चालू घडामोडी - १७ ऑगस्ट २०१५ [Current Affairs - August 17, 2015]

‘अ‍ॅम्फी’च्या सीईओपदी सी. व्ही. आर. राजेंद्रन

    C.V.R. Rajendran
  • ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया’ अर्थात ‘अ‍ॅम्फी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सार्वजनिक आंध्रा बँकेचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सी. व्ही. आर. राजेंद्रन हे नियुक्त झाले आहेत.
  • या पदावरील व बँक व्यवस्थापन संघटना ‘इंडियन बँक्स असोसिएशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेले एच. एस. सिनोर हे सप्टेंबरअखेरिस निवृत्त होत आहेत. ए. पी. कुरियन यांच्याकडून सिनोर यांनी २०१० मध्ये अ‍ॅम्फीची सूत्रे हाती घेतली होती.
  • सिनोर स्वत: आयसीआयसीआय बँकेचे वरिष्ठ अधिकारी राहिले आहेत. त्यांच्या नव्या वारसदारासाठी मेपासून नेमलेल्या त्रिसदस्यीस समितीने अखेर राजेंद्रन यांच्या नावावर शिक्कोमोर्तब केले.
  • राजेंद्रन हे २०१३ मध्ये आंध्रा बँकेत रुजू झाले. तत्पूर्वी ते बँक ऑफ इंडिया आणि कॉर्पोरेशन बँकेतही कार्यरत होते.

राष्ट्रपती प्रणब मुखर्जींच्या पत्नी शुभ्रा मुखर्जी यांचे निधन

  • राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या पत्नी शुभ्रा मुखर्जी यांचे १८ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या.
  • श्वसनाचा त्रास होत असल्याने गेल्या ११ दिवसांपासून आर्मी रिसर्च अ‍ॅन्ड रेफरल हॉस्पिटलमध्ये (लष्करी रुग्णालय) त्यांच्यावर उपचार सुरू होते.
 शुभ्रा मुखर्जी यांच्याविषयी 
  • शुभ्रा मूळच्या बांग्लादेशच्या जेस्सोर येथील असून त्या १० वर्षांच्या असताना त्यांचे कुटुंब कोलकात्याला स्थायिक झाले होते. पदवीधर असलेल्या शुभ्रा यांचा जन्म १७ सप्टेंबर १९४० रोजी झाला होता.
  • त्यांच्यावर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा प्रभाव होता. त्यांनी अनेक वर्षे देशातच नव्हे तर युरोप, आशिया आणि आफ्रिकेत रवींद्र संगीत गायन आणि नृत्य, नाटकांचे प्रभावी सादरीकरण केले होते. 
  • रवींद्रनाथांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी गीतांजली संगीत समूहाची स्थापना केली होती.
  • याशिवाय शुभ्रा यांनी ‘चोखेर आलोय’ आणि ‘चेना अचेनाई चिन’ या दोन पुस्तकांचे लेखन देखील केले आहे. चोखेर आलोय’ या पुस्तकात त्यांच्या आणि इंदिरा गांधी यांच्यातील संभाषणाच्या नोंदी आहेत आणि ‘चेना अचेनाई चिन’ या पुस्तकात त्यांच्या चीन दौऱ्याचे वर्णन आहे.
  • प्रणव मुखर्जी आणि शुभ्रा यांचा विवाह १३ जुलै १९५७ रोजी झाला. काँग्रेसचे खासदार अभिजित मुखर्जी आणि इंद्रजित आणि कन्या शर्मिष्ठा ही त्यांची अपत्ये होत.

‘मार्शमॅलो’ - गुगल अँड्रॉइड फोनचे नवीन व्हर्जन

    Android Marshmallow
  • आईसक्रीम (४.०), जेलीबीन (४.१), किटकॅट (४.४), आणि लॉलिपॉप (५.०) नंतर गुगलचे ‘मार्शमॅलो’ (६.०) या नावाचे अँड्रॉइडचे पुढील व्हर्जन लवकरच बाजारात दाखल होणार आहे.
  • नवीन ‘मार्शमॅलो’चे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये फिंगरप्रिंट सेंन्सर व सुधारीत पॉवर सेव्हिंग मोड असणार आहे.
  • तसेच प्रत्येक नवीन अॅप्लिकेशन डाऊनलोड करताना किंवा ते अपडेट करताना युजर्सना संमतीची आवश्यकता भासणार नाही. 
  • जगभरातील ऐंशी टक्के स्मार्टफोन युजर्स अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम वापरतात. तसेच टॅबलेट करता अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम ही प्रभावशाली ठरत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

अनिर्बन लाहिरी पीजीए अजिंक्यपद स्पर्धेत पाचव्या स्थानी

  • भारताचा गोल्फपटू अनिर्बन लाहिरी याने पीजीए अजिंक्यपद स्पर्धेत पाचवे स्थान पटकावून इतिहास घडविला आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेत अव्वल पाच खेळाडूंमध्ये स्थान पटकावणारा तो पहिला भारतीय गोल्फपटू आहे.
  • लाहिरीने ७०-६७-७०-६८ अशा गुणांची कमाई करताना ही ऐतिहासिक झेप घेतली. 
  • या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या जेसन डे याने जेतेपद पटकावले.
  • २८ वर्षीय लाहिरी मलेशियन ओपन आणि हिरो इंडियन ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावून चर्चेत आले होते.

अँडी मरेला रॉजर्स चषकाचे जेतेपद

    Murray beats Djokovic to win the Rogers Cup
  • जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचविरुद्धची आठ पराभवांची मालिका खंडित करत अँडी मरेने रॉजर्स चषक जेतेपदावर नाव कोरले.
  • कारकीर्दीतील मरेचे हे ३५वे जेतेपद आहे. २०१३ विम्बल्डन स्पर्धेतील विजयानंतर पहिल्यांदाच मरेने जोकोव्हिचला नमवण्याची किमया केली.
  • या लढतीत मरेने जोकोव्हिचवर ६-४, ४-६, ६-३ अशा फरकाने विजय मिळवला. अँडी मरेने हा विजय प्रशिक्षक अ‍ॅमेली मॉरेस्मो यांना समर्पित केला.

अदिती चौहान इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये

  • फुटबॉल विश्वाचा मानबिंदू असलेल्या व प्रदीर्घ वारसा लाभलेल्या इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेच्या महिला प्रारूपात दिल्लीकर फुटबॉलपटू गोलकीपर अदिती चौहान खेळणार आहे.
  • वेस्ट हॅम क्लबने तिच्याशी करार केला असून, या स्पर्धेतील क्लबद्वारे करारबद्ध होणारी ती पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू आहे.
  • मलेशियात झालेल्या एएफसी पात्रता फेरी स्पर्धेत अदितीने भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले होते. २०१३ मध्ये दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाच्या महिला चषक स्पर्धेचे जेतेपद भारताला मिळवून देण्यात अदितीने निर्णायक भूमिका बजावली होती.
  • फुटबॉल संघटनेतील महिलांच्या प्रीमिअर लीगच्या दक्षिण विभाग वेस्ट हॅम तिसऱ्या दर्जाचा संघ आहे.

सुरक्षा परिषदेसाठी भारताला रशियाचा पाठिंबा

  • काही दिवसांपूर्वीच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरुपी सदस्यत्व देण्याच्या भारताच्या मागणीला विरोध करणाऱ्या रशियानेच आता भारतासह ब्राझीललाही पाठिंबा दर्शवला आहे.
  • संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेला ७० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल महासभेच्या होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, रशियाने भारताला दिलेला पाठिंबा महत्त्वाचा मानला जात आहे. 
  • सुरक्षा परिषदेत आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेला अद्यापही प्रतिनिधित्त्व मिळालेले नाही. त्यामुळेच रशियाने सुरक्षा परिषदेतील कायमस्वरूपी सदस्य देण्यात यावे, या भारत आणि ब्राझीलच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.

रेल्वेच्या नव्या एसी कोचचे उद्घाटन

  • रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवास आरामदायी आणि सुरक्षित करण्यासाठी एसी थ्री टियर डब्याच्या (AC 3 - tier coach) रचनेत बदल केला आहे.
  • टप्प्याटप्प्याने सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील एसी थ्री टियर डब्यांचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. हे काम झाल्यानंतर रेल्वे लांब पल्ल्याच्या गाड्यांतील सेकंड क्लासच्या डब्यांच्या रचनेत बदल करणार आहे.
 नव्या रुपातल्या एसी थ्री टियर डब्याची वैशिष्ट्ये 
  • दोन्ही बाजूला उघडणारे प्रवेशद्वारे आणि डब्यातील दोन्ही प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही कॅमेरा तसेच आपत्काळात बाहेर पडण्यासाठी सहा खिडक्या
  • टॉयलेटमध्ये आत एखादी व्यक्ती असल्यास दरवाजाबाहेर एक इंडिकेटर ऑन होणार
  • अंधांसाठी डब्यात ब्रेल लिपीतल्या सूचना
  • डब्याबाहेर लावलेला रिझर्व्हेशन चार्ट वाचणे सोपे व्हावे यासाठी एलईडी दिव्याची सोय
  • डब्यात वरच्या बर्थवर जाणे सोपे व्हावे यासाठी नव्या पद्धतीची शिडी
  • डब्यात मोबाइल चार्जर पॉइंट आणि होल्डर
  • संपूर्ण एसी थ्री टियर डब्यात एलईडी दिव्यांची सोय

इंडियन इंन्स्टिट्युट ऑफ सायन्स (बेंगळुरू) ‘टॉप-५००’ विद्यापीठांमध्ये

  • शांघायच्या जियाओ तोन विद्यापीठाद्वारा अॅकॅडमिक रँकिंग ऑफ वर्ल्ड युनिव्हर्सिटीज् (एआरडब्ल्युयू) ने जगभरातील ‘टॉप - ५००’ विद्यापीठांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात देशातील इंडियन इंन्स्टिट्युट ऑफ सायन्स, बेंगळुरू विद्यापीठ वगळता एकाही विद्यापीठाला स्थान मिळवता आले नाही. 
  • विशेष म्हणजे २००३-०४ या वर्षात याच यादित स्थान मिळवणारे बेंगळुरू विद्यापीठ हे एकमेव होते, मात्र त्यावेळी त्याचे यादीतील स्थान पहिल्या २०० मध्ये होते. ते आता घसरले आहे.
  • ‘एआरडब्ल्यूयू’द्वारा दरवर्षी जगभरातील १२०० विद्यापीठांची क्रमवारी निश्चित केली जाते. त्यातील सर्वोत्तम ५०० विद्यापीठांची यादी प्रकाशित करण्यात येते. 
  • टॉप-१० मध्ये एकट्या अमेरिकेची ८ विद्यापीठे 
  • उर्वरित दोन विद्यापीठे ही इंग्लंडमधील आहेत. 
  • टॉप-१०० मध्ये अमेरिकेची ५१ विद्यापीठे आहेत. 
  • सलग १३ वर्षे हार्वर्ड युनिव्हर्सिटी अव्वल स्थानी 
  • टॉप-१० मध्ये स्टॅनफर्ड, एमआयटी, ब्रिक्ली, कॅम्ब्रिज, प्रिंस्टन, कॅलटेक, कोलंबिया, शिकागो और ऑक्सफर्ड या विद्यापीठांचा समावेश आहे. 
  • या यादीत आशियाई देशांत युनिव्हर्सिटी ऑफ टोकिओ २१ व्या स्थानी, तर क्योटो विद्यापीठ २६ व्या स्थानी आहे. 
  • युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न ४४ व्या स्थानी आहे. इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ वॉरविक ९२ व्या स्थानी असून या यादीतील टॉप-१०० मध्ये या विद्यापीठाने पहिल्यांदाच स्थान पटकावले आहे.

ललित मोदींची सिंगापूरमधील बँक खाती गोठवली

  • आयपीएल माजी प्रमुख ललित मोदी यांच्या अडचणीत वाढ झाली असून अंमलबजावणी संचलनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) मागणीची दखल घेत सिंगापूर सरकारद्वारे ललित मोदी यांची दोन बँक खाती गोठविण्यात आली आहेत. तसेच तेथील सरकारने ललित मोदींविरोधात आणखी माहितीची मागणी भारताकडे केली आहे. 
  • ललित मोदी प्रकरणावरून सिंगापूर सरकारच्या अधिकाऱ्यांमध्ये गेले काही दिवस चर्चा सुरू होती. या चर्चेनंतर मोदींची दोन बँक खाती गोठवण्यात आली. 
  • सीबीआयने इंटरपोलला पत्रव्यवहारकरून ललित मोदी यांच्याविरोधात रेट कॉर्नर नोटीस जारी करण्याची मागणी केली आहे. यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता असून ही नोटीस जारी करण्यात आल्यास ललित मोदींना अटक होऊ शकते.
  • यूपीएच्या कार्यकाळात मोदी यांच्याविरुद्ध फक्त ‘फेमा’ चे प्रकरण दाखल करण्यात आले, ज्यात अटकेची तरतूद नसून जास्तीत जास्त शिक्षा फक्त दंडाची आहे. त्यांच्याविरुद्ध जी ‘लाइट ब्ल्यू कॉर्नर नोटीस’ जारी करण्यात आली होती, ती केवळ क्षेत्रीय विमानतळांसाठी लागू आहे. यामुळे परदेशात बसलेल्या व्यक्तीला अटक करणे शक्य नव्हते.
  • त्यामुळे रेड कॉर्नर नोटीस बजावून ललित मोदींना भारतात आणण्यासाठीचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत असे दिसून येते.

‘मांझी - द माऊण्टन मॅन’ उत्तर प्रदेशात करमुक्त

  • ‘मांझी - द माऊण्टन मॅन’ हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय उत्तर प्रदेश राज्य सरकारने घेतला असल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सांगितले.
  • गया जिल्ह्य़ातील गैहलौर गावातील गरीब कामगार दशरथ मांझी यांच्या जीवनावर हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. दशरथ मांझी यांना ‘माऊण्टन मॅन’ म्हणून ओळखले जाते. 
  • हा चित्रपट केतन मेहता यांनी दिग्दर्शित केला असून नवाझुद्दीन सिद्दिकी यांनी मांझी यांची भूमिका साकारली आहे.

फिफा अध्यक्षपदासाठी चुंग माँग जून मैदानात

  • दक्षिण कोरियाचे अब्जाधीश उद्योगपती चुंग माँग जून यांनीही आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली आहे.
  • अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकताना चुंग यांनी मावळते अध्यक्ष सेप ब्लाटर यांच्यावर टीकेचा भडिमार केला आणि पुढील चार वर्षांत फिफामधील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करणार असल्याचा दावाही केला.
  • याआधी यूएफाचे अध्यक्ष मिचेल प्लॅटिनी, ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू झिको आणि लिबेरियन फुटबॉल असोसिएशनचे प्रमुख मुसा बिलिटी यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली आहे.
 पार्श्वभूमी 
  • झुरिच येथे स्वित्झर्लंड पोलीस अधिकाऱ्यांनी धाड टाकून फिफाच्या सात अधिकाऱ्यांना लाचखोरीच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर संघटनेची प्रतिमा मलिन झाली.
  • अमेरिकेच्या पोलीस अधिकाऱ्यांना १५० दशलक्ष डॉलरची लाच घेतल्याप्रकरणी आरोप दाखल केलेल्या १४ जणांमध्ये या सात अधिकाऱ्यांचा समावेश होता. 
  • ब्लाटर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या जागेसाठी फेब्रुवारी २०१६ मध्ये निवडणूक घेण्याचा निर्णय फिफा सदस्यांनी घेतला आहे.

काश्मिरातील कट्टरवादी अंद्राबीवर गुन्हा

  • पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त काश्मीरमध्ये पाकचा झेंडा फडकवणाऱ्या आणि दहशतवादी हाफिज सईदच्या रॅलीत फोनवरून सहभागी झालेल्या ‘दुखतरन-ए-मिल्लत’ या कट्टरवादी संघटनेच्या प्रमुख असिया अंद्राबी यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
  • बेकायदेशीर कृती कायद्याच्या कलम १३ अन्वये अंद्रबीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून गरज पडल्यास आणखी काही गंभीर कलमंही त्यांच्यावर लावली जाणार आहेत.
  • असिया अंद्रबी यांनी १४ ऑगस्टला काश्मीरमधील बचपोरा भागात पाकचा स्वातंत्र्यदिन साजरा केला होता. पाकचा झेंडा फडकवून त्यांनी त्यांचं राष्ट्रगीतही गायलं होते.
Previous Post Next Post