ब्ल्यू मॉरमॉन महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली २२ जून रोजी झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत ‘ब्ल्यू मॉरमॉन’ (राणी पाकोळी) या फुलपाखराला ‘राज्य फुलपाखरू’ दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
- राज्य फुलपाखरू घोषित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.
- राज्याची मानचिन्हे - प्राणी : शेकरू, पक्षी : हरियाल, वृक्ष : आंबा, फूल : जरूला, फूलपाखरू : ‘ब्ल्यू मॉरमॉन’
- राज्याच्या इतर मानचिन्हांमध्ये आतापर्यंत फुलपाखरू नव्हते. फुलपाखरू हा जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक व वनस्पतीसमवेत परस्परसंबंध असलेले महत्त्वपूर्ण कीटक आहे.
- राज्यात फुलपाखरांच्या जवळपास २२५ प्रजाती आहेत. देशातील १५ टक्के फुलपाखरे महाराष्ट्रात आढळतात. देशात कोणत्याही राज्याने राज्य फुलपाखरू घोषित केलेले नाही.
- फुलपाखरांचे अभ्यासक व निसर्गप्रेमींमार्फत राज्य फुलपाखरू म्हणून ब्ल्यू मॉरमॉन या प्रजातीचा विचार करण्याची मागणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करण्यात आली होती. त्या अनुषंगाने हा प्रस्ताव राज्य वन्यजीव मंडळाच्या मान्यतेकरिता ठेवण्यात आला होता.
ब्ल्यू मॉरमॉन
- शास्त्रीय नाव : पॅपिलिओ पॉलिम्नेस्टर
- ब्ल्यू मॉरमॉन हे फुलपाखरू आकाराने सर्वात मोठे असलेल्या सदर्न बर्डविंग या फुलपाखरानंतर सर्वात मोठे फुलपाखरू असून ते मखमली काळ्या रंगाचे व पंखांवर निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असतात. तसेच पंखाखालील बाजू काळी असून शरीराकडील एका बाजूवर लाल ठिपका असतो.
- ब्ल्यू मॉरमॉन हे फुलपाखरू श्रीलंका व भारतातील केवळ महाराष्ट्र दक्षिण भारत व पूर्व समुद्र किनारपट्टीच्या क्षेत्रात आढळते. सध्या विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत त्याचे अस्तित्त्व आहे.
क्रेडिट, डेबिट कार्डाच्या वापरावर करसवलत
- काळ्या पैशाला प्रतिबंध तसेच क्रेडिट किंवा डेबिट कार्डाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने खरेदीसाठी कार्ड वापरणाऱ्यांना प्राप्तिकरात सवलत देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
- तसेच कार्डाच्या वापरावर विशेषत: पेट्रोलपंपावर आकारण्यात येणारे अतिरिक्त शुल्क आणि रेल्वे तिकीट खरेदीवरील ‘उलाढाल प्रभार’ रद्द होण्याचे संकेत या प्रस्तावात सरकारने दिले आहेत.
- रोकडविरहित अर्थव्यवस्थेकडे (कॅशलेस इकॉनॉमी) वाटचाल आणि करचोरीची प्रवृत्ती कमी करण्यासाठी हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
- १ लाख रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करण्यास प्रोत्साहित करण्याचे सरकारने प्रस्तावित केले आहे. सध्या विविध संस्थांकडून इलेक्ट्रॉनिक व्यवहाराकरिता आकारले जाणारे शुल्क आणि प्रभार रद्द करून, अशा व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश यामागे आहे.
- दुकानदारांना देण्यात येणाऱ्या सवलतीत, उदा. त्याच्या सर्व व्यवहारापैकी किमान ५० टक्के व्यवहार इलेक्ट्रॉनिक माध्यमातून झाले असतील तर त्यावर योग्य ती करसवलत देणे किंवा मूल्यवर्धित करात (व्हॅट) एक ते दोन टक्के सवलत देणे आदी शिफारशींचा समावेश आहे.
- एखाद्या व्यक्तीला कर्जासाठी सुधारित क्षमता मिळण्यासाठी ‘उलाढाल इतिहास’ तयार करणे, करचोरीचे प्रमाण कमी करणे आणि बनावट चलनाला आळा घालणे, हा यामागील उद्देश आहे. या प्रस्तावावर सरकारने २९ जूनपर्यंत प्रतिक्रिया मागवल्या आहेत.
- रोख रकमेच्या व्यवहारांना आळा घालून क्रेडिट किंवा डेबिट कार्डावरील व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार लवकरच अनेक उपाययोजना आखेल, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात म्हटले होते.
आयआयटी मध्ये वैद्यकीय शिक्षण
- आयआयटी खरगपूरची ओळख नामवंत अभियंत्यांसाठी असली तरी लवकरच या प्रतिष्ठित संस्थेत एमबीबीएसचा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे.
- आयआयटी कॅम्पसला लागून असलेल्या तीन एकर भूखंडावर ४०० खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जाणार असून तेथे डॉ. बी. सी. रॉय वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन संस्था २०१७ च्या अखेरीस पूर्णत्वास येईल.
- सरकारने या संस्थेसाठी गेल्या वर्षी २३० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या संस्थेत एमबीबीएससारखे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मेडिकल कौन्सिलची (एमसीआय) परवानगी मागण्यात आली आहे.
- आयआयटी खरगपूर ही संस्था अभियांत्रिकी अभ्यासासाठी जगभरात प्रसिद्ध असून वैद्यकीय शिक्षणात प्रवेश करणारी ही पहिली आयआयटी संस्था ठरणार आहे.
- स्थानिक रुग्णांची सेवा करण्यासह हे रुग्णालय जैववैद्यकीय, क्लिनिकल आणि अन्य संशोधनाचे कार्य सुरू करेल. औषधांचे डिझाईन आणि पुरवठा यासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रातील संशोधनातही हे रुग्णालय योगदान देणार आहे.
मदर तेरेसांचा वारसा पुढे चालवणाऱ्या सिस्टर निर्मला यांचे निधन
- नोबेल पुरस्कार विजेत्या मदर तेरेसांचा वारसा पुढे चालवणाऱ्या व कोलकत्ता येथील धर्मादाय मिशनरीच्या माजी प्रमुख सिस्टर निर्मला जोशी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने २३ जून रोजी निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या.
- सिस्टर निर्मला यांचा जन्म १९३४ साली झारखंडमध्ये झाला. पाटणा येथे ख्रिश्चन मिशनरीजमध्ये त्यांचे शिक्षण झाले.
- मदर तेरेसा यांच्या कार्याने प्रभावित होऊन निर्मला जोशी यांनी रोमन कॅथलिक धर्माचा स्वीकार केला. पॉलिटिकल सायन्समध्ये मास्टर्स डिग्री घेणाऱ्या निर्मला वकील म्हणूनही प्रॅक्टिस करत होत्या.
- मदर तेरेसा यांचा वारसा पुढे नेणाऱ्या निर्मला यांच्याकडे १९९७ मध्ये मिशनरीज ऑफ चॅरिटीजचे प्रमुखपद सोपवण्यात आले होते. २५ मार्च २००९ मध्ये त्यांचा कार्यकाळ समाप्त झाला. निर्मला यांच्या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने २००९ मध्ये त्यांना ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले होते.
चीनने कैलास मानसरोवर यात्रेसाठी नथुला खिंडीतील मार्ग खुला केला
- चीनने कैलास मानसरोवर यात्रेला जाण्यासाठी दुसरा मार्ग खुला केला असून हा मार्ग तिबेटमार्गे नथुला खिंडीतून जातो. भारतीय यात्रेकरूंची पहिली तुकडी २३ जूनला या मार्गाने रवाना झाली. चीन व भारत यांच्यातील मैत्रीअंतर्गत विश्वासनिर्मितीसाठी चीनचा हा एक उपाय आहे.
- हिमालयातील सिक्कीम नथुला मार्ग समुद्र सपाटीपासून ४ हजार मीटरवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यात हा मार्ग खुला करण्याची घोषणा करण्यात आली होती. यामुळे कैलास मानसरोवर यात्रेसाठी अधिक भारतीय यात्रेकरू जाऊ शकतील.
- सध्याचा मार्ग लिपुलकेश खिंडीतून जात असून, २०१३ साली उत्तराखंडात आलेल्या भीषण पुरात हा मार्ग खराब व नादुरुस्त झाला आहे.
- चीनचे भारतातील राजदूत ले येचुंग भारतीय सीमेवरून प्रथमच या मार्गावर आले. या मार्गावर येणारे ते पहिले चिनी अधिकारी ठरले.
कैलास मानसरोवर यात्रा
- ही यात्रा परराष्ट्र मंत्रालयातर्फे आयोजित केली जाते व १ हजार यात्रेकरूना दरवर्षी परवाना दिला जातो. १८ तुकड्यांत हे लोक यात्रेसाठी पाठवले जातात.
- ही संपूर्ण यात्रा २३ दिवसांची असून १९ दिवस प्रवासात तर चार दिवस वैद्यकीय तपासणीसाठी असतात. यात्रेचा एकूण खर्च दर माणशी १.८० लाख रुपये असतो.
आशियाई ग्रां. प्रि. अॅथलेटिक्स सीरिजमध्ये ८ पदकांची कमाई
- भारतीय संघाने बँकॉक येथे पार पडलेल्या आशियाई ग्रां. प्रि. अॅथलेटिक्स सीरिजच्या पहिल्या टप्प्यात ८ पदकांची कमाई केली. यात दोन सुवर्ण, एक रौप्य आणि पाच ब्राँझपदकांचा समावेश आहे.
- भारताला दोन सुवर्णपदक जिन्सन जॉन्सन आणि इंदरजित सिंग यांनी मिळवून दिली. पुरुषांच्या ८०० मीटरच्या शर्यतीत जॉन्सनने १ मिनिट आणि ४८.५२ सेकंद अशी वेळ नोंदवून अव्वल क्रमांक मिळवला.
- तर गोळा फेकमध्ये इंदरजितने १९.८३ मीटर लांब गोळा फेकून अव्वल क्रमांक मिळवला. इंदरजितचे हे या महिन्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक असून, त्याने याआधी चीनमध्ये झालेल्या आशियाई मैदानी स्पर्धेतही सुवर्णपदक मिळविले होते.
- अंकित शर्माने लांब उडीमध्ये ७.७८ मीटर अशी कामगिरी करून रौप्यपदक मिळवले.
- महिलांच्या ४०० मीटरच्या शर्यतीत एम. आर. पूवम्माने (५३.५१ से.) ब्राँझपदक मिळवले. अरोक्या राजीव, एस. नंदा यांनीही ब्राँझपदकाची कमाई केली. महिलांच्या १०० मीटर अडथळा शर्यतीत गायत्री गोविंदराजने (१३.७२ से.) आणि महिलांच्या ८०० मीटर शर्यतीत एम. गोमतीने (२ मि. ७.४८ से.) ब्राँझपदक मिळवले.
- या स्पर्धेतील सुवर्ण विजेत्या खेळाडूला १५०० डॉलर, रौप्य विजेत्याला ८०० डॉलर आणि ब्राँझपदक विजेत्याला ५०० डॉलरचे पारितोषिक मिळणार आहे.
- स्पर्धेदरम्यान गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे भालाफेकमधील भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर राजिंदरसिंगला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
- या स्पर्धेत चौदा क्रीडाप्रकारांचा समावेश होता. तसेच या स्पर्धेचा दुसरा आणि तिसरा टप्पा अनुक्रमे २५ आणि २९ जूनला होणार आहे.
ऑस्करविजेते संगीत दिग्दर्शक जेम्स हॉर्नर यांचे अपघाती निधन
- ‘टायटॅनिक’, ‘अवतार’ आणि ‘ब्रेव्हहार्ट’ या गाजलेल्या हॉलीवूड चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक जेम्स हॉर्नर यांचे २२ जून २०१५ रोजी विमान अपघातात निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते.
- कॅलिफोर्नियामधील व्हेंच्युरा कौंटीमध्ये हॉर्नर यांच्या खासगी विमानाला अपघात झाला.
- हॉलिवूडमधील सर्वाधिक यशस्वी संगीतकारांमध्ये हॉर्नर यांचे नाव आदराने घेतले जाते. १९९७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘टायटॅनिक’ या चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांना दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले होते. या चित्रपटातील ‘माय हार्ट विल गो ऑन’ हे प्रचंड गाजलेले गाणेही हॉर्नर यांचेच होते.
- ‘अवतार’, ‘ब्रेव्हहार्ट’, ‘अ ब्युटिफुल माईंड’, ‘अॅन अमेरिकन टेल’, ‘फिल्ड ऑफ ड्रिम्स’, ‘अपोलो १३’ या हिट चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते. त्यांना आतापर्यंत १० वेळा ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.
झिम्बाब्वे डॉलर बंद
- झिम्बाब्वे डॉलरने चलनाच्या बाबतीत ऐतिहासिक घसरण नोंदविली आहे. एका अमेरिकन डॉलरसाठी ३५ क्वाड्रीलियन (एकावर पंधरा शून्य) झिम्बाब्वेयिन डॉलर मोजण्याची वेळ आली आहे.
- इतक्या प्रचंड अवमूल्यनानंतर गेली अनेक वर्षे बाजारात फारशी किंमत न उरलेला झिम्बाब्वे डॉलर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- ३० सप्टेंबरपासून झिम्बाब्वे डॉलर चलनातून पूर्णत: बाद होणार आहे.
- २००९ साली आर्थिक मंदीतून जग सावरत असतानाच झिम्बाब्वेमध्ये अमेरिकन डॉलरचा वापर वाढला होता आणि स्थानिक चलन नाममात्र राहिले होते. आता झिम्बाब्वेचे अमेरिकन डॉलर हेच अधिकृत चलन बनविण्यात येणार आहे.
- १९७० साली झिम्बाब्वेने ऱ्होडेशियन डॉलरचा चलन म्हणून वापर सुरु केला. त्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झिम्बाब्वे डॉलरचा वापर सुरु करण्यात आला होता. मात्र त्यानंतर वाढती महागाई, चलवाढ, मंदी यामुळे डॉलरच्या तुलनेमध्ये झिम्बाब्वे डॉलरची घसरण होऊ लागली.
!!! जय महाराष्ट्र !!!