लोढा समितीच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी बीसीसीआयची समिती
- न्यायमूर्ती लोढा समितीच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राजीव शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यीय समितीची स्थापना केली आहे.
- आयपीएलच्या समितीचे अध्यक्ष असलेल्या राजीव शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली सचिव अनुराग ठाकूर, माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली व अनिरुद्ध चौधरी या चौघांनी समिती स्थापन करण्यात आली आहे. बीसीसीआयचे कायदेशीर समितीचे प्रमुख यू. एन. बॅनर्जी यांचे सहाय्य त्यांना लाभणार आहे.
- हा कार्यगट आयपीएल फिक्सिंग संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीने दिलेल्या निकालाचा अभ्यास करणार असून शिफारस करण्यासाठी सहा आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
- आयपीएल सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंगसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने गुरुनाथ मय्यप्पन आणि राज कुंद्रा यांना दोषी ठरवले होते. तसेच चेन्नई सुपर किंग्ज व राजस्थान रॉयल्स या संघांवर दोन वर्षांची बंदी घातली आहे.
आत्महत्येच्या प्रमाणात महाराष्ट्र आघाडीवर
- गेल्या वर्षात भारतात सरासरी प्रत्येक तासाला १५ जणांची आत्महत्या झाल्या असून, यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (एनसीआरबी) प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
- गेल्या वर्षभरात भारतात एकूण १ लाख ३१ हजार जणांनी आत्महत्या केली. चेन्नई शहरामध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे दिसून आले आहे.
- गेल्या वर्षी आत्महत्या केलेल्यांपैकी ६९.७ टक्के व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न एक लाखांहून कमी होते. तसेच, आत्महत्या केलेल्या दर ६ जणांपैकी १ गृहिणी होती.
- महाराष्ट्रात २०१४ मध्ये सर्वाधिक १६,३०७ जणांनी आत्महत्या केली. त्यानंतर तामिळनाडू (१६,१२२) आणि पश्चिम बंगालचा (१४,३१०) क्रमांक लागतो.
- ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये आत्महत्येचे प्रमाण अधिक असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
सर्वाधिक आत्महत्या झालेली शहरे | |
---|---|
चेन्नई | २,२१४ |
बंगळूर | १,९०६ |
दिल्ली | १,८४७ |
मुंबई | १,१९६ |
भोपाळ | १,०६४ |
सर्वाधिक अपघाती मृत्यू राज्यात
- राज्यातील रस्ते अधिकाधिक असुरक्षित बनत असल्याचे चित्र राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालावरून निर्माण होत आहे.
- २०१४ या वर्षात देशभरातील रस्ते अपघातात तब्बल १.४ लाख लोकांचे बळी गेले आहेत आणि त्यापैकी सर्वाधिक बळी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांत गेले आहेत.
- वर्षभरात देशात झालेल्या एकूण ४.५ लाख अपघातांपैकी सर्वाधिक अपघात झालेल्या राज्यांच्या यादीतही महाराष्ट्राचा समावेश आहे.
भारत करणार हेलिकॉप्टर्सची निर्मिती
- देशाच्या संरक्षण क्षेत्राला बळकटी देण्याचे उद्दिष्ट ठेवून भारताने रशियाशी नुकताच एक करार केला असून, त्यानुसार रशियाच्या सहकार्याने भारत २०० हेलिकॉप्टर्सची निर्मिती करणार आहे. यामुळे दोन्ही देशांमधील परस्पर संबंध दृढ होण्यास मदत होईल.
- भारत व रशियादरम्यानच्या कराराअंतर्गत विविध संरक्षण प्रकल्पांबाबत सहकार्य करण्यात येणार आहे; तसेच मेक इन इंडिया या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत भारतातच या हेलिकॉप्टरची निर्मिती करण्यात येणार आहे.
- भारताचे रशियातील राजदूत : एस. पी. राघवन
मोदींचा सिलीकॉन व्हॅली दौरा
- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या अमेरिकी दौऱ्यात सिलीकॉन व्हॅलीला भेट देणार असून, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यानंतर सिलीकॉन व्हॅलीला भेट देणारे मोदी हे दुसरे भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत.
- येत्या सप्टेंबर महिन्यात मोदी अमेरिका दौरा करणार असून ते यावेळी सिलीकॉन व्हॅलीला भेट देतील.
- पं. नेहरू यांनी १९४९ साली कॅलिफोर्नियाला भेट दिली होती. तेव्हा या भागाला सिलीकॉन व्हॅली हे नाव नव्हते. १९७० नंतर कॅलिफोर्नियाचा काही भाग सिलीकॉन व्हॅली म्हणून ओळखला जाऊ लागला. या भागाचे वैशिष्ट्य असे की, सिलीकॉन व्हॅली हे अनिवासी भारतीयांचे हक्काचे ठिकाण आहे.
प्रो कबड्डीच्या दुसऱ्या सत्राची सुरुवात
- बॉलिवूडपासून कॉर्पोरेटजगतातील सर्वांनाच आकर्षित केलेल्या प्रो कबड्डीच्या दुसऱ्या सत्राला १८ जुलै रोजी मुंबईतील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) येथे दिमखात सुरुवात झाली.
- महानायक अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रगीत गाऊन प्रो कबड्डी दुसऱ्या सत्राच्या उद्घाटन कार्यक्रमाला ‘चार चाँद’ लावले.
- प्रो कबड्डीच्या पहिल्या सत्रात जयपूर आणि मुंबई यांच्यात अंतिम सामन्याची लढत रंगली, ज्यामध्ये जयपूरच्या संघाने मुंबईचा ३५-२४ असा पराभव करुन पहिल्यावहिली प्रो कबड्डी लीग जिंकली होती.
सहभागी संघ | |
---|---|
यू मुम्बा | पुणेरी पलटण |
जयपूर पिंक पँथर्स | बंगाल वॉरियर्स |
पटणा पायरेटस् | दबंग दिल्ली |
तेलगू टायटन्स | बंगळूर बुल्स |
महागडे खेळाडू
- राकेश कुमार (पाटणा) – १२.८० लाख
- दीपक निवास (तेलुगू टायटन्स) – १२.६० लाख
- सुरजित नारवाल (दिल्ली) व अजय ठाकूर (बंगळूर बुल्स) – १२.२० लाख