‘नो ऍक्सिडेंट डे’
- देशात प्रथमच उत्तर प्रदेश सरकारने १ जुलै रोजी ‘नो ऍक्सिडेंट डे’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
- या दिवशी जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
- यासंबंधीचे पत्र राज्य सरकारकडून सर्व राज्य परिवहन आयुक्तांना पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
- या दिवशी राज्यातील सर्वच भागातील अपघात रोखणे शक्य होणार नाही. पण अपघातप्रवण भागामध्ये ३० जूनच्या मध्यरात्रीपासून पोलिस तैनात करण्यात येतील.
अमेरिकेच्या सर्व राज्यांमध्ये समलिंगी विवाहाला मान्यता
- समलिंगी व्यक्तींना अमेरिकेतील ५० प्रांतांत कुठेही विवाहबद्ध होण्याचा अधिकार आहे, असा निर्णय अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने २६ जून रोजी दिला.
- अमेरिकेच्या ३६ राज्यांमध्ये आणि कोलंबिया डिस्ट्रिक्टमध्ये पुरुष समलिंगी (गे) आणि स्त्री समलिंगी (लेस्बियन) जोडप्यांना लग्न करण्याची परवानगी आहे. आता दक्षिण आणि मध्य-पश्चिम भागातील उर्वरित १४ राज्यांनाही समलिंगी लग्नांवरील बंदीची अंमलबजावणी थांबवावी लागेल, असा निर्णय न्यायालयाने ५ विरुद्ध ४ अशा बहुमताने दिला आहे.
- अनेक राज्यांच्या कायद्यानुसार लग्नाची व्याख्या ‘पुरुष व स्त्री यांचे एकत्रीकरण’ अशी होती व हाच सुप्रीम कोर्टातील अनेक खटल्यांतील वादाचा विषय होता. ‘लग्नापेक्षा कुठलाही संबंध सखोल नाही’, असे न्यायाधीश अँथनी केनेडी यांच्यासह इतर चार लिबरल न्यायाधीशांनी निकालपत्रात नमूद केले आहे.
- कुठल्याही निकालाच्या फेरविचाराची विनंती करण्यासाठी न्यायालय हरणाऱ्या पक्षाला सुमारे तीन आठवडय़ांची मुदत देते. त्यामुळे या निकालाची अंमलबजावणी लगेचच होणार नाही.
‘अरे यार’, ‘भेळपुरी’ हे शब्द ऑक्सफर्डमध्ये
- भारतीयांच्या तोंडून सहज बाहेर पडणारा ‘अरे यार’ या शब्दाला जागतिक मान्यता मिळाली आहे. जगभरात वाचल्या जाणाऱ्या ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये 'अरे यार' या शब्दाला मानाचे स्थान दिले असून त्याबरोबरच चुडीदार, भेळपुरी आणि ढाबा या शब्दांनाही ऑक्सफर्डमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
- ऑक्सफर्डच्या नव्या आवृत्तीत अलीकडेच ५०० नव्या शब्दांची भर घालण्यात आली आहे. या सर्वच शब्दांना स्वत:चे सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि भाषिक महत्त्व आहे. त्यामुळं या शब्दाला पर्यायी शब्द वापरणं योग्य ठरले नसते. म्हणूनच हे शब्द जसेच्या तसे डिक्शनरीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- १८४५पासून आतापर्यंत अनेक शब्दांचा ऑक्सफर्डच्या शब्दकोशात समावेश करण्यात आला आहे. 'चुडीदार' या शब्दाचा इंग्रजी भाषेतील उल्लेख प्रथम १८८०मध्ये करण्यात आल्याचा कागदोपत्री पुरावा उपलब्ध आहे. त्यानंतर तब्बल १३५वर्षानंतर या शब्दाला इंग्रजी शब्दांच्या यादीत स्थान मिळाले आहे.
- ‘अरे यार’ शब्दाचा इतिहासही पूर्वापार चालत आला आहे. १८४५ मध्ये या शब्दाचा उल्लेख झाल्याचे आढळते. अशाप्रकारे इतर काही ऐतिहासिक आणि रोजच्या वापरातील शब्द डिक्शनरीमध्ये समाविष्ट केले गेले आहेत.
भारताचा सतनाम सिंग एनबीए बास्केटबॉल लीगमध्ये
- भारताच्या सतनाम सिंग या बास्केटबॉलपटूने इतिहास घडवला आहे. जगातील सर्वात लोकप्रिय असलेल्या एनबीए (नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन) या अमेरीकेच्या बास्केटबॉल लीग स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी निवड झालेला सतनाम हा पहिला भारतीय असल्याने जागतिक बास्केटबॉल क्षेत्रामध्ये भारताचे नाव चमकले आहे.
- ७ फूट २ इंच उंचीचा सतनाम एनबीएमध्ये डैलस मैवरिक्स या संघाकडून खेळणार असून एनबीए स्पर्धेच्या एकुण ७१ वर्षांच्या इतिहासामध्ये खेळणार तो पहिला भारतीय ठरणार आहे.
- सतनाम सिंग भामरा असे पुर्ण नाव असलेला हा खेळाडू अमेरीकेच्या फ्लोरीडा शहरातील आयएमजी अकादमीमध्ये शिकत असून या कालवधीत कॉलेज स्तरावरील बास्केटबॉल स्पर्धांत सतनामने आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यामुळेच डैलस मैवरिक्स संघाने त्याला करारबध्द केले.
- विशेष म्हणजे डैलस संघाने २०११ साली एनबीएचे विजेतेपद पटकावले होते. शिवाय या संघामध्ये डर्क नोविट्जस्की सारख्या स्टार खेळाडंूचा समावेश आहे.
- गुरसिमरन ‘सिम’ भुल्लर एप्रिल महिन्यात सैक्रोमेंटो किंग्स संघाकडून एनबीए स्पर्धेत खेळणारा पहिला भारतीय वंशाचा खेळाडू ठरला होता.
सिरियातील कोबाने शहरात इसिसचा हिंसाचार
- सिरियातील कोबाने शहर ताब्यात घेतल्यानंतर इसिस संघटनेच्या दहशतवाद्यांनी २४ तासात झालेल्या हिंसाचारात १४६ नागरिकांना ठार मारले आहे. इसिस या इस्लामिक संघटनेकडून सिरियात झालेला हा सर्वाधिक भीषण हिंसाचार आहे.
- कोबाने हे शहर कुर्दिश प्रतिकाराचे प्रतीक बनल्याने इसिसचे क्रौर्य कळसाला पोहोचले आहे. इसिसच्या आत्मघाती बॉम्बरने कोबाने शहराच्या प्रवेशद्वारात स्वत:चे स्फोट घडवून आणले व येणारी वाहने उडविण्यात आली. मागून येणाऱ्या इसिसच्या जिहादींसाठी रस्ता मोकळा करण्यात आला.
- मृत नागरिकांत महिला व लहान मुले आहेत. त्यांचे मृतदेह रस्त्यावर पडलेले आहेत. शहरात आलेल्या इसिसच्या जिहादींनी घराघरात शिरून गोळीबार केला.
विश्वनाथन आनंदला उपविजेतेपद
- माजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदने नॉर्वे क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत नवव्या आणि अंतिम फेरीत बल्गेरियाच्या व्हॅसेलिन टोपालोवविरुद्ध झटपट बरोबरी स्वीकारली. टोपालोव ६.५ गुणांसह निर्विवाद विजेता ठरला.
- नॉर्वेमध्ये ही स्पर्धा झाली. 'इंग्लिश ओपनिंग' पद्धतीत झालेला लेव्हॉन अरोनियन - हिकारू नाकामुरा डावात नाकामुराने विजय प्राप्त केला. यामुळे आनंद व नाकामुरा यांचे समान सहा गुण झाले. टायब्रेकमध्ये आनंद सरस ठरल्याने आनंदला उपविजेता म्हणून घोषित करण्यात आले.
- उपविजेतेपदाबरोबरच या स्पर्धेत आनंदने १२ एलो गुणांची कमाई केली. पुढील फिडे यादीत २८१६ एलो गुणांसह आनंद जागतिक क्रमवारीत पुन्हा दुसऱ्या स्थानी आरूढ झालेला असेल.
- विजेत्या टोपालोवला ७५ हजार, उपविजेत्या आनंदला ५० हजार आणि नाकामुराला ४० हजार डॉलरचे बक्षीस मिळाले.
- या स्पर्धेत नॉर्वेच्या हॅमरने बुद्धिबळ विश्वाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. स्पर्धेत २६७७ एलो गुणांचे सर्वांत शेवटचे मानांकन असलेल्या हॅमरने शांतपणे व एकाग्रतेने जगज्जेत्या कार्लसनला पराभूत केले.
!!! जय महाराष्ट्र !!!