लोकमान्य टिळक स्मृतिदिन
- १ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य राजकीय पुढारी, भारताच्या स्वातंत्र्यलढयाचे आद्य प्रवर्तक, भारतीय असंतोषाचे जनक, गणितज्ञ, खगोलतज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.
सानिया मिर्झाची राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस
- केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने टेनिसपटू सानिया मिर्झाची २०१४-१५ साठीच्या ‘राजीव गांधी खेल रत्न’ पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.
- गेल्याच महिन्यात सानियाने मार्टिना हिंगिसच्या साथीने विम्बल्डनच्या महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकले होते. त्यामुळे महिला दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत सानिया अव्वल स्थानी जाऊन पोहचली होती.
- त्याआधी मिश्र दुहेरीत सानियाच्या खात्यात तीन ग्रँड स्लॅम जेतेपदे जमा आहेत. गतवर्षी इंचियोन आशियाडमध्ये साकेत मिनेनीसोबत मिश्र दुहेरीचे सुवर्ण आणि प्रार्थना ठोंबरेसोबत महिला दुहेरीचे कांस्य पदक तसेच अमेरिकन ओपनमध्ये ब्राझीलचा बु्रनो सोरेस याच्यासोबत सानियाने मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकविले होते.
- सानियाच्या याच कामगिरीची दखल घेत ऑल इंडिया टेनिस असोसिएशने (आयटा) सानियाच्या नावाचा प्रस्ताव क्रीडामंत्रालयासमोर ठेवला होता. क्रीडा मंत्रालयाने हा प्रस्ताव स्विकारला असून त्याचा अंतिम निर्णय पुरस्कार समितीकडून घेतला जाईल.
- सानियाबरोबरच ‘राजीव गांधी खेल रत्न’ पुरस्कारासाठी क्रीडा मंत्रालयाने विकास गौडा (थाळेफेक), टिंटू लुका (८०० मीटर), दिपिका पल्लिकल (स्क्वॅश) अशा एकूण ११ खेळाडूंच्या नावाची शिफारस केली आहे.
- सानियाला २००४ मध्ये अर्जुन तसेच २००६ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार
- सुरुवात : १९९१ (प्रथम विजेता : विश्वनाथन आनंद)
- २९ ऑगस्ट रोजी हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी अर्थात राष्ट्रीय क्रीडादिनी प्रदान करण्यात येणारा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे.
- पुरस्काराचे स्वरूप : पदक, प्रशस्तीपत्र आणि ७.५ लाख रुपये रोख
- राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दरवर्षी एका एका खेळाडूला दिला जातो. २००८ साली हा नियम शिथिल करीत बॉक्सर मेरिकोम, बॉक्सर विजेंदर आणि मल्ल सुशीलकुमार यांना तसेच २०१२ साली मल्ल योगेश्वर दत्त व नेमबाज विजयकुमार यांना संयुक्तपणे या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यानंतर सरकारने नियमात फेरबदल करीत दरवर्षी हा पुरस्कार केवळ एका खेळाडूला देण्याचे जाहीर केले.
- २०१४ ला माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने एकालाही या पुरस्करासाठी पात्र समजले नव्हते. खेलरत्न पुरस्कारांच्या इतिहासात कुणाही खेळाडूला पात्र ठरविण्यात न आल्याची ही तिसरी वेळ होती.
विशेष ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणवीर सैनीला सुवर्ण
- भारताचा गोल्फपटू रणवीर सैनीने लॉस एंजलिस येथे सुरू असलेल्या विशेष ऑलिम्पिक जागतिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देत इतिहास रचला आहे. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
- शारीरिक अपंगत्व असलेल्या विशेष खेळाडूंसाठी दरवर्षी ‘स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धा’ घेतली जाते. ऑटिझमग्रस्त असलेल्या १४ वर्षांच्या रणवीरने जीएफ गोल्फ लेवल-२ अल्टरनेट शॉट सांघिक प्रकारात ही कामगिरी करून दाखविली.
- यापूर्वीही रणवीर सैनीने आशियाई पॅसिफिक जागतिक स्पर्धेत दोन सुवर्णपदकांवर नाव कोरले होते. वयाच्या दुसऱ्या वर्षापासून ऑटिझमच्या व्याधीने ग्रस्त असलेल्या रणवीरने नऊ वर्षांचा असल्यापासून गोल्फ खेळण्यास सुरूवात केली होती.
२०२२ चे हिवाळी ऑलिम्पिक बीजिंगमध्ये
- आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) बीजिंग (चीन) शहराला २०२२ सालच्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद बहाल केले आहे.
- विशेष म्हणजे २००८ साली उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद भूषविलेले बीजिंग शहर उन्हाळी व हिवाळी अशा दोन्ही ओलिम्पिकचे यजमानपद भूषविणारे पहिले शहर ठरणार आहे.
- २०२२ सालच्या हिवाळी ऑलिम्पिकचे यजमानपद पटकावण्याच्या शर्यतीमध्ये बीजिंग समोर काजाकिस्तानच्या अलमाटी शहराचे मोठे आव्हान होते. परंतु, बिजींगने अलमाटी शहराचा ४४-४० अशा मताधिक्यांनी पराभव केला.
- बिजींगमध्ये नैसर्गिक बर्फाची कमतरता असूनही या शहराला २०२२ सालच्या हिवाळी ओलिम्पिकचे यजमानपद देण्यात आले. कारण, २००८ साली बिजींगने उन्हाळी ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजन केले होते.
- या निर्णयानंतर पुर्व आशियाला सलग तिसऱ्यांदा ऑलिम्पिक खेळांचे यजमानपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. दक्षिण कोरीयाच्या प्योंगचांग शहरामध्ये २०१८ सालचे हिवाळी ऑलिम्पिक आयोजित होणार असून टोकियो शहर २०२० सालचे उन्हाळी ऑलिम्पिकचे यजमानपद भूषविणार आहे.
रविचंद्रन अश्विनला अर्जुन पुरस्कार प्रदान
- भारताचा आघाडीचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनला ३० जुलै रोजी केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी अर्जुन पुरस्कार प्रदान केला. गतवर्षी अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर २९ ऑगस्ट २०१४ रोजी झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी अश्विन इंग्लंड दौऱ्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करीत असल्याने अनुपस्थित होता.
- भारताचा प्रमुख फिरकी गोलंदाज म्हणून ओळखला जाणाऱ्या अश्विनने आतापर्यंत २५ कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना १२४ बळी घेतले आहेत. तसेच एकूण ९९ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळताना १३९ बळी मिळवले आहेत. त्याचप्रमाणे २५ टी-२० सामन्यांतून अश्विनने २६ बळी टिपले आहेत.
- नोव्हेंबर २०१३ मध्ये वानखेडे स्टेडियमवर झालेला कसोटी सामना अश्विनचा १९वा सामना होता आणि या सामन्यात त्याने आपल्या बळींचे शतक पुर्ण केले होते. विशेष म्हणजे गेल्या ८० वर्षांत कमी सामन्यांत बळींचे शतक पुर्ण करणारा तो पहिला गोलंदाज ठरला होता. याआधी हा विक्रम माजी फिरकीपटू इरापल्ली प्रसन्ना यांच्या नावावर होता, ज्यांनी २० सामन्यांत १०० कसोटी बळी घेतले होते.
अर्जुन पुरस्कार
- सुरुवात : १९६१
- पुरस्काराचे स्वरूप : रु. ५ लाख रोख, कांस्य धातू पासून बनलेला अर्जुनाचा छोटा पुतळा आणि प्रमाणपत्र
- राष्ट्रीय खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल २९ ऑगस्ट रोजी हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी अर्थात राष्ट्रीय क्रीडादिनी प्रदान करण्यात येतो.
- २००१ पासून अर्जुन पुरस्कार फक्त पुढे उल्लेख केलेल्या क्रीडासत्रांतील खेळांसाठी दिला जाऊ लागला : ऑलिंपिक खेळ, आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, विश्वचषक, विश्वविजेतेपद, क्रिकेट, देशी खेळ आणि अपंगांसाठीचे खेळ
क्षयरोगग्रस्त देशांच्या क्रमवारीमध्ये भारत १४च्या स्थानी
- जागतिक पातळीवर २२ क्षयरोगग्रस्त (टीबी) देशांच्या क्रमवारीमध्ये भारत १४च्या स्थानी असून, जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतातील क्षयरोगग्रस्त रुग्णांची संख्या २६ लाख एवढी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी लोकसभेत दिली.
- तसेच ‘एमडी-आर’ क्षयरोग झालेल्यांची संख्या केवळ ६१ हजार एवढीच असून, त्यांना बहुविध प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या औषधांचा पुरवठा केला जात आहे.
- देशात सर्वप्रथम २००३ मध्ये क्षयरोग निर्मूलनाचा कार्यक्रम सुरू झाला होता २०१३ पर्यंत तो देशाच्या कानाकोपऱ्यात पोचला.
मलेशियाच्या बेपत्ता एमएच ३७० विमानाचा तुकडा भारतीय समुद्रात
- मलेशियाच्या बेपत्ता एमएच ३७० विमानाचा तुकडा भारतीय समुद्रात आढळून आल्याने या विमानाविषयीचे कोडे उलगडण्यास मदत होणार आहे. मलेशियन कंपनीचे हे विमान वर्षांपूर्वी २३९ प्रवाशांना घेऊन बेपत्ता झाले होते. बोईंग कंपनीचे ७७७ या श्रेणीतील हे विमान होते.
- हे अवशेष भारतीय द्वीपसमूहांजवळ आढळले आहेत. मात्र ते या विमानाचेच असल्याची खातरजमा करण्यासाठी मलेशियाने तो तुकडा पॅरिसला पाठविणार आहे.
- मलेशियन विमान कंपनीचे एमएच ३७० विमान ८ मार्च २०१४ला २३९ कर्मचारी आणि प्रवाशांना घेऊन क्वालालंपूरहून बीजिंगला जात होते. या वेळी हे विमान संपर्क तुटून बेपत्ता झाले होते. यानंतर वर्षभर या विमानाचा शोध सुरू होता. मात्र ते सापडू शकले नव्हते. या विमानातून चार भारतीयही प्रवास करत होते.
माननीय अब्दुल कलाम यांची अनेक पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर
- माजी राष्ट्रपती व वैज्ञानिक ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची अनेक पुस्तके प्रकाशनाच्या रांगेत असून, ती येत्या काही महिन्यांत प्रकाशित होत आहेत. ‘इग्नायटेड माइंड्स’ या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचा त्यात समावेश आहे.
- पफिन बुक्स ‘इग्नायडेड माइंडसचा’ दुसरा भाग ‘माय इंडिया-आयडियाज फॉर द फ्युचर’ या नावाने प्रसिद्ध करणार आहे. कलाम यांच्या राष्ट्रपतिपदाच्या कारकीर्दीनंतरच्या भाषणांचा त्यात समावेश आहे. त्यात सात भाग असून मुलांसाठी, प्रौढांसाठी असे वर्गीकरण केले आहे. या पुस्तकामुळे अनेक पिढ्यांचे सक्षमीकरण होऊ शकते.
- २००३ मध्ये पेंग्विनने ‘इग्नायटेड माइंडस- अनलिशिंग द पॉवर विदिन इंडिया’ हे पुस्तक प्रसिद्ध केले होते. पफिनने अलीकडेच ‘रिइग्नायटेड- सायंटिफिक पाथवेज फॉर अ ब्रायटर फ्युचर’ हे पुस्तक प्रसिद्ध केले असून, ते कलाम यांनी श्रीजनपाल सिंह यांच्यासमवेत लिहिले आहे.
- हार्पर कॉलिन्स आता कलाम यांचे ‘अॅडव्हान्टेज इंडिया’ हे पुस्तक प्रकाशित करणार आहे, त्यातही श्रीजनपाल सिंह सहलेखक आहेत. मेक इन इंडिया, स्कील डेव्हलपमेंट, डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटीज प्रोजेक्ट, ग्रामीण विकास प्रारूपे व नवीन ऊर्जा धोरणे याचे विवेचन त्यात केले आहे.
- कलाम यांचे ट्रान्सेडन्स हे पुस्तक अलीकडेच हार्पर कॉलिन्सने प्रकाशित केले आहे, त्यात अरुण तिवारी सहलेखक आहेत. त्यात कलाम व प्रमुख स्वामीजी महाराज यांच्या अध्यात्मिक संबंधांचा ऊहापोह केला आहे.
- आयआयएम शिलाँग येथे त्यांचे जे भाषण होणार होते त्यावर ‘क्रिएटिंग अ लिव्हेबल प्लॅनेट अर्थ’ हे पुस्तक प्रकाशित होणार आहे.
मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग बांधण्याची घोषणा
- युती शासनाच्या कार्यकाळात पूर्ण झालेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या धर्तीवर आता मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग बांधण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.
- सुमारे ३० हजार कोटी रुपयांत उभारला जाणारा हा सहापदरी महामार्ग २०१९ पर्यंत बांधला जाणार असून, या महामार्गावर ऑप्टिक फायबरचे जाळे असेल.
- घोटी, औरंगाबाद, अमरावती या मार्गांवरून पुढे जाणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला ‘कम्युनिकेशन सुपर एक्स्प्रेस हायवे’ संबोधले जाणार आहे.
- राजधानी मुंबईला या महामार्गामुळे औरंगाबाद, अमरावती या महसुली मुख्यालयांबरोबरच उपराजधानी नागपूर जोडले जाणार आहे. हे काम राज्य आणि केंद्र यांच्या संयुक्त भागीदारीत उभे केले जाणार आहे.
ऍक्सिस बँकेचा एडीबीसोबत २० कोटी डॉलर्सचा करार
- देशाची तिसरी सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक ऍक्सिस बँकेने एशियन डेव्हलपमेंट बँकेसोबत (एडीबी) ७ वर्षांसाठी २० कोटी डॉलर्सच्या करारावर स्वाक्षरी केली.
- हा करार ऍक्सिस बँकेच्या कृषी क्षेत्रात आपली उपस्थिती मजबुत करण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणार आहे. याच्या मदतीने बँक शेतकऱ्यांना किफायतशीर दरांमध्ये कृषी कर्ज उपलब्ध करण्यास सक्षम होणार आहे. कृषी कर्जाच्या प्रभावी वितरणासाठी बँक आपल्या निमशहरी आणि ग्रामीण शाखांच्या साखळीचा विस्तार देखील करणार आहे.
- एडीबीच्या या मदतीने ऍक्सिस बँकेच्या ग्रामीण लेंडिंग आणि मायक्रोफायनान्स योजना वाढविण्यास मदत होईल.
आशियाई विकास बँक (Asian Development Bank : ADB)
- स्थापना : ए.डी.बी.ची स्थापना डिसेंबर १९६६ मध्ये करण्यात आली. तिने आपले कार्य १ जानेवारी १९६७ रोजी सुरू केले.
- मुख्यालय : मनिला (फिलिपाइन्स)
- अध्यक्ष : ताकीहीको नाकावो (हे नेहमी जपानी व्यक्तीलाच दिले जाते.)
- सदस्य संख्या : ६७ देश (यांपकी ४८ आशिया पॅसिफिक परिसरातील तर १९ गैर-आशियाई प्रदेशातील आहेत.)
- २ फेब्रुवारी २००७ रोजी जॉर्जिया हा ए.बी.डी.चा ६७वा सदस्य देश झाला.
- कार्ये
- आशिया आणि पॅसिफिक प्रदेशाच्या आर्थिक-सामाजिक विकासाला गती देणे हे या बँकेचे प्रमुख लक्ष्य आहे. त्यासाठी ती पुढील कार्ये करते-
- आपल्या विकसनशील सदस्य राष्ट्रांना आíथक सामाजिक विकासासाठी कर्जे देणे तसेच समभाग गुंतवणूक करणे.
- विकास प्रकल्पांच्या नियोजन आणि कार्यवाहीसाठी तांत्रिक मदत आणि सल्ला सेवा देणे.
- विकसनशील सदस्य राष्ट्रांच्या त्यांच्या विकासात्मक धोरणे आणि योजनांच्या सुसूत्रीकरणाच्या मागण्यांना योग्य प्रतिसाद देणे.
ईपीएफओच्या शेअर बाजारातील गुंतवणुकीला सुरुवात
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधीकडून (ईपीएफओ) शेअर बाजारातील गुंतवणुकीला ६ ऑगस्टपासून सुरुवात केली जाईल.
- चालू आर्थिक वर्षात एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ)च्या माध्यमातून ५,००० कोटी रुपयांचा निधी शेअर बाजारात गुंतवण्यात येणार आहेत. निधीतील संचयित एकूण रकमेपैकी चालू आर्थिक वर्षांसाठीही ही रक्कम एक टक्का असेल. सध्या बाजारात निधीतील काहीही रक्कम गुंतविली जात नाही.
- येत्या ६ ऑगस्टला मुंबईत शेअर बाजारात पहिली गुंतवणूक केली जाईल. या वेळी होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय असतील.
- केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त : के. के. जालान
बँकांच्या भांडवलीकरणासाठी चार वर्षांत ७०,००० कोटींची तरतूद
- सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या भांडवलीकरणासाठी सरकारने चार वर्षांत ७०,००० कोटी रुपये देण्याचे प्रस्तावित केले आहे.
- विद्यमान व पुढील वर्षांत प्रत्येकी २५,००० कोटी रुपये तर २०१७-१८ आणि २०१८-१९ मध्ये प्रत्येकी १०,००० कोटी रुपये असे चार वर्षांत ७०,००० कोटी रुपयांचे भांडवलीकरण सरकारकडून केले जाणार आहे.
- मात्र बँकांना या चार वर्षांत भांडवली पर्याप्ततेचे प्रमाण राखण्यासाठी १.८० लाख कोटी रुपयांची गरज असून त्यापैकी १.१० लाख कोटी हे खुल्या बाजारात समभागांची विक्री करूनच उभारावे लागतील.
- चालू आर्थिक वर्षांत पहिल्या टप्प्यातील २०,००० कोटींचा भांडवली भरणा बहुधा सप्टेंबरमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना दिला जाईल. यापैकी १०,००० कोटी हे अग्रक्रमाने सार्वजनिक क्षेत्रातील कमजोर बँकांना दिले जातील.
MT Fast Facts
|