मोदी आणि ओबामा यांच्यात ‘हॉटलाइन’
- अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात थेट संपर्कासाठी संरक्षित दूरध्वनी यंत्रणा (हॉटलाइन) नुकतीच सुरू करण्यात आल्याचे अमेरिकेतर्फे जाहीर करण्यात आले आहे. दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्येही अशी हॉटलाइन सुरू करण्यात आली आहे.
- हॉटलाइन सुरू होऊन काही दिवस झाले असले तरी अद्याप त्याचा वापर करण्यात आलेला नाही. अत्यंत जवळच्या दोन भागीदारांना सर्वोच्च पातळीवरून विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी ही हॉटलाइन सुरू केली आहे.
- देशाच्या सर्वोच्च नेत्यांमध्ये चर्चेसाठी असलेली भारताची ही पहिलीच हॉटलाइन असून, अमेरिकेबरोबर हॉटलाइन असलेला भारत हा फक्त चौथाच देश आहे. चीन, रशिया आणि ब्रिटनबरोबरही अमेरिकेचा हॉटलाइनद्वारे संपर्क आहे.
- परराष्ट्र सचिव पातळीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये हॉटलाइन सुरू करण्याचा निर्णय २००४ मध्ये होऊन ती अमेरिकी लष्कराच्या मदतीने सुरू करण्यात आली आहे.
- तसेच, चीनबरोबरही परराष्ट्रमंत्री पातळीवरील हॉटलाइन सुरू करण्याचे २०१० मध्ये ठरले आहे. परंतु चीनबरोबरील हॉटलाइन अद्याप कार्यान्वित झालेली नाही.
ग्रीकचे पंतप्रधान ऍलेक्सिस यांचा राजीनामा
- ग्रीसचे पंतप्रधान ऍलेक्सिस सिप्रास यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. ग्रीसवर सध्या आर्थिक संकट ओढवले असताना अश्यावेळी ग्रीसच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे.
- सिप्रास यांच्या राजीनाम्यामुळे आता ठरवलेल्या कालावधीच्या आधीच निवडणुका घेण्यात येणार आहे, असे सरकारी सूत्रांकडून सांगण्यात आले. ग्रीसमध्ये येत्या २० सप्टेंबरला निवडणुका होणार आहेत.
- एलेक्सिस सिप्रास यांनी याच वर्षी निवडणुका जिंकून पंतप्रधान पदावर विराजमान झाले होते. सिप्रास यांना ग्रीसच्या जनतेने मोठ्या बहुमताने विजयी केले होते.
- परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर इतर देशांकडून बेलआउट करार मान्य केल्यानंतर सिप्रास यांनी त्यांचाच पक्ष असलेल्या सिरिजा पार्टीचे समर्थन गमावले होते. कारण पक्षातील इतर मंडळी कराराच्या विरोधात होती. पक्षातील वाढत्या विरोधानंतर सिप्रास यांनी लवकरच निवडणुका घेण्याचे जाहीर केले होते.

भारत-पाक चर्चा रद्द
- भारत-पाकिस्तानात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर होणार असलेली पहिलीवहिली चर्चा पाकिस्तानने तडकाफडकी रद्द केली. या चर्चेत काश्मीरचा मुद्दा असावा आणि हुरियत नेत्यांची भेटही घेता यावी, हा पाकिस्तानचा हेका भारताने धुडकावला होता.
- ही चर्चा विनाअटच असली पाहिजे, असा आमचा आग्रह होता. परंतु भारताने त्यात अटी लादल्याने आम्ही ही चर्चा रद्द करीत आहोत, असे पाकिस्तान परराष्ट्र विभागाने जाहीर केले.
- पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार सरताज अझीझ आणि भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्यातील या चर्चेत काश्मीर मुद्याचा अडसर निर्माण झाला होता.
- परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी काश्मीरवर चर्चा होणार नाही आणि हुरियत नेत्यांची भेट घेणार नाही, या दोन मुद्यांबाबत नि:संदिग्ध हमी देण्यासाठी पाकिस्तानकडे फक्त २२ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंतचा वेळ आहे, असा निर्वाणीचा इशारा पत्रकार परिषदेत दिला होता.
- तसेच अझीझ यांना भेटण्यासाठी दिल्लीत थडकलेले हुरियतचे नेते शाबीर अहमद शाह, बिलाल लोन याच्यासह तिघांना स्थानबद्ध करण्यात आले. या स्थानबद्धतेबद्दल पाकिस्तानने आगपाखड करीत रात्री उशीरा चर्चाच रद्द करण्याची घोषणा केली.

अरूण जेटली यांच्याहस्ते बंधन बँकेचे उद्घाटन
- देशातील पहिल्या सूक्ष्म वित्त संस्थेचे वाणिज्यिक बँकेतील परिवर्तन अखेर २३ ऑगस्ट रोजी झाले. तिसऱ्या पिढीतील पहिली बँक म्हणून बंधन बँकेचा शुभारंभ पहिल्याच दिवशी ६० हजार खाती व ८० कोटी रुपये ठेवींसह झाला.
- 'आपका भला, सबकी भलाई' या ब्रिदसह सुरू झालेल्या बंधन बँकेचे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते कोलकता येथे झाले. त्याचबरोबर बँकेच्या देशभरातील ५०१ शाखांची सुरुवातही झाली.
- येत्या सात महिन्यात बँकेच्या शाखांची संख्या ६३२ पर्यंत तर एटीएमची संख्या २५० पर्यंत वाढविण्याचा बँकेचा मनोदय आहे. तसेच चालू आर्थिक वर्षअखेपर्यंत बँकेचे अस्तित्व देशभरातील २७ राज्यांमध्ये निर्माण होणार आहे.
- देशातील विविध २४ शहरांमध्ये पहिल्याच टप्प्यातील ५०१ शाखांसह २,०२२ सेवा केंद्रे, ५० एटीएम कार्यरत झाले. १.४३ कोटी बँक खाती व १०,५०० कोटी कर्ज याद्वारे बँकेच्या व्यवसायाला सुरुवात झाली आहे.
- २,५७० कोटी रुपये भांडवलासह बँक व्यवसाय सुरू करणाऱ्या बंधनने लवकरच ३,०५२ कोटी रुपयांच्या भांडवलाचे ध्येय पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी रिझर्व्ह बँकेची भांडवल मर्यादा ५०० कोटी रुपयांची आहे.
- बँकेत सध्या १९,५०० कर्मचारी असून ७१ शाखा ग्रामीण तर ३५ शाखा बँक नसलेल्या भागात असतील. राज्यांमध्ये सर्वाधिक २२० शाखा या बंधनचे वर्चस्व असलेल्या पश्चिम बंगालमध्ये असतील. महाराष्ट्रात तिच्या २१ शाखा आहेत.
- कोलकाता येथे लघु वित्त पुरवठा करणाऱ्या बंधन फायनान्स सर्व्हिसेसला गेल्या वर्षी रिझर्व्ह बँकेकडून सामान्य बँक सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली होती.
- बँकेचे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी : चंद्रशेखर घोष

‘डीआरडीओ’ची पतंजली आयुर्वेद कंपनीसोबत भागीदारी
- संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीने अधिकृतरित्या भागीदारी जाहीर केली असून, आता डीआरडीओने विकसीत केलेल्या आयुर्वेदिक सप्लीमेंट्स आणि अन्न पदार्थांची देशात व परदेशात विक्री तसेच जाहिरात रामदेव बाबा करणार आहेत.
- यासाठी सरंक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग, डीआरडीओ प्रमुख एस. क्रिस्तोफर आणि रामदेव बाबा यांच्या उपस्थित एक करार करण्यात आला.
- पतंजली योगपीठ आणि ‘डीआरडीओ’च्या डिफेंस इन्स्टिट्युट ऑफ हाय अल्टिट्युड रिसर्च (DIHAR) मध्ये हा करार झाला. या करारानुसार ‘डीआरडीओ’च्या लेह येथील ‘डीआयएचएआर’ या प्रयोगशाळेत उत्पादनांची चाचणी होणार आहे.
- या प्रयोगशाळेत शेती व प्राण्यांवर आधारित उत्पादनांचे विकसन केले जाते. उत्पादनांच्या तपासणीसाठी या प्रयोगशाळेचा वापर होईल आणि तयार होणाऱ्या उत्पादनांची विक्री व जाहिरातीसाठी पतंजली योगपीठ मदत करेल.
- याशिवाय ‘डीआयएचएआर’ आणि पतंजली यांच्यात तांत्रिक देवाण-घेवाण देखील होणार आहे. ‘डीआयएचएआर’ रामदेव बाबांच्या पतंजली योगपीठाला आपली पाच उत्पादने कशी तयार करायची याची तांत्रिक माहिती देणार आहे.
- पतंजली मार्फत अनेक आयुर्वेदिक उत्पादने तयार करण्यात येतात. त्यास मोठी मागणी देखील आहे. या करारामुळे ‘डीआरडीओ’च्या उत्पादनांनासुद्धा मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
५० शहरे सोलर सिटी म्हणून विकसित करण्यास मंजुरी
- राष्ट्रीय राजधानी दिल्ली, महाराष्ट्रातील नागपूर, ठाणे, औरंगाबाद, शिर्डी तसेच गोव्यातील पणजीसह देशातील एकूण ५० शहरांना ‘सौर शहरे’ अर्थात ‘सोलर सिटी’ म्हणून विकसित करण्यास नवीन आणि नविनीकरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
- मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत माहिती दिली गेली आहे. एकूण प्रस्तावित ६० शहरांपैकी ५० शहरांना सौर शहरे म्हणून विकसित करण्यास मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. ५० शहरांपैकी ४६ शहरांसाठी ‘मास्टर प्लान’ही तयार करण्यात आला आहे.
- यात नागपूर, ठाणे, औरंगाबाद, शिर्डी या महाराष्ट्रातील चार शहरांसह आग्रा, गांधीनगर, राजकोट, सुरत, इम्फाळ, चंदीगड, गुडगाव, फरिदाबाद, बिलासपूर, रायपूर, आगरतळा, गुवाहाटी, जोरहाट, म्हैसूर, सिमला, हमीरपूर, जोधपूर, विजयवाडा, लुधियाना, अमृतसर, डेहराडून, पणजी आणि नवी दिल्ली (एनडीएमसी क्षेत्र) या शहरांचा समावेश आहे.
- याशिवाय पाच शहरांना मंत्रालयाने सैद्धांतिक मंजुरी दिली आहे. यात थिरुवनंतपुरम, जयपूर, इंदूर, लेह आणि महबूबनगर यांचा समावेश आहे.
‘प्रो कबड्डी लीग २०१५’चे जेतेपद यु मुंबाकडे
- अनुप कुमारच्या नेतृत्वाखालील यू मुंबा संघाने प्रो कबड्डी लीगच्या दुसऱ्या हंगामातील विजेतेपद प्राप्त केले. अखेरच्या काही मिनिटांपर्यंत उत्कंठा टिकवणाऱ्या अंतिम सामन्यात यू मुंबाने बंगळुरू बुल्सचा ३६-३० असा पराभव केला.
- प्रो कबड्डी लीगच्या दुसऱ्या हंगामातील विजेत्याला १ कोटी रुपये आणि चषक देण्यात आले. तसेच उपविजेत्याला ५० लाख तसेच तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघाला अनुक्रमे ३० आणि २० लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
- तेलुगू टायटन्सला तिसरे स्थान : राहुल चौधरीच्या दिमाखदार चढायांच्या बळावर तेलुगू टायटन्सने पाटणा पायरेट्सचा ३४ :२६ असा पराभव केला आणि तिसरे स्थान प्राप्त केले.
