भारतीय वंशाचे सुंदर पिचई गूगलचे सीईओ
- जगातील सर्वात लोकप्रिय सर्चइंजिन असलेल्या 'गूगल'च्या सीईओपदी भारतीय वंशाच्या सुंदर पिचई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गूगलचे संस्थापक सर्जी ब्रिन व लॅरी पेज यांनी कंपनीत फेरबदल करत नवीन नियुक्त्या केल्या आहेत.
- भारतात जन्म घेतलेले ४३ वर्षीय सुंदर पिचई हे मूळचे तामिळनाडूतील चेन्नई येथील रहिवासी आहेत. त्यांनी आयआयटी खरगपूरमधून इंजिनिअरिंगची पदवी घेतली व त्यानंतर पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. टेक वर्ल्डमधील मोठे नाव असलेले पिचई, गेल्या ११ (२००४ पासून) वर्षांपासून गूगलमध्ये कार्यरत आहेत.
- २००४ मध्ये गुगलमध्ये रुजू झालेल्या पिचाई यांनी आतापर्यंत कंपनीत विविध पदांच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत.
- २००८ मध्ये त्यांच्याच नेतृत्वाखाली गुगल क्रोम ही नवी प्रणाली स्थापन करण्यात आली. क्रोमच्या यशानंतर जीमेल अॅपचेही काम पिचई यांच्याकडे आले. त्यानंतर ते अँड्रॉइडचे प्रमुख झाले.
- तसेच एक मोठा बदल करत 'अल्फाबेट इंक' नावाची नवी कंपनीही स्थापन केली आहे. नव्याने स्थापन झालेल्या या कंपनीच्या छत्राखाली गुगल व इतर उपकंपन्या येणार असून त्याचे सीईओपद लॅरी पेज यांच्याकडे असेल तर सर्जी ब्रिन अध्यक्षपद सांभाळतील.
भारतीय वंशाचे प्रमुख असलेल्या जगातील काही प्रसिध्द कंपन्या | |||
---|---|---|---|
गुगल : सुंदर पिचाई | मायक्रोसॉफ्ट : सत्या नाडेला | मास्टरकार्ड : अजय बंगा | पेप्सिको : इंद्रा नूयी |
नोकिया : राजीव सुरी | ॲडोबे सिस्टम : शंतनू नारायण | युनिलीवर : हरीश मनवानी | डॉइश बँक : अंशू जैन |
आधार कार्ड आवश्यक परंतु अनिवार्य नाही
- केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता यावा यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असलेच पाहिजे, अशी कोणतीही सक्ती नाही असा स्पष्ट निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने ११ ऑगस्ट रोजी दिला आहे.
- तसेच “आधार कार्ड आवश्यक आहे परंतु सक्तीचे नाही” हे सामान्य लोकांपर्यंत पोचविण्यासाठी मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधून मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
- एका याचिकेद्वारे आधार कार्ड आणि व्यक्तीच्या खासगीपणाच्या मूलभूत हक्कालाच न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आले होते. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्या. जे. केलामेश्वर यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने आधार कार्ड सक्तीचे नसल्याचे स्पष्ट केले.
अमिताभ बच्चन महाराष्ट्राचे व्याघ्रदूत
- अमिताभ बच्चन यांनी महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांचे व्याघ्रदूत अर्थात, ब्रॅन्ड अॅम्बेसेडर होण्यास होकार दिलेला आहे.
- राज्यातील व्याघ्रवैभव जगाच्या पाठीवर ठळकपणे अधोरेखित व्हावे आणि वन पर्यटनाला चालना मिळावी, या दृष्टीने ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी महाराष्ट्राचे व्याघ्रदूत म्हणून योगदान द्यावे, अशी विनंती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बच्चन यांना केली होती.
- मुनगंटीवार यांनी अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनाही व्याघ्रदूताची जबाबदारी स्वीकारण्याची पत्र पाठवून विनंती केली होती. परंतु सचिनने याबाबत अद्याप निर्णय कळविलेला नाही.
- २०१४ मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेमध्ये वाघांची संख्या देशभरात २२२६ इतकी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
- यापूर्वी २०१० मध्ये झालेल्या अखिल भारतीय व्याघ्र गणनेत ही संख्या १७०६ तर २००६ मध्ये झालेल्या गणनेत १४११ वाघ इतकी होती.
- २०१४ च्या गणनेनुसार महाराष्ट्रात १९० वाघ असल्याचा अंदाज आहे.
- २९ जुलै : व्याघ्रदिन
राज्यातील व्याघ्र प्रकल्प | |
---|---|
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प | पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर |
मेळघाट व्याघ्र प्रकल्प | सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोल्हापूर |
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प | बोर व्याघ्र प्रकल्प |
विम्बल्डन विजेत्या सानियाला 'खेलरत्न'
- टेनिसविश्वातील अत्यंत प्रतिष्ठेच्या विम्बल्डन ट्रॉफीवर नाव कोरण्याची किमया करणारी भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झाला क्रीडाविश्वातील सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.
- खेलरत्न पुरस्कार निवड समितीनं तिच्या नावावर शिक्कामोर्तब केलं असून २९ ऑगस्टला, क्रीडा दिनी तिला हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
- यंदाच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीत सानिया मिर्झानं मार्टिना हिंगीससह जेतेपदावर नाव कोरलं होतं. हे तिचे महिला दुहेरीतील पहिलंच ग्रँडस्लॅम ठरले. महिला दुहेरीत अव्वल स्थानी विराजमान होणारी ती पहिलीच भारतीय टेनिसपटू ठरली होती.
- सानियाच्या या झळाळत्या यशाची दखल घेऊन, टेनिस महासंघानं खेलरत्न पुरस्कारासाठी तिच्या नावाची शिफारस केली होती. ती क्रीडा मंत्रालयानं स्वीकारली आणि तिचं नाव पुरस्कार निवड समितीकडे पाठवलं होतं.
- या पुरस्कारासाठी तिची स्पर्धा होती ती, स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकल आणि थाळीफेकपटू विकास गौडा यांच्याशी. पण सानियाने त्यात बाजी मारली आहे. पुरस्कार समितीनं 'खेलरत्न'साठी तिच्या नावावर मोहोर उमटवल्यानं मंत्रिमंडळाची मंजुरी ही फक्त औपचारिकताच राहिली आहे.
- या निवड समितीचे अध्यक्षपद केरळ हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश (निवृत्त) व्ही.के. बाली यांच्याकडे होते आणि त्यात तिरंदाज डोला बॅनर्जी, ज्येष्ठ हॉकीपटू एम.एम. सोमय्या, भोगेश्वर बारुआ आणि क्रीडापत्रकारांचाही समावेश होता.
- सानिया मिर्झाचा यापूर्वी अर्जुन पुरस्कार व पद्मश्रीने सन्मान झाला आहे. विम्बल्डनमध्ये दुहेरीत विजेतेपद, ऑस्ट्रेलियन ओपन (२००९), फ्रेंच ओपन (२०१२) आणि अमेरिकन ओपन (२०१४) या स्पर्धांत तिने मिश्र दुहेरीची विजेतीपदे जिंकली होती.
- याआधी लिअँडर पेसचा १९९६मध्ये अटलांटा ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर खेलरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. पेसनंतर खेलरत्न मिळवणारी सानिया मिर्झा दुसरी टेनिसपटू आहे.
भालचंद्र ऊर्फ अण्णा पेंढारकर कालवश
- संगीत रंगभूमीचा चालताबोलता इतिहास असलेले मराठी रंगभूमीवरील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व भालचंद्र ऊर्फ अण्णा पेंढारकर (वय ९४) यांचे वृद्धापकाळाने ११ ऑगस्ट २०१५ रोजी निधन झाले.
- अभिनेता, गायक, संगीत दिग्दर्शक, संस्थेचे चालक अशा अनेक भूमिका पेंढारकर यांनी अत्यंत कल्पकतेने आणि मनापासून वठवल्या. भालचंद्र पेंढारकर यांचा अभिनय आणि गायनकौशल्य वादातीत होते. ‘सत्तेचे गुलाम’ या नाटकापासून त्यांनी रंगभूमीवरील आपली कारकीर्द सुरू केली.
- भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९२१ रोजी हैदराबादमध्ये झाला. १९४२पासून भालचंद्र पेंढारकर यांनी ‘ललित कलादर्शन नाटक मंडळी’ या संस्थेची सूत्रे हाती घेतली. या संस्थेच्या अनेक नाटकांनी हजारांचा पल्ला गाठला. भारतभर दौरे केले.
पेंढारकर यांची गाजलेली नाटके | |||
---|---|---|---|
संगीत सौभद्र | दुरितांचे तिमिर जावो | संगीत शारदा | मंदारमाला |
आनंदी गोपाळ | जय जय गौरीशंकर | होनाजी बाळा | भावबंधन |
बावनखणी | झाला अनंत हनुमंत | पंडितराज जगन्नाथ | स्वामिनी |
शाब्बास बिरबल शाब्बास |
प्राप्त पुरस्कार | |
---|---|
राज्य सरकारचा जीवनगौरव पुरस्कार | - |
विष्णुदास भावे पुरस्कार | १९७३ |
बालगंधर्व पुरस्कार | १९८३ |
केशवराव भोसले पुरस्कार | १९९० |
जागतिक मराठी परिषद | १९९६ |
संगीत नाटक कला अकादमी | २००४ |
तन्वीर पुरस्कार | २००५ |
चतुरंग जीवनगौरव पुरस्कार | २००६ |
नावेद याकूबला एनआयएची कोठडी
- उधमपूर दहशतवादी हल्ल्यात पकडण्यात आलेला पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद नावेद याकूब याला राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) न्यायालयाने चौदा दिवसांची कोठडी सुनावली आहे.
- नावेद हा लष्कर-ए-तयबाचा दहशतवादी असून त्याने गेल्या आठवड्यात उधमपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात ‘बीएसएफ’चे दोन जवान हुतात्मा झाले होते, तर ‘बीएसएफ’च्या जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले होते.
- नावेदला सुरक्षा दलाने कडक सुरक्षा व्यवस्थेत जम्मूत आणले होते. त्याला ‘एनआयए’च्या न्यायालयात उभे केले असता चौदा दिवसांची कोठडी देण्यात आली. स्फोटानंतर त्याच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अयोध्येतील राम मंदिराच्या दुरुस्तीस परवानगी
- अयोध्येतील न्यायप्रविष्ट असलेल्या वादग्रस्त जागेवरील रामलल्ला मंदिराची किरकोळ दुरुस्ती करण्यासाठी आणि इतर सुविधा पुरविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.
- दोन तटस्थ निरीक्षकांच्या देखरेखीखाली फैजाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे काम करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
- अयोध्येतील वादग्रस्त जागेवरील राम जन्मभूमीच्या परिसरात भेट देणाऱ्या भाविकांना सध्याच्या परिस्थितीमध्ये शक्य त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला मार्चमध्ये दिले होते.
हनुमान चालिसाचे उर्दूत भाषांतर
- प्रसिद्ध उर्दू कवी अन्वर जलालपुरी यांनी श्रीमद्भागवत गीतेचे उर्दूत भाषांतर केले होते. त्यांच्यानंतर आता उत्तर प्रदेशातील अबिद अल्वी या मुस्लिम युवकाने हनुमान चालिसाचे उर्दूत भाषांतर केले आहे.
- अबिद हा मूळचा जौनपूरचा आहे. हनुमान चालिसा त्याला मुखोदगत आहे.
- हिंदू आणि मुस्लिमांना कुराण, हिंदू चालिसा आणि भागवत गीतेची मातृभाषेत माहिती मिळावी, हा भाषांतर करण्यामागे मुख्य उद्देश असल्याचे तो म्हणाला. तसेच हनुमान चालिसाप्रमाणे शिव चालिसाचेही भविष्यात भाषांतर करण्याचा विचार आहे.
काबूलच्या विमानतळावर तालिबानचा हल्ला
- ११ ऑगस्ट २०१५ रोजी काबूलमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला.
- त्यांनी स्फोटकांनी भरलेली मोटार भरधाव वेगाने आणून विमानतळाच्या प्रवेशद्वारावर आदळविल्याने प्रचंड मोठा स्फोट झाला. या हल्ल्यामध्ये पाच नागरिक ठार झाले असून, सोळा जण जखमी झाले आहेत.
- तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, विदेशी नागरिकांना लक्ष्य करत हा हल्ला केल्याचे तालिबानचा प्रवक्ता झबिउल्ला मुजाहिद याने सांगितले.
- ‘इसिस’चा वाढता प्रभाव आणि नव्या नेत्याची नियुक्ती ही यामुळे गेल्या काही दिवसांत तालिबानच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे.
उत्तराखंडमध्ये प्लॅस्टिक बाटल्यांवर बंदी
- उत्तराखंडमधील नदीकिनाऱ्याच्या भागात प्लॅस्टिकच्या बाटल्या वापरण्यावर राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातली आहे.
- गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये आणि सभोवतालच्या परिसरातील प्लॅस्टिक प्रदूषणाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
- भाविक आणि पर्यटक पाण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटल्या घेऊन येथे येतात, आणि नदीकिनारी फेकून देतात. हा प्लॅस्टिक कचरा नदी पात्रातच राहतो, त्यामुळे नदीची मोठ्या प्रमाणावर हानी होते, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
जपानमधील बंद अणुभट्ट्या पुन्हा सुरु
- फुकुशिमाच्या दुर्घटनेनंतर गेल्या चार वर्षांपासून अणुभट्ट्या बंद केल्यानंतर जपानने ११ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा अणुऊर्जा निर्मितीला सुरवात केली.
- अणुबॉंबच्या हल्ल्यामुळे होरपळलेल्या जपानच्या नागरिकांचा आण्विक शक्तीचा वापर करण्यास मोठा विरोध असतानाही सेंदाई येथील युटिलिट क्यूशू इलेक्ट्रिक पॉवरमधील अणुभट्टी सुरू करण्यात आली.
- साधारण तीन दिवसांत ही अणुभट्टी पूर्ण क्षमतेने काम सुरू करून वीजनिर्मिती सुरू होईल. अणुऊर्जा प्रकल्प बंद केल्याने जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर विजेचा तुटवडा भासत होता.
- सरकारने अणुभट्ट्यांची जबाबदारी पूर्ण हाताळणी करण्याचे आश्वासन देत पुन्हा अणुभट्टी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे यांचा आणखी चार अणुभट्ट्या सुरू करण्याचा विचार आहे.