क्युबात तब्बल ५४ वर्षांनंतर अमेरिकेचा दूतावास
- ५४ वर्षे परस्पर शत्रुत्व व द्वेष जोपासलेल्या अमेरिका व क्युबा या देशांनी परस्पर राजनैतिक संबंधांची पुन्हा नव्याने सकारात्मक सुरुवात करताना दूतावास स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
- यानुसार वॉशिंग्टन येथे क्युबाच्या दूतावासाची शेकडो निमंत्रित अतिथींच्या उपस्थितीत स्थापना करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. याचबरोबर, अमेरिकेनेही हवाना येथे दूतावासाची स्थापना केली आहे.
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व क्युबाचे राष्ट्राध्यक्ष राऊल कॅस्ट्रो यांनी परस्पर राजनैतिक संबंध पुन्हा सुरळित करण्याच्या उद्दिष्टास मान्यता दिल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
- ओबामा यांनी क्युबाबरोबरील संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलताना दहशतवाद पसरविणाऱ्या देशांच्या यादीमधील क्युबाचे नाव काढून टाकण्याचा निर्णय गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये घेतला होता.
हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक पॉल व्हॅन ऍस यांचा करार रद्द
- पदभार स्वीकारल्यानंतर केवळ पाचच महिन्यांमध्ये भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक पॉल व्हॅन ऍस यांचा करार ‘हॉकी इंडिया‘ने २० जुलै रोजी तडकाफडकी रद्द केला. हा करार रद्द करण्याचे कोणतेही कारण ‘हॉकी इंडिया‘ने दिलेले नाही.
- भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) हिमाचल प्रदेशमधील प्रशिक्षण केंद्रात भारतीय संघाचे प्रशिक्षण १९ जुलैपासून सुरू झाले. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक व्हॅन ऍस अनुपस्थित राहिले होते.
- बेल्जियममध्ये नुकत्याच झालेल्या जागतिक हॉकी स्पर्धेतील भारतीय संघाच्या कामगिरीचा अहवालही व्हॅन ऍस यांनी वेळेत सादर केला नव्हता. जागतिक हॉकी स्पर्धेतील मलेशियाविरुद्धच्या सामन्यानंतर व्हॅन ऍस आणि ‘हॉकी इंडिया‘चे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती.
शुभम जगलान जागतिक गोल्फ विजेता
- कुमार गटाच्या जागतिक गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी दाखवत भारताच्या दहावर्षीय शुभम जगलान याने विजेतेपद मिळविले.
- अमेरिकेत सॅन दिएगो येथे त्याने १७९ दोषांकासह प्रतिस्पर्ध्यांवर एका स्ट्रोकची आघाडी घेत विजेतेपद पटकाविले. त्याने तीन दिवसांत एकूण १३ बर्डींची नोंद केली. यातील पाच बर्डी त्याने अखेरच्या दिवशी नोंदविल्या. त्याची हीच अचूकता निर्णायक ठरली.
- गोल्फमध्ये कारकीर्द घडविण्याचा ध्यास बाळगणारा शुभम हा नवी दिल्लीतील एका दूध विक्रेत्याचा मुलगा आहे.
जम्मू-काश्मीर क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी इम्रान रझा अन्सारी
- इम्रान रझा अन्सारी यांची जम्मू आणि काश्मीर क्रिकेट संघटनेच्या (जेकेसीए) अध्यक्षपदी निवड झाली आहे. माजी मुख्यमंत्री व संघटनेचे माजी अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांची जागा अन्सारी यांनी घेतली आहे.
- अन्सारी हे भारतीय जनता पक्ष आणि पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी यांच्या जम्म-काश्मीरमधील युती सरकारमध्ये क्रीडामंत्री आहेत. मागील काही दिवसांत जेकेसीए ही संघटना पक्षपातीपणा आणि घोटाळ्यांच्या आरोपांमुळे चर्चेत राहिली आहे.
- अन्सारी यांची अध्यक्षपदी, तर मेहबूब इक्बाल यांची नवे प्रमुख (चेअरमन) म्हणून निवड करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या प्रचार मोहिमेत अबेदिन यांना सर्वाधिक मानधन
- अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीच्या प्रचार मोहिमेत भारतीय वंशाच्या हुमा अबेदिन या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कर्मचारी ठरल्या आहेत. या पदासाठी इच्छुक असलेल्या हिलरी क्लिंटन यांच्या त्या दीर्घकाळापासूनच्या सहकारी आहेत.
- हुमा अबेदिन यांचे वडील भारतीय आणि आई पाकिस्तानी होत्या. प्रचार मोहिमेचे काम बघणाऱ्या हुमा यांचा वार्षिक पगार २ लाख ७७ हजार डॉलर इतका आहे. अबेदिन या हिलरी यांच्या प्रचार मोहिमेच्या उपप्रमुख आहेत. त्यांचे पती माजी संसद सदस्य आहेत.
- अबेदिन यांच्याकडे प्रचार मोहिमेची कार्यवाही असून, अनेकदा त्या स्वतंत्रपणे निर्णय घेतात. तसेच क्लिंटन यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या ऐवजी अबेदिनच बैठका घेतात.
गंगेच्या स्वच्छतेसाठी इस्राईलचे पथक
- गंगा नदी स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत इस्राईलचे एक पथक गंगा नदीला भेट देणार आहे.
- नदीची स्वच्छता करण्याच्या दृष्टिकोनातून हे पथक अभ्यास करणार आहे. भारतात इस्राईलतर्फे राबविण्यात येणारा हा सर्वांत मोठा प्रकल्प आहे.
- गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी इस्राईलतर्फे तंत्रज्ञान पुरविण्यात येणार आहे. इस्राईलच्या याबाबतच्या अनुभवाचा फायदा भारताला होऊ शकेल. यासाठी हे पथक भारत सरकारबरोबरही चर्चा करणार आहे.
- जलव्यवस्थापन व जल पुन:प्रक्रिया या क्षेत्रामधील इस्राईलने विकसित केलेले प्रारुप अनेक दुष्काळग्रस्त देशांमध्ये अवलंबिण्यात आले आहे.
विम्बल्डन कनिष्ठ गटात सुमित नागल दुहेरीत अजिंक्य
- कनिष्ठ मुलांच्या गटात भारताच्या सुमित नागलने व्हिएतनामच्या नाम होअँग ली याच्यासमवेत दुहेरीचे जेतेपद पटकावले.
- अंतिम फेरीत सुमित-ली या आठव्या मानांकित जोडीने चौथ्या मानांकित रीली ओपेल्का व अकिरा सँटिलन या अमेरिकन-जपानी जोडीचा पराभव केला.
- रीली ओपेकाने कनिष्ठा मुलांच्या गटात एकेरीचे जेतेपद मिळविले होते. पण त्याची दुहेरी मुकुटाची संधी हुकली.
MT Gyaan
|