चालू घडामोडी - १८ ऑगस्ट २०१५ [Current Affairs - August 18, 2015]
bySunil Jadhavar•
0
अँडी मरेला रॉजर्स चषकाचे जेतेपद
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचविरुद्धची आठ पराभवांची मालिका खंडित करत अँडी मरेने रॉजर्स चषक जेतेपदावर नाव कोरले.
कारकीर्दीतील मरेचे हे ३५वे जेतेपद आहे. २०१३ विम्बल्डन स्पर्धेतील विजयानंतर पहिल्यांदाच मरेने जोकोव्हिचला नमवण्याची किमया केली.
या लढतीत मरेने जोकोव्हिचवर ६-४, ४-६, ६-३ अशा फरकाने विजय मिळवला. अँडी मरेने हा विजय प्रशिक्षक अॅमेली मॉरेस्मो यांना समर्पित केला.
अदिती चौहान इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये
फुटबॉल विश्वाचा मानबिंदू असलेल्या व प्रदीर्घ वारसा लाभलेल्या इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेच्या महिला प्रारूपात दिल्लीकर फुटबॉलपटू गोलकीपर अदिती चौहान खेळणार आहे.
वेस्ट हॅम क्लबने तिच्याशी करार केला असून, या स्पर्धेतील क्लबद्वारे करारबद्ध होणारी ती पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू आहे.
मलेशियात झालेल्या एएफसी पात्रता फेरी स्पर्धेत अदितीने भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले होते. २०१३ मध्ये दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाच्या महिला चषक स्पर्धेचे जेतेपद भारताला मिळवून देण्यात अदितीने निर्णायक भूमिका बजावली होती.
फुटबॉल संघटनेतील महिलांच्या प्रीमिअर लीगच्या दक्षिण विभाग वेस्ट हॅम तिसऱ्या दर्जाचा संघ आहे.
सुरक्षा परिषदेसाठी भारताला रशियाचा पाठिंबा
काही दिवसांपूर्वीच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरुपी सदस्यत्व देण्याच्या भारताच्या मागणीला विरोध करणाऱ्या रशियानेच आता भारतासह ब्राझीललाही पाठिंबा दर्शवला आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेला ७० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल महासभेच्या होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, रशियाने भारताला दिलेला पाठिंबा महत्त्वाचा मानला जात आहे.
सुरक्षा परिषदेत आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेला अद्यापही प्रतिनिधित्त्व मिळालेले नाही. त्यामुळेच रशियाने सुरक्षा परिषदेतील कायमस्वरूपी सदस्य देण्यात यावे, या भारत आणि ब्राझीलच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.
रेल्वेच्या नव्या एसी कोचचे उद्घाटन
रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवास आरामदायी आणि सुरक्षित करण्यासाठी एसी थ्री टियर डब्याच्या (AC 3 - tier coach) रचनेत बदल केला आहे.
टप्प्याटप्प्याने सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील एसी थ्री टियर डब्यांचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. हे काम झाल्यानंतर रेल्वे लांब पल्ल्याच्या गाड्यांतील सेकंड क्लासच्या डब्यांच्या रचनेत बदल करणार आहे.
इंडियन इंन्स्टिट्युट ऑफ सायन्स (बेंगळुरू) ‘टॉप-५००’ विद्यापीठांमध्ये
शांघायच्या जियाओ तोन विद्यापीठाद्वारा अॅकॅडमिक रँकिंग ऑफ वर्ल्ड युनिव्हर्सिटीज् (एआरडब्ल्युयू) ने जगभरातील ‘टॉप - ५००’ विद्यापीठांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात देशातील इंडियन इंन्स्टिट्युट ऑफ सायन्स, बेंगळुरू विद्यापीठ वगळता एकाही विद्यापीठाला स्थान मिळवता आले नाही.
विशेष म्हणजे २००३-०४ या वर्षात याच यादित स्थान मिळवणारे बेंगळुरू विद्यापीठ हे एकमेव होते, मात्र त्यावेळी त्याचे यादीतील स्थान पहिल्या २०० मध्ये होते. ते आता घसरले आहे.
‘एआरडब्ल्यूयू’द्वारा दरवर्षी जगभरातील १२०० विद्यापीठांची क्रमवारी निश्चित केली जाते. त्यातील सर्वोत्तम ५०० विद्यापीठांची यादी प्रकाशित करण्यात येते.
टॉप-१० मध्ये एकट्या अमेरिकेची ८ विद्यापीठे
उर्वरित दोन विद्यापीठे ही इंग्लंडमधील आहेत.
टॉप-१०० मध्ये अमेरिकेची ५१ विद्यापीठे आहेत.
सलग १३ वर्षे हार्वर्ड युनिव्हर्सिटी अव्वल स्थानी
टॉप-१० मध्ये स्टॅनफर्ड, एमआयटी, ब्रिक्ली, कॅम्ब्रिज, प्रिंस्टन, कॅलटेक, कोलंबिया, शिकागो और ऑक्सफर्ड या विद्यापीठांचा समावेश आहे.
या यादीत आशियाई देशांत युनिव्हर्सिटी ऑफ टोकिओ २१ व्या स्थानी, तर क्योटो विद्यापीठ २६ व्या स्थानी आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न ४४ व्या स्थानी आहे. इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ वॉरविक ९२ व्या स्थानी असून या यादीतील टॉप-१०० मध्ये या विद्यापीठाने पहिल्यांदाच स्थान पटकावले आहे.
ललित मोदींची सिंगापूरमधील बँक खाती गोठवली
आयपीएल माजी प्रमुख ललित मोदी यांच्या अडचणीत वाढ झाली असून अंमलबजावणी संचलनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) मागणीची दखल घेत सिंगापूर सरकारद्वारे ललित मोदी यांची दोन बँक खाती गोठविण्यात आली आहेत. तसेच तेथील सरकारने ललित मोदींविरोधात आणखी माहितीची मागणी भारताकडे केली आहे.
ललित मोदी प्रकरणावरून सिंगापूर सरकारच्या अधिकाऱ्यांमध्ये गेले काही दिवस चर्चा सुरू होती. या चर्चेनंतर मोदींची दोन बँक खाती गोठवण्यात आली.
सीबीआयने इंटरपोलला पत्रव्यवहारकरून ललित मोदी यांच्याविरोधात रेट कॉर्नर नोटीस जारी करण्याची मागणी केली आहे. यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता असून ही नोटीस जारी करण्यात आल्यास ललित मोदींना अटक होऊ शकते.
यूपीएच्या कार्यकाळात मोदी यांच्याविरुद्ध फक्त ‘फेमा’ चे प्रकरण दाखल करण्यात आले, ज्यात अटकेची तरतूद नसून जास्तीत जास्त शिक्षा फक्त दंडाची आहे. त्यांच्याविरुद्ध जी ‘लाइट ब्ल्यू कॉर्नर नोटीस’ जारी करण्यात आली होती, ती केवळ क्षेत्रीय विमानतळांसाठी लागू आहे. यामुळे परदेशात बसलेल्या व्यक्तीला अटक करणे शक्य नव्हते.
त्यामुळे रेड कॉर्नर नोटीस बजावून ललित मोदींना भारतात आणण्यासाठीचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत असे दिसून येते.
‘मांझी - द माऊण्टन मॅन’ उत्तर प्रदेशात करमुक्त
‘मांझी - द माऊण्टन मॅन’ हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय उत्तर प्रदेश राज्य सरकारने घेतला असल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सांगितले.
गया जिल्ह्य़ातील गैहलौर गावातील गरीब कामगार दशरथ मांझी यांच्या जीवनावर हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. दशरथ मांझी यांना ‘माऊण्टन मॅन’ म्हणून ओळखले जाते.
हा चित्रपट केतन मेहता यांनी दिग्दर्शित केला असून नवाझुद्दीन सिद्दिकी यांनी मांझी यांची भूमिका साकारली आहे.
फिफा अध्यक्षपदासाठी चुंग माँग जून मैदानात
दक्षिण कोरियाचे अब्जाधीश उद्योगपती चुंग माँग जून यांनीही आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकताना चुंग यांनी मावळते अध्यक्ष सेप ब्लाटर यांच्यावर टीकेचा भडिमार केला आणि पुढील चार वर्षांत फिफामधील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करणार असल्याचा दावाही केला.
याआधी यूएफाचे अध्यक्ष मिचेल प्लॅटिनी, ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू झिको आणि लिबेरियन फुटबॉल असोसिएशनचे प्रमुख मुसा बिलिटी यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली आहे.
काश्मिरातील कट्टरवादी अंद्राबीवर गुन्हा
पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त काश्मीरमध्ये पाकचा झेंडा फडकवणाऱ्या आणि दहशतवादी हाफिज सईदच्या रॅलीत फोनवरून सहभागी झालेल्या ‘दुखतरन-ए-मिल्लत’ या कट्टरवादी संघटनेच्या प्रमुख असिया अंद्राबी यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बेकायदेशीर कृती कायद्याच्या कलम १३ अन्वये अंद्रबीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून गरज पडल्यास आणखी काही गंभीर कलमंही त्यांच्यावर लावली जाणार आहेत.
असिया अंद्रबी यांनी १४ ऑगस्टला काश्मीरमधील बचपोरा भागात पाकचा स्वातंत्र्यदिन साजरा केला होता. पाकचा झेंडा फडकवून त्यांनी त्यांचं राष्ट्रगीतही गायलं होते.
अश्वनी लोहानी 'एअर इंडिया'चे नवे अध्यक्ष
'एअर इंडिया'चे नवे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून 'इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ मेकॅनिकल इंजिनीअर्स'चे (आयआरएसएमई) अधिकारी अश्वनी लोहानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी असेल.
एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीच्या अध्यक्षपदी सध्या असलेले रोहित नंदन यांचा विस्तारित कार्यकाळ आज, २१ ऑगस्ट रोजी संपतो आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने लोहानी यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने या नियुक्तीचे आदेश जारी केले.
'आयआरएसएमई'च्या १९८०च्या बॅचचे अधिकारी असलेले लोहानी सध्या मध्य प्रदेश पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून भोपाळ येथे कार्यरत आहेत.
'एअर इंडिया'चे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक रोहित नंदन उत्तर प्रदेश केडरचे १९८२च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या वर्षी ११ ऑगस्ट रोजी त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता; मात्र त्या वेळी त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती.
कठीण काळातून कंपनीला वर काढून जागतिक दर्जाच्या स्टार अलायन्स या गटात सहभागी होण्यापर्यंतची वाटचाल त्यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. ती बाब लक्षात ठेवून त्यांना २१ ऑगस्ट २०१५पर्यंतची मुदतवाढ गेल्या ऑक्टोबर महिन्यात देण्यात आली होती.
'फिच' पाठोपाठ ‘मूडीज’नेही आर्थिक विकासदर खुंटवला
आर्थिक सुधारणांना मिळत नसलेली गती आणि देशाच्या बहुतांश भागावर घोंघावणारे कोरडय़ा दुष्काळाचे सावट यामुळे आघाडीच्या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थांनी भारताच्या आर्थिक विकास दराचे अंदाज खालावत आणले आहेत.
स्टेट बँकेचे 'बडी' अॅप
देशातील सर्वात मोठय़ा भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी मोबाइलद्वारे कैक प्रकारचे बँकिंग व्यवहार शक्य करणारे अॅप 'बडी' या नावाने प्रस्तूत केले.
अनेक प्रकारच्या देयकांचा भरणा, सिनेमा, विमान प्रवास तिकिटांचे आरक्षण, हॉटेल बुकिंग यासाठी केवळ मोबाइल फोनचा वापर या अॅपद्वारे शक्य होईल.
अॅक्सेन्च्युअर आणि मास्टरकार्ड यांच्या सहयोगाने बनविलेले हे अॅपद्वारे व्यवहार सुरक्षित व विनासायास असण्याबरोबरच, त्यात देयकांचा भरणा करण्याच्या तारखांचे स्मरण करून देणारे गजर हे अतिरिक्त वैशिष्टय़ आहे.
स्टेट बँकेच्या अध्यक्षा : अरुंधती भट्टाचार्य
पीएफमधील रक्कम ऑनलाइन काढण्याची योजना पुनर्विचारार्थ
भविष्य निर्वाह निधी खात्यातील ऑनलाइन रक्कम काढण्यासाठी आधार कार्ड क्रमांक नोंदविणे अनिवार्य करण्याच्या निर्णयावर निधीचे व्यवस्थापन पाहणारी निवृत्त निधी संघटना (ईपीएफओ) पुनर्विचार करणार आहे.
तत्पूर्वी ईपीएफओने तिच्या खातेदारांसाठी निवृत्त निधीची रक्कम ऑनलाइन माध्यमातून काढून घेण्यासाठी लाभधारकांना आधार कार्ड क्रमांक सक्तीचा केला होता.
ज्या धारकांकडे आधार कार्ड क्रमांक आहे त्यांचे भविष्य निर्वाह खाते संकेतस्थळाद्वारे जोडून ही उपाययोजना संबंधित खात्यातून रक्कम काढून घेण्यासाठी उपयोगात आणण्याची संघटनेची योजना आहे. त्याबाबत कायदेशीर मत विचारात घेण्यात येणार आहे.
विद्यमान रचनेत खातेधारकाला निधी काढायचा असेल तर लेखी अर्ज सादर करावा लागतो. तसेच यापूर्वी खातेदाराला त्याच्या बँकेचा 'रद्द' धनादेश निर्वाह निधी संघटनेकडे द्यावा लागत असे.
नव्या रचनेत खातेधारकाला वैश्विक खाते क्रमांक दिला गेला आहे. आधार कार्ड व बँक खाते हे भविष्य निर्वाह निधी खात्याशी जोडले गेल्यानंतर रक्कम काढावयाची झाल्यास ऑनलाइन अर्ज केल्यानंतर ती आपोआपच संबंधिताच्या बँक खात्यात जमा होण्याचा पर्याय होता.