३० जून हा दिवस एक सेकंदाने मोठा
- या वर्षीचा ३० जून हा दिवस नेहमीपेक्षा एक सेकंदाने मोठा असणार आहे. या दिवशी वेळेमध्ये एका अतिरिक्त सेकंदाची भर घातली जाणार असल्याचे अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने सांगितले आहे.
- पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग कमी होत असल्याने वेळेचा समतोल राखण्यासाठी साधण्यासाठी लीप सेकंद हा उपाय करण्यात येणार आहे. साधारणतः ३० जून किंवा ३१ डिसेंबर रोजी लीप सेकंद मोजला जातो.
- एका दिवसामध्ये ८६,४०० सेकंद असतात. प्रमाण वेळेनुसार, लोक आपल्या दैनंदिन जीवनात याचा समन्वित जागतिक वेळेच्या रूपात वापर करतात. ‘कोऑर्डिनेटेड युनिव्हर्सल टाईम’ची (यूटीसी) आण्विक कालगणनेशी जुळणी करण्यासाठी असा जास्तीचा एक सेकंद घ्यावा लागतो.
- ‘यूटीसी’ ही आण्विक वेळ आहे. याचा अर्थ, सीसियम या मूलद्रव्याच्या अणूमधील अपेक्षित इलेक्ट्रोमॅग्नेटिक परिवर्तनाच्या आधारावर एक सेकंद ही वेळ ठरविली जाते. हे परिवर्तन इतके विश्वसनीय असते की, गेल्या चौदा लाख वर्षांत हे गणित चुकलेले नाही.
- पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी मारण्यास लागणाऱ्या कालावधीला आपण एक दिवस म्हणतो. सरासरी ८६,४००.००२ सेकंद इतका एका दिवसाचा कालावधी असतो. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीचा वेग कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
- सन १८२० पासून पृथ्वीने ८६,४०० सेकंदात परिभ्रमण पूर्ण केले नसल्याचे शास्त्रज्ञांचे गणित आहे. त्यामुळे पापणी लवण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षाही कमी वाटणारे हे अधिकचे ०.००२ सेकंद फार वाटत नसले तरी हे दरदिवशी होत असल्याने वर्षभरात तो कालावधी एक सेकंदापर्यंत जातो. त्यामुळेच ३० जून रोजी ही सेकंदाची भर घातली जाणार आहे.
- १९७२ पासून लीप सेकंदाची अंमलबजावणी सुरू झाली ती १९९९ पर्यंत चालू होती. त्यामुळे वर्षांला एक सेकंद वाढत होता. आता लीप सेकंद फारसे नाहीत. यंदाचा लीप सेकंद हा सन २०००पासून केवळ चौथा लीप सेकंद आहे.
अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सॉफ्टवेअर कंपन्या सज्ज
- सामान्यत: घड्याळीमध्ये २३:५९:५९ नंतर येत्या दिवशी ००:००:०० वाजतात. मात्र ३० जून रोजी एक सेकंद नव्याने सामील झाल्यानंतर ते २३:५९:५९ नंतर २३:५९:६० होतील आणि पुन्हा एक जुलै रोजी ००:००:०० वाजतील.
- अनेक यंत्रणा एक सेकंदासाठी बंद केल्या जातील. यामुळे येणाऱ्या अडचणींतून मार्ग काढण्यासाठी जगभरातील सॉफ्टवेअर कंपन्यांनी तयारी सुरू केली आहे.
- अशाच प्रकारे याआधी २०१२ मध्ये घड्याळी वेळेत एक सेकंद वाढविला गेला तेव्हा अनेक कंपन्यांची यंत्रणा कोलमडली होती व खासकरून जावा स्क्रीप्टमधील सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या, असे वृत्त ‘दि टेलिग्राफ’ दैनिकाने दिले आहे.
फोर्ब्जची सर्वाधिक कमाई केलेल्या सेलिब्रेटींची यादी प्रसिद्ध
- फोर्ब्ज मासिकाने २०१५ मध्ये सर्वाधिक कमाई केलेल्या जगातील 'टॉप १००' सेलिब्रेटींची यादी (सेलिब्रिटी १०० : द वर्ल्ड टॉप पेड एन्टरटेनर्स २०१५) नुकतीच प्रसिद्ध केली आहे.
- या यादीत अमिताभ, सलमान, अक्षयसह भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी याचाही समावेश आहे.
- या वर्षाच्या यादीत अमेरिकेचा बॉक्सर फ्लॉइड मेवेदर हा अव्वलस्थानी आहे. मेवेदरची कमाई १९ अब्ज रुपये आहे.
- अमिताभ आणि सलमानची कमाई २ अब्ज १३ कोटी रुपये आहे. सलमान, अमिताभ हे संयुक्तपणे ७१ व्या स्थानी आहेत. अक्षय कुमारही कमाईत या दोघांच्या जवळपास आहे. त्याची कमाई २ अब्ज ७ कोटी आहे. या यादीत तो ७६ व्या स्थानी आहे. तर धोनीची कमाई १ अब्ज ९७ कोटी रुपये असून तो ८२ व्या क्रमांकावर आहे.
- विशेष बाब म्हणजे यात शाहरुख खान स्थान पटकावू शकलेला नाही.
- फोर्ब्स यादीत गायिका टेलर स्विफ्ट (८), टेनिसपटू रोजर फेडरर (१६), गायिका बियांसे (२९), किम करदाशियाँ (३३), गोल्फपटू टाइगर वुड्स (३७), अभिनेता टॉम क्रूज (५२), अभिनेता जॉनी डेप (८७) आणि लियोनाडरे डिकैप्रियो (८९) यांचा समावेश आहे.
‘इसिस’ संबंधित कंपन्यांशी व्यवहारावर भारताची बंदी
- पश्चिम आशियामध्ये दहशतीचा धुमाकूळ घालणाऱ्या ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेच्या ताब्यातील तेलसाठ्यांच्या व्यापारावर भारताने ३० जून रोजी बंदी घातली.
- तेलसंपन्न इराक, सीरियामधील बहुतांश भूभागावर ताबा मिळविलेल्या ‘इसिस’साठी तेलसाठे हे निधी उभा करण्याचे महत्त्वाचे साधन आहे. त्यांच्या नाड्या आवळण्यासाठी या संघटनेशी तेलासंदर्भातील व्यवहार करू नये, असा ठराव ‘संयुक्त राष्ट्रसंघा’ने (यूएन) केला होता.
इसिस : इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया
- कट्टर दहशतवादी संघटना असलेल्या ‘इसिस’चा उदय सीरिया आणि इराकमध्ये झाला. कट्टरवाद आणि निर्घृण हत्या करत त्यांनी जगभरातील दहशतवाद्यांना आकर्षित केले आहे.
- ‘इसिस’कडे भरतीसाठी असलेल्या तरुणांच्या ओढ्यामुळे पाश्चिमात्य देश चिंताक्रांत झाले आहेत.
- आता ही कट्टरवादी संघटना युरोपमध्येही हातपाय पसरू पाहत असल्याची चिन्हे गेल्या काही दिवसांमध्ये दिसली आहेत. ‘इसिस’ची आर्थिक कोंडी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने मदत करावी, असे आवाहन इराकचे पंतप्रधान हैदर अल-अबादी यांनी केले आहे.
- या पार्श्वभूमीवर वाणिज्य मंत्रालयाने एक परिपत्रक काढून या व्यापारावर बंदी घालत असल्याचे जाहीर केले.
जयललितांचा पोटनिवडणुकीत ऐतिसाहिक विजय
- तमिळनाडूतील आर.के. नगर पोटनिवडणुकीत तमिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि ‘अण्णा द्रमुक’ सर्वेसर्वा जे. जयललिता यांनी ऐतिहासिक विजय मिळविला आहे. जयललिता यांना १ लाख ६० हजार ३४२ मते मिळाली आहेत.
- विक्रमी फरकाने त्यांचा विजय झाला असून सर्व प्रतिस्पर्धी उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. या विजयामुळे तमिळनाडूमधील विधानसभेमध्ये पुन्हा प्रवेश करण्याचा जयललिता यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
- या मतदारसंघातून मुख्य लढत ही जयललिता आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते सी. महेंद्रन यांच्यात झाली. सी. महेंद्रन यांना अवघी दहा हजार मतेच पडली. जयललिता यांनी महेंद्रन यांचा १ लाख ५० हजार ७२२ मतांनी पराभव केला.
- या पोटनिवडणुकीसाठी ७० टक्के मतदान झाले होते. निवडणुकीवर मुख्य विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. त्यामुळे जयललिता यांचा विजय निश्चित मानला जात होता.
- तामिळनाडू राज्यपाल : के. रोसय्या
पार्श्वभूमी
- बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी कर्नाटकमधील विशेष न्यायालयाने जयललिता यांना दोषी ठरविल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाला आणि आमदारकीला मुकावे लागले होते. या निर्णयाविरोधात त्यांनी तेथील उच्च न्यायालयात दाद मागितली.
- उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवित जयललिता यांना निर्दोष ठरविले होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच त्यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
- त्यानंतर घटनेप्रमाणे विधानसभेचा सदस्य होण्यासाठी त्यांनी आर. के. नगर विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढविली.
विजेंदरसिंग प्रोफेशनल बॉक्सिंगमध्ये
- भारतीय बॉक्सर विजेंदरसिंग याने प्रोफेशनल बॉक्सिंगमध्ये पाऊल ठेवताच भारतीय बॉक्सिंगमध्ये नवा अध्याय लिहिला गेला.
- २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकणाऱ्या विजेंदरने आयओएस स्पोर्ट्स अॅण्ड एन्टरटेन्मेंटच्या माध्यमातून क्वीन्स बेरी प्रमोशन्ससोबत बहुवर्षीय व्यावसायिक करार केला. यानुसार तो मिडलवेटमध्ये पहिल्या वर्षी किमान सहा लढती खेळेल.
- हरियाणातील भिवानी गावात जन्मलेला ३९ वर्षांचा विजेंदर यापुढे मॅन्चेस्टर शहरात वास्तव्यास असेल.
- विजेंदरने २००६ आणि २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक, २००६ च्या आशियाडमध्ये कांस्य, २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य आणि २००९च्या विश्व हौशी चॅम्पियनशिप, तसेच २०१० च्या नवी दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. २००९ साली मिडलवेट गटात तो विश्वक्रमवारीत अव्वल स्थानावर राहिला होता.
भारत, थायलंडमध्ये विविध क्षेत्राशी संबंधित करार
- भारत आणि थायलंडने दुहेरी कर आकारणी टाळणे करारासह (डीटीएए) अनेक महत्त्वपूर्ण करारांवर ३० जूनला स्वाक्षऱ्या केल्या, तसेच प्रत्यार्पण करारावर शिक्कामोर्तब करणाऱ्या दस्तऐवजांची देवाण-घेवाण केली.
- भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि थायलंडचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री तानासाक पातिमप्रगोर्म यांनी या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.
- प्रत्यार्पण करारावर २०१३ मध्ये स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा करार फरार गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणासाठी कायदेशीर चौकट उपलब्ध करून देतो. दस्तऐवजांच्या देवाण-घेवाणीमुळे प्रत्यार्पण प्रक्रियेला वेग मिळणार आहे.
विश्वचषकासाठी गोवा यजमान
- २०१७ मध्ये होणाऱ्या १७ वर्षांखालील जागतिक पातळीवरील फुटबॉल विश्वकप स्पर्धा भारतात प्रथमच होत आहे.
- त्यासाठी देशातील सहा शहरांपैकी एक संभाव्य केंद्र म्हणून गोव्याची निवड करण्यात आल्याची अधिकृत घोषणा स्पर्धेचे तांत्रिक संचालक जेवियर सिप्पी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
- गोव्याबरोबरच गुवाहाटी, कोची, कोलकता, नवी मुंबई आणि दिल्ली येथील स्पर्धा केंद्रांचा संभाव्य यादीत समावेश आहे.
- स्पर्धेसाठी गोव्यात चार प्रशिक्षण मैदान आणि एका मुख्य मैदानाची निवड करण्यात आली आहे. ही सर्व मैदाने फिफाच्या दर्जानुसार तयार केली जातील. यामध्ये बाणावली, वास्को, कुंकळ्ळी आणि उत्तोर्डा यांचा समावेश आहे. या चारही केंद्रांवर प्रत्येकी सहा सामने खेळविण्यात येतील.
राष्ट्रपती दक्षिणेच्या दौऱ्यावर
- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी २९ जून रोजी दहा दिवसांच्या दक्षिण भारत दौऱ्यावर रवाना झाले आहेत.
या दौऱ्याचा नियोजित कार्यक्रम
- सिकंदराबाद येथील 'राष्ट्रपती निलयम' येथे ते प्रामुख्याने मुक्कामास असतील.
- एक जुलैला ते तिरुमला येथील श्री तिरुपती देवस्थानास भेट देणार
- तीन जुलै रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या 'उनिकी' या नव्या पुस्तकाची पहिली प्रत राष्ट्रपती मुखर्जी यांना प्रदान करण्यात येणार आहे. हैदराबादमधील इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे हा समारंभ होणार आहे.
- बोलारूम येथे असलेल्या 'राष्ट्रपती निलयम'च्या प्रांगणातील नक्षत्र वाटिकेचे मुखर्जी यांच्या हस्ते सहा जुलै रोजी उद्घाटन होईल.
- राष्ट्रपतींचा दक्षिण मुक्काम आठ जुलैला संपणार आहे.
ग्रीस आर्थिक संकटात
- वारंवार कर्जे घेऊनही आर्थिक बाजू सावरू न शकलेल्या, वित्त पुरवठ्यासाठी बव्हंशी जर्मनीवर अवलंबून राहिलेल्या ग्रीसला आर्थिक दिवाळखोरी जाहीर करण्यावाचून पर्याय उरला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
- ग्रीसला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे तब्बल दीड अरब युरोचे कर्ज फेडायचे आहे. याआधी कडक अटींमुळे या देशाने मदतीचे पॅकेज नाकारले होते. मात्र, आता परिस्थिती आणखी बिकट बनली आहे.
- ग्रीसमधील बँका नागरिकांना पैसे देऊ शकत नसल्याने त्या ६ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रीक सरकारला घ्यावा लागला आहे.
- शिल्लक भांडवलावर नियंत्रण ठेवण्याचा अखेरचा प्रयत्न ग्रीस सरकारने सुरू केला आहे. त्यामुळे बँका व एटीएम केंद्रे २९ जूनला बंद ठेवण्यात आली होती.
- नागरिकांना केवळ ६० युरो पैसे बँकेतून काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे पेन्शनरांनी बँकांबाहेर लांबलचक रांगा लावलेल्या दिसत होत्या.
- अशी बिकट स्थिती असतानाही ग्रीक पंतप्रधान अॅलेक्सिस त्सीप्रास यांनी २९ जून रोजी ग्रीसच्या आर्थिक सुधारणांसाठी अन्य देशांकडून वित्त पुरवठा व्हावा यासाठी सार्वमत घेण्याची घोषणा केली.
परिणाम
- यामुळे युरोपीय संघाचे सामायिक चलन असलेल्या युरोची किंमत कमी होण्याची शक्यता आहे.
- ग्रीसला भारतातून फारशी निर्यात होत नाही. त्यामुळे भारतावर ‘ग्रीस’ संकटाचा फारसा परिणाम होणार नाही.
- ग्रीसमधील आर्थिक संकटामुळे भारतात सेन्सेक्स ५३५ अंशांनी घसरला आहे. तर निफ्टीमध्ये १६६ अंशांची घसरण झाली आहे.
- युरोपातून भारतात झालेली गुंतवणूक परत जाण्याचा धोका असल्यामुळे शेअर बाजारांना आणखी फटका बसू शकेल.
मॅगीच्या निर्यातीला परवानगी; बंदी कायम
- केंद्र सरकारने मॅगीमध्ये आरोग्यास हानीकारक घटक असल्याने बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे मॅगीच्या कोट्यवधींच्या मालाचे नुकसान टाळण्यासाठी नेस्ले कंपनीने उच्च न्यायालयात याचिका केली.
- यावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने कंपनीला परदेशात मॅगीची निर्यात करण्यास परवानगी देत मॅगी विक्रीवरील बंदी कायम ठेवली आहे.
- मॅगीच्या निर्यातीला परवानगी दिल्यामुळे नेस्ले कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणावरील पुढील सुनावणी १४ जुलैला होणार आहे.
ऍडलेडमध्ये पहिली दिवस-रात्र कसोटी
- ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये येत्या नोव्हेंबरमध्ये ऍडलेड ओव्हलच्या मैदानावर प्रथमच दिवस-रात्र कसोटी सामना खेळविला जाणार आहे.
- न्यूझीलंडचा संघ तीन कसोटी सामने खेळण्यासाठी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यास २७ नोव्हेंबरपासून ऍडलेडच्या मैदानावर सुरवात होणार आहे.
- हा सामना दिवस-रात्र असा प्रकाशझोतात आणि गुलाबी चेंडूसह खेळविला जाणार आहे.
- ऍडलेडच्या वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सामन्यास सुरवात असून, तो रात्री साडेनऊपर्यंत खेळविला जावा, असे नियोजन आहे.
विसूभाऊ बापटांची गिनीज बूकमध्ये नोंद
- गेली ३४ वर्षे विसूभाऊ बापट यांची ‘कुटुंब रंगलय काव्यात’ ही काव्यमैफल मराठी रसिकांना मोहिनी घालते आहे. २ हजार ७०८ प्रयोगांचा विक्रम करणाऱ्या या काव्यमैफलीला मराठी रसिकांनी डोक्यावर घेतले आहे.
- सलग पंधरा तास काव्यवाचन करत विसूभाऊ बापट यांनी काव्य वाचनातला नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यासाठी १२ जून रोजी त्यांची गिनीज बूकमध्ये नोंद झाली आहे.
विसूभाऊ बापट यांच्याबद्दल
- पूर्ण नाव : विश्वनाथ श्रीधर बापट
- मूळगाव : रत्नागिरी | जन्मगाव : सांगली.
- रसिक त्यांना आदराने विसूभाऊ म्हणतात.
- १९८१ला मराठी कवितांची महती पटविणाऱ्या ‘कुटुंब रंगलय काव्यात’ची संकल्पना विसूभाऊंनी साकारली. २६ जानेवारी १९८१ ला नगर येथे याचा पहिला प्रयोग झाला.
- दहा, शंभर, हजार, दोन हजार अशा अगणित प्रयोगांची वाटचाल करत विसूभाऊ ‘कुटुंब’ घेऊन जग फिरत आहेत.
‘कुटुंब रंगलय काव्यात’ची भव्यता
- दहा हजारहून अधिक कविता
- एक हजारहून अधिक कवी
- दोन हजार सातशेहून अधिक प्रयोग
- सत्तरहून अधिक काव्यप्रकार
- दहाहून अधिक बोलीभाषा
- ४५ तासांचे पाठांतर
गुलजार यांचे ‘लकीरें’ अवतरले रंगभूमीवर
- ख्यातनाम कवी, गीतकार गुलजार यांच्या लेखणीतून साकारलेला भारत-पाकच्या ६० वर्षांच्या संबंधांवर आधारलेला ‘लकीरें’ या कथा व कवितासंग्रहावर आधारलेले नाटक प्रथमच रंगमंचावर अवतरले आहे.
- सलीम आरिफ यांनी दिग्दर्शित केलेली ही नाट्यकृती पाहून खुद्द गुलजारही दंग राहिले.
- ‘लकीरें’मधील कवितांना आरिफ यांनी नाट्यसूत्रात बांधून त्याचे रंगमंचावर केलेले सादरीकरण पाहून गुलजार कमालीचे सुखावले.
इंडोनेशिया हवाईदलाच्या विमानाला अपघात
- इंडोनेशिया हवाईदलाच्या हर्क्युलस सी-१३० या विमानाला मेदान शहरात झालेल्या अपघातात २० सैनिकांसह ४५ जण ठार झाले आहेत.
- इंडोनेशिया हवाई दलाच्या विमानामधून सैनिक प्रवास करत होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर केवळ दोन मिनिटातच मेदान शहराजवळ विमानाला अपघात झाला आणि अपघातात २० सैनिकांचा जागीच मृत्यू झाला आहे.
- जखमी सैनिकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.
!!! जय महाराष्ट्र !!!