चालू घडामोडी - ९ सप्टेंबर २०१५ [Current Affairs - September 9, 2015]
bySunil Jadhavar•
0
सीरियामधील जझल हा अखेरचा तेलप्रकल्पही इसिसच्या ताब्यात
सीरियामधील सरकारच्या नियंत्रणात असलेला जझल हा अखेरचा तेल प्रकल्पही हस्तगत करण्यात इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने यश मिळविले आहे.
पालमिरा या सीरियामधील ऐतिहासिक शहराच्या
वायव्येस जझल तेल प्रकल्प आहे. सीरियामधील नैसर्गिक वायुच्या मुख्य
क्षेत्रापासूनही हे ठिकाण जवळच आहे.
सीरियामध्ये सध्या बाशर अल असद
यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या फौजा इसिसच्या हल्ल्यांना परतवून लावण्यासाठी
शर्थ करीत आहेत. राक्का या इसिसचे सध्या मुख्यालय असलेल्या शहरावर
अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान १६ दहशतवादी ठार झाले आहेत.
सीरियामध्ये मार्च २०११ मध्ये सुरु झालेल्या संघर्षानंतर लक्षावधी नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. याचबरोबर या संघर्षामुळे सीरियन निर्वासितांचा लोंढा युरोपकडे वाहू लागला आहे.
सीरियाचे राष्ट्राध्यक्ष : बाशर अल असद
पाक, बांगलादेशमधील निर्वासितांना भारतात आश्रय
युरोपातील निर्वासितांचा प्रश्न जगभर
गाजत असतानाच पाकिस्तान आणि बांगलादेशमधील अल्पसंख्यांक समुदायांचा
भारतातील प्रवेश आणि वास्तव्य अधिकृत करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला
आहे.
सरकारने प्रसिद्ध केलेल्या पत्रकाप्रमाणे
३१ डिसेंबर २०१४ रोजी किंवा त्यापूर्वी पाकिस्तान आणि बांगलादेशमधून
भारतात आलेल्या आणि भारतातील निवासाची वैधता संपलेल्या किंवा वैधतेचा
कोणताही पुरावा नसलेल्या अल्पसंख्यांक समुदायातील नागरिकांना पारपत्र (पासपोर्ट) कायदा-१९४६ आणि परदेशी कायदा-१९४६ यामधून वगळण्यात आले आहे.
त्यामुळे बांगलादेश आणि पाकिस्तानमधील
अल्पसंख्यांक समुदायातील निर्वासित त्यांच्या व्हिसाची वैधता संपल्यानंतरही
भारतामध्ये वास्तव्य करू शकणार आहेत.
हा निर्णय मानवीयतेच्या भावनेने घेण्यात
आला आहे. या दोन्ही देशातील हिंदू, शीख, ख्रिश्चन, जैन, पारशी आणि
बुद्धिस्ट धर्माच्या निर्वासितांनी सुरक्षिततेसाठी भारताचा आश्रय घेतला
होता.
काळ्या पैशांच्या यादीत निओ कॉर्पचे नाव
परदेशात ठेवण्यात आलेल्या काळ्या पैशांची भारत सरकारच्या वतीने चौकशी सुरू असून इंदूरस्थित वस्त्रोद्योग कंपनी निओ कॉर्प इंटरनॅशनल लि. या कंपनीबाबतची माहिती देण्याची विनंती भारत सरकारने स्विस सरकारला केली आहे.
निओ कॉर्प ही १९८५ मध्ये छोटी कंपनी सुरू
करण्यात आली आणि आता ती बहुराष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग समूह असल्याचा
दावा केला जात आहे. कर चुकविल्याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने फेब्रुवारी
महिन्यात कंपनीच्या विविध संकुलांवर छापे टाकले होते.
भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये प्रशासकीय
सहाय आणि माहितीची देवाणघेवाण याबाबतचा करार करण्यात आला असून त्याचा एक
भाग म्हणून भारताने विविध कंपन्या आणि व्यक्ती यांच्याबद्दलची सविस्तर
माहिती मागितली आहे.
स्विस सरकारच्या अधिकृत पत्रात प्रसिद्ध
करण्यात आलेल्या भारतीय कंपन्यांच्या यादीत निओ कॉर्पचे नाव नव्याने
समाविष्ट करण्यात आले आहे.
निर्वासितांसाठी ऑस्ट्रिया-जर्मनीच्या सीमा खुल्या
सिरियातील यादवीमुळेहजारो
निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे युरोपीय देशांच्या दिशेने येत आहेत. या
निर्वासितांना हंगेरीतील सरकारने रोखून धरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु
आता हंगेरीहून येणाऱ्या हजारो निर्वासितांसाठी सीमा खुल्या केल्याची घोषणा ऑस्ट्रिया आणि जर्मनी यांनी केली आहे.
जर्मनी इराक व सीरियातून येणाऱ्या स्थलांतरितांसाठी ६ अब्ज युरो (६.७ अब्ज डॉलर्स) इतका निधी येत्या वर्षभरात उपलब्ध करणार आहे. स्थलांतरितांची काळजी घेण्यासाठी हा निधी देण्याचा घेतला आहे.
गेले काही आठवडे व महिने जर्मनी हे
स्थलांतरितांचे आश्रयस्थान ठरले आहे. जर्मनी हा युरोपातील सर्वात मोठी
अर्थव्यवस्था असलेला देश असून, दुसऱ्या महायुद्धानंतर तेथे प्रथमच इतक्या
मोठय़ा संख्येने निर्वासित येत आहेत.
एकूण आठ लाख निर्वासित येणे अपेक्षित असून, ही संख्या गेल्या वर्षीच्या चार पट असेल. त्यासाठी १० अब्ज युरो खर्च येणार आहे.
या आठवडाअखेरीस बावरिया ओलांडून १७ हजार
स्थलांतरित येण्याची शक्यता आहे. जर्मनीत काही प्रमाणात
स्थलांतरितांविरोधात निषेध मेळावे झाले असून काही ठिकाणी हल्ले झाले आहेत.
विशेष करून पूर्व जर्मनीत हे घडत आहे.
डॉ. विकास आमटे यांना नागभूषण पुरस्कार
विविध क्षेत्रात राहून विदर्भाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणाऱ्यांना दरवर्षी 'नागभूषण पुरस्कार'
देऊन सन्मानीत केले जाते. याद्वारे एकप्रकारे विदर्भाच्या आंतरराष्ट्रीय
लौकिकाचा सन्मान केला जातो. यंदाचा हा पुरस्कार डॉ. विकास आमटे यांना
जाहीर झाला आहे.
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर
शहराच्या त्रिशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने नागभूषण अवॉर्ड फाऊंडेशनची
स्थापना करण्यात आली. याद्वारे विदर्भासाठी भरघोस कार्य केलेल्यांचा सन्मान
केला जातो.
१ लक्ष रुपये व सन्मानचिन्ह असे स्वरुप
असलेल्या या पुरस्कारासाठी यंदा कुष्ठरोग्यांसाठी आपले जीवन वेचलेल्या डॉ.
विकास आमटे यांची निवड करण्यात आली आहे.
वडील बाबा आमटे यांच्यापासून प्रेरणा घेत
सेवारत असलेले डॉ. विकास आमटे हे वरोऱ्याच्या महारोगी सेवा समितीचे सचिव
आहेत. आतापर्यंत त्यांना संयुक्त राष्ट्रांसह अनेक आंतरराष्ट्रीय
पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. त्यात आता नागभूषण पुरस्काराची भर
पडली आहे.
आतापर्यंत हा पुरस्कार स्व.आर. के.
पाटील, नितीन गडकरी, भंते सुरेई ससाई, जी. एम. टावरी, स्व.प्राचार्य राम
शेवाळकर, डॉ.प्रकाश व मंदाताई आमटे, मारुती चितमपल्ली, महेश एलकुंचवार,
स्व.कवी ग्रेस, राजकुमार हिराणी, ठाकूरदास बंग, अॅड. व्ही.आर. मनोहर व
पद्मभुषण डॉ. विजय भटकर यांना प्रदान करण्यात आला आहे.
वूमन्स-२०
आर्थिक क्षेत्रातील पुरुषी वर्चस्व कमी करण्यासाठी व लिंग समावेशकता येण्यासाठी जी-२० समुहाने वूमन्स-२० गटाची स्थापना केली आहे.
जी २० च्या सध्या अंकारा (तुर्कस्थान)
येथे झालेल्या असलेल्या बैठकीत वूमन्स-२० ची घोषणा करण्यात आली या बैठकीला
सर्व सदस्य देशाचे वित्तमंत्री व केंद्रीय बँकेचे गव्हर्नर उपस्थित होते
गुल्डेन तुर्कटॅन यांची वूमन्स-२० च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली
वूमन्स-२० ची पहिली परिषद इस्तुंबूल येथे ऑक्टोबर मध्ये होणार आहे
ब्रिटनच्या राणीचा विश्वविक्रम
ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ (द्वितीय)
यांनी ब्रिटीश सत्तेमध्ये ६३ वर्षे (२३,२२७ दिवस) महाराणी पदावर राहण्याचा
विक्रम केला आहे. वयाच्या २५व्या वर्षी राजगादीवर आलेल्या एलिझाबेथ आता ८९
वर्षांच्या असून, ब्रिटिश राजवंशातील सर्वाधिक काळ जगलेल्या व्यक्ती असाही
विक्रम त्यांनी बनविला आहे.
९ सप्टेंबर रोजी त्यांना ब्रिटिश
राजसत्तेचे प्रमुखपद हातात घेऊन ६३ वर्षे पूर्ण होत आहेत. या सहा दशकांच्या
कालावधीत त्यांनी ब्रिटिश संसदेत अनेक पंतप्रधानांचा कार्यकाळ, अनेक
आशियाई, आफ्रिकन देशांचे स्वातंत्र्यही पाहिले.
‘जाटिया हाऊस’वर बिर्लांची मोहोर
दक्षिण मुंबईतील जाटिया हाऊस नावाच्या
बंगल्याची प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांनी तब्बल ४२५ कोटी
रुपयांना (म्हणजे १,८०,००० रुपये प्रति चौरस फूट दराने) खरेदी केली आहे.
मुंबईतील घरांच्या खरेदी-विक्रीतील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आर्थिक व्यवहार आहे.
उद्योगपती व केम मॅक कंपनीचे यशवर्धन
जाटिया यांच्या मालकीचा हा बंगला २५००० चौरस फुटांच्या परिसरात पसरला आहे.
जाटिया यांनी ७० च्या दशकात एम. सी. वकील यांच्याकडून हा बंगला खरेदी केला
होता.
फोर्ब्ज मासिकाच्या दानशूर व्यक्तींच्या यादीत सात भारतीय
फोर्ब्ज मासिकाच्या ताज्या आशिया
आवृत्तीतील दानशूर व्यक्तींच्या यादीत सात भारतीय दानशूरांचा समावेश आहे.
उल्लेखनीय दातृत्वाची दखल घेऊन १३ देशांतील दानशूर व्यक्तींचा या यादीत
समावेश करण्यात आला आहे.
त्यात सेनापती गोपालकृष्णन, नंदन नीलेकणी
आणि एस. डी. शिबुलाल या 'इन्फोसिस'च्या तीन सहसंस्थापकांचाही समावेश आहे.
आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या वैयक्तिक दानाची दखल घेऊन
त्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
नारायणमूर्ती यांचा मुलगा रोहन याने
प्राचीन भारतीय साहित्याच्या प्रसार-प्रचारासाठी हार्वर्ड विद्यापीठाला ५२
लाख डॉलरची मदत केली आहे. त्यामुळे त्याचे नावही या यादीत आहे.
त्या व्यतिरिक्त मूळचे केरळमधील असलेले
दुबईतील व्यावसायिक सनी वार्की, मूळचे भारतीय असलेले लंडनस्थित उद्योजक
बंधू सुरेश आणि महेश रामकृष्णन यांचाही या यादीत समावेश आहे.
भारतीय वंशाच्या मुलाने स्पेलिंग बी स्पर्धा जिंकली
भारतीय वंशाच्या नऊ वर्षांचा अनिरुद्ध काथिरवेलने ऑस्ट्रेलियातील ‘द ग्रेट ऑस्ट्रेलियन स्पेलिंग बी’ स्पर्धा जिंकली.
या स्पर्धेचे बक्षीस ५० हजार डॉलर असून, त्याच्या शाळेलाही १० हजार डॉलरचे साहित्यही देण्यात येणार आहे.
तमीळ कुटुंबातील आणि मेलबर्न येथे
जन्मलेल्या अनिरुद्धची स्मरणशक्ती एवढी दांडगी आहे की, तो दररोज सरासरी दहा
नवीन इंग्रजी शब्द आत्मसात करतो.
डीआरडीओच्या महासंचालकपदी जे. मंजुळा यांची नियुक्ती
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या
(डीआरडीओ) महासंचालकपदी जे. मंजुळा यांची निवड करण्यात आली असून, त्यांनी
‘इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टीम क्लस्टर’ या विभागाची सूत्रे
स्वीकारली. मंजुळा यांनी के. डी. नायक यांच्याकडून पदभार स्वीकारला.
या विभागाचे महासंचालकपद भूषविणाऱ्या
त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. मंजुळा यांनी बंगळूरमधील ‘डिफेन्स
ऍव्हिओनिक्स रिसर्च सेंटर’मध्ये संचालक म्हणून काम केले असून, संशोधक
म्हणूनही त्यांनी स्वत:चा ठसा उमटविला आहे. मंजुळा यांनी के. डी. नायक
यांच्याकडून पदभार स्वीकारला.
हैदराबाद येथील डिफेंस इलेक्ट्रॉनिक
रिसर्च लॅबोरेटरी मध्ये इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक वारफेअर विभागात २६
वर्षाहून अधिक काळ त्यांनी काम केले आहे. यात त्यांनी सेना, वायु सेना,
नौसेना आणि अर्ध सैन्य दलासाठी काही उपकरण आणि सॉफ्टवेअर डिजाइन केले आहेत.
मंजुळा यांनी उस्मानिया विद्यापीठातून
इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले आहे. मंजुळा यांना यापूर्वी
डीआरडीओचा सर्वोत्कृष्ट कार्य व २०११ मध्ये सर्वोत्तम शास्त्रज्ञाचा
पुरस्कार मिळाला आहे.