दिनविशेष
-
५ सप्टेंबर : राष्ट्रीय शिक्षक दिन
भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस
‘एक श्रेणी एक वेतन’ योजना लागू
- तब्बल चार दशकांपासून रखडलेली माजी सैनिकांची ‘एक श्रेणी एक वेतन’ ची (वन रँक वन पेन्शन-ओआरओपी) मागणी मान्य करत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी ५ सप्टेंबर २०१५ रोजी ही बहुप्रतिक्षित योजना लागू करण्याची ऐतिहासिक घोषणा केली.
- समान पदावर आणि समान काळ काम करणाऱ्या व्यक्तीला समान निवृत्तीवेतन मिळावे. हे वेतन देताना निवृत्तीची तारीख विचारात घेतली जाऊ नये, अशी निवृत्त सैनिकांची मागणी होती.
- गेल्या ४२ वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत दिले होते. मात्र, भाजप सत्तेवर येऊन १५ महिने उलटल्यानंतरही यावर काहीच निर्णय होत नसल्याचं पाहून माजी सैनिकांनी आंदोलन पुकारले होते.
- चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर अखेर सरकारने ‘वन रँक वन पेन्शन’ ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. संरक्षणमंत्री पर्रिकर यांनी एका पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. या निर्णयामुळं देशाच्या तिजोरीवर दरवर्षी ८ ते १० हजार कोटींचा बोजा पडणार आहे.
चौथ्या विश्व साहित्य संमेलनाला सुरुवात
- ५ सप्टेंबर २०१५ रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या चौथ्या विश्व संमेलनाची सुरुवात पोर्ट ब्लेअर (अंदमान) येथे झाली.
- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मृती सुवर्णमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून अंदमान येथे ‘विश्व साहित्य संमेलन’ भरविण्यात येणार आले आहे.
- टोरंटोच्या विश्व साहित्य संमेलनासाठी ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांची निवड करण्यात आली होती. परंतु, राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे या संमेलनासाठी प्रा. शेषराव मोरे यांची अध्यक्षपदी निवड झाली.
कॉलड्रॉपसाठी नुकसाभरपाई देण्याची ‘ट्राय’ची सूचना
- मोबाइलवर कॉल सुरू असताना, तो अचानक मध्येच बंद होण्याची (कॉलड्रॉप) गंभीर दखल घेऊन दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) अशा सेवा पुरवठादार कंपन्यांनी ग्राहकांना नुकसाभरपाई द्यावी, असे सुचवले आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कॉलड्रॉपविषयी चिंता व्यक्त केल्यानंतर ‘ट्राय’ने एक सल्लापत्रक प्रसिद्ध केले असून, त्यावर २८ सप्टेंबरपर्यंत लोकांकडून सूचना मागवल्या आहेत.
- सेवेची गुणवत्ता चांगल्या दर्जाची नसेल, तर अशा मोबाइल सेवा पुरवठादार कंपनीला ‘ट्राय’ दंड आकारते. एखाद्या मोबाइल नेटवर्कवरून केलेल्या एकूण कॉलपैकी कॉलड्रॉपचे प्रमाण २ टक्क्यांपेक्षा अधिक असू नये, असे ‘ट्राय’चे म्हणणे आहे.
- ‘ट्राय’ने सुचविल्यानुसार कॉल सुरू झाल्यापासून पाच सेकंदांच्या आत ड्रॉप झाल्यास त्यासाठी भरपाई देऊ नये. मात्र पाच सेकंदांनंतर कॉल ड्रॉप झाल्यास त्यासाठी भरपाई द्यावी. अशी भरपाई देताना शेवटची पल्स गृहित धरण्यात येऊ नये.
पाकव्याप्त काश्मिरमध्ये पाच देशांच्या मदतीने प्रकल्प उभारणी
- पाकव्याप्त काश्मिरातील मुझफ्फराबाद शहरातील विकासकामाच्या नावाखाली, पाकिस्तान सरकारने पाच देशांच्या माध्यमातून प्रकल्प उभारणी सुरू केली आहे. या पाच देशांमध्ये चीनबरोबरच दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया, कुवेत आणि तुर्कस्तानचा समावेश आहे.
- काश्मीर खोऱ्यात २००५मध्ये झालेल्या भूकंपामध्ये मुजफ्फराबादचे मोठे नुकसान झाले होते. त्याच्या पुनर्बांधणीसाठी या देशांची मदत घेण्यात आली आहे.
- या शहरामध्ये चीनचे ३००० आणि दक्षिण कोरियाचे ३०० कामगार दाखलही झाले आहेत. या परिसरात जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येत आहेत.
- या प्रदेशामध्ये दक्षिण कोरियाने १०० मेगावॉटचे दोन, ८९ मेगावॉटचा एक जलविद्युत प्रकल्प पूर्ण केला आहे, तर चीनच्या मदतीने झेलम नदीवर ११०० मेगावॉटचा प्रकल्प पूर्ण करण्यात येत आहे. पाकिस्तानच्या प्रशासनाकडून नीलम-झेलम जलविद्युत प्रकल्प बांधण्यात येत आहे. ९६९ मेगावॉट क्षमतेचा हा प्रकल्प आहे.
- या परिसरात सौदी अरेबिया विद्यापीठ बांधत असून, हे विद्यापीठ तात्पुरत्या स्वरूपात एका इमारतीत सुरू झाले आहे.
झुम्पा लाहिरी यांना अमेरिकेतील प्रतिष्ठेचे राष्ट्रीय मानवतावादी पदक
- पुलिस्त्झर पारितोषिक विजेत्या भारतीय वंशाच्या अमेरिकन लेखिका झुम्पा लाहिरी यांची अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय मानवतावादी पदकासाठी (National Humanities Medal) निवड करण्यात आली आहे. पुढील आठवडय़ात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते लाहिरी यांना हे पदक प्रदान करण्यात येणार आहे.
- मानवतावादी लेखनावर भर दिल्यामुळे लाहिरी यांची या पदकासाठी निवड करण्यात आली आहे. लाहिरी यांनी भारत अमेरिकेतील वितुष्ट आणि आपलेपणावर आधारित सुरेख लिखाण केल्याचे व्हाइट हाऊसकडून सांगण्यात आले.
- पहिले राष्ट्रीय मानवतावादी पदक १९९६ मध्ये प्रदान करण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत १७५ जणांना हे प्रतिष्ठेचे पदक देण्यात आले आहे. यापूर्वी भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांना हे पदक मिळाले आहे.
फिफाच्या क्रमवारीमध्ये भारत १५५व्या स्थानावर
- फिफाने नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारीमध्ये भारताने एका स्थानाने आगेकूच केली असून भारत १५५व्या स्थानावर पोहोचले आहेत.
- फिफा विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीमध्ये भारताला दोन सलग पराभवांचा सामना करावा लागला होता, त्यामुळे जुलै महिन्यामध्ये त्यांची १५६व्या स्थानावर घसरण झाली होती.
- कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावलेला अर्जेटिनाचा संघ क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. बेल्जियमचा संघ दुसऱ्या स्थानावर असून विश्वविजेता जर्मनीचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे.
ओडिशातील व्हिलर द्विपला डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव
- जनतेचे राष्ट्रपती असलेल्या अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली म्हणून ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील व्हिलर द्विपचे नाव बदलून त्याला माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्याचा निर्णय ओडिशा सरकारने घेतला आहे.
- बीजू पटनाईक यांनी १९९३ मध्ये कलाम यांच्या सांगण्यावरून व्हिलर द्विप संरक्षण मंत्रालयाच्या ताब्यात दिला होता.
- व्हिलर बेट ओडिशा राज्याच्या किनारपट्टीवर चांदीपूरच्या दक्षिणेला सुमारे ७० किमी अंतरावर स्थित आहे. या बेटाचा वापर भारताच्या क्षेपणास्त्रांची चाचणी करण्यासाठी केला जातो.
- ओडिशाचे मुख्यमंत्री : नवीन पटनाईक
सुप्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचे निधन
- सुप्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचे ५ सप्टेंबर २०१५ रोजी कॅन्सरच्या आजारामुळे निधन झाले. ते ५१ वर्षाचे होते. मागील काही वर्षांपासून त्यांना कॅन्सरच्या विकारानं ग्रासलं होतं.
- आदेश श्रीवास्तव यांनी आपल्या संगीतच्या कारर्किदीत रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. ‘चलते चलते’, ‘बाबुल’, ‘बागबान’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘राजनीति’, ‘देव’ यासरख्या जवळजवळ १०० चित्रपटास त्यांनी संगीत दिले आहे.