चालू घडामोडी - २७ ऑगस्ट २०१५ [Current Affairs - August 27, 2015]

जीसॅट-६ चे यशस्वी प्रक्षेपण

    GSAT 6
  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) संवाद उपग्रह ‘जीसॅट-६’चे भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक जीएसएलव्ही डी-६ च्या माध्यमातून २७ ऑगस्ट रोजी दुपारी ४.५२ मिनिटांनी सतीश धवन अवकाश केंद्रावरून (श्रीहरीकोटा) यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
  • इस्रोने तयार केलेला जीसॅट-६ हा २५ वा भूस्थिर उपग्रह आहे तर जीसॅट मालिकेतील हा १२ वा उपग्रह आहे. हा उपग्रह ९ वर्षे कार्यरत राहणार आहे.
  • नियोजित मार्गावरून अचूक मार्गक्रमण करत 'जीएसएलव्ही'ने उपग्रहाला १७ मिनिटांत १६८ किलोमीटर बाय ३५९३९ किलोमीटरच्या लंबवर्तुळाकार कक्षेत प्रस्थापित केले.
  • त्यानंतर तात्काळ उपग्रहावरील सौरपंखे उघडले जाऊन त्याच्याशी संपर्क प्रस्थापित झाला. यानंतर उपग्रहावर बसवण्यात आलेल्या इंधन यंत्रणेच्या साह्याने 'जीसॅट ६'ला ३६ हजार किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत पाठवण्यात येईल.
  • इस्रोचे अध्यक्ष : ए. एस. किरणकुमार
  • प्रकल्पाचे संचालक : आर. उमामहेश्वरन
 ‘जीसॅट-६’ ची वैशिष्ट्ये 
  • उपग्रहाचे वजन : २११७ किलो (११३२ किलो इंधनाचे वजन + ९८५ किलो मूळ उपग्रहाचे वजन)
  • वैशिष्ट्य : या उपग्रहावर सर्वात मोठा एस बँड अँटेना असून त्याचा व्यास ६ मीटर आहे.
  • कार्य : जीसॅट-६ हा उपग्रह एस बँड व सी बँडच्या दूरसंचार यंत्रणेसाठी वापरला जाणार आहे.
  • वापर : या उपग्रहाचा वापर प्रामुख्याने लष्करासाठी केला जाणार आहे.

 जीएसएलव्ही 
  • हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थचे (इस्त्रो) भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान आहे. जीएसएलव्ही (जिओस्टेशनरी सॅटेलाइट लाँच व्हेईकल) प्रक्षेपकाचे हे एकूण नववे उड्डाण आहे.
  • स्वदेशी बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनच्या साह्याने जीएसएलव्हीने केलेले हे दुसरे यशस्वी उड्डाण आहे. १५ एप्रिल २०१० रोजी एका अयशस्वी उड्डाणानंतर ५ जानेवारी २०१४ ला क्रायोजेनिक इंजिनच्या साह्याने केलेले उड्डाण यशस्वी झाले होते.
  • त्यानंतर २७ ऑगस्ट २०१५ रोजी स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनासह इस्रोच्या जीएसएलव्ही डी-६ प्रक्षेपकाने जीसॅट-६ उपग्रह यशस्वीपणे कक्षेमध्ये सोडला. इस्रोच्या वतीने प्रक्षेपित करण्यात आलेला हा पंचविसावा संवाद उपग्रह आहे.
  • स्वदेशी क्रायोजेनिक तंत्रज्ञान असलेला भारत हा अमेरिका, रशिया, जपान, चीन आणि फ्रान्सनंतर फक्त सहावा देश आहे. 
‘जीएसएलव्ही डी-६’ची वैशिष्ट्ये
व्यास : ३.४ मीटरलांबी : ४९.१ मीटरवजन : ४१६ टन

'स्मार्ट सिटी' योजनेसाठी ९८ शहरांची अंतिम यादी जाहीर


  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी 'स्मार्ट सिटी' योजनेसाठी निवड करण्यात आलेल्या ९८ शहरांची अंतिम यादी २७ ऑगस्ट रोजी केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत जाहीर करण्यात आली असून जम्मू-काश्मीर आपली दोन शहरे नंतर नोंदविणार आहे.
  • देशातील शंभर शहरांचा नियोजनबद्ध विकास करण्याच्या प्रयोजनाने सुरू करण्यात आलेल्या 'स्मार्ट सिटी' योजनेच्या अंतिम यादीत महाराष्ट्राच्या खालील दहा शहरांना स्थान मिळाले आहे.
मुंबईठाणेसोलापूरपुणेऔरंगाबाद
नवी मुंबईकल्याण-डोंबिवलीनागपूरनाशिकअमरावती
  • राज्य सरकारने शिफारस केलेल्या यादीत पिंपरी-चिंचवडचाही समावेश करण्यात आला होता. परंतु, केंद्राकडून जाहीर झालेल्या अंतिम यादीत पिंपरी-चिंचवडला स्थान देण्यात आलेले नाही.
  • या यादीत उत्तर प्रदेशमधील सर्वाधिक १३ शहरांचा, तर तामिळनाडूतील १२, मध्य प्रदेशमधील ७, गुजरातमधील ६, पश्चिम बंगाल व राजस्थानधील ४, आणि बिहार व आंध्र प्रदेशमधील प्रत्येकी ३ शहरांचा 'स्मार्ट सिटी'मध्ये समावेश आहे.
  • या शहरांच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून पुढील पाच वर्षांमध्ये ९८ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.
 स्मार्ट सिटी योजना 
  • योजनेच्या पहिल्या टप्प्यात देशभर राज्य पातळीवर स्पर्धा घेऊन शहरांची निवड करण्यात आली होती. त्यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला शहरांच्या संख्येचा वाटा ठरवून दिला होता.
  • 'स्मार्ट सिटी' योजनेकरवी केंद्राकडून मिळणाऱ्या अधिकच्या निधीचा या शहरांच्या विकासासाठी राज्यांच्या सरकारांना उपयोग करता येणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून निवड झालेल्या शहरांतील आरोग्य, शिक्षण, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण, वाहतूक व्यवस्था इत्यादी पायाभूत सुविधांच्या नियोजनबद्ध विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष निधी मिळणार आहे.
  • या योजनेबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  • सर्व ९८ शहरांची यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा.

उसेन बोल्ट २०० मीटरचाही चॅम्पियन

  • जमैकाचा विश्वविक्रमवीर धावपटू उसेन बोल्टने बीजिंगमध्ये सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत १०० मीटर पाठोपाठ २०० मीटरचेही जेतेपद पटकावले. 
  • बोल्टने २०० मीटरची शर्यत १९.५५ सेकंदात पूर्णकरून आपणच जगातील सर्वात वेगवान व्यक्ती असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले.
  • अमेरिकेच्या जस्टीन गॅटलीनला याही स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. गॅटलीनने १९.७४ सेकंदात शर्यत पूर्ण करून बोल्टला कडवी टक्कर दिली.
  • या स्पर्धेच्या १०० मीटर श्रेणीत उसेन बोल्टने ९.७९ सेकंदात शर्यत पूर्ण करून स्पर्धेचे जेतेपद कायम राखले होते, तर गॅटलीनने ९.८० सेकंदात शर्यत पूर्ण करून रौप्य पदकाची कमाई केली.

डिव्हिलियर्सचा नवा विक्रम

  • दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज ए.बी.डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांत सर्वात कमी डावात ८ हजार धावांचा टप्पा गाठून भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार सौरव गांगुलीचा विक्रम मोडीस काढला.
  • डिव्हिलियर्सने अवघ्या १८२ डावांत ८ हजार धावांचा आकडा गाठला आहे. हा विक्रम याआधी सौरव गांगुलीच्या नावावर होता. सौरवने २०० डावांमध्ये ८ हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
  • त्यानंतर सर्वात वेगवान ८ हजार धावा करणाऱ्यांमध्ये सचिन तेंडुलकर (२१० सामने), वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा (२११ सामने) आणि भारतीय संघाचा एकदिवसीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी (२१४ सामने) यांचे नाव घेतले जाते.
  • डिव्हिलियर्सच्या नावावर सध्या १९० एकदिवसीय सामन्यात १८२ डावांमध्ये ५३.२७ च्या सरासरीने ८०४५ धावा जमा आहेत. 
  • ए.बी.डिव्हिलियर्सच्या नावावर याआधी सर्वात वेगवान अर्धशतक, शतक आणि दीडशतक ठोकण्याच्याही विक्रमाची नोंद आहे. आता वेगवान ८ हजार धावांचा विक्रम रचून डिव्हिलियर्सने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

पाकचे माजी पंतप्रधान गिलानींच्या अटकेचे आदेश

  • पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्याविरोधात २७ ऑगस्ट रोजी फेडरल न्यायालयाकडून भ्रष्टाचारप्रकरणी अटक वॉरंट काढण्यात आले.
  • पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) नेते असलेल्या गिलानी यांच्यासह त्यांच्याच पक्षाच्या मखदूम अमीन फाहीम यांच्या विरोधातही अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.
  • न्यायालयाने हे आदेश फेडरल इनव्हेस्टीगेटिंग एजन्सीच्या (एफआईए) वतीने दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रानंतर दिले आहेत.
  • गिलानी यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात त्यांच्यावर अनेक बनावट कंपन्या स्थापन करून या कंपन्यांना बेकायदेशीरित्या व्यापारी सवलती दिल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत.
  • न्यायालयाने यापूर्वीही गिलानी आणि फईम यांच्याविरोधात नोटीस जारी केली होती. मात्र, या दोघांकडून या नोटीशींना उत्तर देण्यात आले नव्हते. त्यामुळे आता न्यायालयाने पोलिसांना गिलानी आणि फईम यांना अटक करून १० सप्टेंबरला न्यायालयात हजर करण्यास सांगितले आहे.

पटेल समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण

  • पटेल समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गुजरातमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला २६ ऑगस्ट रोजी हिंसक वळण लागले.
  • या आंदोलनात ९ जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरचित्रवाणीवरून गुजराती बांधवांशी संवाद साधत आंदोलन थांबवून चर्चेसाठी पुढे येण्याचे आवाहन पटेल समाजाच्या नेत्यांना केले आहे.
  • आर्थिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात सुस्थितीत असलेल्या पटेल समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हार्दिक पटेल या तरुणाच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे.
  • हार्दिक पटेल याने येथील जीएमडीसी मैदानावर घेतलेल्या सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. या सभेनंतर हार्दिकला पोलिसांनी ताब्यात घेतले व चौकशीनंतर सोडून दिले होते. मात्र, त्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागले. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या.

टिंटू लुकाचा ऑलिम्पिक प्रवेश निश्चित

  • भारताच्या टिंटू लुकाला जागतिक मैदानी स्पर्धेत ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले, परंतु तिने ऑलिम्पिकमधील प्रवेश मात्र निश्चित केला.
  • २६ वर्षीय लुकाने ही शर्यत २ मिनिटे ०.९५ सेकंदांत पार करीत पहिल्या प्राथमिक फेरीत सातवे स्थान मिळवले. प्रत्येक प्राथमिक फेरीतील पहिले तीन खेळाडूच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले.
  • आशियाई विजेती व राष्ट्रीय विक्रम नोंदविणारी खेळाडू लुकाची १ मिनिट ५९.१७ सेकंद ही वैयक्तिक सर्वोत्तम वेळ आहे. तिला ही वेळ नोंदविता आली नाही. मात्र, २ मिनिटे १ सेकंद या ऑलिम्पिक पात्रता वेळेपेक्षा कमी वेळ नोंदवत तिने रिओ ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले.

आयसीआयसीआयची 'एक्स्ट्रा' गृह कर्ज योजना

  • परवडणाऱ्या घरांचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण, मध्यमवयीन पगारदार आणि व्यवसाय असणाऱ्या ग्राहकांसाठी आयसीआयसीआय बँकेने 'एक्स्ट्रा' या अनोख्या कर्ज योजनेची घोषणा केली.
  • देशातील ही पहिलीच 'मॉर्गेज गॅरंटी'चे पाठबळ असणारी योजना असून अतिरिक्त शुल्क भरून कर्ज रक्कम आणि कर्जफेडीचा कालावधी निवृत्तीपलीकडे वाढवून घेण्याची सुविधा यात ग्राहकांना मिळणार आहे.
  • 'इंडिया मॉर्गेज गॅरेंटी कॉर्पोरेशन'च्या मदतीने सुरू केलेल्या या 'आयसीआयसीआय बँक एक्स्ट्रा होम लोन्स'मुळे कर्जदार ग्राहकांना गृहकर्जाची रक्कम २० टक्क्यांपर्यंत वाढवता येऊ शकते.
  • तसेच, कर्जाच्या परतफेडीचा कालावधीत वयाच्या ६७व्या वर्षापर्यंत वाढवण्याची सुविधा आहे. यामुळे ग्राहकांना स्वत:ला उभी करावी लागणारी रक्कम कमी करण्यास मदत होते.
  • यासाठी उर्वरित विस्तारित कालावधीसाठी मासिक हप्ता तेवढाच असेल. मात्र या सुविधेकरिता १.५० लाख रुपयांपर्यंत रक्कम शुल्क म्हणून आकारली जाईल.
  • हे कर्ज पहिले घर खरेदी करण्यासाठी असेल व त्याचा वार्षिक व्याजदर बँकेच्या नियमित रचनेप्रमाणे असेल. सुरुवातीच्या टप्प्यात मुंबई उपनगर, नवी दिल्ली परिसर, बंगळुरू आणि सूरत या शहरांतील घरांसाठी ७५ लाख रुपयांपर्यंत कर्ज याअंतर्गत मिळेल.
  • या अनोख्या योजनेचा हा देशातील पहिलाच प्रयोग असून यामुळे माफक दरातील घरमागणी वाढून सरकारच्या 'सर्वाना घरे' मोहिमेलाही पाठबळ मिळणार आहे.
 दृष्टिक्षेपात 'एक्स्ट्रा' गृह कर्ज योजना 
  • कर्जफेड कालावधी वयाच्या ६७ वर्षांपर्यंत
  • २० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त अर्थसाहाय्य
  • कालावधी विस्तारल्याने घटलेला मासिक हप्ता
  • कमाल १.५० लाख रुपयांपर्यंत सुविधा शुल्क
  • ७५ लाख रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध
  • आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर

सातव्या वेतन आयोगाला चार महिन्यांची मुदत वाढ

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सातव्या वेतन आयोगाला चार महिन्यांची मुदत वाढ देण्यास मंजुरी देण्यात आली. ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत हा कालावधी वाढवून देण्यात आला आहे.
 पार्श्वभूमी 
  • केंद्र सरकारने २८ फेब्रुवारी २०१४ रोजी न्या. ए. के. माथूर यांच्या अध्यक्षतेखाली सातव्या वेतन आयोगाची स्थापना केली होती.
  • ही स्थापना ज्या प्रस्तावाद्वारे झाली होती त्यानुसार स्थापना दिवसापासून १८ महिन्यांच्या आत या आयोगाला आपल्या सूचना सादर करायच्या होत्या व ही मुदत २७ ऑगस्ट २०१५ रोजी संपत आहे.
  • कामाचा आवाका व संबंधितांशी सखोल सल्लामसलत या गोष्टींच्या अनुषंगाने सातव्या केंद्रीय वेतन आयोगाने सरकारला हा कालावधी ३१ डिसेंबर पर्यंत अर्थात चार महिन्यांनी वाढवून देण्याची विनंती केली होती.

अमेरिकेकडून अब्दुल हक्कानी 'जागतिक दहशतवादी'

  • पाकिस्तानातील कट्टर दहशतवादी संघटना असलेल्या हक्कानी नेटवर्कचा सर्वोच्च नेता अब्दुल अझीझ हक्कानी याला अमेरिकेने विशेष जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. हक्कानी याने अफगाणिस्तानात अनेक हल्ले केले आहेत, त्यामुळे अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे.
  • जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत आता अब्दुल हक्कानीचा अमेरिकेने समावेश केल्यामुळे त्याच्या नावावर अमेरिकेत असलेली सर्व मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. त्याच्यासोबत कुठल्याही अमेरिकी नागरिकाने कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नयेत, असे अमेरिकी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 
  • कट्टर दहशतवादी असलेल्या हक्कानी याच्याबद्दल माहिती देणाऱ्यास सुमारे ५० लाख रुपयांचे बक्षीस अमेरिकेने मागील वर्षी जाहीर केले होते.
  • अल कायदाशी संबंधित असलेल्या हक्कानी नेटवर्कचा माजी प्रमुख आणि अब्दुल याचा भाऊ बद्रुद्दीन हक्कानी याचा मृत्यू झाल्यानंतर हक्कानी नेटवर्कची धुरा अब्दुल हक्कानीकडे आली होती. अफगाणिस्तानात मागील काही वर्षांमध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोटांमध्ये अब्दुल हक्कानीचा हात असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे.

सेशल्स-भारत सहकार्य वाढणार

  • भारत आणि सेशल्स या दोन देशांतील संबंध अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येत असून, त्यासाठी विविध क्षेत्रांतील सहकार्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.
  • भारताच्या दौऱ्यावर असलेल्या सेशल्सचे अध्यक्ष जेम्स ऍलेक्स मायकेल यांनी २७ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजधानीतील हैदराबाद हाउसमध्ये भेट घेतली.
  • यावेळी विविध क्षेत्रांतील सहकार्य वाढविण्यावर एकमत झाले. कृषी, हवाई वाहतूक, सागरी सुरक्षा आदी क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य करण्यासाठीच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
  • सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी आवश्यक सुविधा असलेले अत्याधुनिक डॉर्निअर विमान भारतातर्फे सेशल्सला देण्यात येणार आहे. यापूर्वीही भारताने अशा प्रकारचे एक विमान सेशल्सला दिले आहे.
  • याशिवाय एक नाविक बोट आणि अत्याधुनिक रडारदेखील सेशल्सला भारताकडून देण्यात येणार आहे.

डॉ. नरेंद्र जाधव आरबीआय इतिहास लेखन सल्लागार समितीचे अध्यक्ष

    Narendra Jadhav
  • नियोजन मंडळाचे माजी सदस्य व पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांची सरकारने रिझर्व्ह बॅंकेच्या (आरबीआय) इतिहास लेखन सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
  • रिझर्व्ह बॅंकेच्या या इतिहास लेखन समितीचे अध्यक्षपद रिझर्व्ह बॅंकेच्या निवृत्त गव्हर्नरांकडेच देण्याची परंपरा आजवर काटेकोर पाळली गेली होती. त्यानुसार डॉ. बिमल जालान यांच्याकडे हे पद होते.
  • मात्र, त्यांची उचलबांगडी करून डॉ. जाधव यांची प्रतिनियुक्ती तेथे केली गेली आहे. जाधव आता ‘आरबीआय’चा १९९७ ते २००७ या काळातील इतिहासाचा पाचवा खंड तयार करणाऱ्या इतिहास लेखन समितीचे प्रमुख सल्लागार असतील.
Previous Post Next Post