चालू घडामोडी - ११ सप्टेंबर २०१५ [Current Affairs - September 11, 2015]
bySunil Jadhavar•
0
मोदी, ओबामा आणि बिडेन यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता
महिनाअखेरीस नियोजित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि उपाध्यक्ष ज्यो बिडेन यांच्यामध्ये चर्चा होण्याचीदाट शक्यता आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यामध्ये भारतीय नेतृत्वाशी उच्चस्तरीय चर्चा करण्याची तयारी सुरू आहे.
यामध्ये थेट मोदी-ओबामा यांच्यातही चर्चा होऊ शकेल, असे सांगितले जाते.
यापूर्वी प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी बराक ओबामा यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले होते.
त्यानंतरची ही दोन्ही नेत्यांमधील पहिली भेट असेल.
मोदी आणि ओबामा यांच्यात 28 सप्टेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये चर्चा होऊ शकते.
या संदर्भात अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी उपाध्यक्ष ज्यो बिडेन स्वत:हून उत्सुक असून दोन्ही देशांमधील व्यापार 500 अब्ज डॉलरपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न केले जातील असे बिडेन यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या भारत दौऱ्यामध्ये सांगितले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण :
जपानमधील कोयासन विद्यापीठात उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
जपानच्या नागरिकांना महाराष्ट्राने दिलेली ही अमूल्य भेट आहे, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केली.
मुख्यमंत्री फडणवीस आणि वाकायामाचे गव्हर्नर योशिनोबू निसाका यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि कोसायन विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
सानिया मिर्झा, लिएंडर पेस मिश्र दुहेरीत अंतिम फेरीत :
स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस हिच्यासोबत अव्वल मानांकित सानिया मिर्झा हिने महिला दुहेरीत तसेच अनुभवी लिएंडर पेसने मिश्र दुहेरीत अमेरिकन ओपन टेनिसची गुरुवारी अंतिम फेरी गाठली.
सानिया-हिंगीस या अव्वल जोडीने उपांत्य फेरीत इटलीची सारा इराणी-फ्लाव्हिया पेनेटा या 11व्या मानांकित जोडीचा सलग सेटमध्ये 6-4, 6-1 असा 77 मिनिटांत पराभव केला.
मिश्र दुहेरीच्या उपांत्य सामन्यात पेस-मार्टिनाने भारतीय खेळाडू रोहण बोपन्ना तसेच चायनिज-तैपेईची यंग जान चान यांच्यावर सलग सेटमध्ये 6-2, 7-5 ने 61 मिनिटांत विजय साजरा केला.
हिंगीसने यंदा विम्बल्डनमध्ये पेससोबत मिश्र आणि सानियासोबत महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले होते.
ज्येष्ठ नागरिकांसाठी भारत अनुकूल नसल्याचे संशोधन :
ज्येष्ठ नागरिकांसाठी भारत हे ठिकाण फारसे अनुकूल नसल्याचे अलिकडेच करण्यात आलेल्या एका संशोधनातून समोर आले आहे.
"हेल्पएज" या संस्थेने साऊथहॅंप्टन विद्यापीठाच्या संशोधनाने 'ग्लोबल एजवॉच इंडेक्स‘बाबत संशोधन केले आहे. त्यातून ही माहिती समोर आली आहे.
या संशोधनात जगातील विविध देशांमध्ये 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसाठी असलेल्या अनुकूल परिस्थितीनुसार मानांकन देण्यात आले आहे.
त्यामध्ये स्वित्झर्लंड सर्वांत वरच्या क्रमांकावर आहे.
तर एकूण 96 देशांमध्ये भारत 71 व्या क्रमांकावर आहे.
प्रत्येक देशामधील ज्येष्ठांसाठी आवश्यक ती सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा या संशोधनात अभ्यास करण्यात आला आहे.
स्वित्झर्लंडनंतर नॉर्वे आणि स्विडनचा क्रमांक लागतो. तर जर्मनी चौथ्या क्रमांकावर तर कॅनडा पाचव्या क्रमांकावर आहे. त्यानंतर नेदरलॅंड, आईसलॅंड, जपान, युएस, युके आणि डेन्मार्कचा क्रमांक लागतो.
अॅडर्व्हटायझिंग स्टँडर्ड्स काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी रायचौधरी यांच्या नियुक्ती :
अॅडर्व्हटायझिंग स्टँडर्ड्स काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी एचटी मीडिया लिमिटेडचे संचालक बिनॉय रायचौधरी यांच्या नियुक्तीची घोषणा गुरुवारी नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात पत्रकार परिषदेत करण्यात आली.
रायचौधरी यांचा कार्यकाळ 2015-16 असा एक वर्षाकरिता असेल.
तसेच अॅडर्व्हटायझिंग स्टँडर्ड्स काऊन्सिल ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी आर.के. स्वामी बीबीडीओ प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष श्रीनिवासन. के. स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तर मीडिया ब्रँड्स प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शशिधर सिन्हा यांची खजिनदारपदी नियुक्ती झाली आहे.
अॅपलने केले iPhone 6S व iPhone 6S + सादर :
अॅपलने सन फ्रांसिस्कोमध्ये आयोजित एका खास समारोहात आयफोन 6 एस (iPhone 6S) व आयफोन 6 एस प्लस (iPhone 6S +) सादर केले.
यासोबतच अॅपलने आयपॅड प्रो याचेदेखील लाँचिंग केले आहे.
'ओरिजनल आयपॅड'नंतर आयपॅडशी संबंधित असलेली ही सर्वांत मोठी बातमी असल्याचे सांगितले आहे.
नव्या आयफोनची प्री-ऑर्डर बुकिंग या शनिवारपासून 12 सप्टेंबर सुरू होणार आहे.
कंपनी नव्या उत्पादनाला 12 देशात 25 सप्टेंबरपासून विक्रीसाठी पाठविणे सुरू करणार आहे.
'आयफोन 6एस' व ‘आयफोन '6एस प्लस' या दोन्ही डिव्हाईसची किंमत मागील वर्षी लाँच केलेल्या मॉडेल एवढीच ठेवण्यात आली आहे.
युवा राष्ट्रकुल स्पर्धेत प्राची आणि टेनिसच्या मुकुंद व वेणुगोपाल सुवर्णपदक :
युवा राष्ट्रकुल स्पर्धेत तिरंदाजीमध्ये महिलांच्या गटात भारताच्या प्राची सिंगने रिकर्व्ह प्रकारात आणि टेनिसच्या मिश्र दुहेरीत शशिकुमार मुकुंद व धृती टी. वेणुगोपाल यांनी धडाकेबाज खेळ करून सुवर्णपदक जिंकले.
भारतीय संघाने एकूण 17 पदकांसह पदकतालिकेत सहावे स्थान पटकावले आहे.
रिलायन्स एनर्जीने विविध सेवा देणारे मोबाइल अॅप सुरू :
28 लाखाहून अधिक ग्राहक असलेल्या रिलायन्स एनर्जीने वीजशुल्क भरण्यापासून तक्रारी नोंदवण्यापर्यंत विविध सेवा देणारे मोबाइल अॅप सुरू केले आहे.
सध्या हे अॅप अॅण्ड्राइडवर उपलब्ध असून नोव्हेंबरपासून ओएसवर उपलब्ध होऊ शकेल.
कागदाचा कमीत कमी वापर, ग्राहकांना एका ठिकाणी सर्व प्रकारच्या सोयी,
तसेच एका बटनाच्या क्लिकवर वीजशुल्क भरण्याची सोय देणाऱ्या या अॅपमधून
इतरही सुविधा मिळणार आहेत.
मीटर रीडिंग, वीजशुल्काची प्रत डाऊनलोड
करणे, मागील महिन्यांमधील वीजवापर, शुल्कप्रतीमधील भाषा बदलणे, यासोबतच
वीजशुल्क भरण्याची सोयही या अॅपमध्ये करण्यात आलेली आहे.
याशिवाय वीज खंडित झाल्याच्या तक्रारी, नोंदणी केलेल्या तक्रारींचा मागोवा या अॅपमधून घेता येईल.