चालू घडामोडी - २५ जुलै २०१५ [Current Affairs - July 25, 2015]

‘फॉर्च्युन’च्या सर्वात्कृष्ट कंपन्यांच्या यादीत सात भारतीय कंपन्या

    Fortune Global 500-2015
  • ‘फॉर्च्युन’च्या प्रसिद्ध केलेल्या ‘ग्लोबल ५००- २०१५’ या जागतिक दर्जाच्या सर्वात्कृष्ट ५०० कंपन्यांच्या नव्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा मोटर्ससह सात भारतीय कंपन्या आहेत.
  • या यादीत वॉलमार्ट ही रिटेल क्षेत्रातील दिग्गज कंपनी अव्वल स्थानावर आहे. रँकिंग ठरवण्यासाठी ‘फॉर्च्युन’ने ३१ मार्च २०१५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षातील कंपन्यांच्या स्थितीचा अभ्यास केला आहे.
  • या यादीतील भारतीय कंपन्या व त्यांचे स्थान
    इंडियन ऑइल११९
    रिलायन्स इंडस्ट्रीज१५८
    टाटा मोटर्स२५४
    स्टेट बँक ऑफ इंडिया२६०
    भारत पेट्रोलियम२८०
    हिंदुस्तान पेट्रोलियम४४९
    ओएनजीसी४४९
  • याआधी प्रसिद्ध झालेल्या ‘फॉर्च्युन’च्या यादीशी तुलना केल्यावर टाटा मोटर्स आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाल्याचे तर यादीतील अन्य भारतीय कंपन्यांच्या रँकिंगमध्ये घसरण झाल्याचे दिसून आले.
  • यंदाच्या यादीत वॉलमार्ट ही अमेरिकेतील रिटेल क्षेत्रातील दिग्गज कंपनी पहिल्या स्थानावर, चिनी पेट्रोलियम कंपनी साइनोपेक ग्रुप दुसऱ्या स्थानावर, नेदरलंड (हॉलंड) मधील रॉयल डच शेल तिसऱ्या स्थानावर, चायना नॅशनल पेट्रोलियम चौथ्या स्थानावर आणि एक्सॉन मोबिल पाचव्या स्थानावर आहे.
  • या यादीत अमेरिकेतील सर्वाधिक १२८ कंपन्यांचा समावेश असून त्याखालोखाल चीनच्या १०० कंपन्या आहेत.
या यादीतील इतर कंपन्या व त्यांचे स्थान
अॅपल१५
बँक ऑफ चायना४५
जे. पी. मॉर्गन६१
आयबीएम८२
चायना डेव्हलपमेंट बँक८७
मायक्रोसॉफ्ट९५
गुगल१२४
पेप्सी१४१
इंटेल१८२

ज्येष्ठ नेते रा.सु.गवई यांचे निधन

  • आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, अभ्यासू संसदपटू आणि बिहार व केरळचे माजी राज्यपाल दादासाहेब उपाख्य रामकृष्ण सूर्यभान गवई यांचे २५ जुलै रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षाचे होते.
  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या नागपूर दीक्षाभूमीवर घेतली त्या दीक्षाभूमीवर भव्य स्मारक उभारण्याचे ऐतिहासिक काम दादासाहेब गवई यांनी केले. त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.
रा.सु.गवई यांच्याबद्दल
    R.S. Gavai
  • मुरब्बी राजकारणी म्हणून रा.सू.गवई यांची ख्याती होती. १९६८ ते ७८ विधान परिषदेचे उपाध्यक्ष आणि १९७८ ते १९८२ विधान परिषदेचे अध्यक्षपद त्यांना बहाल करण्यात आले. त्यानंतर १२ डिसेंबर १९८६ ते १९८८ काळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे आले. 
  • १९९८-९९ लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले एप्रिल २००० मध्ये राज्यसभेवर निवडून आले. 
  • २००६ मध्ये ते बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले. २००८ ते २०११ अशी तीन वर्षे त्यांनी केरळचे राज्यपाल म्हणून काम पाहिले.
  • वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे ते अध्यक्ष होते.
  • विधान परिषदेचे ते सलग ३० वर्षे सभासद होते. राज्यात रोजगार हमी योजना सुरू व्हावी, यासाठी त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि विधान परिषदेचे तत्कालिन अध्यक्ष वि.स. पागे यांच्या सहकार्याने पायाभूत काम केले. 
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी आणि अमरावतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाचे ते अध्यक्ष होते.

सुरेश नारायणन नेस्ले इंडियाचे नवे एमडी

    Suresh Narayanan
  • मॅगी प्रकरणानंतर नेस्ले इंडियाने व्यवस्थापकीय संचालकपदी (एमडी) सुरेश नारायणन यांची नवे एमडी म्हणून नियुक्ती केली आहे. नारायणन हे गेल्या सोळा वर्षांत नेस्ले इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती होणारे पहिले भारतीय ठरले आहेत.
  • नेस्लेचे लोकप्रिय उत्पादन असलेल्या मॅगीवर देशभरात बंदी आल्यानंतर आता कंपनीच्या धोरणाचा भाग म्हणून नेस्ले इंडियाने आपल्या संचालक मंडळात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 
  • येत्या १ ऑगस्टपासून कंपनीचे वर्तमान व्यवस्थापकीय संचालक एटियंस बेनेट यांच्याऐवजी नारायणन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहणार आहेत. 
पार्श्वभूमी
  • मॅगीच्या नमुन्यांमध्ये शिसे आणि मोनोसोडियम ग्लुटामेट आढळल्यामुळे देशातील अन्न व औषधद्रव्य प्रशासन विभागाने ५ जून रोजी मॅगीवर बंदी घातली होती. गेल्या काही दिवसांपुर्वी ‘नेस्ले इंडिया’ने अंबुजा सिमेंट्सच्या मदतीने मॅगीची हानिकारक पाकिटे नष्ट केली होती.
  • बंदी विरोधात नेस्लेनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
  • नारायणन हे १९९९ पासून नेस्ले समूहाचा भाग आहेत. आतापर्यंत ते नेस्ले फिलिपाइन्सचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. त्याशिवाय २००५ ते २००८ काळात ते नेस्लेच्या दक्षिण आशिया विभागाचे प्रमुख होते. 

हिवतापावरील पहिली परवानाप्राप्त लस वापरण्यास मान्यता

  • हिवतापावरील पहिल्या परवानाप्राप्त मानवी लसीच्या वापरास ‘युरोपियन युनियन’ने मान्यता दिली असून, आफ्रिकेमध्ये लहान मुलांवर तिचा वापर करण्यात येईल. 
  • ‘आरटीएसएस’ किंवा ‘मॉस्कविरिक्स’ असे तिचे नाव असून, ब्रिटिश औषध उत्पादक कंपनी ‘ग्लासोस्मिथक्लाईन’ (जीएसके) आणि ‘पाथ’ या दोन संस्थांनी ही लस तयार केली आहे. 
  • या लसीच्या उपलब्धतेमुळे विकसनशील आणि गरीब देशांमध्ये मलेरियामुळे होणारे हजारो मृत्यू रोखले जाऊ शकतील. 
  • ‘युरोपियन मेडिसीन एजन्सी’ ही संस्था या औषधाला परवाना मिळावा म्हणून प्रयत्नशील होती. या लसीच्या निर्मितीसाठी ‘बिल अँड मेलिंडा गेट्‌स फाउंडेशन’ने मदत केली. आता लसीचा केव्हा आणि कोठे वापर करायचा याचे मार्गदर्शन जागतिक आरोग्य संघटना करेल.
  • अलीकडच्या काळात निर्माण झालेली ही पहिलीच प्रतिबंधात्मक लस असून कोणत्याही परजीवाचा प्रतिक्रार करण्यासाठी तयार झालेलीही ती पहिलीच लस आहे.

मलेरियाचा विळखा

  • जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दरवर्षी ३० ते ५० कोटी लोकांना मलेरियाची बाधा होते आणि त्यातील ९० टक्के हिस्सा आफ्रिकन देशांचा असतो. आफ्रिकेत जवळपास साडेचार लाख मुले वयाची पाच वर्षे पूर्ण होण्याआधीच मलेरियाला बळी पडतात 
  • आशियातील चार मलेरिया रुग्णांपैकी तीन भारतीय असतात. भारतात मलेरियाची लागण होण्याची शक्यता असणाऱ्यांची संख्या सुमारे १३ कोटी आहे.

ओमानचा आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये प्रवेश

  • ओमान या देशाने पुढील वर्षी भारतात आयोजित करण्यात आलेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये प्रवेश मिळवला आहे.
  • आयसीसीच्या प्राथमिक फेरीच्या स्पर्धेत आखातातील लहान अशा ओमान देशाच्या संघाने नामिबियावर पाच विकेट्स राखून मात करत वर्ल्ड टी-२०मध्ये प्रवेश निश्चित केला आहे. या यशामुळे ओमानला आयसीसीतर्फे टी-२०चा दर्जाही लाभणार आहे.
  • प्राथमिक फेरीचे महत्व लक्षात घेऊन त्यांनी श्रीलंकेचा माजी कर्णधार दुलीप मेंडिसची प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली होती. तसेच इंग्लंडचा माजी अष्टपैलू डेरेक प्रिंगल यांना संघाच्या तांत्रिक सल्लागारपद दिले.
  • ओमानने नामिबियाला नमवण्याआधी त्याच्या तुलनेत अनुभवी असलेल्या कॅनडा, हॉलंड व कसललेल्या अफगाणिस्तान या संघांना पराभवाची धूळ चारली. 
  • दुसऱ्या झुंजीत अफगाणिस्तानने पापॉ न्यू गिनियावर (पीएनजी) सहा विकेट्सने मात करत वर्ल्ड टी-२० स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला. अफगाणिस्तानने सलग चौथ्यांदा या स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये पार पडलेल्या वनडे वर्ल्डकपमध्येही अफगाणिस्तानने प्रवेश केला होता. 
  • भारतात पुढील वर्षी रंगणाऱ्या वर्ल्ड टी-२०मध्ये कसोटीचा दर्जा लाभलेल्या दहा देशांच्या संघासह स्कॉटलंड, आयर्लंड, हाँगकाँग, हॉलंड, अफगाणिस्तान व ओमान हे संघ भाग घेतली.

आयडीएफसीला आरबीआयकडून बँकिंग सेवा परवाना

  • पायाभूत सेवा क्षेत्रासाठी वित्त पुरवठा करणाऱ्या आघाडीच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी अर्थात आयडीएफसीला रिझर्व्ह बँकेकडून बँकिंग सेवा देण्यासाठी परवाना मिळाला आहे.
  • ‘बँकिंग नियामक कायदा, १९४९’च्या कलम २२(१) अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडून आयडीएफसी बँक लिमिटेडला बँक परवाना मान्य झाला.
  • बँकिंग परवाना मिळावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या कंपन्यांमध्ये गेल्या वर्षी केवळ बंधन फायनान्शियल सर्व्हिसेस ही सूक्ष्मवित्त कंपनी आणि मुंबईस्थित आयडीएफसी या दोनच कंपन्यांना प्राथमिक बँकिंग परवाना देण्यात आला आहे.
  • यापैकी बंधनने २३ ऑगस्टपासून व्यवसायास प्रारंभ करण्याचे जाहीरही केले आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते बँकेच्या कोलकता येथील मुख्यालयी तिचा शुभारंभ होईल.
  • यापूर्वी २००४मध्ये येस बँकेला शेवटचा बँकिंग परवाना देण्यात आला होता.

श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंदेला यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

    Sreesanth, Ankit Chavan and Ajit Chandila
  • आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी एस. श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंदेला यांच्यासह सर्व आरोपी क्रिकेट खेळांडूची दिल्लीच्या पाटियाला हाऊस कोर्टाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
  • २०१३ साली आयपीएलच्या सहाव्या मोसमादरम्यान या तिघांना स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. 
  • श्रीशांतवर पैसे घेऊन गोलंदाची केल्याचा आरोप होता. तेव्हापासून तो क्रिकेटच्या मैदानाबाहेरच होता. या निर्णयामुळं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्याचा त्याचा मार्ग पुन्हा मोकळा झाला आहे.
Previous Post Next Post