ऐतिहासिक भूसीमा कराराची अंमलबजावणी
- सुमारे सात दशकांनंतर भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर असलेल्या १६२ लहान-मोठ्या गावांमध्ये ३१ जुलै रोजी मध्यरात्री स्वातंत्र्याची पहाट उगवली.
- या दोन्ही देशांमधील गेल्या ४१ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भूसीमा कराराची अंमलबजावणी झाल्यामुळे भारतातील १११ गावांचा बांगलादेशमध्ये आणि बांगलादेशमधील ५१ गावांचा भारतामध्ये समावेश करण्यात आला. रात्री १२ वाजून ०१ मिनिटांनी या गावांमधील नागरिकांनी आपापल्या देशाचे राष्ट्रध्वज फडकावून आनंद साजरा केला.
- या हस्तांतर प्रक्रियेत भारतातील १७,१६० एकरमध्ये पसरलेल्या १११ वसाहती बांगलादेशच्या हद्दीत समाविष्ट झाल्या असून, बांगलादेशमधील ७ हजार ११० एकरमध्ये वसलेल्या ५१ वसाहती भारतीय हद्दीत समाविष्ट झाल्या आहेत.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी जून महिन्यात ढाका येथे ऐतिहासिक भू-सीमा करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. वास्तविक, १९७४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांनी सीमावाद संपवण्यासाठी हा करार केला होता. परंतु, चार दशके त्याची अंमलबजावणीच होऊ शकली नव्हती.
- भारत व बांगलादेशदरम्यान ४०९६ किलोमीटरची सीमा असून, तेथून दहशतवादी सहज बांगलादेशात जाऊ शकत होते. त्याला या करारामुळे आळा बसणार आहे.
या करारातील ठळक मुद्दे
- नव्या करारानुसार त्या भागातील जनतेला आहे तेथेच राहून त्या देशाचे नागरिकत्व घेण्याचा किंवा मायदेशात परत येण्याचा पर्याय दिला आहे.
- भारतीय हद्दीतील ५१ बांगलादेशी भूभागांमध्ये १४,८५६ लोक राहतात. त्या सर्वानी भारतीय नागरिकत्व पत्करून येथेच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
- बांगलादेशी भूमीतील १११ भारतीय भूभागांमध्ये ३७,३६९ लोक राहतात. त्यातील ९७९ भारतीयांनी भारतात येण्यासाठी अर्ज केला आहे. अन्य लोक तेथेच राहून बांगलादेशी नागरिकत्व स्वीकारू इच्छितात.
- नागरिकांच्या देवाणघेवाणीची प्रक्रिया नोव्हेंबपर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे आता तेथे नागरी सुविधा पुरवता येऊ शकतील आणि या भूभागांच्या विकासातील अडसर दूर झाला आहे.
जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिप
महिलांच्या संघाला रौप्य
- भारतीय महिलांच्या संघाने जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिपमधील रिकर्व्ह प्रकारात रौप्यपदक पटकावले आहे. अंतिम लढतीत रशियाने भारतावर २८-२७ अशी मात केली.
- दीपिकाकुमारी, लक्ष्मीरानी मांझी आणि रिमिल बुरुली या त्रिकुटाने रशियन संघावर दबाव निर्माण करीत ४-० ची आघाडी मिळविली होती, परंतु भारतीय संघाने पुढील दोन सेट गमावले आणि नंतर शूट ऑफमध्ये २७-२८ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे सुवर्णपदक हुकले.
रजत चौहानला वैयक्तिक रौप्य
- तसेच या स्पर्धेत भारताच्या रजत चौहानने वैयक्तिक रौप्य पदक जिंकले. या स्पर्धेत भारताला आतापर्यंत एकदाही वैयक्तिक गटात पदक जिंकण्यात यश आले नव्हते.
- कम्पाऊंड गटात त्याने स्पेनच्या स्टीफन हॅन्सनला तोडीसतोड उत्तर दिले पण त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कंपाउंड प्रकारात रजत चौहानने वैयक्तिक रौप्य पदक जिंकून भारताचे खाते उघडले होते. विश्व तिरंदाजी चॅम्पियनशीपमध्ये ही भारताची आतापर्यंतची सर्वश्रेष्ठ कामगिरी आहे.
सिंगापूर स्वातंत्र्य दिन सोहळ्याला अनंत गीते यांची उपस्थिती
- सिंगापूर स्वातंत्र्य दिनाच्या ५०व्या वर्धापन दिनानिमित्त सिंगापूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय दिवस संचलनाला भारताचे प्रतिनिधी म्हणून पंतप्रधानांनी अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांची नियुक्ती केली आहे. गीते ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
- सिंगापूर स्वातंत्र्यदिनाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत सरकारने विविध संकल्पना मांडल्या आहेत. यात युवा आणि महिला शक्तीचा प्रामुख्याने समावेश आहे.
- सिंगापूरच्या विकासात सुरुवातीपासून प्रत्येक व्यक्तीने दिलेले योगदान आणि भविष्यात विकासाच्या वाटा काय असतील, याबाबत सरकारने विविध पातळींवर कार्यक्रम हाती घेतले आहेत. यालाच त्यांनी 'एस-जी ५०' असे नाव दिले आहे.
आसाराम बापू हे संत - राजस्थानच्या पाठ्यपुस्तकातील वादग्रस्त उल्लेख
- राजस्थानमध्ये तिसरी इयत्तेच्या पाठ्यपुस्तकात आसाराम बापू हे स्वामी विवेकानंद, मदर तेरेसा, रामकृष्ण परमहंस यांच्यासारखेच संत आहेत असा वादग्रस्त उल्लेख करण्यात आला आहे.
- या ४० पानी पुस्तकात आसारामबापूंचे नाव महान संतांच्या यादीत समाविष्ठ करण्यात आले आहे. आसारामबापूंचे छायाचित्रही प्रसिद्ध करण्यात आले असून, या यादीत गुरूनानक, स्वामी विवेकानंद, मदर तेरेसा आणि रामकृष्ण परमहंस या महान व्यक्तींचा समावेश आहे.
- दिल्लीस्थित एका प्रकाशन संस्थेने आसाराम बापूंच्या नावाचा समावेश करून नया उजाला हे पुस्तक तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे याविरोधात पालकांनी आणि विरोधकांनी आवाज उठवला आहे.
- लैंगिक शोषणाप्रकरणी आसाराम बापू ऑगस्ट २०१३पासून तुरुंगात आहेत. १६ वर्षाच्या मुलीनं तक्रार दाखल केल्यानंतर आसाराम बापूला अटक करण्यात आली होती.
वानखेडेवर जाण्यास शाहरुख खानला परवानगी
- मुंबई क्रिकेट असोसिएशनने अभिनेता आणि कोलकाता नाइट रायडर्स संघाचा मालक शाहरुख खान याला वानखेडे स्टेडियमवर प्रवेश करण्यास घातलेली बंदी अखेर तीन वर्षांनतर उठवली आहे.
- आयपीएल स्पर्धेदरम्यान कोलकाता विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एका सामन्यानंतर शाहरुखने मैदानाच्या सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की केली होती. मे २०१२ मध्ये हा प्रकार घडला होता.
- शाहरुखच्या या गैरवर्तनाची गंभीर दखल घेऊन एमसीएने त्यावेळी शाहरुखवर ५ वर्षांसाठी वानखेडे प्रवेशबंदी घातली होती. या बंदीची मुदत २०१७ पर्यंत असताना शाहरुखच्या चांगल्या वर्तनाचा विचार करून मुदतीपूर्वी त्याच्यावरील बंदी उठवण्यात आली आहे.
- वेस्ट इंडिजमध्ये नुकत्याच संपलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये शाहरुखच्या मालकीच्या त्रिनिनाद अॅण्ड टोबॅगो रेड स्टील या संघाने जेतेपद पटकावले आहे.
साखर निर्यातीला परवानगी
- चालू वित्तीय वर्षात साखरेच्या चाळीस लाख टन निर्यातीला परवानगी देण्यात आली असून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण ५ टक्क्यांवरून ६ ते ७ टक्के करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.
- साखरनिर्यातीमुळे कारखान्यांकडे पडून असलेल्या अतिरिक्त साखरेची आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री होऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देणी फेडण्यात हातभार लागेल, असे सरकारला वाटते.
- सध्या देशभरातील साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादकांची १४ हजार कोटींची थकबाकी आहे.
- साखर उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक आहे. साखरेचे २०१४-१५ हंगामातील उत्पादन २८.३ दशलक्ष टन आहे.
याकूबच्या फाशीविरोधात उपनिबंधकाचा राजीनामा
- मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटांतील आरोपी याकूब मेमनला देण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेवर नाराजी व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाचे उपनिबंधक अनूप सुरेंद्रनाथ यांनी राजीनामा दिला आहे.
- अनूप यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला असून त्यांना लगेचच पदमुक्तही करण्यात आले आहे. अनूप यांनी राजीनामा पत्रात राजीनाम्याचे कारण वैयक्तिक असल्याचे नमूद केले असले तरी आपल्या फेसबुक पेजवर त्यांनी याकूबच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
- अनूप यांनी ३० जुलै रोजी याकूबच्या फाशीवर अंतिम निर्णय येण्याच्या दोन तास आधी आपला राजीनामा दिला.
- अनूप हे दिल्लीतील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीत प्राध्यापक तसेच मृत्युदंड संशोधन प्रकल्पाचे संचालक आहेत.
'एनएससीएन' व भारत सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण शांतता करार
- नागालँडमधील प्रमुख बंडखोर संघटना 'एनएससीएन'ने (Nationalist Socialist Council of Nagaland)भारत सरकारशी ३ ऑगस्ट २०१५ रोजी महत्त्वपूर्ण शांतता करार केला.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह आणि एनएससीएन संघटनेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत नवी दिल्लीत गृह विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
- या करारानुसार परस्परांवरील हल्ल्यांना पूर्णविराम देण्यात आला आहे. नागालँडमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी हा करार होणे महत्त्वपूर्ण होते.
- या करारामुळे गेल्या ६० वर्षांपासून असलेल्या समस्या निकाली निघाल्या असून खांद्याला खांदा लावून नागालँड आणि देशाचा विकास होईल.
- या करारानुसार नागालँडच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी, तेथील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मोदी यांनी केली आहे.
- 'एनएससीएन' ही संघटना नागालँडमधील एक शक्तीशाली बंडखोर संघटना म्हणून ओळखली जाते. त्यामुळे हा शांती करार म्हणजे पूर्वोत्तर राज्यांमध्ये शांतता नांदण्याच्या दृष्टीने टाकलेले महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले जात आहे.
भारताच्या १६३ मच्छिमारांची पाकिस्तानकडून सुटका
- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे पाकिस्तानी समपदस्थ नवाझ शरीफ यांच्या रशियातील चर्चेत ठरल्याप्रमाणे सदिच्छा म्हणून पाकिस्तानने १६३ भारतीय मच्छिमारांना मुक्त केले आहे.
- सुटका करण्यात आलेल्यांत ११ वर्षांच्या एका मुलाचा व १६२ प्रौढांचा समावेश आहे. त्यांना वाघा सीमेवर आणून भारताच्या हवाली करण्यात आले.
- दोन्ही देशांनी एकमेकांच्या मच्छिमारांना बोटींसह पंधरा दिवसात सोडून देण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानातील तुरुंगात भारताचे ३५५ मच्छिमार असून भारताच्या तुरुंगात पाकिस्तानचे २७ मच्छिमार आहेत.
जीवसृष्टीस अनुकूल असलेल्या महापृथ्वीचा शोध
- पृथ्वीपासून फक्त २१ प्रकाशवर्षे अंतरावर खगोल शास्त्रज्ञांना एक ग्रहमाला आढळली असून, त्यात एक महाकाय ग्रह व तीन सुपर अर्थ (महापृथ्वी) आहेत.
- एचडी २१९१३४ असे या ग्रहमालेच्या ताऱ्याचे नाव असून ग्रहमाला कॅसियोपिया या नक्षत्र समूहात आहे. या तीन सुपर अर्थपैकी एक ग्रह त्यांच्या सूर्यासमोरून जातो. सूर्यासमोरून जाणाऱ्या य सुपरअर्थची घनता पृथ्वीसारखीच आहे. हा ग्रह आतापर्यंत आढळलेल्या पृथ्वीसारख्या ग्रहापैकी सर्वात जवळ आहे.
- या तीनही सुपरअर्थ खडकाळ असून, आपली सौरमाला तयार झाल्यानंतर राहिलेल्या अवशेषातून हे ग्रह तयार झाले असावेत असे मानण्यात येत आहे. एचडी २१९१३४ हा तारा व सुपरअर्थ यांच्यातील अंतर मोजण्यासाठी सर्व ग्रह एकमेकांसमोर व तीनही ग्रह ताऱ्यासमोर यावे लागतील म्हणजेच ग्रहण व्हावे लागेल.
- या ग्रहाचा शोध पहिल्यांदा कॅनरी आयलंड येथील गॅलिलिओ नॅशनल टेलिस्कोपच्या मदतीने लावण्यात आला होता. ही दुर्बीण इटलीची आहे. या ग्रहाच्या शोधाची निश्चिती मात्र नासाच्या स्पिट्झर दुर्बिणीने केली आहे.
मनीषा वाघमारेने एल्बुरस शिखर यशस्वीपणे सर केले
- ४० पेक्षा कमी तापमान, हवामानातही स्थिरता नाही, त्यातच वादळ अशा खडतर परिस्थितीत अदम्य इच्छाशक्ती, प्रबळ आत्मविश्वास, साहसीवृत्ती, जबरदस्त फिटनेस या बळावर औरंगाबाद येथील इंडियन कॅडेट फोर्सची साहसी वीरांगना मनीषा वाघमारे हिने युरोप खंडातील सर्वांत उंच असणारे बर्फाच्छादित एल्बुरस शिखर यशस्वीपणे सर करण्याचा पराक्रम केला.
- रशियाची राजधानी मॉस्कोजवळ असणारे एल्बु्रस शिखर हे १८,६१० फूट उंचीवर आहे.
- या मोहिमेसाठी औरंगाबादच्या मनीषा वाघमारेसह नागपूर आणि दिल्लीतील जवळपास सात ते आठ जणांचा गट भारतातून २४ जुलै रोजी रवाना झाला होता. या मोहिमेची सुरुवात मनीषाने २६ जुलै रोजी केली आणि मधील तीन टप्पे १८ तासांत यशस्वीपणे पूर्ण केले.
- याआधी मनीषा वाघमारे हिने गेल्या वर्षी २ ते ५ नोव्हेंबरदरम्यान एव्हरेस्टवीर आनंद बनसोडेसह १० जणांच्या पथकासह पूर्ण बर्फाळ असणाऱ्या ऑस्ट्रेलियातील माऊंट कोसिस्को, माऊंट टाऊनसेंड, माऊंट राम्सहेड, माऊंट इवरारिज, माऊंट राम्सहेड नॉर्थ, माऊंट आलिस, माऊंट साऊथ वेस्ट आॅफ अब्बीट पीक, माऊंट कॅरवर ही शिखरे सर करण्याचा भीमपराक्रम केला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी शिखरे सर करणारी मनीषा ही मराठवाड्यातील पहिलीच गिर्यारोहक आहे.
चौटाला पिता-पुत्रांची दहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा कायम
- शिक्षक भरतीतील घोटाळ्याप्रकरणी हरियानाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला आणि त्यांचे पुत्र अजयसिंह चौटाला यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरविले असून, त्यांना सुनावण्यात आलेली दहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा कायम केली आहे.
- कनिष्ठ न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाने चौटाला यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. या न्यायालयांचे आधीचे निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने चौटाला यांची त्याविरोधातील याचिका फेटाळून लावली.
- ओम प्रकाश चौटाला, मुलगा अजसिंह चौटाला आणि इतर तीनजणांना सुनावण्यात आलेली दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा दिल्ली उच्च न्यायालयाने ५ मार्च रोजी दिलेल्या निकालात कायम ठेवली होती. त्याविरोधात चौटाला यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
- धक्कादायक पुराव्यांमधून देशातील भयंकर परिस्थिती निदर्शनास आली असल्याचे सांगून दिल्ली न्यायालयाने ही शिक्षा सुनावली होती.