राणी रामपाल 'साइ'ची प्रशिक्षिका
- भारतीय हॉकी संघाची खेळाडू राणी रामपालकडे सहायक प्रशिक्षकाची जबाबदारी सोपविली जाणार आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साइ) राणीच्या उत्तम प्रदर्शनाकडे बघून साईने तिच्या नियुक्तीसाठी नियमांत सूट दिली आहे.
- हरयाणाच्या राणी रामपाल हिने २०१० मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. त्या वेळी ती अवघी १५ वर्षांची होती.
- तिने चॅम्पियन्स स्पर्धेत कझाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात चार गोल नोंदविले होते. या स्पर्धेतील सवरेत्कृष्ट युवा खेळाडूचे पारितोषिक तिला देण्यात आले. तसेच २०१० मध्ये तिला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघातर्फे दिला जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट युवा महिला खेळाडू पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.
- २०१३ मध्ये भारतीय संघाने कनिष्ठ गटाच्या विश्वचषक स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. या यशात तिने केलेल्या आक्रमक खेळाचा मोठा वाटा होता.
- राणी रामपाल ही सध्या भारताची भरवशाची खेळाडू आहे. तिने नुकत्याच झालेल्या जागतिक हॉकी लीग (उपांत्य फेरी) मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. तिच्या कामगिरीमुळेच भारतीय संघास ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मोदी गेलेल्या देशांतून २० अब्ज डॉलर्स 'एफडीआय'
- गेल्या आर्थिक वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिलेल्या देशांकडून भारतात २० अब्ज डॉलर्सची थेट परकी गुंतवणूक करण्यात आली आहे.
- २०१४ -१५ या कालावधीत भारताकडून बाहेर ६.४२ अब्ज डॉलर्सची परकी गुंतवणूक करण्यात आली तर भारतात एकूण ७५.७१ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली, असे वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत लेखी स्वरूपात सांगितले आहे.
- याच काळात भारतातील कंपन्यांनी भूतान, ब्राझील, नेपाळ, जपान, अमेरिका, म्यानमार, ऑस्ट्रेलिया, सेशेल्स, मॉरिशस, फिजी, श्रीलंका व सिंगापूर या देशांमध्ये ३.४२ अब्ज डॉलर्सची थेट परकी गुंतवणूक केली आहे.
- या कालावधीत भारतातील थेट विदेशी गुंतवणुकीत २७ टक्क्यांची वाढ झाली असून हे प्रमाण आता ३०.९२ अब्ज डॉलर्स झाले आहे.
निवडणुकीत मतदान बंधनकारक करणारे गुजरात देशातील पहिले राज्य
- गुजरात सरकारने राज्यातील स्थानिक निवडणुकीत मतदान न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.
- गुजरात स्थानिक कायदा २००९ संशोधक अॅक्ट अंतर्गत हा निर्णय घेतला असून स्थानिक निवडणुकीत मतदान बंधनकारक करणारे गुजरात हे देशातील पहिले राज्य ठरलं आहे.
- गुजरातमध्ये गतवर्षी स्थानिक निवडणुकीत केवळ ५० ते ६० टक्क्यापर्यंत मतदान झाले होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. गुजरात पंचायत निवडणूक नियम (संशोधन) २०१५ आणि नगर पालिका निवडणूक नियम (संशोधन) २०१५ अंतर्गत मतदान न करणाऱ्या व्यक्तीला १०० रुपये दंड केला जाणार आहे.
- निवडणुकीत मतदान न करणाऱ्या व्यक्तीला मॉनिटरी दंड आणि सोशल सर्विस अंतर्गत शिक्षा दिली जाऊ शकते. तसेच त्या व्यक्तीला सरकारी योजनेपासूनही वंचित ठेवण्याचा सरकार पातळीवर विचार सुरु आहे.
- मतदान यादीत नाव असलेल्या पण मतदान न करणाऱ्या व्यक्तींना निवडणूक अधिकारी मतदानानंतर नोटीस बजावतील. महिनाभराच्या आत त्या व्यक्तीला मतदान न करण्याचे कारण सांगावे लागेल. दोषी आढळल्यास १५ दिवसात त्या व्यक्तीला १०० रुपये दंड भरावा लागेल.
‘नागा’ करारावर शेजारी राज्यांचा आक्षेप
- नागालँडमध्ये शांतता नांदावी म्हणून केंद्र सरकारने केलेल्या ऐतिहासिक करारावर अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मणिपूर या शेजारी राज्यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.
- ‘हा करार करताना केंद्र सरकारने आम्हाला विश्वासात घेतले नाही. त्यामुळेच आमच्या राज्यांची एक इंचही जमीन आम्ही देणार नाही’, असा ठाम पवित्रा या तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. या भूमिकेमुळे ‘नागा’ करार पेचात सापडण्याची शक्यता आहे.
पार्श्वभूमी
- नागा बंडखोरांशी तब्ब्ल १६ वर्षे चाललेल्या चर्चेला ३ ऑगस्ट रोजी मूर्त स्वरूप आले.
- नागालँडमधील ‘नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड’ (इसाक-मुईवाह) या बंडखोर गटाबरोबरच्या ऐतिहासिक करारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सरकार आणि संघटनेच्या प्रतिनिधींनी स्वाक्षऱ्या केल्या.
- या कराराने नागालँडमध्ये शांततेची नवी पहाटच उजाडल्याचे दिसत होते मात्र आता शेजारी राज्यांनीच त्यावर आक्षेप घेऊन वादाची ठिणगी टाकलीय.
मंगळ ग्रहाची सफर ऑनलाइन
- अमेरिकी अवकाश संशोधन संस्थेने (नासा) क्युरिऑसिटी रोव्हर या मंगळ यानाच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मंगळ ग्रहाची सफर ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यानाने केलेला मंगळप्रवास त्यामुळे अनुभवता येईल. मुख्य म्हणजे यामुळे नवोदित संशोधक, विद्यार्थी आणि जिज्ञासूंना हा खजिना उपलब्ध होणार आहे.
- ‘क्युरिऑसिटी रोव्हर’ मंगळाची अद्भूत सफर केली आहे. त्यातून ‘नासा’कडे मोठ्या प्रमाणावर छायाचित्रे व माहिती संकलित झाली आहे. शिवाय ५० वर्षांतील अन्य यानाच्या मदतीने मिळालेली माहितीही ऑनलाइन उपलब्ध करून दिली जाणार आहे.
- ‘मार्स ट्रेक’ हे वेबबेस्ड अॅप्लिकेशन असून, ते नेटकरांना विनामूल्य उपलब्ध असेल. मंगळावर पहिली मानवी मोहीम २०३०मध्ये आखली जाणार आहे. त्यासाठी इच्छुकांची नोंदणी करण्यासाठी व अन्य माहितीची आदानप्रदान करण्यासाठी ‘मार्स ट्रेक’चा वापर सध्या केला जातो.
- ६ ऑगस्ट २०१२ रोजी नासाने क्युरिऑसिटी रोव्हर हे यान मंगळावर सोडले. कारच्या आकाराचे हे यान यशस्वीपणे मंगळावर उतरलेच पण त्याच्यावर सोपविण्यात आलेले कामही ते चोख पार पाडते आहे. या यानाकडून मिळालेली माहिती, मातीचे नमुने, प्रतिमा अतिशय महत्त्वाच्या आहेत.
अॅमेझॉनने पुण्यात ग्राहक सेवा केंद्र
- ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीच्या अॅमेझॉनने पुण्यात तिसरे ग्राहक सेवा केंद्र सुरू करीत असल्याची घोषणा केली आहे.
- कंपनीने २००५मध्ये पहिले केंद्र हैदराबादमध्ये सुरू केले. त्यानंतर गेल्या वर्षी दुसरेही केंद्र हैदराबादमध्येच सुरू करण्यात आले.
- या केंद्रांच्या माध्यमातून अॅमेझॉन डॉट इन आणि अॅमेझॉन डॉट कॉम या वेबसाइटसना सपोर्ट देण्यात येत आहे. या शिवाय ई-मेल, चॅट, फोन आणि सोशल माध्यमांद्वारे येणाऱ्या ग्राहकांच्या मागण्यांची पूर्तता येथून करण्यात येते.
- या केंद्रातून किमान शंभर जणांना रोजगार मिळेल. देशात विस्तार करण्यासाठी गेल्या वर्षी १२,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे सूतोवाच कंपनीतर्फे करण्यात आले होते.
गतिमंदांच्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताला १७३ पदके
- लॉस अँन्जेलीस येथे झालेल्या गतिमंदांच्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत भारताने तब्बल १७३ पदकांची कमाई केली आहे.
- ‘स्पेशल ऑलिंपिक भारत’ या नावाने गतिमंदांच्या उन्हाळी ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या २७५ जणांच्या भारतीय संघाने १४ वेगवेगळ्या खेळांमधील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ४७ सुवर्ण, ५४ रौप्य आणि ७२ कांस्य पदके पटकावली आहे.
- अॅथलेटिक्समध्ये भारताने सर्वात चांगली कामगिरी करत ४७ पदकांची कामाई केली, ज्यात दोन वेगवेगळ्या प्रकारच्या १०० मीटर शर्यतींमधील दोन सुवर्ण पदकांचाही समावेश आहे. सॉफ्ट बॉल या प्रकारात प्रथमच भाग घेणाऱ्या भारतीय संघाने थेट सुवर्ण पदक पटकावले.
- २०११मध्ये ग्रीसमधील अथेन्समध्ये झालेल्या गतिमंदांच्या उन्हाळी ऑलंपिक स्पर्धांमध्ये भारताने १५६ पदके जिंकली होती. यात ५६ सुवर्ण, ४६ रौप्य आणि ५२ कांस्य पदकांचा समावेश होता.
- २०१७ मध्ये गतिमंदांच्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार आहेत.