चालू घडामोडी - २८ जून २०१५ [Current Affairs - June 28, 2015]

एमएसएमई क्षेत्रासाठी स्वतंत्र जॉब पोर्टल

    MSME Job Portal
  • सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांतून (एमएसएमई) रोजगार मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने १६ जून रोजी www.eex.dcmsme.gov.in हे जॉब पोर्टल सुरू केले. 
  • याचा थेट फायदा देशात सध्या कार्यरत असणाऱ्या, एमएसएमई क्षेत्रातील सव्वा तीन कोटी युनटना होणार आहे. याशिवाय नव्याने नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांनाही याचा लाभ उठवता येणार आहे. एमएसएमई क्षेत्राला कुशल मनुष्यबळ मिळवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.
  • डिजिटल इंडिया, स्किल इंडिया व मेक इन इंडिया या तीन योजनांना पाठिंबा देण्यासाठी एमएसएमई मंत्रालयातर्फे हे एक प्रकारे इम्प्लॉयमेंट एक्स्चेंज तयार करण्यात आले आहे.
  • सध्या हे पोर्टल फक्त कारखानदारी (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रासाठी आहे. हळूहळू अन्य एमएसएमई क्षेत्रांचा समावेश यात करण्यात येईल. आगामी काळात या पोर्टलची रचनाही अधिक सुटसुटीत केली जाणार आहे. नोकरी शोधणाऱ्यांना या पोर्टलवर आपली माहिती विनाशुल्क नोंदवता येणार आहे.

लेहमधील ऐतिहासिक हेमिस महोत्सवाला प्रारंभ

  • सुमारे तीनशे वर्षांचा इतिहास लाभलेल्या (लेह) लडाखमधील ऐतिहासिक बौद्ध मठामध्ये हेमिस महोत्सवाला २८ जूनपासून उत्साहात प्रारंभ झाला. देश-परदेशातील शेकडो पर्यटकांनी या महोत्सवासाठी हजेरी लावली आहे.
  • बौद्ध भिक्खू गुरू पद्मसंभव ऊर्फ गुरू रिनपोचे यांच्या जयंतीनिमित्त या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. भूतान आणि तिबेटमधील बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसाराचे श्रेय पद्मसंभव यांनाच दिले जाते. .
  • चंद्राच्या गतीवर अवलंबून असणारे तिबेटियन दिनदर्शिकेतील पाचव्या महिन्यात दहा दिवस या महोत्सवाचे आयोजन केले जाते. या काळात येथील बौद्ध मठामध्ये धार्मिक पूजाविधी केले जातात.
  • या महोत्सवातील नृत्याविष्कारदेखील तंत्र विद्येशी संबंधित आहेत. जागतिक शांती आणि समृद्धतेसाठी हे नृत्याविष्कार महत्त्वपूर्ण मानले जातात.

श्री श्री रवि शंकर कोलंबियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित

    Shri Shri Ravi Shankar
  • अध्यात्मिक गुरु श्री श्री रवि शंकर यांना कोलंबियाच्या ‘ओरडेन डी ला डेमोक्रेसिया सिमॉन बोलीवर पुरस्कार’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
  • त्यांना हा पुरस्कार संघर्षग्रस्त क्षेत्रांमध्ये पुनर्वसन कार्य करण्याबद्दल आणि देण्यात आले शांततापूर्ण उद्देश्यांसाठी कार्य केल्याबद्दल प्रदान करण्यात आला आहे.
  • श्री श्री रविशंकर यांनी आर्ट ऑफ लिविंगची १९८१मध्ये स्थापना केली. या संस्थेचा उद्देश लोकांना दैनंदिन अडचणी, सामाजिक समस्या तसेच हिंसेपासून मुक्ती देणे हा आहे.
  • १९९७मध्ये त्यांनी मानवी गुण वाढविण्याच्या आणि जीवनाशी संबंधित समस्या दूर करण्याच्या उद्देशाने इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन वैल्यूज़ (IAHV) या संस्थेची स्थापना केली.
  • कोलंबियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराची सुरुवात १९८०मध्ये झाली. हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजसेवा करणाऱ्या लोकांना दिला जातो.

आता तुम्हीच मोजा तुमचा इन्कम टॅक्स

    Income Tax Department
  • करदात्यांनी त्यांचे आयकर विवरणपत्र अर्थात रिटर्न स्वत:च भरावे यासाठी आयकर विभाग ई-फायलिंगला प्रोत्साहन देत आहे.
  • नोकरदारांना त्यांचा इन्कम टॅक्स किती भरावा लागणार आहे, हे त्यांच्या कंपनीकडून कळत असते. परंतु याशिवाय अन्य करदात्यांनाही नेमका किती इन्कम टॅक्स भरावा लागेल, हे कळावे यासाठी आयकर विभागाने आपल्या वेबसाइटवर कॅल्क्युलेटर तयार केला आहे.
  • हा ऑनलाइन कम्प्युटर बेस्ड प्रोग्रॅम आहे. याचा वापर करून करदात्याला इन्कम टॅक्सचा भरणा किती करावा लागणार आहे हे कळल्याने ३१ ऑगस्ट या कर भरायच्या अंतिम तारखेच्या आत टॅक्स भरणे त्याला शक्य होईल. 
  • गुंतागुंतीच्या प्रक्रिया याच्या साह्याने करता येणार नाहीत. यासाठी प्रत्यक्ष रिटर्न भरताना त्या अर्जामध्ये इन्कम टॅक्सची मोजणी करावी लागणार आहे.
  • आयकर विभागाची वेबसाइट www.incometaxindia.gov.in वर हा आयकर कॅल्क्युलेटर उपलब्ध आहे.

न्यूझीलंडमधील उच्चायुक्तांची उचलबांगडी

    Ravi Thapar
  • न्यूझीलंडमधील भारताचे उच्चायुक्त रवी थापर यांच्या पत्नी शर्मिला थापर यांनी घरात कामाला असलेल्या नोकराचा छळ केल्यामुळं रवी थापर यांना परराष्ट्र मंत्रालयाने दिल्लीतील मुख्यालयात रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. 
  • वेलिंग्टनमधील उच्चायुक्तांच्या अधिकृत निवासस्थानी आचाऱ्याचे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने थापर यांच्या पत्नी शर्मिला यांनी आपल्याला गुलामाची वागणूक देऊन मारहाण केल्याची तक्रार न्यूझीलंड पोलिसांसमोर केली होती. या प्रकरणाची पोलिसांमध्ये अधिकृत तक्रार करण्यात आली नाही. 
  • याबाबतची माहिती मिळताच भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं चौकशी समिती नेमली होती. या समितीच्या अहवालानंतर थापर यांना परत बोलावण्यात आलं आहे.

रशियाचे माजी पंतप्रधान प्रिमाकोव यांचे निधन

  • रशियाचे माजी पंतप्रधान येवगेनी प्रिमाकोव यांचे वयाच्या ८५व्या वर्षी मॉस्को येथे निधन झाले. 
  • अमेरिकेकडे जाणारे त्यांचे विमान अ‍ॅटलांटिकवर असताना सर्बियात नाटोच्या बॉम्बहल्ल्यांमुळे वळवण्यात आल्याची घटना १९९९ मध्ये घडली होती.
  • ते मुरब्बी नेते, वैज्ञानिक होते. त्यांनी बोरिस येल्तसिन यांच्या अध्यक्षपदाच्या काळात म्हणजे १९९८-९९ दरम्यान पंतप्रधानपद भूषवले होते. १७ ऑगस्ट १९९८ मध्ये रशिया दिवाळखोरीत असताना ते पंतप्रधान झाले.

‘नासा’च्या यानाचा स्फोट

    SpaceX Falcon 9 Rocket Breaks Up After Launch With Space Station Cargo
  • अमेरिकी अवकाश संशोधन संस्थेच्या (नासा) यानाचा २८ जून रोजी उड्डाणानंतर काही वेळातच स्फोट झाला. 
  • स्पेसएक्स फाल्कन ९ या अवकाशयानाने फ्लोरिडा येथील केप कॅनव्हेराल येथील तळावरून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले. मात्र, काही वेळातच त्याचा स्फोट झाला. 
  • अवकाश स्थानकावर साहित्य घेऊन जाणारे हे मालवाहू यान असल्याने जीवितहानी झाली नाही. उड्डाणातील त्रुटींमुळेच यानाचा स्फोट झाला असावा, अशी शक्यता नासाने व्यक्त केली आहे.
  • फाल्कन-९ हे रॉकेट २०८ फूट लांबीचे असून या रॉकेटची १९ वी झेप होती. स्पेस-एक्स ही कंपनी ईलॉन मस्क यांची असून अंतराळ क्षेत्रात उतरल्यानंतर या कंपनीच्या वाट्याला आलेली ही पहिलीच दुर्घटना आहे.

पाकिस्तानला कर्जाचा ५० कोटी डॉलरचा हप्ता मंजूर

  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला ५०६.४ दशलक्ष डॉलर्सचा कर्जाचा हप्ता मंजूर केला आहे. देशाच्या आर्थिक सुधारणा व वाढीसाठी संपुट योजनेचा भाग म्हणून ही उपाययोजना करण्यात आली आहे. 
  • पाकिस्तानची आर्थिक स्थिती वाईट असून त्यांना या कर्जामुळे लाभ होणार आहे. तीन वर्षांच्या कालावधीसाठी हे कर्ज मंजूर करण्यात आले आहे.
  • पाकिस्तानच्या जानेवारी ते मार्च २०१५ या काळातील आर्थिक स्थितीचा सातव्यांदा आढावा घेतल्यानंतर हे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे इस्लामाबादला पुढील आठवडय़ात कर्जाचा आठवा हप्ता दिला जाणार आहे.
  • सप्टेंबर २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने तीन वर्षांसाठी विस्तृत निधी सुविधा म्हणून ६.६ अब्ज डॉलर्सचा हप्ता मंजूर केला होता. नव्या कर्ज हप्त्याला मंजुरी मिळाल्याने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला दिलेली रक्कम २०१३ पासून ४.१ अब्ज डॉलर्स झाली आहे. 

!!! जय महाराष्ट्र !!!

Previous Post Next Post