ग्रीसच्या बेलआऊट पॅकेजवर युरोझोनमध्ये एकमत
- युरोझोनच्या नेत्यांबरोबर झालेल्या तात्काळ बैठकीनंतर तिसऱ्या बेलआउट वाटाघाटीसाठी ग्रीस तयार झाला आहे. युरोझोनच्या नेत्यांबरोबर सर्वसम्मतीने करारास मान्यता मिळाली आहे.
- ग्रीसला आर्थिक आधार आणि आर्थिक सुधारणा घडवून आणण्यासाठी यूरोपियन स्टैबिलिटी मॅकॅनिजम म्हणजेच ईएमएस कार्यक्रम लागू करण्यात येणार आहे. यानुसार ग्रीसला ८६ बिलियन युरोचे पॅकेज मिळणार असून ग्रीसचे पंतप्रधान अलेक्सिस तिसिप्रास यांनीदेखील या पॅकेजला संमती दर्शविली आहे.
- बेलआउटसाठी ग्रीसला तीन अटी मान्य करणे आवश्यक आहे. ग्रीसला दिल्या जाणाऱ्या बेलआउट पॅकेजसाठी युरोपियन युनियनचे सदस्य देश आणि युरो झोनचे अर्थमंत्री लवकरच नवीन नियम आणि अटी तयार करतील.
- ग्रीससाठी एक फंड तयार केला जाणार असून ग्रीसच्या बँकांना २५०० कोटी यूरो मिळणार आहे. ग्रीसला आता संसदेत आणि लेबर मार्केटमध्ये रिफॉर्म आणावे लागणार आहेत.
- युरोपियन परिषदेचे अध्यक्ष : डोनाल्ड टस्क
‘फ्लिपकार्ट’चा ‘दत्तक साह्य कार्यक्रम’
- ‘फ्लिपकार्ट’ने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ‘दत्तक साह्य कार्यक्रम’ सुरू केला आहे. दत्तक घेणाऱ्या कर्मचाऱ्याला पन्नास हजार रुपये दत्तकभत्ता देण्यात येणार आहे.
- दत्तक प्रक्रियेच्या वेळी उद्भवणारे इतर खर्च, कायदेशीर, एजन्सी, नियामक खर्च यांच्यासाठी हा भत्ता असल्याचे ‘फ्लिपकार्ट’कडून सांगण्यात आले आहे.
- तसेच कोणत्याही महिला कर्मचाऱ्याने १२ महिन्यांखालील वयाच्या बाळाला दत्तक घेतल्यास कर्मचारी प्रसूती रजा धोरणांतर्गत त्यांना सहा महिन्यांची समान पगारी रजा देण्यात येईल. शिवाय चार महिन्यांसाठी कर्मचाऱ्यांच्या सोयीची वेळ कामासाठी दिली जाणार आहे, असेही फ्लिपकार्टने सांगितले.
सर्व पोलिस ठाणी ऑनलाइन करणारे महाराष्ट्र पहिले राज्य
- केंद्र सरकारच्या ई-गव्हर्नन्स अभियानांतर्गत क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टिमने (सीसीटीएनएस) महाराष्ट्रातील सर्वच पोलिस ठाणी ऑनलाइन झाली आहेत.
- देशातील विविध राज्यांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. मात्र, राज्यातील सर्व पोलिस ठाणी ऑनलाइन करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले.
- नागरिकांना आता घरी बसून ऑनलाइन एफआयआर नोंदविता येणार आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून कारागृह, न्यायालयाचे कामकाज जोडण्यात येणार आहे.
- सीसीटीएनएस या यंत्रणेमुळे पोलिस ठाण्यातील स्टेशन डायरी किंवा अन्य लेखीकाम कमी होणार आहे. या यंत्रणेमुळे घरी बसूनच नागरिकांना परवानगीचा फॉर्म डाउनलोड करून भरण्याची सुविधा आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांसह पोलिस कर्मचाऱ्यांसाठीही ही यंत्रणा उपयोगी ठरणार आहे.
- संगणक व इंटरनेटसाठी मराठी भाषेचे ऑप्शन या यंत्रणेत देण्यात आले आहे. यासाठी सर्वच पोलिस ठाण्यांना नवीन संगणक देण्यात आले आहेत. या यंत्रणेसाठी विप्रो, बीएसएनएल आणि प्राईस वॉटरहाउस कूपर या तीन कंपन्यांना पाच वर्षांसाठी देखभालीसाठी करारबद्ध करण्यात आले आहेत.
- या यंत्रणेद्वारे राज्यातील गेल्या १४ वर्षांतील १ कोटी १५ लाख गुन्हेगारांची माहिती अपलोड करण्यात आली आहे.
- या यंत्रणेत सहभागी होण्यासाठी ३ हजार ५०० पोलिस कर्मचाऱ्यांना आतापर्यंत प्रशिक्षण देण्यात आले असून, आणखी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे सुरू आहे.
सुपरसॉनिक प्रवासी विमान : एस-५१२
- बोस्टनमधील मूळ भारतीय शास्त्रज्ञासह अमेरिकन शास्त्रज्ञांच्या गटाने न्यूयॉर्क ते लंडन हा प्रवास केवळ तीन तासांत पार करणारे स्वनातीत (सुपरसॉनिक) विमान तयार केले आहे. स्पाईक एअरोस्पेसने २०१३मध्ये एस-५१२ हे स्वनातीत विमान सादर केले होते, यामध्ये कंपनीने नुकतेच आणखी बदल केले आहेत.
- या बदलांमुळे हे विमान आणखी वेगवान झाले असून, आता एस-५१२ हे २२०५ किमी/प्रतितास इतका वेग गाठू शकते. हा वेग आवाजाच्या १.८ पट आहे.
- या विमानासाठी खास प्रकारची ‘डेल्टा’ विंग्स (पाती) तयार करण्यात आली आहेत, यामुळे विमानाची कार्यक्षमता वाढली आहे. ही पाती कमी वेगाच्या विमानासाठीही उपयुक्त असल्याचे ते म्हणाले. विमानासाठी तयार करण्यात आलेली नवी शेपूटही अत्यंत कमी वजनाची असून, वळण्यासाठी तसेच उड्डाणावेळी ती विमानाला मदतनीस ठरत आहे.
- एस-५१२ हे एक व्यावसायिक श्रेणीतील जेट असून, ते तयार करण्यासाठी सहा कोटी ते आठ कोटी अमेरिकन डॉलर एवढा खर्च आला आहे.
जगातील वेगवान प्रवासी विमाने
- ट्युपोलेव्ह टीयू-१४४ : २४३० किमी/प्रतितास
- कॉन्कर्ड : २१७९ किमी/प्रतितास
- सेस्ना सायटेशन एक्स : ११२६ किमी/प्रतितास
पंतप्रधान १७ जुलैला काश्मीर दौऱ्यावर
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १७ जुलैला जम्मू काश्मीरच्या एकदिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत.
- माजी काँग्रेस नेते गिरीधारीलाल डोगरा यांच्या जयंतीनिमित्त जम्मूमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहतील.
- डोगरा हे जम्मू भागातील कठुआ जिल्ह्याशी संबंधित नेते होते. डोगरा यांची मुलगी अर्थमंत्री अरुण जेटली यांची पत्नी आहे.
- पंतप्रधान आपल्या दौऱ्यानिमित्त जम्मू काश्मीरच्या विकासासाठी ७० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता आहे. जम्मूमध्ये एम्सच्या स्थापनेबाबतही मोदींकडून घोषणेची शक्यता आहे.
भारत-अमेरिका मलबार नौदल युद्ध सरावात जपानी नौदलाचाही समावेश
- केंद्र सरकारच्या निर्णयानुसार येत्या ऑक्टोबरमध्ये बंगालच्या उपसागरात होणाऱ्या १९ व्या भारत-अमेरिका मलबार नौदल युद्ध सरावात अमेरिकेच्या नौदलाबरोबर आता जपानी नौदलाचाही समावेश करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.
- चीनच्या आरेरावीला रोखण्यासाठी भारताने हे ठोस पाऊल उचललं आहे.
- भारत-अमेरिका-जपान यांच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या मलबार नौदल सरावाच्या आधी भारत-ऑस्ट्रेलियातील नौदलांमध्ये पहिल्यांदाच सराव होणार आहे. ११ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर असा दहा दिवसांचा हा सराव बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणमला होणार आहे.
पार्श्वभूमी
- २००७ मध्ये बंगालच्या उपसागरात झालेल्या मलबार सागरी युद्ध सरावात जपान, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरच्या नौदालाचा समावेश केल्याबद्दल चीनने भारताकडे तीव्र आक्षेप नोंदवला होता. तसंच पुढील सुरक्षेच्या दृष्टीने चीनने त्यावेळी संपूर्ण सरावावर नजर ठेवली होती.
- चीनच्या आक्षेपानंतर नौदलाने भारताबाहेर जपानबरोबर सराव केला होता. २००९ आणि २०१४ मध्ये पॅसिपिक सागरात भारताने जपानबरोबर सराव केला.
मॅच फिक्सिंगप्रकरणी मुंबईचा रणजीपटू हिकेन शाह निलंबित
- राजस्थान रॉयल्स संघातील लेग स्पिनर प्रवीण तांबेला मॅच फिक्सिंगची ऑफर दिल्याप्रकरणी मुंबई रणजी संघातील क्रिकेटपटू हिकेन शाह याच्यावर बीसीसीआयनं निलंबनाची कारवाई केली.
- विशेष म्हणजे, २०१३च्या फिक्सिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेली लोढा समिती उद्या आपला अहवाल सादर करणार आहे. त्याच्या आदल्याच दिवशी हिकेनचं नाव उघड करण्यात आलं आहे. हिकेन शाहचे बुकींशी संबंध असल्याचं चौकशीदरम्यान समोर आले आहे.
- ३० वर्षीय हिकेश शाह मुंबईकडून रणजी खेळतो. प्रथम दर्जाच्या ३७ सामन्यांत त्यानं ४२.३५च्या सरासरीनं २१६० धावा केल्या आहेत. बीसीसीआयच्या कारवाईनंतर त्याची कारकीर्द संपुष्टात येण्याचीच शक्यता आहे.
गुजरातमधील पुरामुळे १० सिंह व १,६०० निलगायींचा बळी
- गुजरातच्या काही भागांत अलीकडे आलेल्या पुराने १० सिंह, १,६०० पेक्षा अधिक निलगायी आणि सुमारे ९० हरणांसह अनेक वन्य प्राण्यांचा बळी घेतला.
- गुजरातच्या मुख्य वनसंरक्षकांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे दाखल केलेल्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे.
- मुख्यत: अमरेली आणि भावनगर जिल्ह्यांत सर्वाधिक वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला. २ जुलैपर्यंत १० सिंह, १,६७० निलगायी, ८७ हरिण, ९ काळवीट, ६ जंगली डुकरांचे मृतावशेष सापडले असल्याचे या अहवालात म्हटले आहे. अमरेली जिल्ह्यात चार तर भावनगर जिल्ह्यात सहा सिंहांचा मृत्यू झाला आहे.
- कमी दाबाच्या पट्ट्याने गत २६ जूनला अमरेली जिल्ह्यातील धारी, बगसारा, कुकवाव तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे शेत्रुंजी नदीला पूर आला होता. या पुरात शेकडो वन्यजीवांना जीव गमवावा लागला होता.
चीनला चान होम वादळाचा तडाखा
- चीनच्या जिझियांग व झियांगसू प्रांतांना चान होम नावाच्या जोरदार वादळाने जबरदस्त तडाखा दिला असून, या वादळामुळे ११.१लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. वादळग्रस्त भागातील विमान, रेल्वे, दळणवळण व फोन अशा सर्वच सुविधा ठप्प झाल्या आहेत.
- या वर्षी चीनला धडकणारे हे नववे वादळ असून, १९४९ नंतर आलेले हे सर्वांत मोठे वादळ आहे.
- या वादळामुळे जिझियांग प्रांताचे ४१० दशलक्ष डॉलरचे (२,५९० कोटी रुपयांचे) नुकसान झाले आहे. जिझियांग प्रांतातील ७ लाख १० हजारपेक्षा जास्त लोकांना वादळाचा तडाखा बसला आहे.
- पुढे सरकल्यानंतर या वादळाचा वेग ओसरला आहे. हे वादळ दरताशी ३० कि.मी. वेगाने आता पिवळ्या समुद्रापर्यंत जाईल व त्याचा वेग हळूहळू कमी होत जाईल.