Header Ads

चालू घडामोडी - १९ जून २०१५ [Current Affairs - June 19, 2015]

‘कृषी विमा’ आणि ‘नाऊ कास्ट’ या दोन वेबपोर्टलचे उद्घाटन

 • केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी १९ जून २०१५ रोजी ‘कृषी विमा’ आणि ‘नाऊ कास्ट’ या दोन वेबपोर्टलचे उद्घाटन केले.
 • सरकारच्या राष्ट्रीय कृषी विमा योजना (एनएआयएस), सुधारित राष्ट्रीय कृषी विमा योजना (एमएनएआयएस) आणि हवामानाधारित कृषी विमा योजना (डब्ल्यूबीसीआयएस) या प्रमुख तीन विमा योजनांतर्गत शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पीक, प्रीमियम, अंतिम तारीख, विमा कंपन्यांशी संपर्क करणे याबाबतची माहिती ‘कृषी विमा’ वेबपोर्टलद्वारे घेता येईल.
 • त्याचप्रमाणे कृषी खात्याकडे ‘एसएमएस’ सेवेसाठी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर शेतकऱ्यांना पीक विम्याबाबतची माहिती निःशुल्कपणे पाठविली जाईल. या वेबपोर्टलवर सर्व राज्यांची जिल्हावार, तालुकावार माहिती उपलब्ध आहे.
 • हवामानाची माहिती डॉप्लर रडारमार्फत हवामान खात्यातर्फे एकत्रित केली जाते. याअंतर्गत अतिवृष्टी, गारपीट, मुसळधार पाऊस यासारख्या परिस्थितीचा अंदाजवजा इशारा शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोचविण्यासाठी देशभरातील १४६ हवामान केंद्रांचा उपयोग केला जाणार आहे. 
 • हवामान खात्यातर्फे दिल्या जाणाऱ्या इशाऱ्याची तत्काळ माहिती ‘नाऊ कास्ट’ या वेबपोर्टलमार्फत तसेच ‘एसएमएस’द्वारे शेतकऱ्यांना मिळेल.
 • या केंद्रांच्या ५० किलोमीटर परिघातील शेतकऱ्यांना किमान तीन तास आधी "एसएमएस‘द्वारे हवामानाबाबतचे इशारे कळविले जातील.

दुष्काळग्रस्त भागातील जनतेसाठी ‘मनरेगा’च्या कार्यअवधीमध्ये वाढ

  MGNREGA
 • दुष्काळग्रस्त भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ‘मनरेगा’च्या कार्यअवधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, आता ‘मनरेगा’चे काम शंभर ऐवजी दीडशे दिवस चालेल. 
 • दुष्काळग्रस्त भागातील लोकांना अधिक रोजगार हवा असेल, तर त्यांना ‘मनरेगा’वर दीडशे दिवस काम उपलब्ध होऊ शकेल. दुष्काळाची तीव्रता अधिक असणाऱ्या राज्यांमध्ये या उपाय योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल. 
 • देशातील बहुसंख्य भागात अद्याप पुरेसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे ‘मनरेगा’च्या कामाचे दिवस वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 • सध्या देशातील ६५२ जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू आहे. याचा सर्वाधिक लाभ शेतमजूर आणि महिला कामगारांना होतो आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक पाचवे कुटुंब ‘मनरेगा’शी जोडलेले आहे.
 • ‘मनरेगा’च्या वाढलेल्या अवधीचा सर्वाधिक फायदा झारखंड, ओडिशा, छत्तीसगड आणि आंध्रप्रदेशातील लोकांना होणार आहे.

भारत आणि स्पेन दरम्यान राजनैतिक पारपत्रधारकांसाठी व्हिसाची आवश्यकता रद्द करण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या

 • भारत आणि स्पेन दरम्यान, राजनैतिक पारपत्रधारकांसाठी व्हिसाची आवश्यकता रद्द करण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत १७ जून २०१५ रोजी मंजूरी देण्यात आली.  
 • यामुळे भारत आणि स्पेनच्या राजनैतिक पारपत्रधारकाला एकमेकांच्या देशात प्रवेश करताना, प्रवास करताना तसेच ९० दिवसांचा मुक्काम करताना आवश्यक पूर्ततेसह व्हिसाशिवाय प्रवास करता येईल.
 • भारताने व्हिसाची आवश्यकता रद्द करण्याचा असा करार आतापर्यंत ४० देशांबरोबर केला आहे.

ऍमेनेस्टी इंटरनॅशनलचे आकार पटेल भारतातले अध्यक्ष

  Aakar Patel
 • जागतिक पातळीवर मानवी हक्‍क आणि मानवाधिकारासाठी (ह्युमन राईटस) काम करणाऱ्या ऍमेनेस्टी इंटरनॅशनल या संस्थेच्या भारतातील प्रमुखपदी लेखक आणि पत्रकार आकार पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ऍमेनेस्टी भारतात तीन मुख्य कार्यालये आहेत. 
 • पटेल यांनी वृत्तपत्रांमध्ये काम केले आहे. डेक्कन क्रोनिकल या दैनिकात त्यांनी सहाय्यक संपादक म्हणून काम केले होते. तसेच मिड-डेचे संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

ऍमेनेस्टी इंटरनॅशल

  Amnesty International
 • स्थापना : जुलै १९६१
 • संस्थापक : बॅरिस्टर पिटर बेनेसन
 • मुख्यालय : लंडन 
 • महासचिव : सलील शेट्टी (भारत)
 • ऍमेनेस्टी इंटरनॅशल ही संस्था मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी जगभर कार्य करते. स्वतंत्र्यासाठी पोर्तुगालमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर त्यांना तुरुंगात डांबण्यात आले होते. या घटनेनंतर ही संस्था स्थापन करण्यात आली. 
 • शोषणाविरुध्द राबविलेल्या अभियानाबद्दल १९७७ साली या संस्थेला नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या संचालकपदी अर्चना रामसुंदरम
 • वरिष्ठ आयपीएस अधिकारी अर्चना रामसुंदरम यांची केंद्रीय अन्वेषण विभागातून (सीबीआय) उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांना राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाचे (एनसीआरबी) संचालक करण्यात आले आहे.
 • त्या १९८०च्या तामिळनाडू तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. 
 • गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात त्यांची ‘सीबीआय’च्या अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीवर वाद निर्माण झाला होता आणि त्यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिकाही सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. 
 • त्यांची नियुक्ती बेकायदा आणि नियमाविरुद्ध असल्याचे दिसून येत असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सीबीआयच्या अतिरिक्त संचालकपदावर काम करण्यास मनाई केली होती.

सुब्रतो रॉय यांना जामीन मंजूर

  Subrata Roy
 • गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणात गेल्या वर्षभरापासून दिल्लीतील तिहार तुरुंगात असलेल्या ‘सहारा’चे प्रमुख सुब्रतो रॉय यांना सर्वोच्च न्यायालयाने अटींवर जामीन मंजूर केला. 
 • रोख स्वरुपात पाच हजार कोटी रुपये आणि तितक्याच रकमेची बॅंक हमी दिल्यानंतर त्यांना जामीनावर तुरुंगातून सोडण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. 
 • त्याचबरोबर पुढील १८ महिन्यांमध्ये टप्प्याटप्याने सहारा समुहाने ३६ हजार कोटी रुपये सेबीला देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या निर्देशांचे पालन केले नाही, तर सुब्रतो रॉय यांना पुन्हा पोलीसांपुढे शरण यावे लागणार आहे.
 • सुब्रतो रॉय यांचा पासपोर्ट जप्त करण्यात यावा. न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाऊ नये, याचबरोबर देशात कुठे जाणार आहात, त्याची सर्व माहिती सुब्रतो रॉय यांनी दिल्ली पोलीसांना देण्याचे बंधनही न्यायालयाने त्यांच्यावर घातले आहे.
 •  दर पंधरा दिवसांनी त्यांना नवी दिल्लीतील टिळक मार्ग पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे.

चिनी भाषेतील भगवतगीता प्रकाशित

 • आंतरराष्ट्रीय योग दिनावरील परिषदेदरम्यान चिनी भाषेतील भगवतगीता प्रकाशित करण्यात आल्यानंतर कम्युनिस्ट देशांत तिचा प्रवेश झाला आहे.
 • शांघायमधील झेजियांग विद्यापीठातील प्रा. झू चेंग आणि लिंग हाई यांनी भगवतगीतेचे चिनी भाषेत भाषांतर केले असून, सिचुआन पीपल्स पब्लिकेशनच्यावतीने ती प्रकाशित करण्यात आली आहे. भारतातील प्रसिद्ध योग प्रशिक्षकांच्या उपस्थितीत भगवतगीतेचे प्रकाशन करण्यात आले.
 • चीनमधील भारताचे राजदूत अशोक के. कांत यांनी या भगवतगीतेचे प्रकाशन केले.

!!! जय महाराष्ट्र !!!