किरगिझीस्तानबरोबर संरक्षण सहकार्य करार
- मध्य आशियातील किरगिझीस्तानच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांमध्ये विविध प्रकारच्या चार करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. किरगिझीस्तानच्या नेत्यांबरोबर विस्तृत चर्चा झाल्यानंतर या करारांना मान्यता देण्यात आली.
- किरगिझीस्तानबरोबर संरक्षण संबंध दृढ करत भारताने त्यांच्याबरोबर संरक्षण, सुरक्षा, लष्करी प्रशिक्षण, संयुक्त कवायती आणि लष्करी निरीक्षकांची देवाणघेवाण यांचा समावेश असलेला संरक्षण सहकार्य करार केला.
- याशिवाय, निवडणूक क्षेत्राबाबत सहकार्य, किरगिझीस्तानचे अर्थमंत्रालय आणि भारतीय मानक संस्था यांच्यातील सामंजस्य करार आणि सांस्कृतिक सहकार्य करार असे करारही या वेळी करण्यात आले.
- मध्य आशियाच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ताजिकिस्तानला भेट देणार आहेत. या वेळी भारतीय हवाई दलाच्या अयानी हवाईतळाचा मुद्दा मोदी उपस्थित करण्याची दाट शक्यता आहे.
- रशियाच्या दबावामुळे बंद असलेल्या या हवाईतळाचा २००७ मध्ये भारताने कायापालट केला होता.
- पाकव्याप्त काश्मिरपासून फक्त १३ कि.मी. आणि ताजिकिस्तान चीन सीमेपासून विमानाने अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेला हा हवाईतळ व्यूहात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणूनच, हा हवाईतळ पुन्हा कार्यान्वित करण्याचे भारताचे प्रयत्न आहेत.
गंगेतील डॉल्फिनची एकत्रित गणना
- राष्ट्रीय गंगा स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत लवकरच गंगा नदीच्या प्रदूषणामुळे धोक्यात आलेल्या डॉल्फिन माशांच्या प्रगणन सर्व्हेला प्रारंभ करण्यात येणार आहे. या माशांची संख्या ही गंगा नदीच्या प्रदूषणाची पातळी दर्शविण्याचे एक परिमाण आहे.
- बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या चार राज्यांतून एकत्रितपणे या वर्षी ऑक्टोबरमध्ये हा सर्व्हे सुरू करण्यात येणार असून, साधारण पुढील वर्षी म्हणजे फेब्रुवारी २०१६ मध्ये या सर्व्हेचा अहवाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
- केंद्रीय जलस्रोत, नदीविकास व गंगा पुनरुत्थान मंत्रालयाच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे.
- गंगेतील डॉल्फिनच्या प्रगणनेचा हा राष्ट्रीय स्तरावरील पहिलाच सर्व्हे आहे. 'इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर' या संस्थेकडून अशा थेट प्रगणन पद्धतीचा अवलंब केला जातो. यामुळे या प्रजातीची संख्या व त्यांचे राज्यनिहाय वर्गीकरण याबाबत नेमकी माहिती मिळविणे शक्य होणार आहे.
- एनजीओ, स्थानिक ग्रामस्थांसह या सर्वेसाठी सुमारे ४५० जण काम करणार असून या उपक्रमासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्या त्या राज्य सरकारांच्या वन विभागाकडून हा सर्व्हे करण्यात येणार आहे. याबरोबरच पाणपक्षी, मगरी, कासवे अशा अन्य परिमाणांचेही प्रगणन या सर्व्हेमध्ये करण्यात येणार आहे.
- २०१४ मध्ये केलेल्या गणनेनुसार गंगा नदीतील या प्रजातीची संख्या ३५०० असून, १९८० मध्ये असलेली पाच हजार संख्या विविध कारणांमुळे घटून ३५०० वर आली आहे.
- त्यामध्ये उद्योगांमधील प्रदूषण, कीटकनाशकांचा वापर, मासेमारीच्या जाळ्यांचा अनियमित वापर, वाळूच्या बेसुमार खाणी या कारणांचा समावेश आहे; ज्यामुळे या जातीच्या प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या कारणांमुळे दर वर्षी सरासरी १० ते १५ टक्के डॉल्फिनचा बळी जात आहे.
- जंगलात ज्याप्रमाणे वाघ हा जंगलाच्या जैवसाखळीचा महत्त्वाचा घटक असतो, त्याप्रमाणेच नदीच्या जैवसाखळीतील हे डॉल्फिन महत्त्वाचे घटक आहेत. त्यांची संख्या वाढविणे हे गंगा नदीच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.
- वन्यजीव कायदा १९७२ नुसार अतिधोक्यात आलेल्या प्राण्यांमध्ये गंगा नदीतील डॉल्फिनचा समावेश आहे.
पोलादनिर्मितीमध्ये भारत तिसरा
- सर्वाधिक पोलादनिर्मिती करणाऱ्या देशांच्या स्पर्धेत भारताने अमेरिकेला मागे टाकून तिसरे स्थान पटकावले असून, आगामी दहा वर्षांमध्ये ३० कोटी टन पोलादनिर्मितीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. त्यासाठी मंत्रालयाने २०२५पर्यंतचा रोडमॅपही आखला आहे.
- जानेवारीच्या सुरुवातीला पोलादनिर्मितीमध्ये देश चौथ्या स्थानावर होता. त्यापुढे अव्वल स्थानावरील चीन, जपान आणि अमेरिका यांचाच क्रमांक होता. मात्र, जानेवारी ते जून २०१५ या कालावधीत भारताने अमेरिकेला मागे टाकून तिसरे स्थान मिळवले आहे. दे
- शात पोलादाचा दरडोई वापर बराच कमी आहे. जगभरात पोलादाचा दरडोई वापर २१६ किलो आहे, तर देशात हाच वापर ६० किलो इतका आहे.
- केंद्रीय पोलाद आणि खाणमंत्री : नरेंद्र सिंह तोमर
विम्बल्डन स्पर्धा २०१५ महिला दुहेरी : सानिया-हिंगीस विजयी
- भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने तिची स्वित्झर्लंडची जोडीदार मार्टिना हिंगीसच्या साथीने विम्बल्डनमधील महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
- सानिया विम्बल्डन पुरस्कार पटकावणारी पहिली भारतीय महिला टेनिसपटू ठरली असून मार्टिना हिंगीसनेही तब्बल १७ वर्षांंनी विम्बल्डनमध्ये बाजी मारली आहे.
- महिलांच्या या जोडीने मकारोवा-एलेना वेस्नीना जोडीचा पराभव केला. हा सामना २ तास ४७ मिनिटे चालला. या मोसमात सानिया-हिंगीस यांनी माकारोवा-व्हेसनिना यांना हरवूनच इंडियन वेल्स आणि मायामी मास्टर्स स्पर्धा जिंकल्या होत्या.
- पहिल्या सेटमधील पराभव झाल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये सानियाने मार्टिनासोबत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आणि विजयाला गवसणी घातली.
- महिलांच्या दुहेरी सामन्यात भारताला प्रथमच यश मिळाले आहे. विम्बल्डनमध्ये महिला दुहेरीत जेतेपद मिळविणाऱ्या सानियाला आपली जोडीदार मार्टिना सोबत ३ कोटी ३४ लाख रुपयांचे बक्षिस आणि चषक मिळाले.
- विम्बल्डन स्पर्धेत २००३मध्ये सानियाने कनिष्ठ गटात रशियाच्या अलिसा क्लेयबानोव्हाच्या साथीने खेळताना जेतेपदावर कब्जा केला होता.
पुरुष एकेरी : नोव्हाक जोकोव्हिच विजयी
- विम्बल्डन स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम मुकाबल्यात नोव्हाक जोकोव्हिचने रॉजर फेडररवर ७-६, ६-७, ६-४, ६-३ असा विजय मिळवत विम्बल्डनच्या तिसऱ्या तर कारकीर्दीतील नवव्या ग्रँड स्लॅम जेतेपदावर कब्जा केला. ग्रँड स्लॅम स्पर्धेत जोकोविच हा दोनशेवा विजय ठरला.
- फेडररने आतापर्यंत १७ ग्रँड स्लॅम स्पर्धेत जेतेपद मिळविले आहेत. २०१२मध्ये विम्बल्डनच्याच ग्रास कोर्टवर त्याने शेवटचा जेतेपदाचा चषक उंचावला होता. तेव्हापासून फेडररला ग्रँड स्लॅम जिंकता आलेले नाही.
- यापूर्वी जोकोविचने २००८, २०११, २०१२, २०१३, २०१५मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, २०११ आणि २०१४मध्ये विम्बल्डन आणि २०११मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली होती.
महिला एकेरी : सेरेना विल्यम्स विजयी
- ३३ वर्षीय सेरेना विल्यम्सने जेतेपदाच्या झुंजीत स्पेनच्या गार्बिन मगुरुझावर ६-४, ६-४ अशी मात करत कारकिर्दीतील सहावे विम्बल्डन पटकावले.
- ३३व्या वर्षी विम्बल्डन एकेरीचे जेतेपद पटकावणारी सेरेना पहिलीच टेनिसपटू ठरली.
- या ट्रॉफीसह सेरेनाच्या एकेरीतील ग्रँडस्लॅम जेतेपदांची संख्या २१ झाली आहे. तिला जेतेपदासह २.५ मिलियन युरो रक्कम आणि चषक बक्षीस म्हणून देण्यात आला.
- फ्रेंच खुली स्पर्धा आणि विम्बल्डन या लागोपाठच्या स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम दोनदा नावावर करणारी सेरेना पहिली टेनिसपटू ठरली आहे. याआधी २००२मध्ये सेरेनाने ही किमया केली होती.
- सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदे विजेत्यांच्या यादीत स्टेफी ग्राफच्या (२२) विक्रमापासून सेरेना एक जेतेपद दूर आहे. या यादीत मार्गारेट कोर्ट (२४) अव्वल स्थानी आहे.
ब्रिटनच्या पाच उपग्रहांपैकी तीन उपग्रहांचे नियंत्रण चीनी कंपनीकडे
- भारतीय अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’ने अवकाशात सोडलेल्या ब्रिटनच्या पाच उपग्रहांपैकी तीन उपग्रहांचे नियंत्रण चीनमधील एका कंपनीकडे असणार आहे. हे उपग्रह चीनमधील शहरांच्या वाढीवर लक्ष ठेवणार आहे. यामुळे भारताने प्रक्षेपित केलेल्या उपग्रहाद्वारे चीनच्या शहरांवर नजर ठेवण्याची घटना प्रथमच घडत आहे.
- ‘इस्रो’ने ब्रिटनचे डीएमसी-३ हे तीन एकसारखे उपग्रह अवकाशात सोडले. एका अहवालानुसार, या उपग्रहांवर चीनमधील २१ एटी ही कंपनी संपूर्ण नियंत्रण ठेवणार आहे.
- ब्रिटन आणि या कंपनीमध्ये सात वर्षांसाठी सुमारे १७ कोटी डॉलरला हा करार झाला आहे.
- या उपग्रहांमुळे चीनमधील शहरांची उच्च दर्जाची अद्ययावत छायाचित्रे मिळणार आहेत. हा करार चार वर्षांपूर्वीच चीनचे तत्कालीन अध्यक्ष वेन जिआबाओ आणि ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरॉन यांच्यात झाला होता. तसेच, यापैकी दोन उपग्रहांची नावे बीजिंग-१ आणि बीजिंग-२ अशीही ठरविण्यात आली होती.
- उपग्रहांचे प्रक्षेपण केल्यानंतर ‘इस्रो’ने प्रसिद्ध केलेल्या माहितीमध्ये या माहितीचा समावेश नव्हता.
देशात अडीच लाख अब्जाधीश नागरिक
- भारतासारख्या विकसनशील देशात अब्जाधीशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे ‘वेल्थ एक्स’ या संस्थेच्या एका सर्वेक्षणातून सामोरे आले आहे. २०१४ मध्ये देशातील अब्जाधीश नागरिकांच्या संख्येत २७ टक्क्यांनी वाढ झाली असून, ही संख्या अडीच लाखांवर पोचली आहे.
- भारतात २०१३ मध्ये १.९६ लाख नागरिक अब्जाधीश होते. अब्जाधीशांची हीच संख्या २०१८ पर्यंत ४.३७ लाखांवर पोचणार आहे, तर २०२३ पर्यंत त्याच्या दुप्पट होणार असल्याचे या अहवालानुसार समोर आले आहे.
- या अहवालानुसार देशातील सुधारलेल्या आर्थिक कामगिरीचे व वातावरणाचे श्रेय लोकसभेच्या निवडणुकीनंतर आलेल्या नव्या सुधारणावादी सरकारला दिले आहे.
- भारताच्या बरोबरीनेच दक्षिण अफ्रिकेतील कोट्यधीशांच्या संख्येत वाढ होत आहे. २०१३-१४मध्ये कोट्यधीशांच्या बाबतीत भारत चौदाव्या क्रमांकावर होता. यामध्ये अमेरिका, जपान, चीन व ग्रेट ब्रिटन हे देश आघाडीवर आहेत.
- एकीकडे देशातील कोट्यधीशांच्या संख्येत वाढ होत असली, तरी आर्थिक विषमता कायम आहे. सामाजिक- आर्थिक व जातीनिहाय निकषांनुसार झालेल्या जणगणनेनुसार (एसईसीसी) भारतात आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणावर आहे. या अहवालानुसार ७४.५ टक्क्यांपेक्षा जास्त ग्रामीण कुटुंबांचे मासिक उत्पन्न पाच हजार रुपयांपेक्षा कमी आहे.
‘आकाश’ हवाईदलात दाखल
- संपूर्णपणे भारतीय बनावटीचे ‘आकाश’ हे भूपृष्ठावरून हवेत ३० किमीपर्यंत आणि १८,००० किमी उंचीवरून मारा करण्याची क्षमता असलेले सुपरसॉनिक क्षेपणास्त्र १० जुलै रोजी हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाले.
- लढाऊ विमानांसह क्षेपणास्त्रांनाही लक्ष्य करण्याचीही ‘आकाश’ची क्षमता आहे.
- संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत हे क्षेपणास्त्र हवाई दलात समाविष्ट झाले.
सुनीता विल्यम्स यांची नासाच्या व्यापारी मोहिमेसाठी निवड
- भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे जाणाऱ्या व्यापारी मोहिमेवर निवड झाली आहे. ‘नासा’ने निवड केलेल्या चार अंतराळवीरांमध्ये त्यांचा समावेश आहे.
- या चौघांना व्यापारी मोहिमेसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या मोहिमेनंतर पृथ्वीच्या जवळच्या कक्षेतील व्यापारी मोहिमांना बळ मिळणार आहे.
- सुनीता विल्यम्स यांच्या नावावर अंतराळात सर्वाधिक ३२२ दिवस व्यतीत करणारी महिला अंतराळवीराचा विक्रम आहे.
MT Facts
|