चालू घडामोडी - २४ जुलै २०१५ [Current Affairs - July 24, 2015]

नासाला पृथ्वी २.० चा शोध लावण्यात यश

    Kepler 452B
  • नासा या अमेरिकेच्या राष्ट्रीय अवकाश संशोधन संस्थेस पृथ्वीशी अत्यंत साधर्म्य असलेल्या ग्रहाचा शोध लावण्यात यश आले आहे. केप्लर या नासाच्या जगप्रसिद्ध अवकाश यानाच्या सहाय्याने हा अत्यंत महत्वपूर्ण शोध लावण्यात आला आहे. 
  • या ग्रहाचे नामकरण केप्लर-४५२ बी असे करण्यात आले आहे. पृथ्वीपेक्षा सुमारे ६० टक्क्यांनी मोठा असलेला हा ग्रह सायग्नस या नक्षत्रसमूहामध्ये असून, तो सुमारे १४०० प्रकाशवर्षे अंतरावर आहे.
  • पृथ्वीशी साधर्म्य असलेले ग्रह याआधीही आढळून आले आहेत. मात्र केप्लर-४५२ बी हा सूर्याशी साधर्म्य असलेल्या ताऱ्याभोवती फिरत असल्याचे आढळून आले आहे. 
  • शिवाय, हा तारा व केप्लर-४५२ बी यांमधील अंतर हे सुमारे पृथ्वी-सूर्यामधील अंतराइतकेच आहे. केप्लर-४५२ बी ३८५ दिवसांच्या कालावधीमध्ये या ताऱ्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करत असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले. 
  • या ताऱ्याच्या आकारावरुन तो खडकाळ असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तविला आहे. याचबरोबर, जीवसृष्टीसाठी अत्यावश्यक असलेले पृष्ठभागावरील पाणीही या ग्रहावर असण्याची शक्यता आहे.
  • परंतु या ग्रहाचा सूर्य आपल्या सूर्यापेक्षा दीड अब्ज वर्षे जुना आहे. तसेच तो सूर्यापेक्षा १० टक्के अधिक प्रकाशमान आहे. त्याच्या अतिउष्ण ऊर्जेमुळे या ग्रहावरील पाण्याच्या स्रोतांची किंवा सागराची वाफ झाली असण्याचीही शक्यता आहे.

राज्य सरकारच्या शिक्षा माफ करण्याच्या अधिकाराला परवानगी

  • राज्य सरकारांनी दंड प्रक्रिया संहितेनुसार असलेल्या अधिकाराचा वापर करून जन्मठेप भोगत असलेल्या कैद्यांना राज्य सरकारांनी शिक्षामाफी देण्यास वर्षभरापूर्वी दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने काही अटी घालून उठविली आहे.
  • दंड प्रक्रिया संहितेच्या कलम ४३२ व ४३३ नुसार राज्य सरकारांना कैद्यांची शिक्षा पूर्णपणे माफ करण्याचे अथवा शिक्षेत कपात करून त्यांची मुदतपूर्व सुटका करण्याचे अधिकार आहेत. 
  • ९ जुलै २०१४ रोजी या अधिकारांच्या व्याप्तीसंदर्भातील एका प्रकरणावर सुनावणी करताना ही स्थगिती दिली गेली होती. सरन्यायाधीश न्या. एच. एल. दत्तु यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाने आता ही स्थगिती सशर्त उठविल्याने राज्य सरकारांना आपले अधिकार पुन्हा वापरता येणार आहेत.
  • खंडपीठाने स्थगिती मागे घेताना एक अटही जोडली आहे. केंद्रीय पथकांमार्फत तपास झालेल्या, ‘टाडा’सारख्या केंद्रीय कायद्यांतर्गत शिक्षा सुनावलेल्या प्रकरणांचा किंवा न्यायालयाने शिक्षेत सवलत न देण्याचा स्पष्ट आदेश दिलेल्या प्रकरणांसाठी या अधिकाराचा वापर करता येणार नाही, असे खंडपीठाने म्हटले आहे.
  • बलात्कार आणि बलात्कारानंतर खुनासारख्या लैंगिक छळाच्या प्रकरणांत जन्मठेपेची शिक्षा झालेले कैदीही सुटकेसाठी अर्ज करू शकत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
खालील प्रकरणांमध्ये माफी देता येणार नाही.
  • सीबीआयसारख्या केंद्रीय पथकांमार्फत तपास
  • ‘टाडा’सारख्या केंद्रीय कायद्यांतर्गत शिक्षा
  • बलात्कारासारख्या लैंगिक छळ प्रकरणातील दोषी
  • शिक्षेत सवलत न देण्याचा न्यायालयाचा आदेश
  • मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावलेले दोष

डॉ. सुब्बय्या अरुणन यांना लोकमान्य टिळक सन्मान पारितोषिक

    Subbaiah Arunan
  • लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दिला जाणारा ‘लोकमान्य टिळक सन्मान पारितोषिक’ भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) मंगळयान मोहिमेचे प्रकल्प संचालक व शास्त्रज्ञ डॉ. सुब्बय्या अरुणन यांना जाहीर झाला.
  • सुवर्णपदक, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व एक लाख रुपये असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. या पारितोषिकाचे ३३वे वर्ष असून आत्तापर्यंत विविध क्षेत्रातील दिग्गजांना या पारितोषिकाने गौरविले आहे.
  • लोकमान्य टिळक यांच्या ९५व्या पुण्यतिथीदिनी (१ ऑगस्ट) टिळक स्मारक मंदिरात पारितोषिक वितरण होईल.
  • समाज व राष्ट्रासाठी सेवाभावी वृत्तीने झटणाऱ्या व्यक्तींना हे पारितोषिक दिले जाते. ट्रस्टच्या विश्वस्तांनी यावर्षी डॉ. अरुणन यांची निवड केली आहे. 
  • डॉ. अरुणन यांनी चांद्रयान मोहिमेत दिलेल्या योगदानाची दखल घेऊन ‘इस्रो’ने त्यांच्याकडे मंगळयान मोहिमेची जबाबदारी दिली. त्यांनी ५०० शास्त्रज्ञ आणि ४५० कोटी रुपयांमध्ये पहिल्याच प्रयत्नात मोहीम यशस्वी करत मंगळाला गवसणी घातली.
  • विज्ञान-तंत्रज्ञानातील त्यांच्या या कार्याची दखल घेत केंद्र सरकारने डॉ. अरुणन यांना ‘पद्मश्री’ (२०१५) देऊन गौरविले.

सेबी आणि फॉरवर्ड मार्केट्स कमिशन यांचे विलिनीकरण

    SEBI
  • भांडवल बाजार नियामक सेबी (सेक्युरिटीज अँड एक्सेंज बोर्ड ऑफ इंडिया) आणि फॉरवर्ड मार्केट्स कमिशन (वायदा बाजार आयोग) यांचे विलिनीकरण लवकरच होणार आहे. या विलिनीकरणाची प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी दिली आहे.
  • या दोन्ही नियामक संस्थांची कामकाज पद्धती जवळपास सारखी आहे. जगभरातही अशा प्रकारच्या दोन नियामकांच्या कार्यपद्धतीत फारसा फरक नसतो. त्यामुळेत देशातील या दोन्ही संस्था विलिन करण्याच निर्णय घेण्यात आला आहे.
  • दोन्ही संस्थांचे विलिनीकरण झाल्यानंतर सेबीला कमॉडिटी डेरिव्हेटिव्हवर लक्ष ठेवणेही शक्य होणार आहे.

फोर्ब्स आशिया फॅब्युलस ५० कंपन्यांच्या यादीत १० भारतीय कंपन्या

    Forbes Asia Fabulous 50
  • फोर्ब्स आशिया फॅब्युलस ५० कंपन्यांच्या यादीत १० भारतीय कंपन्यांना स्थान मिळाले आहे. ‘फॅब ५०’मध्ये समाविष्ट करताना १,११६ कंपन्यांमधून निवड करण्यात आली. त्यासाठी वार्षिक ३ अब्ज डॉलर महसूल हा निकष होता.
  • एचडीएफसी बँकेने गेल्या दहा वर्षांत या यादीत नवव्यांदा स्थान राखले आहे. तर टाटा समूहातील तीन कंपन्यांचा या यादीत समावेश आहे. ३.२ कोटी ग्राहक आणि ४,००० शाखा असलेल्या एचडीएफसी बँकेचा विशेष उल्लेख ही यादी जारी करताना फोर्ब्सने केला आहे. 
  • चीनमधील २५ हून अधिक कंपन्या फोर्ब्सच्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये गणले गेल्या आहेत. चीन, भारत, दक्षिण कोरिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, इंडोनेशिया, जपान या देशांचा उतरता क्रम कंपन्यांच्या संख्येबाबत यादीत आहे.
‘फॅब ५०’मध्ये समाविष्ट भारतीय कंपन्या
ऑरबिंदो फार्माएचसीएल टेक्नॉलॉजीज
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हीसेसएचडीएफसी बँक
ल्युपिनमदरसन सुमी सिस्टिम्स
सन फार्माटाटा मोटर्स
टेक महिंद्रटायटन

राष्ट्रीय खेळाडूचा रेल्वेतून बाहेर फेकल्यामुळे मृत्यू

  • रेल्वे पोलिसांनी उत्तर प्रदेशातील कासगंज येथे राष्ट्रीय खेळाडू होशियार सिंहला रेल्वेतून बाहेर फेकल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.
  • होशियार सिंह हा तलवारबाजीतील खेळाडू आहे. तो जनरल डब्यात बसला होता. मात्र, प्रवासादरम्यान पत्नीची प्रकृती बिघडल्याने तो महिलांच्या डब्यात आला होता.
  • पोलिसांनी दंड म्हणून २०० रुपयांची मागणी केली. यावेळी पोलिस व होशियारमध्ये धक्काबुक्की झाली. पोलिसांनी होशियारला धावत्या रेल्वेतून बाहेर फेकून दिले. यामध्ये होशियारचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
  • होशियार सिंहने २००५ मध्ये केरळ येथे तलवारबाजीच्या अंडर १७ स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते.

कुपोषित बालकांचे प्रमाण मध्य प्रदेशात सर्वाधिक

  • सरकारच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-३ (एनएफएचएस-३) नावाच्या सर्वेक्षणानुसार वय वर्षे पाचपर्यंतच्या कुपोषित बालकांचे प्रमाण मध्य प्रदेशात सर्वाधिक असून, हे प्रमाण ७४.१ टक्के आहे.
  • मध्य प्रदेशापाठोपाठ झारखंड (५६.५ टक्के) आणि बिहार (५५.९ टक्के) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकांवर असल्याचे या उत्तरात नमूद करण्यात आले आहे.
  • २००५-०६ मध्ये देशभरात वय वर्षे पाचपर्यंतच्या बालकांमध्ये रक्तक्षय आणि कुपोषित बालकांचे प्रमाण ६९.५ टक्के होते.

शुभम जगलान पुन्हा ज्युनिअर गोल्फ स्पर्धेत विजयी

    Shubham Jaglan
  • ज्युनिअर वर्ल्ड गोल्फ चॅम्पियनशिप जिंकल्यामुळे चर्चेत आलेला शुभम जगलान (वय १० वर्षे) हा एका दूधवाल्याचा मुलगा सलग दुसऱ्या आठवड्यात जागतिक दर्जाची गोल्फची स्पर्धा जिंकला आहे. शुभमने ज्युनिअर वर्ल्ड गोल्फ चॅम्पियनशिप पाठोपाठ आता लास व्हेगास येथे झालेली आयजेजीए वर्ल्ड स्टार्स ऑफ ज्युनिअर गोल्फ स्पर्धा जिंकली आहे.
  • शुभम हा मूळचा हरियाणातील एका गावात राहणारा मुलगा; त्याचे वडील दूधविक्रीचा व्यवसाय करतात. 
  • लास व्हेगास येथे झालेल्या स्पर्धेत शुभमने ३ फेऱ्यांमध्ये फाइव्ह स्ट्रोक मार्जिनसह १०६ असा स्कोअर केला. अमेरिकेच्या जस्टिन डँग आणि सुहान संधू तसेच थायलंडच्या पोंग्सापेक लओपेकडी यांना मागे टाकत त्याने अव्वल स्थान पटकावले.
MT Gyaan
  • राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांच्यासोबत व्यासपीठावर कार्यक्रमादरम्यानच बिहारमधील माजी मंत्री आनंद मोहन सिंह यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.
  • आनंद मोहन हे बिहारमधील नोखा येथील माजी आमदार होते. तसेच राबडी देवी सरकारच्या कार्यकाळात त्यांनी मंत्रीपदही भूषविले आहे.
Previous Post Next Post