Header Ads

चालू घडामोडी - २१ जुलै २०१५ [Current Affairs - July 21, 2015]

क्रायोजेनिक इंजिनच्या शक्तिशाली आवृत्तीची यशस्वी चाचणी

  ISRO
 • भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) २० जुलै रोजी भारतीय अंतराळवीरांना अवकाशात उड्डाण करण्यासाठी आवश्यक असलेल्या क्रायोजेनिक इंजिनच्या शक्तिशाली आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली.
 • या नव्या इंजिनमुळे जागतिक व्यावसायिक स्पर्धेत उतरलेल्या इस्रोला आठ टन वजनाचे सॅटेलाइट अवकाशात सोडणे शक्य होणार आहे. 
 • तामिळनाडूतील महेंद्रगिरी येथील इस्रो केंद्रात इंजिनाची जमिनीवरच चाचणी घेण्यात आली.
 • या इंजिनची क्षमता सध्याच्या क्रोयोजेनिक इंजिनांपेक्षा २५ टक्के अधिक असुन जीओ-सिंक्रोनस एसएलव्ही मार्क-३ या रॉकेटसाठी होणार वापर या शक्तिशाली क्रोयोजेनिक इंजिनचा वापर होणार आहे.
 • २०१६ साली होणाऱ्या जीएसएलव्ही मार्क-३च्या उड्डाणासाठी इस्रोचे मनोबल वाढवण्यासाठी ही चाचणी महत्त्वपूर्ण होती. 
 • शक्तिशाली क्रायोजेनिक इंजिनचा प्रत्यक्षात वापर सुरू होण्यास किमान सात वर्षांचा कालावधी लागणार असून भारतीय अंतराळवीरांची अवकाशातील सफर घडवण्यासाठी याच इंजिनाची होणार मदत आहे.

गुटखा, सुगंधी स्वादिष्ट तंबाखू या पदार्थांवर आणखी एक वर्षभरासाठी बंदी

 • गुटखा, पानमसाला, सुगंधी स्वादिष्ट तंबाखू व सुपारी या पदार्थांवर आणखी एक वर्षभरासाठी बंदी घालण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनमंत्री एकनाथ खडसे यांनी नियम ४६ अन्वये निवेदन करताना २१ जुलै रोजी विधान परिषदेत दिली. 
 • देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर झालेल्या संशोधनातून गुटखा, पानमसाला, सुगंधी स्वादिष्ट तंबाखू व सुपारी हे पदार्थ आरोग्यास अपायकारक आहेत हे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कर्करोगासह हृदयरोग आणि अन्य जीवघेणे आजार होतात. या पदार्थांचा विशेषतः तरुण पिढीवर अनिष्ट परिणाम होत असल्याने त्यावर बंदी घालणे उचित ठरणार आहे. 
 • या पदार्थांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी देशातील २६ राज्ये आणि ५ केंद्रशासित प्रदेशातील अन्नसुरक्षा आयुक्तांनी अन्नसुरक्षेचे निकष जाहीर केले आहेत. त्यामुळे या पदार्थांवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
 • मागच्या सरकारने हा निर्णय घेतला होता. परंतु, त्याची मुदत संपत आल्याने आणखी एक वर्षासाठी तिला मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे खडसे यांनी जाहीर केले.

जपानकडून ‘बुलेट ट्रेन’चा अहवाल केंद्र सरकारला सुपूर्द

  Bullet train
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद ‘बुलेट ट्रेन’चा अहवाल जपानने केंद्र सरकारला सुपूर्द केला.
 • मुंबई ते अहमदाबाददरम्यानचे ५०८ किलोमीटरचे अंतर दोन ते अडीच तासांत पार करणाऱ्या या गाडीसाठी १२ थांबे असतील. त्यात ठाणे, सुरत, बडोदा आदी स्थानकांचा समावेश आहे. या बुलेट ट्रेनचा वेग ताशी ३५० किमी असणार आहे.
 • महत्त्वाकांक्षी ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पासाठी केंद्र सरकारने जपान सरकारकडे मदत मागितली आहे. त्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाबाबतचा अंतिम अहवाल जपानचे राजदूत ताकेशी यागी यांनी केंद्र सरकारला सुपूर्द केला.
 • प्रकल्पासाठी सुमारे १ लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, प्रकल्प २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
 • आगामी दोन वर्षांत या कामाला प्रारंभ होईल. यासाठीचे तंत्रज्ञान, यंत्रसामग्री तसेच अर्थसाह्य जपानतर्फे दिले जाणार असून केंद्र सरकारला त्यासाठी भूसंपादन करावे लागणार आहे. ५०८ किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग उभारला जाणार आहे.
 • या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जपान सरकारने कमी व्याजदराने निधी देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, त्यासाठी ३० टक्के कच्च्चा माल जपानमधूनच घेण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

देशातील प्रमुख ३५ नद्या प्रदूषित : सीपीसीबी अहवाल

 • केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) देशातील ४० नद्यांच्या प्रदूषणाची पाहणी केली असता, केवळ दक्षिण भारतातील चार, तसेच आसाममधील एकच नदी स्वच्छतेच्या प्रमाणांवर यशस्वी ठरल्या आहेत.
 • उर्वरित ३५ नद्या पूर्णपणे प्रदूषणाच्या विळख्यात आहेत. यामध्ये सतलजपासून साबरमती, कृष्णा, तापी, तुंगभद्रा आणि दमणगंगापर्यंतच्या नद्यांचा सम&#23#2366;वेश आहे. 
 • सीपीसीबीने २००५पासून २०१३पर्यंतच्या आकड्यांवर आधारित हा निष्कर्ष काढला आहे. या काळात ४० नद्यांच्या ८३ ठिकाणांवर पाहणी करण्यात आली.
 • यामध्ये चार गोष्टींच्या प्रमाणांवर लक्ष केंद्रित केले होते. १. बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड (बीओडी), २. डिजॉल्व ऑक्सिजन (डिओ), ३. टोटल कोलिफार्म (टीसी) आणि ४. टोटल डिजॉल्व्हड्‌ सॉलिड (टीडीएस).
 • प्रामुख्याने बीओडीनुसार पाण्यात ऑक्सिजनचा वापर करणारे घटक दर्शवितात, तर डीओमध्ये एकूण ऑक्सिजनचे प्रमाण स्पष्ट होते. टीसीमध्ये एकूण जीवाणूंची उपस्थिती आणि टीडीएसमध्ये पाण्यात असलेल्या ठोस घटकांची नोंद होते.

प्रदूषित नद्या

 • गंगा, सतलज, मार्कंडा, घग्घर, यमुना, चंबळ, ढेला, किच्छा, कोसी, बहेला, पिलाखर, सरसा, रावी, माही, रामगंगा, बेतवा, सोन, स्वान, वर्धा, भीमा, साबरमती, मंजीरा, तापी, नर्मदा, वाणगंगा, दमणगंगा, इंद्रावती, महानदी, चुरनी, दामोदर, सुवर्णरेखा, कृष्णा, तुंगभद्रा. 
स्वच्छ नद्या
 • गोदावरी, कावेरी, पेन्नार, उत्तर पिनकानी, धनसारी.

ब्रिक्स बॅंकेच्या कामकाजाला कामकाजाची

 • जगात नव्याने उदयास येत असलेल्या अर्थव्यवस्थांना पायाभूत निधी पुरविण्यासाठी ब्रिक्स (ब्राझील, रशिया, चीन, भारत व दक्षिण आफ्रिका) देशांनी एकत्रितरित्या स्थापन केलेल्या बॅंकेच्या (एनडीबी) कामकाजाची २१ जुलैपासून शांघाय येथील मुख्यालयामधून औपचारिक कामकाजाची झाली. 
 • या उद्घाटनाच्या समारंभास चीनचे अर्थमंत्री लोऊ जिवेई, शांघाय शहराचे महापौर यांग शिआँग आणि एनडीबीचे अध्यक्ष के. व्ही. कामत हे उपस्थित होते. 
 • के. व्ही. कामत हे एनडीबीचे प्रथम अध्यक्ष म्हणून काम पाहणार असून त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा आहे. 
 • रशियातील उफा येथे नुकत्याच झालेल्या ७व्या ब्रिक्स परिषदेत एनडीबीची घोषणा करण्यात आली होती. 
 • सध्या या बॅंकेकडे ५० अब्ज डॉलर्सचे भांडवल असून येत्या दोन वर्षांत हे भांडवल १०० अब्ज डॉलर्सवर जाण्याचा अंदाज आहे. या भांडवलामध्ये प्रत्येक सभासद देशाचा समान वाटा असणार आहे. 
 • याशिवाय, चीनच्या पुढाकारामधून सुरु झालेल्या आशिया पायाभूत गुंतवणूक बॅंकेचाही एनडीबीस पाठिंबा आहे. भारतासहित अन्य ५६ देश या बॅंकेचे सभासद आहेत. जागतिक बॅंकेने एनडीबीचे स्वागत केले आहे.

सांसद आदर्श ग्राम योजना : १०७ खासदारांनी गाव दत्तक घेतलेले नाही

 • माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या खासदारांनी गाव दत्तक घेण्याची योजना (सांसद आदर्श ग्राम योजना) सुरू करून वर्ष उलटले, तरीही अद्याप १०७ खासदारांनी गाव दत्तक घेतलेले नाही.
 • गाव दत्तक न घेतलेल्यांमध्ये राज्यसभेतील ५७ आणि लोकसभेतील ५० खासदार आहेत. लोकसभेतील ज्या ५० खासदारांनी अद्याप गावे दत्तक घेतलेली नाहीत, त्यातील ३८ पश्चिम बंगालमधील आहेत.
 • भाजपचे सहकारी पक्ष असलेल्या शिवसेना, शिरोमणी अकाली दल, लोक जनशक्ती पक्ष आणि अपना दल यांच्या सर्वच्या सर्व खासदारांनी गावे दत्तक घेतली आहेत.
 • पंतप्रधानांनी गेल्या वर्षी ११ ऑक्टोबरला या योजनेचा प्रारंभ केला. त्यानंतर गाव दत्तक घेण्यासाठी खासदारांना महिनाभराची मुदत देण्यात आली होती. 
 • या अंतर्गत प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घ्यायचे आणि सन २०१६पर्यंत त्याचा सर्वांगीण विकास करणे बंधनकारक करण्यात आले. सन २०१९पर्यंत तीन गावे या पद्धतीने विकसित करण्याची योजना आहे.

२०१७ पर्यंत भारतामध्ये ५० कोटी इंटरनेट वापरकर्ते

  Internet Users
 • इंटरनेट ऍण्ड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया (आयएमएमएआय) आणि केपीएमजी यांनी ‘इंडिया ऑन द गो - मोबाईल इंटरनेट व्हिजन २०१७’ अहवाल प्रसिद्ध केला.
 • त्यानुसार नजीकच्या भविष्यात भारतामध्ये मोबाईल इंटरनेट धारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असून २०१७ पर्यंत भारतामध्ये ५० कोटी इंटरनेट वापरकर्ते (युजर्स) होतील असा अंदाज आहे.
 • जून २०१५ पर्यंत भारतामध्ये ३५ कोटी मोबाईल धारक आहेत. तर इंटरनेटसाठी ‘थ्रीजी’ची सुविधा वापरणाऱ्या युजर्समध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
 • आयएमएमएआय आणि केपीएमजीच्या अहवालानुसार भारतात २०१४ च्या अखेरपर्यंत ८.२ कोटी ‘थ्री-जी’ सुविधा वापरणारे युजर्स होते. त्यामध्ये २०१७ पर्यंत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन ती २८.४ कोटींवर पोचण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

‘तोशिबा’ गैरव्यवहार : सीईओंचा राजीनामा

 • संगणक सामुग्री निर्माण करणारी ‘तोशिबा’ या लोकप्रिय कंपनीत झालेल्या गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिसाओ तानाका यांनी राजीनामा दिला आहे.
 • जपानमध्ये कार्यरत असलेल्या ‘तोशिबा’ने गेल्या काही वर्षांमध्ये आपला नफा वाढवून सांगितला होता. या गैरप्रकाराची तानाका यांना कल्पना असल्याचे तपासात उघड झाले होते. त्यामुळे गैरव्यवहाराची जबाबदारी स्विकारत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
 • त्यांच्यानंतर मसाही मुरोमाची हे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळतील.
 • कंपनीचे उपाध्यक्ष नोरिओ सासाकी व सल्लागार आत्सुतोषी निशिदा हेदेखील गैरव्यवहारात सहभागी असल्याने राजीनामा देण्याची शक्‍यता आहे. 
 • ‘तोशिबा’ने अनेक वर्षे आपला नफा वाढवून दाखविला होता. यानंतर आता कंपनीचा खरा नफा कळणे अपेक्षित आहे. तसेच खोटी माहिती दिल्याबद्दल संचालक मंडळाला पायउतार व्हावे लागणार असून कंपनीला मोठा दंडही भरावा लागण्याची शक्यता आहे.

मिलिंद सोमण बनला ‘आयर्नमॅन’

 • बॉलिवूड अभिनेता व मॉडेल मिलिंद सोमण याने तंदुरुस्तीची कस लावणारी ट्रायथॅलॉन ही स्पर्धा यशस्वीरित्या पार केली. ट्रायथलॉन ही जगातील सर्वांत अवघड स्पर्धांपैकी एक समजली जाते.
 • झ्युरीचमध्ये झालेल्या या स्पर्धेत ५० वर्षीय मिलिंद सोमण याच्यासह ६ भारतीय नागरिक व देशविदेशातील २००० स्पर्धक सहभागी झाले होते. मिलिंद सोमणने ही सर्व आव्हाने यशस्वीरित्या पार केली.
 • ट्रायथलॉनमध्ये ३.८ किमी पोहणे, १८०.२ किमी सायकल चालविणे आणि ४२.२ किमी धावणे या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. स्पर्धकाने हे सर्व सलग न थांबता करायचे असतात. ही तिन्ही आव्हाने पार करणाऱ्याला ‘आयर्नमॅन’ हा किताब दिला जातो.
 • स्पर्धकांना ही ट्रायथलॉन १६ तासांमध्ये पूर्ण करणे गरजेचे असते. मिलिंदने १५ तास १९ मिनिटांमध्ये ती पार केली. स्पर्धेत सहभागी झालेल्या ७ पैकी ५ भारतीय स्पर्धकांनी ही स्पर्धा पूर्ण केली.
 • पुण्याच्या डॉ. कौस्तुभ राडकर याच्या नेतृत्वाखाली या सर्वांनी हे यश मिळविले. कौस्तुभने आतापर्यंत बारा वेळा ‘आयर्नमॅन’ हा किताब मिळविला आहे.