‘मोबाइल डेटा’ ग्राहकाला देणं बंधनकारक
- 'मोबाइल डेटा'ची संपूर्ण माहिती ग्राहकाला देणे दूरसंचार कंपन्यांना बंधनकारक करण्यात येणार आहे. याशिवाय दूरसंचार कंपन्यांना ग्राहकांच्या पूर्वपरवानगीशिवाय मोबाइल डेटा 'अॅक्टिव्ह' अथवा 'डिअॅक्टिव्ह' करता येणार नाही.
- या विषयीचा 'डेटा यूज इन्फर्मेशन रेग्युलेशन' १ नोव्हेंबरपासून देशभर लागू करण्यात येणार आहे.
- दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात 'ट्राय'ने टेलिकॉम कंझ्युमर प्रोटेक्शन रेग्युलेशनमध्ये बदल केले असून, ते लागू करण्यासाठी कंपन्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
- नव्या नियमावलीनुसार कंपन्यांना माहितीच्या वापरासंबंधी ग्राहकांना एसएमएस अथवा यूएसएसडीच्या माध्यमातून ही माहिती द्यावी लागणार आहे.
- कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या विशेष डेटा ऑफरव्यतिरिक्त अन्य योजनांमध्ये प्रत्येकी १० एमबी डेटाचा वापर झाल्यानंतर माहिती द्यावी लागणार आहे. या शिवाय कोणत्याही प्रकारची माहिती मागविण्याचे अधिकार ग्राहकांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
- विविध विशेष डेटा पॅक अंतर्गत ५० टक्के किंवा १०० टक्के डाटा वापरल्यानंतर त्या विषयीची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
- याशिवाय ५०० एमबी, १०० एमबी आणि १० एमबी डाटा शिल्लक राहिला असतानाही त्या विषयीची माहिती ग्राहकांना द्यावी लागणार आहे. या व्यतिरिक्त डाटाची मर्यादा ९० टक्के झाल्यानंतर योजनेची विस्तृत स्वरुपात माहिती कंपनीला द्यावी लागणार आहे.
- मोबाइल डेटा वापरणाऱ्या ग्राहकांना तो अॅक्टिव्हेट करण्यासाठी अथवा डिअॅक्टिव्हेट करण्यासाठी १९२५ या टोल फ्री क्रमांकावर अनुक्रमे ‘START’ अथवा ‘STOP’ एसएमएस करावा लागणार आहे. १ सप्टेंबरपासून ही सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे.
- सेवा पुरवठादार कंपन्यांकडून मोबाइल डेटाच्या संदर्भात योग्य ती माहिती आणि वेळोवेळी सूचना मिळत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी 'ट्राय'कडे आल्या होत्या. त्यामुळे 'ट्राय'ने नियमांमध्ये हे बदल केले आहेत.
अनिवासी भारतीयांना आधार कार्ड
- केंद्र सरकारने अनिवासी भारतीय (एनआरआय), भारतीय वंशाचे नागरिक (पीआयओ) आणि परदेशात वास्तव्यास असणाऱ्या भारतीयांना (ओआयसी) आधार कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे संबंधितांना आपली डिजिटल ओळख मिळविणे शक्य होणार आहे.
- आधार कार्ड नोंदणीच्या प्रकल्पाला गती देण्यासाठी केंद्र सरकारने भारतीय वंशाच्या प्रत्येक नागरिकाला या प्रक्रियेत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
- आधारचे दीर्घकालीन उद्दिष्ट लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अंतर्गत अनिवासी भारतीय, भारतीय वंशाचे नागरिक आणि परदेशात वास्तव्यास असणाऱ्या भारतीयांची नोंदणी करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
- पुण्याचे जुळे शहर म्हटले जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरणार आहे.
- पिंपरी-चिंचवडमधील डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला हे संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. या भागात होणारे हे पहिले संमेलन असले, तरी पुणे परिसरातील १४वे संमेलन आहे.
- महामंडळाच्या ९ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत या संमेलनासाठी महामंडळाने उद्योगनगरी म्हणून नावारूपाला आलेल्या पिंपरी-चिंचवडची निवड केली.
- अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अध्यक्षा : डॉ. माधवी वैद्य
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
- ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने, तसेच त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करण्याच्या हेतूने न्या. म. गो. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने १८७८च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले.
- त्यासाठीचे आवाहन ‘ज्ञानप्रकाश’ वृत्तपत्रामध्येमध्ये प्रसिद्ध झाले आणि या आवाहनानुसार ११ मे १८७८ रोजी सायंकाळी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले.
- याला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजले जाते. या संमेलनाचे अध्यक्ष पद न्या.रानडे यांनीच भूषविले.
- दुसरे ग्रंथकार संमेलन १८८५ साली पुण्यातच (दाणे आळी, बुधवार पेठ) जोशी हॉलमध्ये भरले. कृष्णशास्त्री राजवाडे या संमेलनाचे अध्यक्ष होते.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने |
क्रमांक | वर्ष | स्थळ | अध्यक्ष |
१ | १८७८ | पुणे | महादेव गोविंद रानडे |
२ | १८८५ | पुणे | कृष्णशास्त्री राजवाडे |
८६ | २०१३ | चिपळूण | नागनाथ कोतापल्ले |
८७ | २०१४ | सासवड | फ.मुं शिंदे |
८८ | २०१५ | घुमान (पंजाब) | डॉ. सदानंद मोरे |
८९ | २०१६ | पिंपरी-चिंचवड | अजून निवड झालेली नाही. |
पंतप्रधान नरेंद्र मोदी युएईच्या दौऱ्यावर
- पंतप्रधान नरेंद्र मोदी १६-१७ ऑगस्ट रोजी २ दिवसांच्या संयुक्त अरब आमिरातीच्या (UAE) दौऱ्यावर जाणार आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर तब्बल ३४ वर्षांनी भारताचे पंतप्रधान संयुक्त अरब आमिरातीच्या दौऱ्यावर जात आहेत. मोदींच्या आखाती देशांच्या दौऱ्यातील हा पहिला टप्पा आहे.
- पंतप्रधान मोदी १६ ऑगस्ट रोजी अबू धाबी येथे संयुक्त अरब आमिरातीच्या राजकीय नेतृत्वाशी अनेक विषयांवर चर्चा करतील आणि १७ ऑगस्ट रोजी दुबईत प्रमुख व्यापाऱ्यांना तसेच नोकरीच्या निमित्ताने राहणाऱ्या भारतीयांना भेटणार आहेत.
- दुबईत पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी क्रिकेट स्टेडियममध्ये विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात पंतप्रधान मोदी ४० हजार भारतीयांना उद्देशून भाषण करणार आहेत.
- या दौऱ्याच्या निमित्ताने व्यापार, गुंतवणूक, संरक्षण या विषयांवर सहकार्याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे.
- भारत आणि संयुक्त अरब आमिराती यांच्यात २०१४-१५ मध्ये ५९ अब्ज डॉलरचा व्यापार झाला आहे. संयुक्त अरब आमिरातीसोबत सर्वाधिक व्यापार करणाऱ्यांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. अव्वल स्थानी चीन आणि दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे.
- नोकरीच्या निमित्ताने संयुक्त अरब आमिरातीमध्ये राहणाऱ्या भारतीयांकडून २०१४ मध्ये मायदेशी १२.६४ अब्ज डॉलर पाठवण्यात आले आहेत. भारताला मोठ्या प्रमाणावर विदेशी चलन मिळवून देणाऱ्यांमध्ये संयुक्त अरब आमिराती हा प्रमुख देश आहे.
देशात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण ४५ टक्के
- केंद्र सरकारने संसदेत राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाचा (NCRB) अहवाल सादर केला. या अहवालामध्ये राष्ट्रीय पातळीवर आरोपींना शिक्षा होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. २०१४ मध्ये राष्ट्रीय पातळीवर शिक्षा होण्याचे प्रमाण ४५ टक्क्यांवर पोहोचले आहे. २०१३ मध्ये हेच प्रमाण ४०.२ टक्के इतके होते तर २०१२ मध्ये हे प्रमाण केवळ ३८.५ टक्के इतके होते.
- राज्यांचा विचार केल्यास केरळची कामगिरी सर्वोत्तम असल्याचे दिसून येते. केरळमध्ये आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण तब्बल ७७ टक्के इतके आहे. केरळनंतर तामिळनाडूमध्ये आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ६५.९ टक्के इतके आहे तर बिहारमध्ये हेच प्रमाण सर्वात कमी म्हणजे १० टक्के इतके आहे.
- महाराष्ट्राची कामगिरी यात वाईट असल्याचे दिसते. राज्यात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण २०१३ मध्ये केवळ १३ टक्के इतके होते. त्यात जवळ जवळ ७ टक्क्यांची वाढ होत ते प्रमाण आता १९.३ टक्क्यांवर पोहोचले आहे. २०१२ मध्ये हेच प्रमाण ९ टक्के इतके होते.
- बिहार, महाराष्ट्राबरोबरच पश्चिम बंगालमध्येही आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण केवळ ११ टक्के इतके आहे. राष्ट्रीय पातळीवर शिक्षा होण्याच्या प्रमाणापेक्षा बिहार, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल ही राज्ये अद्याप बरीच मागे आहेत.
- गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे असे मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण राष्ट्रीय पातळीपेक्षा जास्त म्हणजे ५३.२ टक्के इतके आहे.
- देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा प्रथम एनसीआरबीने नोंदी ठेवण्यास सुरुवात केली त्यावेळी म्हणजे १९५३ मध्ये आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण तब्बल ६४ टक्के होते. त्याच्या पुढील दशकात त्यात वाढ झाली आणि ते प्रमाण ६५ टक्क्यांवर पोहोचले. मात्र ७०च्या दशकानंतर त्यात सातत्याने घसरण होत गेली आणि २०१२ मध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत खाली आले.
इंग्लंडचा जो रूट कसोटी क्रिकेट रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर
- इंग्लंडला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस मालिकेत दमदार विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा इंग्लंडचा जो रूट ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथला मागे टाकून कसोटी क्रिकेट रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे.
- रूटने या मालिकेत दोन शतके व दोन अर्धशतकांसह ४४३ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नव्या रँकिंगनुसार रूट हा फलंदाजीत अव्वल असल्याचे स्पष्ट झाले. स्टीव्हन स्मिथ मात्र तिसऱ्या स्थानावर फेकला गेला. दक्षिण आफ्रिकेचा ए.बी. डीव्हिलियर्स हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
गोलंदाजीत स्टुअर्ट ब्रॉड दुसऱ्या स्थानावर
- फलंदाजीत जशी इंग्लंडने रँकिंगमध्ये सरशी साधली तशीच गोलंदाजीतही साधली आहे. ऑस्ट्रेलियाला नॉटिंगहॅमशायर कसोटीत ६० धावांत उखडणारा स्टुअर्ट ब्रॉड याने आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम रँकिंग मिळविले आहे. तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
- पहिल्या क्रमांकावर मात्र अजूनही दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन आहे. इंग्लंडचे फ्रेड ट्रूमन हे याआधी रँकिंगमध्ये सर्वोत्तम चौथ्या स्थानावर पोहोचले होते. तो विक्रम ब्रॉडने मागे टाकला.
- ट्रेन्ट ब्रिज येथील विजयानंतर इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कूक हा मायदेशात दोन वेळा अॅशेस जिंकणारा तिसरा कप्तान ठरला आहे. याआधी, डब्ल्यू.जी. ग्रेस व माईक ब्रेअर्ली यांनी ही कामगिरी केली होती.
- इंग्लंडने पाच सामन्यांच्या या मालिकेत ३-१ अशी आघाडी घेत अॅशेस मालिका जिंकलेली आहे.
बॉबी जिंदाल सर्वांत तरुण उमेदवार
- लुईसयाना प्रांताचे राज्यपाल बॉबी जिंदाल हे रिपब्लिकन पक्षातर्फे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या उमेदवारांपैकी सर्वांत कमी वयाचे उमेदवार आहेत.
- अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असणारे ते पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत. ही निवडणूक २०१६ मध्ये होणार आहे.
- बॉबी जिंदाल हे वयाच्या ३६व्या वर्षी लुईसयानाचे राज्यपाल बनले होते. त्या वेळी ते अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत कमी वयाचे राज्यपाल ठरले होते.
- २०१६मधील अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यास मात्र ते सर्वांत तरुण अध्यक्ष ठरणार नाहीत. जॉन एफ केनेडी हे ४३ वर्षांचे असताना निवडणूक जिंकून सर्वांत तरुण अध्यक्ष बनले होते. जिंदाल सध्या ४४ वर्षांचे आहेत.
- अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे एकूण १७ उमेदवार इच्छुक आहेत. यामध्ये जिंदाल यांचे नाव पहिल्या दहामध्येही नाही. त्यामुळे आपल्या नावाचा विचार होण्यासाठी त्यांना आपली लोकप्रियता वाढवावी लागणार आहे.
- सध्या आयोवा येथे त्यांचा प्रचार सुरू असून त्यांच्या सभांना गर्दीही होत आहे.
भारतातील वर्तमानपत्रांच्या संख्येत वाढ
- रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर इन इंडिया (आरएनआय) या संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, जागतिक कल लक्षात घेऊन भारतातील इंग्लिश आणि प्रादेशिक भाषांतील वृत्तपत्रांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
- मार्च २०१३ ते मार्च २०१५ या दोन वर्षांत वृत्तपत्र नोंदणीची संख्या ९४,०६७ वरून १,०५,४४३ वर पोचली आहे.
- मार्च २०१४ मध्ये देशातील इंग्लिश वर्तमानपत्रांची संख्या १३,१३८ अशी होती. एका वर्षात ती १३,६६१ अशी झाली. याच कालावधीत हिंदी वर्तमानपत्रांची संख्या ४०,१५९ वरून ४२,४९३ झाली. मार्च २०१४ मध्ये संस्कृत वर्तमानपत्रांची संख्या ८० होती. या वर्षी मार्चमध्ये ती ९५ झाली.
- वृत्तपत्रांच्या संख्येबरोबरच विक्रीतही मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
वर्तमानपात्रांच्या संख्येनुसार आघाडीची तीन राज्ये |
राज्य | मार्च २०१३ | मार्च २०१४ | मार्च २०१५ |
उत्तर प्रदेश | १४,३३६ | १५,२०९ | १६,१३० |
महाराष्ट्र | १२,४६६ | १३,३७५ | १४,३९४ |
दिल्ली | ११,४१० | - | १२,१७७ |