठ) या देशांचाही समावेश असून ब्राझील सातव्या स्थानावर फेकला गेला आहे.
 • या क्रमवारीमध्ये इराण (क्रमांक ३९) हा आशियामधील सर्वोच्च क्रमांक मिळविणारा देश ठरला आहे.
 • भारतीय फुटबॉल संघाची 'फिफा' क्रमवारी १२ स्थानाने घसरली असून या क्रमवारीत भारत १६७ व्या स्थानावर आला आहे.

क्रिकेटपटू अजय जडेजा याचा दिल्लीच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा

 • माजी क्रिकेटपटू अजय जडेजा यांनी दिल्लीच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्याने दिल्ली संघासमोर अडचणी वाढल्या आहेत.
 • तसेच डीडीसीएने मात्र याबाबत जडेजा यांच्याकडून कोणतेही अधिकृत पत्र मिळाले नसल्याचे सांगितले.
 • जडेजा यांनी गतमहिन्यामध्येच दिल्लीच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली होती.

लखनौतील कुटुंबाकडे ३०० वर्षांपूर्वी उर्दूत लिहिलेले महाभारत

 • जुन्या लखनौतील करबाला कॉलनीतील मंजुल या कुटुंबाकडे गेल्या पाच पिढ्यांपासून चालत आलेला हा अमूल्य ठेवा म्हणजे सुमारे ३०० वर्षांपूर्वी उर्दूत लिहिलेले महाभारत सापडले आहे.
 • पणजोबा मवाली हुसेन नसीरबादी यांनी रायबरेली या जन्मगावी आपल्या वाचनालयात हा ग्रंथ जतन करून ठेवला होता.
 • विशेष म्हणजे उर्दूत लिहिलेल्या या महाभारतातील प्रत्येक प्रकरणात अरबी आणि पर्शियन भाषेत प्रस्तावना दिली आहे.
 • हा ग्रंथ म्हणजे केवळ शब्दश: अनुवाद नसून ते सोप्या गोष्टीरूपात लिहिलेले आहे.
 • प्रत्येक प्रकरणात अरेबिक अवतरणांमध्ये माहिती दिली आहे.

मराठमोळा लेखक सुदीप नगरकरने बेस्ट सेलरच्या यादीत अव्वल क्रमांक

 • इंग्रजी साहित्य क्षेत्रातील मराठमोळा लेखक सुदीप नगरकरने पुन्हा एकदा बेस्ट सेलरच्या यादीत अव्वल क्रमांक पटकावला आहे.
 • दोन आठवड्यांपूर्वी प्रकाशित झालेल्या 'यू आर ट्रेडिंग इन माय लाईफ' या सुदीपच्या कादंबरीचे 50 हजारहून अधिक प्रति विकल्या गेल्या असून बेस्ट सेलरच्या स्पर्धेत सुदीपने चेतन भगतलाही मागे टाकले आहे.
 • सर्वाधिक खपाच्या टॉप १० कादंबरींमध्ये मध्ये सुदीपची कांदबरी पहिल्या तर चेतनचे पुस्तक दुस-या स्थानावर आहे.

शॉरॉन हा गुंतागुंतीचा व स्फोटक भूगर्भीय इतिहास असलेला उपग्रह असल्याचे सूचित

 • नासाच्या न्यू होरायझन्स या अवकाशयानाने प्लुटोच्या शॉरॉन या उपग्रहाची वेगळी व अतिशय जास्त विवर्तनक्षमता असलेली छायाचित्रे पाठवली आहेत.
 • या छायाचित्रांवरून तरी शॉरॉन हा गुंतागुंतीचा व स्फोटक भूगर्भीय इतिहास असलेला उपग्रह असल्याचे सूचित होत आहे.
 • या छायाचित्रात निळा, लाल व अवरक्त असे रंग असून ती या अवकाशयानावरील राल्फ, मल्टीस्पेक्ट्रल व्हिज्युअल इमेजिंग कॅमेऱ्याने टिपली आहेत.
 • रंगांमुळे या उपग्रहाच्या पृष्ठभागावरील बदल अधोरेखित झाले आहेत.
 • शॉरॉनच्या रंगीत छायाचित्रात प्लुटोच्या छायाचित्रांइतकी रंगांची विविधता नाही.
 • उत्तर ध्रुव लाल रंगात दिसत असून त्याचे नामकरण मोर्डर मॅक्युला असे करण्यात आले आहे असे नासाने म्हटले आहे.
 • शॉरॉन हा १२१४ किलोमीटर व्यासाचा असून त्याच्या प्रतिमेचे विवर्तन २.९ किलोमीटर इतके आहे म्हणजे इतक्या लहान भागातील तपशील त्यात दिसू शकतात.
 • शॉरॉनचा व्यास हा प्लुटोच्या निम्मा असून तो ग्रहाच्या तुलनेत उपग्रहाचा आकार मोठा अशा प्रकारचा सौरमालेतील पहिलाच उपग्रह आहे.
 • शॉरॉनच्या वरच्या भागात तुटलेल्या घळया दिसतात व व्हल्कन प्लॅनमची पठारे तळाकडच्या भागात दिसतात. शॉरॉनचा १२१४ किलोमीटरचा भाग काही ठिकाणी ०.८ किलोमीटर विवर्तनाने दिसत आहे.
 • दुसऱ्या एका छायाचित्रात श्ॉरॉनच्या विषुववृत्ताच्या उत्तरेकडे काही तडे गेलेले दिसतात व त्यात काही घळयांचा समावेश आहे.
 • यातील मोठी घळी १६०० कि.मी रूंदीची असून शॉरॉनचा बराच भाग तिने व्यापला आहे.

'४ जी' च्या जाहिरातीमधून ग्राहकांची दिशाभूल

 • ग्राहकांची दिशाभूल करणारी जाहिरात टेलिव्हीजनवर दाखविल्याप्रकरणी एअरटेल या टेलिकॉम सर्व्हिस देणाऱया कंपनीला अॅडव्हर्टाइझिंग स्टॅण्टर्ड काऊन्सिल ऑफ इंडियाने(एएससीआय) धक्का दिला आहे.
 • एअरटेलने '४ जी' च्या जाहिरातीमधून ग्राहकांची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवणारी नोटीस 'एएससीआय'ने कंपनीला बजावली आहे.
 • तसेच ही जाहिरात येत्या ७ ऑक्टोबरपर्यंत मागे घेण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
 • एअरटेलची '४ जी' सेवा दाखल झाल्याची माहिती देणाऱया जाहिरामधील प्रमुख मॉडेल असलेली मुलगी तिच्या मोबाईल इंटरनेट स्पीडपेक्षा अधिक जलदगतीने चित्रपट डाउनलोड करून दाखवले तर एअरटेल तुम्हाला मोबाइलचे बिल आयुष्यभर फुकटात देईल, असे इतरांना आव्हान करताना दिसते.
 • शिवाय, जर इतर मोबाईल इंटरनेट सेवा पुरवणाऱयांचा इंटरनेट वेग एअरटेल '४ जी' हून अधिक वेगवान असेल, तर एअरटेल कंपनी आयुष्यभर मोबाइल बिल फ्री देईल.
 • मात्र, ही जाहिरात प्रसारित करताना कोणतेही अस्वीकृती (डिस्क्लेमर) दिलेले नाही. त्यामुळे जाहिरात वादात अडकली आहे.
 • दरम्‍यान, आम्‍ही केलेल्‍या दाव्‍यावर आम्‍ही ठाम असून, हे 'एएससीआय'ला पटवून दिले जाईल, असे एअरटेलने सांगितले आहे.

Friday, October 02, 2015

चालू घडामोडी - ०२ ऑक्टोंबर २०१५ [Current Affairs - October 02, 2015]

सानिया आणि मार्टिना ओपन डब्ल्यूटीए स्पर्धेच्या उपांत्यफेरीत

 • भारतीय टेनिस तारका सानिया मिर्झा आणि स्वीत्झर्लंडची मार्टिना हिंगीस या जोडीने ओपन डब्ल्यूटीए स्पर्धेची उपांत्यफेरी गाठली.
 • अव्वल मानांकित सानिया आणि हिंगीस यांनी उपांत्यपूर्व फेरीत पाचव्या मानांकित प्राप्त अमेरिकेच्या राकेल कोप्स जोन्स आणि एबिगेल स्पीयर्सचा ६-२, ६-२ असा पराभव केला.
 • दुसऱ्या फेरीत त्यांनी क्लाउडिया जान्स इग्नासिक आणि अनास्तासिया रोडियोनोव्हा यांचा ६-३, ६-२ असा पराभव केला होता, तर पहिल्या फेरीत त्यांना बाय मिळाला होता.
 • सानिया-हिंगीस जोडीने या वर्षी विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन विजेतेपद पटकावलेले आहे.

देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी राष्ट्रीय धोरण

 • देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी पुढील वर्षी नवे सर्वंकष राष्ट्रीय धोरण आणण्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरणमंत्री थावरचंद गहलोत यांनी ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त येथे आयोजित कार्यक्रमात केली.
 • लवकरच नवे राष्ट्रीय धोरण अवलंबले जाईल.
 • समाजाने वृद्धांकडे लक्ष देण्याची आवश्यकता लक्षात घेता नवे धोरण त्या दिशेने ठोस पाऊल टाकणारे ठरेल.
 • समाजातील बदलत्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीमुळे नव्या राष्ट्रीय धोरणाची गरज प्रतिपादित करताना त्यांनी वृद्धांना अधिक सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले.
 • सरकारने याआधीच स्वयंसेवी संस्था आणि अन्य घटकांकडून सूचना आणि शिफारशी मागितल्या आहेत.
 • १९९९ मध्ये अवलंबण्यात आलेल्या राष्ट्रीय धोरणाची जागा नव्या सर्वसमावेशक धोरणाने घेतलेली असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

वरूड तालुक्यात राज्यातील पहिला डिहायड्रेशन प्रकल्प उभारला :

 • विदर्भाच्या कॅलिफोर्नियातील संत्रा उत्पादकांची ससेहोलपट थांबविण्यासाठी वरूड तालुक्यात राज्यातील पहिला डिहायड्रेशन प्रकल्प उभारला जाणार आहे.
 • तसेच मोर्शी तालुक्यात संत्रा रस प्रक्रिया केंद्रही सुरू केली जातील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे आयोजित राष्ट्रीय कृषी व संत्रा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केली.
 • युती शासन जलयुक्त शेतशिवाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संरक्षित सिंचन देण्याचा प्रयत्न करीत आहे.
 • सहा हजार गावांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे.
 • संत्र्याला बाजारपेठ मिळाली पाहिजे, याकरिता राज्यातील १० शहरांमध्ये जागा उपलब्ध करुन देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अभिनेते प्रशांत दामले यांनीही दुष्काळग्रस्तांना मदत

 • मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर, अक्षय कुमार यांच्यापाठोपाठ आता अभिनेते प्रशांत दामले यांनीही दुष्काळग्रस्तांना मदत दिली आहे.
 • प्रशांत दामले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त केला असून जलयुक्तशिवार योजनेसाठी ही मदत वापरली जाणार आहे.
 • पावसाने पाठ फिरवल्याने राज्यात भीषण दुष्काळाचे सावट असून दुष्काळग्रस्तांसाठी सिने व क्रीडा क्षेत्रातील मंडळी सरसावली आहेत मकरंद अनासपुरे व नाना पाटेकर यांनी 'नाम' संस्थेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना मदत करायला सुरुवात केली आहे.
 • अक्षय कुमारनेही दुष्काळग्रस्तांना ९० लाख रुपयांची मदत करण्याचे आश्वासन दिले होते.
 • या यादीत आता प्रशांत दामले यांचाही समावेश झाला आहे. दामले यांनी एक लाख रुपयांची मदत दिली आहे.
 दिनविशेष : 
 • १८६९ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरातमधील पोरबंदर येथे जन्म 
 • १९०४ : माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा जन्म.

Thursday, October 01, 2015

चालू घडामोडी - ०१ ऑक्टोंबर २०१५ [Current Affairs - October 01, 2015]

दाभोळ येथील वीजप्रकल्प एक नोव्हेंबरपासून सुरू होणार

 • अनेक वर्षांपासून बंद पडलेला दाभोळ येथील वीजप्रकल्प एक नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
 • या प्रकल्पामधून ५०० मेगावॉट वीज उत्पादन होईल.
 • याशिवाय रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रा. लि. कंपनीची दोन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विभागणी केली जाणार आहे.
 • केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी आज झालेल्या महत्त्वाच्या पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली.
 • हा प्रकल्प गेल्या वर्षी जानेवारीमध्ये गॅसपुरवठ्याअभावी बंद पडला होता.
 • या निर्णयानुसार या रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रा. लि. कंपनीची दोन कंपन्यांमध्ये विभागणी केली जाणार आहे.
 • यातील एका कंपनीकडे गॅसवर आधारित वीजनिर्मितीची जबाबदारी असेल, तर दुसऱ्या कंपनीकडे लिक्विफाईड नॅचरल गॅस रिगॅसिफिकेशन टर्मिनलची जबाबदारी असेल.
 • गेल (गॅस ऍथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड) तर्फे नैसर्गिक वायूचा पुरवठा केला जाईल, तर एनटीपीसी (नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन) तर्फे वीजनिर्मितीची कामगिरी पार पाडली जाईल.
 • भारतीय रेल्वेचीही या प्रकल्पामध्ये महत्त्वाची हिस्सेदारी राहणार आहे.

"आयएनएस कोची" या युद्धनौकेचा भारतीय नौदलामध्ये समावेश

 • "आयएनएस कोची" या युद्धनौकेचा बुधवार संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते भारतीय नौदलामध्ये समावेश करण्यात आला.
 • कोलकत्ता क्‍लास (प्रोजेक्‍ट 15ए) प्रवर्गामधील क्षेपणास्त्र प्रणालीने सिद्ध असलेली आयएनएस कोची ही नौदलामध्ये समाविष्ट करण्यात आलेली दुसरीच अशा प्रकारची विनाशिका आहे.
 • भारतीय नौदलामधील नाविक संरचना विभागाने बांधणी केलेली ही युद्धनौका अत्याधुनिक प्रणालींनी सज्ज करण्यात आली आहे.
 • आयएनएस कोचीची मुख्य वैशिष्टये -
 • ७५०० टनांपेक्षा जास्त वजन व ३० "नॉट" पेक्षा जास्त वेग
 • जमिनीवरुन जमिनीवर मारा करु शकणाऱ्या ब्राह्मोस क्षेपणास्त्रांनी सज्ज
 • जमीन व हवेमधील लक्ष्याचा भेद करण्यासाठी "सुपर रॅपिड गन माऊंट (७६ एमएम) व एके ६३० क्‍लोज इन वेपन सिस्टीम"
 • प्रणालींचा समावेश दोन "सी किंग" वा "चेतक" जातीच्या हेलिकॉप्टरसाठी जागा
 • पूर्णत: स्वदेशी बनावटीच्या रॉकेट लॉंचर्स व टॉर्पेडो लॉंचर्सचा समावेश

"मायक्रोसॉफ्ट"चे जनक बिल गेट्‌स यांनी सलग २२ व्या वर्षी पहिले स्थान

 • अमेरिकेतील ४०० सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये "मायक्रोसॉफ्ट"चे जनक बिल गेट्‌स यांनी सलग २२ व्या वर्षी पहिले स्थान पटकाविले आहे.
 • "बर्कशायर हॅथवे"चे अध्यक्ष वॉरन बफे यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून, "ओरॅकल"चे लॅरी एलिसन तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
 • "फोर्ब्स" मासिकाने ही यादी प्रसिद्ध केली आहे.
 • बिल गेट्‌स यांची एकूण संपत्ती ७६ अब्ज डॉलर असून, गेल्या वर्षीपेक्षा त्यांच्या संपत्तीत पाच अब्ज डॉलरची घट झाली आहे.
 • बफे यांची संपत्ती ६२ अब्ज डॉलर असून, त्यात गेल्या वर्षीपेक्षा पाच अब्ज डॉलरची घट झाली आहे.
 • एलिसन यांची संपत्ती ४७.५ अब्ज डॉलर असून, गेल्या वर्षीपेक्षा त्यात २.५ अब्ज डॉलरची घट झाली आहे.
 • चौथ्या क्रमांकावर "ऍमेझॉन"चे जेफ बझ असून, त्यांची संपत्ती १६.५ अब्ज डॉलर आहे.
 • ४०.३ अब्ज डॉलर संपत्तीसह "फेसबुक"चे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग सातव्या स्थानावर आहेत.
 • पहिल्या दहा श्रीमंतांमध्ये ते प्रथमच आले असून, "गुगल"चे लॅरी पेज ३३.३ अब्ज डॉलर संपत्तीसह दहाव्या क्रमांकावर आहेत.
 • अमेरिकेन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रम्प ४.५ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह १२१ व्या स्थानावर आहेत.
 • या यादीमध्ये भारतीय वंशाच्या चार व्यक्तींचा समावेश आहे. त्यामध्ये १९४ क्रमांकावर जॉन कपूर (संपत्ती ३.३ अब्ज डॉलर), २३४ व्या क्रमांकावर रोमेश टी. वाधवानी, २६४ व्या क्रमांकावर भरत देसाई, तर ३५८ व्या क्रमांकावर कवित्रक राम श्रीराम यांचा समावेश आहे.
 • या यादीतील ४०० श्रीमंतांची एकूण संपत्ती २३४० अब्ज डॉलर आहे.
 • ही संपत्ती २०१४ मध्ये २२९० अब्ज डॉलर होती.

ट्विटर आपल्या युजर्ससाठी अक्षरांची मर्यादा वाढविण्याच्या विचारात

 • लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट ट्विटर आपल्या युजर्ससाठी १४० अक्षरांची असलेली मर्यादा वाढविण्याच्या विचारात असून त्याबाबत कंपनीतील वरिष्ठांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.
 • केवळ १४० शब्दांमध्ये सध्या ट्‌विटरद्वारे संदेश देण्याची सुविधा आहे.
 • १४० शब्दांमध्ये एखाद्या संकेतस्थळाची लिंक, युजर हॅण्डल वगैरे साऱ्यांचा समावेश आहे.
 • यावर काम करताना १४० अक्षरांच्या मर्यादेतून लिंक आणि युजर हॅण्डल वगळण्याच्या विचार करण्यात येत आहे. या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ट्विटरच्या युजरमध्ये वाढ होण्याचे प्रमाण आतापर्यंतचे सर्वांत कमी प्रमाण असल्याचे निदर्शनास आले आहे.
 • त्यामुळे युजर्सच्या सुविधेसाठी कंपनी आपल्या धोरणांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात आहे.
 • फेसबुकसारख्या इतर सोशल नेटवर्किंग साईटसच्या तुलनेत १४० शब्दांची मर्यादा ही मोठी दरी असल्याचे काही युजर्स तसेच डिझाईनर्सने म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर १५० अक्षरांच्या मर्यादेबाबत पुनर्विचार करण्यात येत आहे.
 • आपली १४० शब्दांची मर्यादा हटविण्यासाठी ट्‌विटर नवे काहीतरी निर्माण करण्याची शक्‍यताही व्यक्त करण्यात आली आहे.

अमृत या अभियानाची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्याचा निर्णय

 • केंद्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या अटल मिशन फॉर रिज्युव्हनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) या महत्त्वाकांक्षी अभियानाची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
 • या अभियानात राज्यातील ४३ शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
 • शहरातील प्रत्येक घरासाठी प्रचलित निकषानुसार पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छतेसाठी मलनि:स्सारण, मलव्यवस्थापन व पर्जन्यजल वाहिनीची व्यवस्था करण्यासह शहरांतील मोकळ्या जागा, हरित क्षेत्रे, परिवहन व्यवस्था यांमध्ये सुधारणा करून प्रदूषण कमी करणे तसेच इतर सुविधांची निर्मिती या उद्दिष्टांच्या पूतर्तेसाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.
 • केंद्राने ५०० शहरांचा समावेश अमृतमध्ये केला असून, राज्यातील ४३ शहरांचा समावेश आहे.
 • २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीसाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे.
 • केंद्र शासनाकडून या आर्थिक वर्षासाठी एक हजार तीन कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे.

ग्रीन एनर्जी कॉरीडॉर कार्यक्रमांतर्गत २७ योजनांची अंमलबजावणी

 • केंद्र सरकारच्या ग्रीन एनर्जी कॉरीडॉर कार्यक्रमांतर्गत महापारेषण या सरकारी कंपनीने आखलेल्या २७ योजनांची अंमलबजावणी केली जाणार असून त्याकरिता आवश्यक ३६७ कोटी रुपयांच्या खर्चास राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
 • या योजनेतून २५७० मेगावॅट अतिरिक्त ऊर्जानिर्मिती होणार आहे.
 • राज्यात पाच वर्षांत १४ हजार ४०० मे.वॅ. अपारंपारिक ऊर्जानिर्मिती करण्याचे सरकारने ठरवले आहे.
 • त्यामध्ये ७५०० मे.वॅ. सोलार एनर्जी, १५०० मे.वॅ. विंड एनर्जी असणार आहे.
 • त्याच कार्यक्रमांतर्गत नवीन वीज पारेषण वाहिन्या उभारून अतिरिक्त २५७० मे.वॅ. वीज पुरवठा केला जाणार आहे.
 • त्याकरिता आंतरराज्यीय व राज्यांतर्गत पारेषण प्रणालीचे बळकटीकरण होणार आहे.
 • ग्रीन एनर्जी कॉरीडॉर कार्यक्रमाकरिता येणाऱ्या एकूण खर्चाच्या २० टक्के (७३.४ कोटी) रक्कम महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या अंतर्गत निधीतून उभारण्यात येणार आहे.
 • नॅशनल क्लीन एनर्जी फंडाकडून ४० टक्के (१४६.८ कोटी) रक्कम मिळणार आहे तर उर्वरित ४० टक्के (१४६.८ कोटी) रक्कम जर्मन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्जरुपाने उपलब्ध करून दिली जाणार आहे.

राष्ट्राच्या आवारात इतर ध्वजांसह पॅलेस्टाईनचाही झेंडा फडकणार

 • पॅलेस्टाईनची गेली अनेक वर्षे रखडलेली मागणी आता मान्य झाली असून संयुक्त राष्ट्राच्या आवारात इतर ध्वजांसह पॅलेस्टाईनचाही झेंडा फडकणार आहे.
 • सप्टेंबर महिन्यातच पॅलेस्टाईन आणि व्हॅटिकनचा ध्वज फडकवण्याचा निर्णय घेण्यात आला.
 • पॅलेस्टाईनचा ध्वज फडकवण्यासाठी घेण्यात आलेला निर्णय ११९ देशांनी बहुमताने पारित केला, तर ४५ सदस्यांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला नाही.
 • इस्रायलने पॅलेस्टाईनचा ध्वज फडकविण्यास अर्थातच कडाडून विरोध केला होता.
 • इस्रायल, अमेरिकेसह इतर सहा देशांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले होते.
 • २०१२ साली पॅलेस्टाईनचा दर्जा वाढवून त्यास व्हॅटिकन सिटीप्रमाणे नॉन मेंबर ऑब्झर्व्हरचा दर्जा दिला होता.
 • त्यानंतरही ध्वज फडकविण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे.

प्लेक्स काऊन्सिलच्या तीनही गटांतील प्रथम क्रमांकाचे पुरस्कार बहाल

 • प्लेक्स काऊन्सिलच्या तीनही गटांतील प्रथम क्रमांकाचे निर्यात क्षेत्रातील पुरस्कार जैन इरिगेशनला बहाल करण्यात आले.
 • येथे झालेल्या गौरव सोहळ्यात प्लेक्स काऊन्सिलचे माजी अध्यक्ष डॉ. हिरू एन. पटेल यांच्या हस्ते प्लास्टिक एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे २०१३-१४ व २०१४-१५ या दोन आर्थिक वर्षातील एकूण सहाही गटांचे प्रथम पुरस्कार देऊन कंपनीला गौरविण्यात आले.
 • जैन इरिगेशनने प्लास्टिक उत्पादनांच्या निर्यातीत उच्चांक राखल्याने २०१३-१४ या वर्षासाठी कंपनीला पीव्हीसी शीट, पीव्हीसी पाईप आणि होजेस, ठिबक सिंचन विभागांत पहिल्या क्रमांकाच्या पारितोषिकाने गौरविण्यात आले.
 • २०१४-१५ या वर्षासाठी पीव्हीसी शीट, पीव्हीसी पाईप आणि होजेस, ठिबक सिंचन विभागांतही गौरविण्यात आले.
 • दोन्ही वर्षांचे पुरस्कार कंपनीच्या वतीने सी.ए. जोशी, प्रवीण कुमत, अशोक अग्रवाल, विवेक डांगरीकर, पी. डी. गोरे आणि सी. आर. वासुदेवन यांनी स्वीकारले. मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत जगभरात भारताचा पहिला नंबर

 • परकीय गुंतवणुकदारांचा कल आता भारताकडे वळला असून २०१५ मधील पहिल्या सहा महिन्यांमध्ये भारतात तब्बल ३१ अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) झाली आहे.
 • विशेष बाब म्हणजे परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत जगभरात भारताचा पहिला नंबर आला असून अमेरिका, चीन यासारख्या देशांनाही भारताने मागे टाकले आहे.
 • विदेशातील एका इंग्रजी प्रसारमाध्यमाने २०१५ मध्ये जगभरातील देशांमध्ये झालेल्या परकीय गुंतवणुकीचा अभ्यास करत अहवाल तयार केला आहे.
 • या अहवालात जगभरात सर्वाधिक परकीय गुंतवणूक भारतात झाल्याचे म्हटले आहे.
 • २०१५ मधील पहिल्या सहा महिन्यात भारतात ३१ अब्ज डॉलर्स, चीनमध्ये २८ तर अमेरिकेत २७ अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक झाल्याचे यामध्ये म्हटले आहे.  

सार्वजनिक ठिकाणी स्तनपानासाठी विशेष कक्ष

 • सार्वजनिक ठिकाणी मुलांना स्तनपानासाठी केंद्र सरकार लवकरच 'राष्ट्रीय स्तनपान धोरण' जाहीर करणार असून, या धोरणात या सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला आहे.
 • पुढील वर्षी हे धोरण लागू होण्याची शक्यता आहे.
 • सार्वजनिक ठिकाणी विशेष स्तनपान कक्ष तयार करण्यात येणार आहे.
 • महिला व बालविकास मंत्रालयाने या धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, असे या बैठकीत सांगण्यात आले.
 • या मोहिमेत आंगणवाडी व आशा कर्मचाऱ्यांनी सामील करून घेतले जाणार आहे.
 • गर्भवती महिलांचे समुपदेशन करण्यासाठी या महिलांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे.
 • सरकारी रुग्णालयांमध्ये गर्भवती महिलांचे समुपदेशन करण्यासाठी डॉक्टर किंवा नर्सच्या रूपाने विशेष कर्मचाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे, असे या बैठकीत सांगण्यात आले.