राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत १५० नवीन शस्त्रक्रिया
- महाराष्ट्र सरकारच्या राजीव गांधी जीवनदायी योजनेचा विस्तार करण्यात येणार असून येत्या चार महिन्यांत या योजनेत १५० नवीन शस्त्रक्रियांचा समावेश करण्यात येणार आहे.
- सध्या योजनेंतर्गत ९७१ शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. कर्करोग, हृदयरोग, किडनी प्रत्यारोपण इ. ३० विभागांच्या शस्त्रक्रिया या योजनेंतर्गत करण्यात येतात. येत्या काळात कॉक्लिअर इम्प्लांट (कानाच्या अंतर्भागातील नागमोडी नलिका), गुडघा प्रत्यारोपण, हीप रिप्लेसमेंट अशा शस्त्रक्रियांचा योजनेत समावेश करण्यात येणार आहे.
- या योजनेअंतर्गत दीड लाखापर्यंतच्या शस्त्रक्रियांचा खर्च शासनाकडून करण्यात येतो. किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी ही मर्यादा अडीच लाख रुपयांची आहे.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना
- ही भारत सरकारची योजना महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत येते. २१ नोव्हेंबर २०१३ रोजी हि योजना सुरु करण्यात आली.
- ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे आणि ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे, अशा लोकांना या योजनेद्वारे दीड लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय मदत मिळावी, अशी योजना आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रत्येक कुटुंबामागे वर्षाला ३३३ रुपये देते.
- तसेच या योजनेअंतर्गत दारिद्रय़रेषेखालील, केसरी, अंत्योदय व अन्नपूर्णा योजनेतील रेशनकार्ड धारकांना 'हेल्थ कार्ड' दिले जाणार आहे.
- जुलै २०१२मध्ये ही योजना गडचिरोली, अमरावती, सोलापूर, धुळे, मुंबई, मुंबई उपनगर, नांदेड व रायगड या जिल्ह्यांत सुरू झाली.
ग्रीसमधील नागरिकांचा बेलआऊटविरोधात कौल
- संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या ग्रीसने युरोझोनमध्ये राहण्याच्या विरोधात मतदान केले आहे. युरोपियन देशांचे बेलआऊट पॅकेज ग्रीसमधील जनतेने बहुमताने नाकारले आहे. या संदर्भात घेण्यात आलेल्या मतदानात ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी विरोधात मतदान केले.
- ११ लाख लोकसंख्येच्या ग्रीसमध्ये या सार्वमतासाठी ११ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. कर्जातून सुटका होण्याकरता आंतरराष्ट्रीय कर्जदारांकडून आणखी निधी (बेलआउट फंड्स) मिळण्याच्या मोबदल्यात तुम्ही कठोर आर्थिक शिस्त स्वीकारण्यास तयार आहात काय, असा प्रश्न मतदारांना विचारण्यात आला होता. मतदारांनी या विरोधात मतदान केले.
- ग्रीसचे पंतप्रधान अॅलेक्सिस सिप्रास यांनी जनतेला प्रस्तावाच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले होते.
- कर्जाचा बोजा प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे सरकारने बँका बंद करणे आणि एटीममधून दररोज फक्त ६० युरो काढण्याचे निर्बंध लागू करणे यासारखे कठोर उपाय योजल्यानंतर हे सार्वमत घेण्यात आले.
- युरोझोनमधील सहकारी देशांनी अतिशय घृणात्मक अटी लादल्याने ग्रीसचे अर्थमंत्री यनिस वारोफाकीस यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
- ग्रीसचे पंतप्रधान : अॅलेक्सिस त्सिप्रास
पाचगाव देशातील पहिले वायफाय खेडे
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या घोषणेनंतर उमरेड तालुक्यातील पाचगाव येथे मोफत ‘वायफाय’ सुरू करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ४ जुलै रोजी केली. त्यानुसार पाचगाव हे देशातील पहिले ‘वायफाय’ गाव ठरले आहे.
- तसेच महाराष्ट्रात १०० टक्के ग्रामपंचायती वायफाय यंत्रणेशी जोडण्यात येणार असून, देशभरातील अन्य राज्यांत ४० टक्के ग्रामपंचायतींमध्ये ही सेवा पुरविण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली.
देशातील १९ महाविद्यालयांना वारसा दर्जा
- विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील १९ महाविद्यालयांना वारसा दर्जा दिला आहे. त्याचा परिणाम म्हणून महाविद्यालयांना सुधारणांसाठी आता आर्थिक निधी दिला जाणार आहे.
- पुण्याचे फर्ग्युसन महाविद्यालय, मुंबईचे सेंट झेवियर्स महाविद्यालय, नागपूरचे हिस्लॉप महाविद्यालय यांचा यात समावेश आहे.
- आयोगाने महाविद्यालयांकडून वारसा महाविद्यालय योजनेत वारसा दर्जासाठी प्रस्ताव मागितले होते, या योजनेत साठ प्रस्ताव मिळाले होते; त्यात दिल्लीचा एकही प्रस्ताव नव्हता.
- साठ प्रस्तावात निवड समितीने १९ महाविद्यालयांची निवड केली असून आता त्यांना संवर्धनासाठी अनुदान दिले जाईल व विशेष वारसा संबंधित विशेष अभ्यासक्रम राबवता येतील.
- विद्यापीठ अनुदान आयोगाने मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाला १.५३ कोटींचे अनुदान जाहीर केले असून त्यात संवर्धनाचे काम केले जाईल. तसेच 'मेन्टेनिंग हेरिटेज इन इंडिया' हा पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला जाईल.
- २०१३ मध्ये केंद्र सरकारने ही योजना सुरू केली होती. या योजनेत संबंधित दर्जा मिळालेल्या शैक्षणिक संस्थांना सरकार वार्षिक ८-१० कोटी रुपये अनुदान देते, त्यात परिसराचे संवर्धन आणि नवीन अभ्यासक्रम यांना मदत होते.
वारसा दर्जा मिळालेली महाविद्यालये | |
---|---|
सेंट झेवियर्स महाविद्यालय : मुंबई | फर्ग्युसन महाविद्यालय : पुणे |
हिस्लॉप महाविद्यालय : नागपूर | सेंट झेवियर्स महाविद्यालय : कोलकत्ता |
सीएमएस महाविद्यालय : कोट्टायम | सेंट जोसेफ महाविद्यालय : त्रिची |
खालसा महाविद्यालय : अमृतसर | सेंट बेडेज महाविद्यालय : सिमला |
ख्राइस्ट चर्च महाविद्यालय : कानपूर | ओल्ड आग्रा महाविद्यालय : आग्रा |
मीरत महाविद्यालय : मीरत | कन्या महाविद्यालय : जालंधर |
गव्हर्नमेंट ब्रेनन महाविद्यालय : केरळ | युनिव्हर्सिटी महाविद्यालय : मंगळुरू |
कॉटन महाविद्यालय : गुवाहाटी | मिदनापूर महाविद्यालय : पश्चिम बंगाल |
गव्हर्नमेंट मेडिकल सायन्स महाविद्यालय : जबलपूर | गव्हर्नमेंट गांधी मेमोरियल सायन्स महाविद्यालय : जम्मू |
लंगट मानसिंग महाविद्यालय : मुझफ्फरपूर |
फ्रान्समधील वाइनयार्ड्सना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा
- फ्रान्समधील शॅम्पेन वाइनयार्ड्स या फसफसती वाइन तयार करणाऱ्या भागाला युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा दिला आहे.
- त्यामुळे ताज महाल व चीनच्या महाभिंतीबरोबरच या ठिकाणाचाही उल्लेख सर्वत्र विशेष वारसा ठिकाण म्हणून केला जाईल. जागतिक वारसा मिळाल्याने हे ठिकाण पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक येऊ शकतात.
- शॅम्पेन वाइनयार्ड्स या फ्रान्समधील भागात तीन महत्त्वाच्या प्रभागांचे एकत्रीकरण केलेले असून तेथे सतराव्या शतकापासून ते १९ व्या शतकातील औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीपर्यंत दुय्यम किण्वन क्रियेच्या मदतीने ही वाइन तयार केली जात होती.
- त्यात कार्बन डायॉक्साईड तयार होत असल्याने ती फसफसते, त्यामुळे तिला स्पार्कलिंग वाईन म्हणतात.
- फ्रान्समधील बुरगुंडी येथे उत्तर फ्रेंच शॅम्पेन येथे रोलिग हिल्समध्ये विशिष्ट द्राक्षे उत्पादित केली जातात. त्यापासून ही वाइन तयार केली जाते.
- जागतिक वारसा ठिकाणात ११ ठिकाणांचा समावेश करण्यात आला असून शॅम्पेन व बुरगुंडी या फ्रान्समधील दोन ठिकाणांचा समावेश केला आहे, तेथे फसफसणारी वाइन तयार होते.
- युनेस्कोने आतापर्यंत वारसा दिलेल्या ठिकाणांचे संरक्षण केले नाही असा आरोप केला जात आहे. पर्यटनामुळे या ठिकाणांची हानी होते असे सांगण्यात आले आहे.
वारसा ठिकाणांमध्ये समावेश करण्यात आलेली इतर ठिकाणे | |
---|---|
ख्रितियनफेल्ड : मोराविह्य़न चर्च वसाहत (डेन्मार्क) | ग्रेट बुरखान व आजूबाजूची पवित्र स्थळे (मंगोलिया) |
सुसा व मेमंड गुंफा (इराण) | तुसी (चीन) |
बाकेजे (कोरिया) | दियाकबकीर फोर्टेस (तुर्की) |
खालदून डोंगर (मंगोलिया) | द पार फोर्स हंटिंग (उत्तर झियालँड) |
बोटॅनिक गार्डन्स (सिंगापूर) |
८ अनिवासी भारतीयांना पुरस्कार
- ब्रिटनमधील आघाडीचे अनिवासी भारतीय उद्योजक लॉर्ड करण बिलिमोरिया यांना यावर्षीचा उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय भारतीय नागरिक असा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. व्यवसाय व शिक्षण या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी केलेल्या यशस्वी कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला.
- ब्रिटनमधील भारताचे उपउच्चायुक्त वीरेंद्र पॉल यांनी एका समारंभात बिलिमोरिया यांना सन्मानित केले.
- याव्यतिरिक्त इतर ७ भारतीयांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले असून, त्यात सरोश झाईवाला, उमा वधवानी, कॅप्टन नलीन पांडे, रवींद्रसिंग गिदार, प्रवीणकांत अमीन, बजरंग बहादूर माथुर, संजय वधवानी यांनाही याच कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
काळ्या पैशासाठी ई-फायलिंगची सोय
- विदेशात कर चुकवून दडविलेला काळा पैसा जाहीर करण्यास सरकारने दिलेल्या मुदतीचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्ती ई फायलिंगची सुविधाही वापरू शकते.
- काळा पैसा जाहीर करण्यासाठी सरकारने एक खिडकी योजना जाहीर केली आहे. यासाठी व्यक्ती किंवा संस्थेला पारंपरिक फॉर्मही भरता येतो.
- ई फायलिंगसाठी ‘डिजिटल सिग्नेचर’ आवश्यक आहे. लेखी स्वरूपातील दस्तावेजांचे स्वाक्षरीने जसे प्रमाणीकरण होते तसेच डिजिटल सिग्नेचरमुळे ई फायलिंगचे होते.
- विदेशात कर चुकवून ठेवलेला पैसा जाहीर करण्यासाठी या एक खिडकी योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यास हे काम खूप कमी वेळेत आणि पूर्ण गुप्तता राखून पार पाडता येईल असा ऑनलाईन फायलिंग सुविधेचा उद्देश आहे.
- या उद्देशासाठी दोन पानी नवा फॉर्म उपलब्ध करण्यात आला आहे. त्यासोबत भारताबाहेरच्या अघोषित संपत्तीचे निवेदन करण्यासाठी तीन पानी स्वतंत्र पुरवणीही आहे.
- काळा पैसा जाहीर करण्यासाठी सरकारने १ जुलैपासून तीन महिन्यांची एक खिडकी मुदत योजना जाहीर केली आहे. या जाहीर केलेल्या बेहिशेबी संपत्तीवर व पैशांवर ३१ डिसेंबरपर्यंत कर आणि दंड भरता येईल. जे इच्छुक या योजनेचा लाभ घेतील त्यांना ३० टक्के कर आणि तेवढीच रक्कम दंड म्हणून भरावी लागेल.
- गेल्या मे महिन्यात संसदेने काळ्या पैशांविरुद्धचा नवा कायदा संमत केला व त्याला २६ मे रोजी राष्ट्रपतींनी मान्यता दिली. या कायद्यांतर्गत ही एक खिडकी योजना जाहीर करण्यात आली आहे. विदेशात कर चुकवून ठेवण्यात आलेल्या संपत्तीत अचल मालमत्ता, दागिने, शेअर्स आणि दुर्मिळ कलाकृतींचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य आशियाई देशांच्या दौऱ्यावर रवाना
- पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ जुलैपासून सहा देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. सर्वप्रथम ते उझबेगिस्तानला भेट देणार आहेत.
- पंतप्रधान मध्य आशियातील उझबेगिस्तान, तुर्कमेनिस्तान, किर्गीस्तान, ताजिकीस्तान या देशांना भेटी देणार आहे. मध्य आशियातील हे सर्व देश नैसर्गिक वायूंनी समृद्ध आहेत.
- त्यानंतर ते रशियाला रवाना होणार आहेत. अनेक वर्षांच्या कालावधीनंतर मध्य आशियाई देशांचा दौरा करणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत.
- रशियातील उफा शहरात होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या परिषदेत पंतप्रधान सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बरोबर अर्थमंत्री अरुण जेटली देखील ब्रिक्स देशांच्या परिषदेत सहभागी होणार आहेत. ब्रिक्स देशांची परिषद ८ ते ९ जुलै दरम्यान होणार आहे.
- या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान शांघाई शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. पंतप्रधानांचा हा दौरा ६ ते १३ जुलै दरम्यान असणार आहे.
अमेरिका विश्वविजेता
- अमेरिकेने गत चॅम्पियन जपानला पराभूत करून फिफा महिला फुटबॉल वर्ल्डकपचे विजेतेपद पटकावले. अमेरिकेने तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली.
- फायनल लढतीत कर्णधार कार्ली लॉयडच्या हॅट्ट्रीकच्या बळावर अमेरिकेने जपानला ५-२ ने पराभूत करून मोठा विजय मिळवला.
- याआधीच्या २०११च्या वर्ल्डकप फायनलमध्ये जपानकडून अमेरिकेचा पराभव झाला होता.
- अमेरिकेने यापूर्वी १९९१ आणि १९९९ मध्ये किताब जिंकले आहेत. तीन वेळा ही स्पर्धा जिंकणारे अमेरिका पहिले राष्ट्र ठरले आहे.
- २२ वर्षीय अमेरिकेची कर्णधार कार्ली लॉयडला ‘गोल्डन बॉल’चा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. लॉयडने स्पर्धेत एकूण ६ गोल केले. यातील तीन गोल तर तिने फायनलमध्ये केले.
हॉकी वर्ल्ड लीगमध्ये भारत चौथ्या स्थानी
- इंग्लंडने रियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाच्या बचाव फळीतील उणिवा स्पष्ट करीत ५ जुलै रोजी खेळल्या गेलेल्या लढतीत ५-१ ने शानदार विजय मिळवला आणि एफआयएच हॉकी वर्ल्ड लीग सेमीफायनल्समध्ये कास्यपदकाचा मान मिळवला.
- भारतातर्फे एकमेव गोल सामन्याच्या अखेरच्या मिनिटाला रूपदिंरपाल सिंगने पेनल्टी कॉर्नरवर नोंदवला. भारतीय गोलकीपर पी. आर. श्रीजेशने चांगला बचाव केला; पण त्याला योग्य साथ लाभली नाही. या लाजिरवाण्या पराभवासह भारताची या स्पर्धेतील मोहीम संपली. या स्पर्धेत भारताला चौथ्या स्थानावरच समाधान मानावे लागले.
- याआधी, फ्रान्सने पाकिस्तानचा २-१ ने पराभव करीत सातवे स्थान पटकावले, तर आयर्लंडने मलेशियाविरुद्ध ४-१ ने विजय मिळवत पाचवे स्थान पटकावले.
साक्षीदारांना दुप्पट भत्ता
- आरोप सिद्ध होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी व साक्षीदार न्यायालयात उपस्थित राहावे यासाठी त्यांचा आहार व प्रवास भत्ता प्रतिदिन १०० ऐवजी २०० रुपये करण्याचा अध्यादेश राज्यशासनाने काढला आहे.
- तुटपुंजा आहार व प्रवास भत्त्यामुळे साक्षीदार दिवसमोड करून न्यायालयात उपस्थित राहण्यास टाळाटाळ करतात. परिणामी साक्षीअभावी खटला कमकुवत होतो आणि आरोपीस अपेक्षित शिक्षा होत नाही.
- साक्षीदारांमुळे घटनाक्रम, आरोपींचे गुन्हा सिद्ध करण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे साक्षीदारांना साक्ष देण्यास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा आहार व प्रवास भत्ता दुप्पट केल्याने ते खटल्यातील त्यांची भूमिका चोखपणे बजावू शकतील. त्याचा सकारात्मक परिणाम होऊन न्यायालयास आरोपींना शिक्षा देण्यास मदत होईल. साक्षी-पुराव्यांअभावी आरोपी निर्दोष सुटण्याचे प्रमाणही त्यामुळे कमी होईल.
- नियम १९८० नुसार वर्ग १ व वर्ग २ साक्षीदारांना आहार व दैनिक भत्ता म्हणून प्रतिदिन १०० ऐवजी प्रतिदिन २०० रुपये मिळतील. तर वर्ग ३ व वर्ग ४ साक्षीदारांना आहार व दैनिक भत्ता म्हणून आता ६० ऐवजी प्रतिदिन १२० रुपये मिळतील.
चिलीला ऐतिहासिक जेतेपद
- चिलीने अर्जेंटिनाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव करताना कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा जिंकण्याची आपली ९९ वर्षांची प्रतीक्षा संपवली.
- त्यामुळे लिओनेल मेस्सीला सलग दुसऱ्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या फायनलमध्ये निराशेचा सामना करावा लागला. गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीतही अर्जेटिनाला पराभवाला सामोरे जावे लागले होते.
- आर्सेनलचा स्टार अलेक्सिस सांचेजने चिलीकडून विजयी गोल केला. दोन्ही संघ निर्धारित वेळेत गोल करण्यात अपयशी ठरले. त्यानंतर झालेल्या शूटआऊटमध्ये यजमान चिलीने ४-१ अशी बाजी मारली.
- कोपा अमेरिका स्पर्धेत चिलीने अर्जेटिनावर मिळवलेला हा पहिलाच विजय आहे.
- चिलीला १९५५, १९५६, १९७९ आणि १९८७ मध्ये कोपा अमेरिका स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे निधन
- राज्याचे माजी सहकार मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे ६ जुलै रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून प्रतापसिंह यांच्यावर उपचार सुरू होते.
- प्रतापसिंह मोहिते-पाटील यांची १९८५ साली युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदापासून राजकीय कारकीर्दीला सुरूवात झाली होती.
- १९९२-९७ मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांची कारकिर्द चांगलीच गाजली. १९९८ मध्ये कौटुंबिक विरोधाला जुमानत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पुढे विधान परिषदेवर ते निवडून गेले.
- भाजप-शिवसेना युतीच्या काळात सहकार राज्यमंत्री म्हणून त्यांना काम करता आले. २००३ मध्ये भाजपकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून गेले.
- भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. मात्र, त्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
- मोहिते-पाटील घराण्यात राजकीय कलह सुरू झाल्यानंतर गेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विरोधात त्यांचे सख्खे बंधू प्रतापसिंह मोहिते-पाटील हे माढा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उभे होते. परंतु, त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांचे पुत्र डॉ. धवलसिंह यांच्या राजकीय अस्तित्वासाठी अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केला होता.
एफटीआयआय सोसायटीच्या सदस्यत्वाचा पल्लवी जोशी यांचा राजीनामा
- एफटीआयआयच्या अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरून निर्माण झालेल्या वादळानंतर मराठी अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी या एफटीआयआय सोसायटीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
- चौहान यांच्या नियुक्तीवरून एफटीआयआयमध्ये नकारात्मक वातावरण तयार झाले असून, या स्थितीत संस्थेमध्ये काम करू शकत नसल्याचे सांगत पल्लवी जोशी यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे पत्र पाठवून सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
- याआधी जानू बारूआ व संतोष सिवन यांनीही गव्हर्निंग कौउन्सिलच्या पदांचा तीन आठवड्यांपूर्वी राजीनामा दिला आहे.
- बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार एफटीआयआय सोसायटीचे सदस्य आहेत. यामध्ये विद्या बालन, राजकुमार हिरानी यांचा समावेश आहे.
अविवाहित महिलासुद्धा तिच्या पाल्याची कायदेशीर पालक
- अविवाहित महिलासुद्धा एकट्याने तिच्या पाल्याची कायदेशीर पालक म्हणून सांभाळ करू शकते. यासाठी संबंधित महिलेने पाल्याच्या वडिलांची संमती घेण्याची गरज नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै २०१५ रोजी दिला. 'लिव्ह इन रिलेशनशीप'च्या दृष्टीने न्यायालयाचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
- संबंधित पाल्याचे वडील कोण आहेत, याची ओळख जर महिलेला उघड करायची नसेल, तर त्यालाही हरकत घेता येणार नाही. त्यामुळे वडील कोण आहेत, याचा कोणताही उल्लेख कायदेशीर कागदांवर न करता महिलाच त्या पाल्याची एकमेव पालक म्हणून सांभाळ करू शकणार आहे.
- न्यायमूर्ती विक्रमजित सेन यांच्या नेतृत्वाखालील पीठाने हा निकाल दिला.
- एक अविवाहित महिलेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेसंदर्भातील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निर्णय दिला. पालक म्हणून पिता कोण आहे व पित्याचेच नाव पालक म्हणून लावण्याच्या परंपरेविरोधात त्या महिलेने याचिकेच्या माध्यमातून आवाज उठवला होता.
हॅमिल्टन अजिंक्य
- यंदाच्या हंगामातला जबरदस्त फॉर्म कायम राखत लुईस हॅमिल्टनने ब्रिटिश ग्रां. प्रि. शर्यतीत अव्वल स्थान पटकावले. या शर्यतीचे हॅमिल्टनचे हे सलग दुसरे जेतेपद आहे.
- या विजयासह हॅमिल्टनने गुणतालिकेत संघसहकारी निको रोसबर्गला पिछाडीवर टाकत दमदार आघाडी घेतली आहे. हॅमिल्टनने १९४ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले.
- हॅमिल्टनने व्यावसायिक खेळाचे सर्वोत्तम उदाहरण पेश करताना १०.९५६ सेकंदांच्या फरकाने बाजी मारली.
- हॅमिल्टनची घरच्या मैदानावरचे हे तिसरे, यंदाच्या वर्षांतले पाचवे तर कारकीर्दीतील ३८वे जेतेपद आहे. रोसबर्गने दुसरे तर वेटेलने तिसरे स्थान मिळवले.