Header Ads

चालू घडामोडी - २ जून २०१५ [Current Affairs - June 2, 2015]

एसबीआयची महिलांसाठी ‘हर घर हर कार’ योजना

  State Bank of India
 • ‘स्टेट बॅंक ऑफ इंडिया’ने महिलांसाठीच्या खास योजनेमध्ये वाहनकर्जावर सूट देणारी नवी ‘हर घर हर कार’ नावाची योजना सादर केली आहे. 
 • या योजनेमध्ये महिलांना १० टक्के कर्जदराने वाहनकर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेशिवाय वाहनकर्ज घेणाऱ्या महिलांना १०.२५ टक्के व्याजदराने वाहनकर्ज उपलब्ध आहे.
 • महिलांना बळ देऊन त्यांना सक्षम करण्याच्या हेतूने एसबीआयने अलिकडेच महिलांसाठी ‘हर घर’ नावाची योजना आणली होती. या योजनेत गृहकर्जदरात ०.२५ टक्के सूट देण्यात आली होती. त्यामुळे महिलांना केवळ १० टक्के व्याजदराने गृहकर्ज उपलब्ध झाले होते. 
 • आता एसबीआयने या योजनेत सहभागी झालेल्या महिलांसाठी ‘हर घर हर कार’ ही योजनाही सादर केली आहे. 

मुख्य माहिती आयुक्तपदी विजय शर्मा

 • मुख्य माहिती आयुक्त आणि केंद्रीय दक्षता आयुक्तपदावर सरकार आणि विरोधकांत मतैक्य झाले असून, मुख्य माहिती आयुक्तपदी (सीआयसी) विजय शर्मा आणि केंद्रीय दक्षता आयुक्तपदी (सीव्हीसी) सीबीडीटीचे प्रमुख के. व्ही. चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
 • ही दोन्ही पदे गेल्या नऊ महिन्यांपासून रिक्त होती. प्रदीप कुमार निवृत्त झाल्यानंतर सीव्हीसीचे पद २८ सप्टेंबरपासून रिक्त होते. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली जात होती. 
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांची दोन वेगवेगळ्या समितीची स्वतंत्र बैठक झाली. या बैठकीत या दोन नावांवर शिक्कामोर्तब झाले. मंजुरीसाठी ही नावे राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आली आहेत.

भारतीय क्रिकेट संघाच्या हंगामी प्रशिक्षकपदी रवी शास्त्री

  Ravi Shastri
 • आगामी बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघाच्या हंगामी प्रशिक्षकपदी माजी कर्णधार रवी शास्त्री यांची नियुक्ती केली आहे. भारतीय संघाचा बांगलादेश दौरा १० जूनपासून सुरू होणार आहे.
 • रवी शास्त्री सध्या भारतीय संघाचे संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. या दौऱ्यासाठी ती जबाबदारीही त्यांच्याकडे कायम राहणार आहे. बांगलादेश दौऱ्यानंतर कायमस्वरूपी प्रशिक्षकाची निवड करण्यात येईल, असे बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
 • याआधी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी असलेल्या डंकन फ्लेचर यांच्यासोबतचा करार संपुष्टात आला आहे. बीसीसीआयने त्यांच्या करारात वाढ केली नव्हती म्हणून हे प्रशिक्षकपद रिक्त होते.
 • रवी शास्त्री यांना भारताकडून ८० कसोटी आणि १५० एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. यात १९८० मधील विश्वचषक स्पर्धेचा समावेश आहे.
 • बीसीसीआयने गेल्यावर्षी इंग्लंड दौऱ्यात निवड केलेले संजय बांगर यांना फलंदाजीचे प्रशिक्षक, भारत अरुण यांना गोलंदाजीचे प्रशिक्षक आणि आर. श्रीधर यांना क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक म्हणून कायम ठेवले आहे. हे तिघेही इंग्लंड दौऱ्यातील वनडे सामन्यांच्या मालिकेपासून भारतीय संघासोबत आहेत. 
 • तसेच बिश्वरूप डे यांचे प्रशासकीय व्यवस्थापकपद आणि ऋषिकेश उपाध्याय यांचे लॉजिस्टिक्स व्यवस्थापकपद कायम ठेवण्यात आले आहे.

गुरप्रीत सिंग रियो ऑलिम्पिकसाठी पात्र

  Gurpreet Singh
 • भारताचा नेमबाज गुरप्रीत सिंगने म्युनिच, जर्मनी येथे सुरू असलेल्या वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात चौथा क्रमांक मिळवून २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमधील प्रवेश निश्चित केला. रिओ ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवणारा तो भारताचा पाचवा नेमबाज ठरला. 
 • गुरप्रीतने १० मी. एअर रायफल प्रकारात अंतिम फेरीत त्याने १५४.८ गुणांची कमाई केली. पोर्तुगालचा जोआओ कॉस्टा २०१.४ गुणांसह सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. या प्रकारासाठी पहिल्या तीन खेळाडूंना ऑलिम्पिक प्रवेश मिळणार होता. परंतु, कॉस्टाने यापूर्वीच ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवल्याने चौथ्या स्थानावरील गुरप्रीतची वर्णी लागली. 
 • मध्य प्रदेशातील महू येथील आर्मी मार्क्समनशिप युनिटमध्ये गुरप्रीत प्रशिक्षण घेतो आहे. तो लष्करात सुभेदार पदावर कार्यरत आहे. 
 • गेल्या वर्षी ग्रॅनडा, स्पेन येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत जितू रायने ५० मीटर फ्री पिस्तूल प्रकारात रौप्यपदकासह ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले होते. 
 • यानंतर युवा अपूर्वी चंडेलाने चांगवोन, कोरिया येथे झालेल्या नेमबाजी विश्वचषकात १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदकासह रिओवारी पक्की केली होती. 
 • फोर्ट बेनिंग, अमेरिका येथे झालेल्या नेमबाजी विश्वचषकात ऑलिम्पिक पदक विजेत्या गगन नारंगने  ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात कांस्यपदकासह ऑलिम्पिकचा मार्ग सुकर केला होता. 
 • भारतातर्फे ऑलिम्पिकमध्ये एकमेव वैयक्तिक सुवर्णपदक विजेत्या अभिनव बिंद्राने १० मीटर एअर रायफल प्रकारात सहाव्या स्थानासह विक्रमी पाचवी ऑलिम्पिकवारी पक्की केली. 
 • प्रत्येक देशातर्फे ३० नेमबाजपटू १५ विविध प्रकारांतून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकतात.

गांधी-मंडेला क्रिकेट मालिका

 • भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन देशांच्या क्रिकेट संघांमध्ये गांधी-मंडेला क्रिकेट मालिका आयोजित करण्यात येणार आहे. सध्या दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांमध्ये या मालिकेचा कार्यक्रम निश्चितीबाबत चर्चा सुरू आहे.
 • या मालिकेंतर्गत दक्षिण आफ्रिका भारतात चार कसोटी सामने खेळणार आणि २०१८ मध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेमध्ये चार कसोटी सामने खेळेल, असे दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघटनेचे प्रमुख हारुन लोर्गाट यांनी सांगितले.

भारत आणि स्वीडनमध्ये सामंजस्य करार

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात सहकार्य करण्याच्या भारत आणि स्वीडन मधील सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
 • उद्देश : दोन्ही देशांच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांमध्ये सहकार्याला प्रोत्साहन देणे
 • सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने आतापर्यंत १७ देशांच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाबरोबर सहकार्य करार केले आहेत.

जॉर्ज यो नालंदा विद्यापीठाचे नवे कुलगुरु

 • सिंगापूरचे विदेशमंत्री जॉर्ज यो आंतरराष्ट्रीय नालंदा विद्यापीठाचे नवे कुलगुरु असतील. १८ जुलै २०१५ ला ते कार्यभार स्विकारतील. जॉर्ज नालंदा विद्यापीठात आंतरराष्ट्रीय सल्लागार समितीचे अध्यक्ष आहेत. जॉर्ज यांना २०१२ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
 • नोबल पुरस्कार विजेते प्राध्यापक अमर्त्य सेन यांची ते जागा घेतील. प्राध्यापक सेन नालंदा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू आहेत.
 • नालंदा विद्यापीठासाठी बिहार राज्य सरकारने ४४५ एकर जमीन दिली आहे. 
 • जॉर्ज यो सिंगापूरमध्ये २४ वर्ष मंत्री होते. त्या काळात त्यांनी विदेश आणि आरोग्य ही खाती सांभाळली. ५ मे रोजी आंतरराष्ट्रीय नालंदा विद्यापीठाच्या झालेल्या बैठकीत त्यांच्या नावाला मान्यता देण्यात आली. त्यावर भारत सरकारने आता मान्यता दिली आहे.

बीजिंगमध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी

 • चीनची राजधानी असलेल्या बीजिंग शहरामध्ये एका नव्या कायद्यान्वये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी घालण्यात आली आहे. 
 • चीनमध्ये धूम्रपान करणाऱ्या नागरिकांची संख्या ३० कोटींपेक्षाही जास्त असून; जगातील एक तृतीयांश सिगरेट्‌स केवळ चीनमध्येच ओढल्या जातात. दरवर्षी धूम्रपानाशी संबंधित आजारांमुळे देशात १० लाखांपेक्षाही जास्त नागरिकांचा मृत्यु होतो. 
 • धूम्रपानावर बंदी आणण्यासाठी चीनमध्ये याआधीही प्रयत्न करण्यात आले आहेत; मात्र धूम्रपानाचा वाढता प्रसार रोखण्यात तितकेसे यश आलेले नाही. आता या नव्या कायद्यांतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, कार्यालये आणि उपहारगृहांमध्ये धूम्रपानावर बंदी घालण्यात आली आहे.

माजी टेनिसपटू डॉरिस हार्ट यांचे निधन

 • करियर स्लॅमसह विम्बल्डन ग्रँड स्लॅम स्पर्धेची एकाच दिवशी तीन विजेतीपदे पटकावण्याचा पराक्रम करणाऱ्या महान टेनिसपटू डॉरिस हार्ट यांचे मायमी येथे निधन झाले.
 • ग्राउंडस्ट्रोक्स आणि अचूक ड्रॉपशॉट्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या हार्ट यांचा आंतरराष्ट्रीय हॉल ऑफ फेममध्ये समावेश होता. त्यांनी १९५४-५५ मध्ये अमेरिकन अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. ही स्पर्धांच नंतर अमेरिकन ओपन म्हणून ओळखली जाते. त्यांनी दोनवेळा फ्रेंच ओपन व प्रत्येकी एकदा विम्बल्डन व ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद मिळवले होते. १९५१ मध्ये जागतिक क्रमवारीत त्या अग्रस्थानी होत्या. त्यांनी कारकिर्दीत दुहेरीची २९ विजेतीपदेही पटकावली होती.

विंडोज टेन २९ जुलैपासून विनामूल्य उपलब्ध

  Windows 10
 • विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम वापरत असलेल्या जगभरातील युजर्ससाठी २९ जुलैपासून 'विंडोज टेन‘ विनामूल्य उपलब्ध होणार आहे. अलिकडेच मायक्रोसॉफ्टच्यावतीने त्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. 
 • यापूर्वीच्या ‘विंडोज’च्या व्हर्जनमधून वगळण्यात आलेल्या स्टार्ट मेन्युचा ‘विंडोज टेन’मध्ये पुन्हा समावेश करण्यात आला आहे. 
 • स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी तसेच अधिकाधिक युजर्सपर्यंत पोचण्यासाठी मायक्रोसॉफ्टने जानेवारीमध्ये विंडोज ७ आणि विंडोज ८.१ वापरकर्त्यांसाठी विनामूल्य अपग्रेडेशनची सुविधा देण्याची घोषणा केली होती. 
 • ‘विंडोज टेन’ हे होम, मोबाईल, प्रो, एंटरप्राईज आणि एज्युकेशन एडिशनमध्ये उपलब्ध आहे. त्यापैकी होम एडिशनम अधिकाधिक ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आली आहे. त्यामुळे ती डेस्कटॉप पीसीज्‌, लॅपटॉप्स आणि अन्य डिव्हाईसेसमध्ये वापरता येणार आहे. 
 • ‘विंडोज टेन’मध्ये नव्या सुविधांसह विंडोज एज ब्राऊजर, चेहरा ओळखण्याची सुविधा, बोटाच्या ठशांद्वारे लॉगीनची सुविधा यासह फोटो, नकाशे, मेल, कॅलेंडर आदींसाठी विविध विंडोज ऍप्सही असणार आहेत. तर ‘विंडोज प्रो’ एडिशनही व्यावसायिक वापरासाठी उपयोगी ठरणार असल्याचे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे.

मिस्बा उल हक याच्याकडे असलेली लॅंड क्रूझर जप्त

 • पाकिस्तान कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार मिस्बा उल हक याच्याकडे असलेली लॅंड क्रूझर ही अलिशान गाडी महसूल खात्याने जप्त केली. 
 • मिस्बा याने या गाडीची कस्टम ड्यूटी आणि टॅक्स भरला नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले. 
 • गेल्यावर्षी ३९ लाख रुपयांचा कर चुकविल्यामुळे त्याची सर्व बॅंक खाती बंद करण्यात आली होती. त्यानंतर पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दर यांनी या प्रकरणात मध्यस्थी करून प्रकरण मिटवले होते.

बिग बाजाराने मॅगीची विक्री थांबवली

 • आपल्या सर्व आऊटलेटमधून मॅगी हद्दपार करण्याचा निर्णय बिग बाजाराने घेतला असल्यामुळे मॅगीला मोठा झटका मिळाला आहे. देशभरात नेस्ले कंपनीच्या मॅगीचे अनेक नमुने सदोष आढळल्यामुळे बिग बाजारने हे पाऊल उचलले आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या भंडारांमधूनही मॅगी हद्दपार झाली आहे.
 • मॅगीत मोनोसोडियम ग्लुटामेंट अर्थात एमएसजी आणि शिशाचा वापर मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे तपासात आढळले आहे. या दोन्हीचं अतिरिक्त सेवन तब्येतीला धोकादायक ठरू शकतात. 
 • याची दखल घेत लखनौच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने मॅगीचा परवाना रद्द करत देशात मॅगीच्या विक्रीवर बंदी घालावी, अशी शिफारस केंद्रीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाला केली आहे.
 • दिल्लीतही मॅगीच्या पाकीटांची तपासणी झाली असता १३ पैकी १० नमून्यांमध्ये दोष आढळून आल्यामुळे दिल्ली सरकारने मॅगीवर बंदी घातली आहे. तसेच सर्व दोषीविरोधात कडक कारवाईच आश्वासन दिले आहे. केरळ सरकारने किरकोळ बाजारात मॅगीच्या विक्रीवर तात्पुरती बंदी लादली आहे. तसेच पश्चिम बंगालसह अनेक राज्यात मॅगीचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.
 • भारतातील आतापर्यंत १० राज्यांनी मॅगी विक्रीवर बंदी अथवा मॅगीचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.

!!! जय महाराष्ट्र !!!