पॅरिसमध्ये डिसेंबरमध्ये हवामान बदल परिषद
- पॅरिसमध्ये डिसेंबरमध्ये हवामान बदल परिषद होत असून त्यात नवा हवामान करार होण्याची शक्यता आहे.
- भारतातील हरितवायूंची उत्सर्जन तीव्रता २०३० पर्यंत ३३ ते ३५ टक्के कमी करण्याचे उद्दिष्ट आहे.
- अमेरिका आणि चीन या जगातील दोन मोठ्या प्रदूषकांच्या पंक्तीत भारताला बसविण्यात आले आहे.
- याचवेळी भारताने मोठ्या कंपन्यांना स्वच्छ आणि हरित तंत्रज्ञानासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.
- मोदी आणि ओबामा यांच्या तिसऱ्या भेटीत अनेक व्यापक विषयांवर चर्चा झाली.
- तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीचे कायम सदस्यत्व मिळावे यासाठी जी-4 देशांच्या (जपान, भारत, जर्मनी, ब्राझील) बैठकीने योग्य वेळ साधली.
- निरीक्षकांच्या मते सुरक्षा समितीत सुधारणा नोव्हेंबरपासून सुरू होणे अपेक्षित आहे.
- सुरक्षा समितीत मतभेद होण्याआधी त्या सुधारणा करण्याची अमेरिकेची भूमिका असणार आहे.
- जर्मनी आणि जपान यांनी भारताला नकाराधिकाराशिवाय कायम सदस्यत्व दिले जाण्यास तयारी दर्शविली आहे.
- तसेच अमेरिकी संरक्षण सामग्री आणि शस्त्रास्त्रांवरील भर वाढविण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.
- भारताला २२ 'एएच-६४ ई' अपाचे आणि १५ 'सीएच-४७ एफ' चिनूक हेलिकॉप्टर अमेरिकेकडून २०१८ पर्यंत मिळणार आहेत.
- सध्याच्या एमआय- ३५ आणि एम- २६ या रशियन हेलिकॉप्टरची जागा ते घेतील.
केंद्र सरकारचा भूसंपादन कायदा संमत
- केंद्र सरकारचा भूसंपादन कायदा संमत झाला असता तर नवीन कायद्यानुसार जमिनींचे व्यवहार करता आले असते.
- मात्र, नवा भूसंपादन कायदाच न आल्याने सर्वच राज्यांना मूळ कायद्याच्या आधारेच जमिनींचे व्यवहार करावे लागणार आहेत.
- संपूर्ण देशाचा विचार केला तर केवळ महाराष्ट्रातच शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करताना त्याला बाजारभावाप्रमाणे पाचपट मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जगाचा नकाशाही बदलत असल्याचे संशोधन
- जागतिक तापमानवाढीमुळे होणाऱ्या दुष्पपरिणांमध्ये आणखी एका गोष्टीची भर पडली असून, यामुळे जगाचा नकाशाही बदलत असल्याचे ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासावरून स्पष्ट झाले आहे.
- तुलनात्मकदृष्ट्या, जगातील सर्वांत वेगाने उष्ण होत चाललेला प्रदेश म्हणून कॅनडियन आर्क्टिक हा भाग ओळखला जातो.
- येथे जागतिक तापमानवाढीचा बदल थेट दिसून येत आहे.
- गेल्या पन्नास वर्षांमध्ये या भागाचे तापमान चार अंश सेल्सिअसने वाढले असून, येथील तापमान शून्य अंशांच्या वर गेल्यास हिमनद्या शंभर पट अधिक वेगाने वाहत आहेत.
- मिशेल कूप्स या संशोधकाने पेटॅगोनिया आणि अंटार्क्टिक किनाऱ्यावरील हिमनद्यांची तुलना करून याचे विश्लेषण केले आहे.
- या अभ्यासानुसार, तापमानवाढ आणि वेगाने वितळणाऱ्या बर्फामुळे पेटॅगोनियामधील हिमनद्या अधिक वेगाने वाहत आहेत.
- यामुळे हिमनद्यांचे तळ सरकत आहेत. हा सर्व भाग एकाच भूप्रतलाचा असला, तरी येथील वातावरणांमध्ये फरक आहे.
- पेटॅगोनियामधील वेगाने वाहणाऱ्या हिमनद्यांमुळे किनाऱ्याच्या भागाची मोठ्या प्रमाणावर झीज होत आहे.
- यामुळे मोठ्या हिमपर्वतांचा भाग मूळ भागापासून वेगळा होण्याची शक्यता असून, काही हिमतुकडे आधीच वेगळे झाले आहेत.
- ध्रुवापासून दूर जसजसे दूर जाऊ, तसे हिमनद्यांचा वेग वाढत आहे. तापमानवाढीमुळे हा बदल होत असून, त्याचा परिणाम म्हणून झीज वाढणे, पाण्याचे प्रमाण वाढणे आणि हिमनगांची जागा बदलणे असा होत आहे.
एफआयआर ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा
- गुन्ह्याबाबतचा प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा ओडिशामध्ये सुरु करण्यात आली असून मुख्यमंत्री नवीन पटनायईक यांनी शनिवारी या सेवेचे उद्घाटन केले आहे.
- केंद्र पुरस्कृत क्राइम ऍण्ड क्राईम ट्रॅकिंग नेटवर्क ऍण्ड सिस्टीम्स् (सीसीटीएनएस) प्रकल्पांतर्गत "ई-एफआयआर"ची सुविधेचा प्रारंभ करण्यात आला आहे.
- या सुविधेमुळे राज्यातील तंत्रशिक्षितांना ऑनलाईन एफआयआर दाखल करता येणे शक्य होणार आहे.
- त्यासाठी राज्यातील ५३१ पोलिस स्थानकांचे संगणकीकरण करण्यात आले आहे.
- "www.citizenportal-op.gov.in" या संकेतस्थळावरून लोकांना तक्रारी दाखल करणे, एफआयआरची प्रतीची मागणी करणे, भाडेकरूची तपासणी करणे, परवान्यासाठी अर्ज, आंदोलन-अर्जासाठी परवाना, चारित्र्य प्रमाणपत्रासाठी अर्ज, कर्मचाऱ्यांची पडताळणी, हरवलेल्या व्यक्तींची तसेच वस्तूंची तक्रार दाखल करता येणार आहे.
राज्यातील सहा साहित्यिकांनी साहित्य पुरस्कार परत करण्याचा निर्णय
- विचारवंत व साहित्यिक डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना महिन्यानंतरही पकडण्यात अपयश आल्याच्या निषेधार्थ राज्यातील सहा साहित्यिकांनी "बीएमटीसी अरळु साहित्य पुरस्कार" परत करण्याचा निर्णय घेतला.
- वीरण्णा मडिवाळर (बेळगाव), टी. सतीश जवरेगौडा (मंड्या), संगमेश मेणसीनकाई (धारवाड), हणमंत हालिगेरी (बागलकोट), श्रीदेवी आलूर (बळ्ळारी) आणि चिदानंद साली (रायचूर) अशी त्या साहित्यिकांची नावे आहेत.
- डॉ. कलबुर्गी यांची ३० ऑगस्टला धारवाडमधील त्यांच्या राहत्या घरात हत्या झाली. गुन्हे अन्वेषण विभागाकडून त्यांच्या हत्येचा तपास सुरू आहे.
- कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुंडलिक हालंबी यांनी पुरस्कार परत करण्यात येत असल्याबद्दल जाहीर केले.
सानिया आणि मार्टिना वर्षातील सातवे विजेतेपद
- सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस यांनी आपला धडाका कायम ठेवत या वर्षातील सातवे विजेतेपद पटकाविले आहे.
- सानिया व मार्टिन यांच्या जोडीने वुहान ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत इरिना कॅमेलिया बेगू-मोनिका निकुलेस्कू या जोडीचा ६-२, ६-३ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करत विजेतेपद पटकाविले.
- अमेरिकन ओपन स्पर्धेचे विजेतेपद मिळविल्यानंतर या जोडीने सलग दोन डब्लूटीए स्पर्धांत महिला दुहेरीचे विजेतेपद मिळविले आहे.
- सानिया व मार्टिनाच्या जोडीचे हे या वर्षातील सातवे विजेतेपद आहे.
- या दोघींनी उपांत्य फेरीच्या लढतीत तैवानच्या चौथ्या मानांकित चिंग चॅन-युंह यान चान जोडीचा ५३ मिनिटांत ६-२, ६-१ असा पराभव केला होता.
मॅजिक क्यूब नावाचा महासंगणक तयार
- पृथ्वीचे भवितव्य काय असेल तसेच हवामान व जैविक प्रणालींमध्ये काय बदल होतील या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी चीनने एक योजना आखली असून त्यात मॅजिक क्यूब नावाचा एक दोन मजली महासंगणक तयार करण्यात आला आहे.
- त्याचा खर्च १.४ कोटी डॉलर्स इतका आहे.
- चीनच्या वैज्ञानिकांनी असे म्हटले आहे की, पृथ्वीवरील नैसर्गिक प्रणालीत होणारे बदल शोधले जाऊ शकतात किंवा त्याची नोंद करता येईल.
- अगदी ढगांच्या निर्मितीतील बदलांपासून सर्व बाबतीत आगामी काळात होणाऱ्या बदलांचे भाकित करता येतील.
- चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या या योजनेत अनेक संस्था सहभागी होत असून एक खास महासंगणक त्यासाठी तयार करण्यात आला आहे.
- अर्थ सिस्टीम न्युमरिकल सिम्युलेटर अँड सॉफ्टवेअरचे प्राथमिक रूप असलेल्या या महासंगणकाला सीएएस अर्थ सिस्टीम मॉडेल १.० असे नाव देण्यात आले आहे.
- त्याचे नाव ब्लू मॅजिक क्यूब असून तो उत्तर बीजिंगमध्ये झोंगुआनकुन सॉफ्टवेअर पार्कमध्ये ठेवण्यात आला आहे. त्यात ९ कोटी युआन म्हणजे १.४ कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
- त्याची क्षमता १ पेंटाफ्लॉप असून तो चीनमधील दहा शक्तिमान महासंगणकांपैकी एक असणार आहे.
- त्याची साठवण क्षमता ५ पीबी आहे.
- आगामी प्रगत मॅजिक क्युबच्या एक दशांश आकाराचा हा महासंगणक आहे.
- सध्या त्याच्या मदतीने हवा प्रदूषण व हवामान अंदाज कमी काळाकरिता दिले जातील.
नरेंद्र मोदी व चान्सलर अँगेला मर्केल हे व्यापक चर्चा करणार
- प्रमुख क्षेत्रांमध्ये भारत व जर्मनीतील द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व जर्मनीच्या चान्सलर अँगेला मर्केल हे आज व्यापक चर्चा करणार असून त्यात व्यापार, सुरक्षा व संरक्षणविषयक संबंध वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.
- संरक्षण, शिक्षण, नविनीकरणीय ऊर्जा, उच्च तंत्रज्ञान, कौशल्य विकास, विज्ञान व तंत्रज्ञान, रेल्वे, पाणी आणि कचरा व्यवस्थापन, नागरी विकास आणि कृषी या क्षेत्रांमधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यावर या बोलण्यांमध्ये भर दिला जाण्याची अपेक्षा आहे.
- भारत व जर्मनी हे २००१ सालापासून महत्त्वाचे भागीदार आहेत.
- मोदी यांच्या जर्मनी दौऱ्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी मर्केल या तीन दिवसांच्या भारत भेटीवर येत आहेत.
इंग्लंड राजदूतपदी अजय शर्मा यांची नियुक्ती
- इंग्लंड सरकारने कतारमधील राजदूतपदी भारतीय वंशाचे राजदूत अजय शर्मा यांची नियुक्ती केली आहे.
- शर्मा हे इराणमध्ये परराष्ट्र आणि राष्ट्रकुल विभागाचे प्रमुखपदी आहेत.
- नोव्हेंबरमध्ये ते कतारमधील जबाबदारी स्वीकारतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
- निकोलस हॉप्टन यांची दुसऱ्या पदावर नियुक्ती करण्यात आल्याने शर्मा यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे.
जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल भारतात
- जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल भारतात आल्या असून त्यांच्यासमवेच अनेक वरिष्ठ मंत्री व अधिकारी असणार आहेत.
- व्यापार व सुरक्षा या मुद्दय़ांवर चर्चा करण्यासाठी येत असून दोन्ही देशांच्या मंत्रिमंडळाची संयुक्त बैठक होत आहे.
- मर्केल व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी संयुक्तपणे आंतर सरकारी सल्लामसलत बैठकीचे नेतृत्व करतील.
- त्या बंगळुरू येथील रॉबर्ट बॉश्च कंपनीला भेट देणार असून त्यावेळी मोदी त्यांच्यासमवेत असणार आहेत.
- भारत व जर्मनीच्या उद्योजकांची एकत्र बैठक बंगळुरू येथे होणार आहे.
शशांक मनोहर बीसीसीआय अध्यक्षपदी
- नागपूर येथील ज्येष्ठ वकील शशांक मनोहर यांची रविवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
- नामांकन अर्ज सादर करण्याची मुदत शनिवारी संपल्यानंतर मनोहर यांचा एकमेव अर्ज होता.
- जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी पोटनिवडणूक घेणे आवश्यक होते.
- मनोहर यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ २०१७ मध्ये संपणार आहे.
व्याघ्रदूत अमिताभ बच्चन यांच्या हस्ते सन्मान
- वन्यजीवांचे संरक्षण, वनगुन्ह्यांचा तपास आदी कार्याचा गौरव म्हणून वनविभागातील अधिकारी, कर्मचारी आणि संस्था प्रतिनिधींना व्याघ्रदूत अमिताभ बच्चन यांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे.
- येत्या मंगळवारी बोरीवली (मुंबई) येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात हा कार्यक्रम घेतला जाणार आहे.
- विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वनविभागाने पुरस्कार जाहीर केले आहेत.
- शहापूर इको विकास समिती व राखीव व्याघ्र प्रकल्प अमरावतीचे अध्यक्ष व्यंकट मुडे व सचिव प्रतिभा तुरक आणि बफर डिव्हिजन चंद्रपूरचे अध्यक्ष रमेश गेडाम आणि सचिव डी.एम. कुळमेथे यांना पुरस्कृत केले जाणार आहे.
- 'वन्यजीव व्यवस्थापन-2015' या विषयात वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित माने यांचा सन्मान केला जाणार आहे.
गांधीजींच्या संकेतस्थळावर १ लाख हिट्सची वाढ
- दोन दिवसांत या संकेतस्थळाला २ लाख नागरिकांनी भेट दिली असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा यामध्ये 1 लाख हिट्सची वाढ झाली आहे.
- देशासह जगभरातून या संकेतस्थळाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
- गांधीयन ऑर्गनायझेशन, बॉम्बे सर्वोदय मंडळ आणि मुंबई आणि गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव या संस्थांमार्फत www.mkgandhi.org हे संकेतस्थळ गेल्या १५ वर्षांपासून चालविण्यात येत आहे.
- ते दररोज अपडेट करण्यात येते. सहा विविध आत्मचरित्रं, गांधी यांच्या कार्याचे १०० भाग, यासह ऑनलाइन बुक, ५०० फोटो, विविध विषयांवरील ८०० लेख असे साहित्य मोफत उपलब्ध आहे.
ज्येष्ठ नागरिकांना धान्य व साखर योजना
- राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना रेशनवर प्रत्येकी ३५ किलो धान्य व साखर देण्यासाठी राज्य शासनाचा विचार सुरू असून आगामी सहा महिन्यांत ही योजना सुरू केली
जाणार असल्याची घोषणा अन्न व नागरीपुरवठामंत्री गिरीष बापट यांनी शनिवारी केली. - तसेच ज्या वृद्धांना मुलेसांभाळत नाहीत, त्यांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मानधन देण्यासाठीही शासकीय पातळीवर विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
'चेरॉन' या सर्वात मोठ्या चंद्राची छायाचित्रे
- नासाच्या न्यू होरायझन यानाने प्लुटोच्या 'चेरॉन' या सर्वात मोठ्या चंद्राची आजवरची सर्वात सुस्पष्ट छायाचित्रे टिपली आहेत.
- त्यामुळे प्लुटोच्या अनेक भूगर्भीय रहस्यांचा उलगडा होण्यास मदत होणार असल्याचा आणि प्लुटोच्या गहन आणि भीषण इतिहासावर प्रकाश पडणार असल्याचा दावा 'नासा'तर्फे करण्यात आला आहे.
- प्लुटो या सूर्यमालेतील ग्रहाबद्दल फारशी माहिती नाही.
- प्लुटोचा 'चेरॉन' हा सर्वात मोठा चंद्र प्लुटोच्या व्यासाच्या निम्म्या आकाराचा येतो.
- 'चेरॉन' हा चंद्र केवळ पर्वतीय आणि ओबडधोबड असल्याचा समज होता पण तो पर्वतीय, उंच शिखरे, सपाट भूप्रदेश आणि भूपृष्ठावर वेगवेगळे रंग असणारा असल्याचे नव्या चित्रावरून दिसून येते.
- 'न्यू होरायझन' यानाने १४ जुलै रोजी प्लुटोभोवती फेरी मारली आणि त्यावेळी टिपलेली छायाचित्रे २१ सप्टेंबर रोजी पाठविली.
- त्यात या चंद्राच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर ओबडधोबड, पर्वतीय भाग दिसतो.