Header Ads

चालू घडामोडी - ०५ व ०६ ऑगस्ट २०१५ [Current Affairs - August 05 & 06, 2015]

जम्मू-श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला

 • जम्मू-श्रीनगर हायवेवर सीमरोली येथे ५ ऑगस्ट रोजी पाकिस्तानातून आलेल्या नावेद आणि नोमन उर्फ मोमीन या दहशतवाद्यांनी बीएसएफच्या (सीमा सुरक्षा बल) ताफ्यावर अंदाधुंद हल्ला केला.
 • या हल्ल्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर देत नोमन याचा खात्मा केला. मात्र, नावेद पळून जाण्यात यशस्वी झाला. त्याने तेथून पळ काढत जवळच्या गावातील पाच गावकऱ्यांना एका शाळेच्या इमारतीत ओलीस ठेवले.
 • ओलिसांपैकी तिघे पळून जाण्यात यशस्वी ठरले. तर उरलेल्या दोघांनी त्याच्याशी दोन हात करून त्याला पकडले. गावकऱ्यांनी पोलिसांना खबर दिल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. पकडलेला मोहम्मद नावेद हा लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आहे.
 • या हल्ल्यात कॉन्स्टेबल रॉकी आणि सुभेंदू रॉय शहीद झाले, तर ११ जण जखमी झाले आहेत.
 • दहशतवाद्यांशी जीवाची बाजू लावून लढणाऱ्या सर्व जवानांचा शौर्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल, तसेच नावेदला पकडून देणाऱ्या दोघा ग्रामस्थांना पुरस्कार देण्याची शिफारस जम्मू काश्मीर सरकारला करु अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत केली.
 • एन्काउंटरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव मोमीन होते तर जिवंत पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव मोहम्मद नावेद उर्फ उस्मान आहे. तो पाकिस्तानातील फैसलाबादचा राहणारा आहे.

ललित मोदींविरोधात अजामीनपात्र वॉरंट

 • इंडियन प्रिमियर लीगचे (आयपीएल) माजी मुख्याधिकारी ललित मोदी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्यासंदर्भात अजामीनपात्र वॉरंट काढण्याची सक्तवसुली संचलनालयाची विनंती विशेष न्यायालयाने मंजूर केली आहे.
 • आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणासंदर्भात तपास करत असलेल्या संचलनालयाने याआधी बजावलेल्या समन्सला मोदींकडून कोणतेही उत्तर देण्यात न आल्याने संचलनालयाने विशेष न्यायालयात धाव घेतली होती.
 • आयपीएलमधील गैरव्यवहारप्रकरणी २०१०मध्ये प्रथम भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) चेन्नईमध्ये प्राथमिक चौकशी अहवाल (एफआयआर) दाखल केला होता. यानंतर दोन वर्षांनी संचलनालयाने आर्थिक गैरव्यवहाराविरोधातील विशेष कायद्यांतर्गत मोदींविरोधात गुन्हा दाखल केला होता. 
 • मोदी यांनी २०१०मध्येच भारत सोडून लंडनमध्ये आश्रय घेतला आहे.

तिरुपती बालाजी देवस्थानने सुरु केले डिमॅट खाते

  Tirumala Venkateswara Temple
 • तिरुमला तिरुपती देवस्थानाने आता भक्तांकडून शेअर्सच्या स्वरुपातील दान स्वीकारण्यासाठी डिमॅट खाते उघडले आहे. त्यामुळे आता बालजींचे भक्त त्यांना शेअर्सच्या स्वरुपात देखील दान करू शकणार आहेत. इलेक्ट्रॉनिक स्वरुपात शेअर्स ठेवण्यासाठी डिमॅट खाते आवश्यक असते.
 • तिरुपती बालाजी देवस्थानाला मिळणाऱ्या विविध शेअर्सची प्रमाणपत्रे खराब होऊन नष्ट होऊ नयेत यासाठी देवस्थानाने डिमॅट खाते उघडले आहे.
 • देवस्थानाने ‘स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड‘मध्ये डिमॅट खाते उघडले असून देवस्थानाला १६०१०१००००३८४८२८ हा डिमॅट खाते क्रमांक देण्यात आला आहे.

तिरुपती बालाजी

 • आंध्रप्रदेशातील तिरुमला वेंकटेश्वराच्या मंदिरालाच ‘तिरुपती बालाजी‘ म्हणून ओळखले जाते. ‘तिरुपती बालाजी‘ हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते. प्रत्येक वर्षी त्यांना देणग्या स्वरुपात करोडो रुपये, मौल्यवान धातू आणि शेअर्सची प्रमाणपत्रे (स्टॉक सर्टिफिकेट्स) प्राप्त होत असतात. 
 • ऑगस्ट २०१४पर्यंत ‘तिरुपती बालाजी देवस्थाना‘ने भारतातील विविध बँकांमध्ये ५००० किलो सोने जमा केले आहे.
 • हे देवस्थान ऑनलाइन देणगी देखील स्वीकारते. त्यासाठी अनके बँकांशी करार (टाय-अप) करण्यात आले आहेत.

राणी रामपाल 'साइ'ची प्रशिक्षिका

 • भारतीय हॉकी संघाची खेळाडू राणी रामपालकडे सहायक प्रशिक्षकाची जबाबदारी सोपविली जाणार आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साइ) राणीच्या उत्तम प्रदर्शनाकडे बघून साईने तिच्या नियुक्तीसाठी नियमांत सूट दिली आहे.
 • हरयाणाच्या राणी रामपाल हिने २०१० मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. त्या वेळी ती अवघी १५ वर्षांची होती. 
 • तिने चॅम्पियन्स स्पर्धेत कझाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात चार गोल नोंदविले होते. या स्पर्धेतील सवरेत्कृष्ट युवा खेळाडूचे पारितोषिक तिला देण्यात आले. तसेच २०१० मध्ये तिला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघातर्फे दिला जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट युवा महिला खेळाडू पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.
 • २०१३ मध्ये भारतीय संघाने कनिष्ठ गटाच्या विश्वचषक स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. या यशात तिने केलेल्या आक्रमक खेळाचा मोठा वाटा होता.
 • राणी रामपाल ही सध्या भारताची भरवशाची खेळाडू आहे. तिने नुकत्याच झालेल्या जागतिक हॉकी लीग (उपांत्य फेरी) मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. तिच्या कामगिरीमुळेच भारतीय संघास ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील श्रीमंत व्यक्तींची यादी

  Bill Gates
 • जगभरातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील श्रीमंत व्यक्तींची यादी फोर्ब्जने जाहीर केली आहे. यामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी आणि विश्वविख्यात मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्‌स प्रथम क्रमांकावर आहेत.
 • फोर्ब्जने ५ ऑगस्टला जाहीर केलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील श्रीमंतांच्या यादीत शंभर व्यक्तींपैकी जवळजवळ ५१ व्यक्ती या अमेरिकेतील आहेत, तर  ३३ व्यक्ती या आशियातील आणि ८ युरोपमधील आहेत.
 • या शंभर व्यक्तींची एकूण संपत्ती ८४२.९ अब्ज डॉलर इतकी असल्याचे या यादीत म्हटले आहे. यामध्ये बिल गेट्‌स यांची संपत्ती ७९.६ अब्ज डॉलर इतकी आहे, तर त्यांच्यापाठोपाठ ओरॅकलचे संस्थापक लॅरी इल्लीसन यांचा क्रमांक असून त्यांची संपत्ती ५० अब्ज डॉलर इतकी आहे.
 • तिसऱ्या नंबरवर अमॅझोनचे जेफ्फी बेझोस असून त्यांची संपत्ती ४७.८ अब्ज डॉलर आहे. सोशल मिडियात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फेसबुक या संकेतस्थळाचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्गसुद्धा चौथ्या क्रमांकार आहेत. मार्क झुकरबर्गची संपत्ती ४१.२ अब्ज डॉलर आहे. यानंतर  
 • या यादीत गुगलचे लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन आणि अलीबाबाचे अध्यक्ष जॅक मा यांचाही समावेश आहे. 
 • गेल्या काही दिवसापूर्वी फोर्ब्जने सर्वाधिक श्रीमंत दाम्पत्य म्हणून बिल गेट्‌स व त्यांच्या पत्नी मेलिंडा यांचे नाव जाहीर केले होते.

मोदी गेलेल्या देशांतून २० अब्ज डॉलर्स 'एफडीआय'

 • गेल्या आर्थिक वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिलेल्या देशांकडून भारतात २० अब्ज डॉलर्सची थेट परकी गुंतवणूक करण्यात आली आहे. 
 • २०१४ -१५ या कालावधीत भारताकडून बाहेर ६.४२ अब्ज डॉलर्सची परकी गुंतवणूक करण्यात आली तर भारतात एकूण ७५.७१ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली, असे वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत लेखी स्वरूपात सांगितले आहे. 
 • याच काळात भारतातील कंपन्यांनी भूतान, ब्राझील, नेपाळ, जपान, अमेरिका, म्यानमार, ऑस्ट्रेलिया, सेशेल्स, मॉरिशस, फिजी, श्रीलंका व सिंगापूर या देशांमध्ये ३.४२ अब्ज डॉलर्सची थेट परकी गुंतवणूक केली आहे.
 • या कालावधीत भारतातील थेट विदेशी गुंतवणुकीत २७ टक्क्यांची वाढ झाली असून हे प्रमाण आता ३०.९२ अब्ज डॉलर्स झाले आहे.

इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिग्नलला १०१ वर्षे पूर्ण

 • जगभरातील वाहतुकीस शिस्तीचे वळण लावणाऱ्या इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिग्नलला ५ ऑगस्ट रोजी १०१ वर्षे पूर्ण झाली. आघाडीचे सर्च इंजिन गुगलनेही आपल्या होमपेजवर अनोख्या डूडलद्वारे या ऐतिहासिक घटनेचे स्मरण केले आहे.
  Google Doodle traffic Signal
 • लिस्टर वायर या उटाह प्रांतातील सॉल्टलेक सिटी शहरातील पोलिसाने सर्वप्रथम १९१२ मध्ये इलेक्ट्रिक ट्रॅफिक लाइटचा शोध लावला होता. याच सिग्नलमध्ये सर्वप्रथम लाल-हिरव्या रंगाचा वापर करण्यात आला होता.
 • पुढे ५ ऑगस्ट १९१४ मध्ये अमेरिकी ट्रॅफिक सिग्नल कंपनीने ओहियो प्रांतातील क्लेव्हलॅंडमध्ये ‘ईस्ट-१०५ स्ट्रीट अँड युक्लिड अव्हेन्यू’ येथील चौकामध्ये सर्वप्रथम सिग्नल यंत्रणा बसविली होती.
 • यामध्ये लाल आणि हिरव्या रंगाच्या दिव्यांच्या चार जोड्या होत्या. त्याला विद्युत पुरवठा करण्याचे काम नियंत्रण कक्षात नेमण्यात आलेले कर्मचारी करत असत. त्या कर्मचाऱ्यांनाही हे दिवे चालू बंद करताना मोठा त्रास होत असे.
 • पण कालौघात आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे काम स्वयंचलित झाले. आता तर संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून वाहतुकीवर थेट लक्ष ठेवता येते.