चालू घडामोडी - ४ जून २०१५ [Current Affairs - June 4, 2015]

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देशभरात ‘हरित मोहीम’

  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (५ जून) देशभरात झाडे लावण्याची ‘हरित मोहीम’ सुरू करण्यात येणार आहे. त्याचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या ७ रेसकोर्स मार्ग या निवासस्थानी रोपटे लावून करणार असल्याची माहिती पर्यावरण व वन राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
  • या निमित्तानेच पुण्यात संपादन करण्यात आलेल्या ७० एकर जमिनीत चार हजार झाडे लावण्याचा कार्यक्रमही अमलात आणला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
  • क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अजिंक्य रहाणे व रोहित शर्मा तसेच मुष्टियोद्धा सुशीलकुमार या मोहिमेमध्ये सहभागीहोणार आहेत.
  • शहरांमध्ये हरित कवच म्हणजेच वनीकरण व वृक्षारोपण वाढविण्यासाठी ‘नगर वन उद्यान योजना’ किंवा ‘नागरी वनीकरणाची योजना’ आखण्यात आली आहे. केंद्र सरकारतर्फे या योजनेला अंशतः साह्य केले जाणार आहे.

पी कुनीकृषनन सतीश धवन अंतराळ केंद्राचे संचालक

    P Kunikrushnan
  • पी कुनीकृषनन यांची १ जून २०१५ रोजी सतीश धवन अंतराळ केंद्राचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते मे २०१५ मध्ये निवृत्त होत असलेल्या एमवायएस प्रसाद यांची जागा घेतील.
  • वर्तमान नियुक्तीपूर्वी ते विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या उपसंचालक पदावर कार्यरत होते. जून २०१०मध्ये ते पीएसएलव्ही प्रकल्पाचे संचालक होते. यादरम्यान त्यांनी १३ पीएसएलव्ही मोहिमांचे यशस्वीपणे पूर्ण केले आहे.
  • त्यांना २०११च्या अॅस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया पुरस्कार आणि २०१०च्या इस्त्रो इंडीविजुअल मेरिट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
  • सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)च्या अंतर्गत कार्य करते आणि ते आंध्र प्रदेश राज्यात नेल्लोर जिल्ह्यात स्थित आहे.

ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन सुपर सीरीज २०१५

    Australian Badminton Open 2015
  • जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या चेन लोंगने ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन सुपर सीरीज २०१५ चा पुरुष एकेरीचा किताब जिंकला. अंतिम फेरीमध्ये त्याने डेन्मार्कच्या विक्टर एक्सेलसेनला पराभूत केले.
  • महिला गटात जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावरील स्पेनच्या कॅरोलीना मारिनने महिला एकेरीचा किताब जिंकला. अंतिम फेरीमध्ये तिने चीनच्या वैंग शिजियानला पराभूत केले.
  • ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन सुपर सीरीज २०१५चा अंतिम सामना सिडनी ऑलंपिक पार्कमध्ये ३१ मे २०१५ रोजी खेळण्यात आला.

अमीना गुरीब फकीम मॉरिशसच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष

  • मॉरिशस सरकारने १ जून २०१५ रोजी अमीना गुरीब फकीम यांची राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. त्या मॉरिशसच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष असतील.
  • १९६८ मध्ये ब्रिटन पासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हिंदी महासागरातील बेट मॉरिशसमध्ये १९९२ला राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या जागेवर राष्ट्राध्यक्षपद निर्माण केले.
  • माजी राष्ट्रपती कैलास पूरयाग यांनी २९ मे २०१५ रोजी राजीनामा दिला होता.
  • अमीना यापूर्वी वैज्ञानिक आणि जीवशास्त्रज्ञदेखील राहिल्या आहेत.

सोमनाथ मंदिरात बिगरहिंदूंना प्रवेश नाही

  • गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिरात यापुढे परवानगीशिवाय बिगरहिंदूंना प्रवेश देणार नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
  • सुरक्षा आणि या धार्मिक वास्तूचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या प्रमुखपदी माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एल. के. अडवानीही विश्वस्त आहेत.

भारत आणि अमेरिका संरक्षण आराखडा करार

  • भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकणाऱ्या दहा वर्षांच्या संरक्षण आराखडा करारावर स्वाक्षरी करण्यात आली. संरक्षण सामग्री आणि तंत्रज्ञानाचा संयुक्तपणे विकास आणि उत्पादन करण्याचा मुद्दा यामध्ये अंतर्भूत करण्यात आला आहे.
  • भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे संरक्षणमंत्री ऍश्टन कार्टर यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
  • सागरी सुरक्षा आणि संयुक्त प्रशिक्षणावर भर देणारा हा करार करण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्यातच झाला होता. या करारामुळे जेट इंजिनाचे तंत्रज्ञान आणि बांधणी संयुक्तपणे विकसित केली जाणार आहे.
  • याशिवाय, उच्च तंत्रज्ञान असलेल्या मोबाईल पॉवर स्रोत आणि रासायनिक तसेच जैविक युद्धापासून बचाव करणाऱ्या अत्याधुनिक संरक्षण पोशाखाबाबत करण्यात येणाऱ्या करारांचाही अंतिम मसुदा निश्चित करण्यात आला.
  • करारातील मुद्दे
  1. सुरक्षा आणि प्रशिक्षणावर भर
  2. संरक्षण तंत्रज्ञानाचा संयुक्‍तपणे विकास
  3. संरक्षण क्षमता वाढविणे
  4. उच्च पातळीवर संरक्षण चर्चा
  5. ‘मेक इन इंडिया’अंतर्गत उत्पादन

उत्तराखंडच्या आरोग्य मंत्र्यांना ‘जागतिक तंबाखू निषेध दिवस पुरस्कार २०१५’

  • उत्तराखंडचे आरोग्य मंत्री सुरेंद्र सिंह नेगी यांना ३१ मई २०१५ रोजी ‘जागतिक तंबाखू निषेध दिवस पुरस्कार २०१५’ या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) वतीने हा सन्मान त्यांना भारतातील ‘डब्ल्यूएचओ’चे प्रतिनिधी डॉ. अरुण थापा यांनी प्रदान केला.
  • राज्यात तंबाखू आणि मादक पदार्थांविरुद्ध सुरेंद्र सिंह नेगी यांनी राज्यात चालविलेल्या अभियानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
  • जगभरात ३१ मे हा दिवस ‘जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन’ म्हणून साजरा केला जातो.

जयपूरची मेट्रो सुरु

  • फक्त ४ वर्षात बांधण्यात आलेली जयपूरची मेट्रो रेल्वेसेवा ४ जून रोजी प्रवाशांसाठी खुली करण्यात आली. मानसरोवर- चांदपोल या ९.६ किलोमीटर मार्गाचे राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
  • जयपूर मेट्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. सी. गोयल यांनी मुख्यमंत्र्यांना या प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.
  • या मार्गावर नऊ स्थानके आहेत. मानसरोवर, न्यू आतीश मार्केट, विवेक विहार, श्‍यामनगर, रामनगर, सिव्हिल लाइन्स, रेल्वे स्टेशन, सिंधी कॅंप आणि चांदपोल अशी या स्थानकांची नावे आहेत. या मार्गावरील चांदपोल हे पूर्ण भूमिगत स्थानक आहे. एकूण कर्मचाऱ्यांमध्ये तीस टक्के महिला कर्मचारी, हेही जयपूर मेट्रोचे वैशिष्ट्य आहे.
  • मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी त्याचे फेज-१ ए आणि फेज-१ बी असे दोन भाग करण्यात आले होते. त्यात मानसरोवर - चांदपोल हा टप्पा पूर्ण झाला असून, आता चांदपोल - बडी चौपाड या फेज-१ बी टप्प्याचे काम प्रगतिपथावर आहे. अवघ्या चार वर्षांत पहिला टप्पा पूर्ण झाला असून, त्यासाठी सुमारे २०२३ कोटी रुपये खर्च झाला आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळ आता बांगलादेशातही

    LIC Logo
  • भारतीय आयुर्विमा महामंडळाला (एलआयसी) बांगलादेशात विमा व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे. बांगलादेशमधील एका कंपनीसोबतच्या संयुक्त उपक्रमांतर्गत एलआयसी तेथे आपले काम सुरु करणार आहे.
  • काही अटींच्या पूर्ततेनंतर एलआयसीला व्यवसाय करण्यासाठीचे संमतीपत्र देण्यात येणार आहे. अटींची पूर्तता झाल्यानंतर एलआयसीचे काम सुरू होईल.
  • बांगलादेशमधील एका कंपनीसोबतच्या संयुक्त उपक्रमांतर्गत ‘एलआयसी बांगलादेश लिमिटेड’ या नावाने एलआयसीचे काम सुरू होईल. दोन वर्षांपूर्वी एलआयसीला काही कारणांमुळे बांगलादेशमध्ये व्यवसायासाठी परवानगी नाकारण्यात आली होती.
  • सध्या भारताव्यतिरिक्त नेपाळ, श्रीलंका आणि सिंगापूरमध्ये एलआयसीचे काम सुरू आहे.

‘फिफा' फुटबॉल क्रमवारीत भारत १४१व्या स्थानावर

  • ‘फिफा’च्या ताज्या क्रमवारीमध्ये जगज्जेत्या जर्मनीने अव्वल स्थान टिकवून ठेवले बेल्जियमने आतापर्यंतचे त्यांचे सर्वोच्च मानांकन गाठताना दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.
  • भारतीय संघानेही सहा क्रमांकांची प्रगती केली. आता जागतिक फुटबॉल क्रमवारीमध्ये भारत १४१ व्या क्रमांकावर आहे. यापूर्वी भारत १४७व्या स्थानावर होता.
  • फुटबॉल खेळणाऱ्या आशियाई देशांच्या यादीत भारत २२व्या क्रमांकावर आहे. आशियाई संघांमध्ये इराणला (४१वा क्रमांक) सर्वोच्च स्थान आहे. त्यांच्याखालोखाल जपान (५२) आणि दक्षिण कोरिया (५८) हे देश आहेत.

इन्फोसिसने ‘कॅलैडस इन्क’ आणि ‘स्कॅवा’चे अधिग्रहण केले

  • ई-कॉमर्स सेवा पुरवणाऱ्या ‘स्कॅवा’ या कंपनीचे इन्फोसिसने संपादन केले आहे. इन्फोसिसने एप्रिलमध्ये ‘स्कॅवा’ कंपनीचे संपादन करण्यासाठी करार केला होता. हा करार सुमारे १२ कोटी अमेरिकी डॉलर्सला (७६८ कोटी रुपयांना) करण्यात आला आहे.
  • तसेच ४ जूनला इन्फोसिसने ‘कॅलैडस इन्क’चे पूर्णपणे अधिग्रहण केले आहे. ‘स्कॅवा’ होल्डिंग गटातील कंपनी आहे.
  • कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांनी आक्रमक अधिग्रहण धोरण अवलंबले असून त्यांचा ऑटोमेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) अशा भागात काम करणाऱ्या कंपन्यांचे अधिग्रहण करण्यावर भर आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी इन्फोसिसने सुमारे १२५० कोटी रुपयांना ‘पनया’चे अधिग्रहण केले होते.

अमेरिकने दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशांच्या यादीतून ‘क्युबा’चे नाव काढले

  • २९ मे २०१५ रोजी अमेरिकने दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या आणि दहशतवाद्यांना शरण देणाऱ्या देशांच्या यादीतून ‘क्युबा’चे नाव काढून टाकले.
  • अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी शीतयुद्धाचे सबंध सुधारण्यासाठी आणि ‘क्युबा’बरोबर मैत्री वाढविण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलले आहे.
  • १९८२ मध्ये तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्याद्वारे क्युबाला या यादीत समाविष्ट करण्यात आले होते. आता या यादीत फक्त इराण, सीरिया आणि सुदान हे देश आहेत.

!!! जय महाराष्ट्र !!!

Previous Post Next Post