चालू घडामोडी - २४ ऑगस्ट २०१५ [Current Affairs - August 24, 2015]
bySunil Jadhavar•
0
भारत-पाक चर्चा रद्द
भारत-पाकिस्तानात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर होणार असलेली पहिलीवहिली चर्चा पाकिस्तानने तडकाफडकी रद्द केली. या चर्चेत काश्मीरचा मुद्दा असावा आणि हुरियत नेत्यांची भेटही घेता यावी, हा पाकिस्तानचा हेका भारताने धुडकावला होता.
ही चर्चा विनाअटच असली पाहिजे, असा आमचा आग्रह होता. परंतु भारताने त्यात अटी लादल्याने आम्ही ही चर्चा रद्द करीत आहोत, असे पाकिस्तान परराष्ट्र विभागाने जाहीर केले.
पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार सरताज अझीझ आणि भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्यातील या चर्चेत काश्मीर मुद्याचा अडसर निर्माण झाला होता.
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी काश्मीरवर चर्चा होणार नाही आणि हुरियत नेत्यांची भेट घेणार नाही, या दोन मुद्यांबाबत नि:संदिग्ध हमी देण्यासाठी पाकिस्तानकडे फक्त २२ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंतचा वेळ आहे, असा निर्वाणीचा इशारा पत्रकार परिषदेत दिला होता.
तसेच अझीझ यांना भेटण्यासाठी दिल्लीत थडकलेले हुरियतचे नेते शाबीर अहमद शाह, बिलाल लोन याच्यासह तिघांना स्थानबद्ध करण्यात आले. या स्थानबद्धतेबद्दल पाकिस्तानने आगपाखड करीत रात्री उशीरा चर्चाच रद्द करण्याची घोषणा केली.
अरूण जेटली यांच्याहस्ते बंधन बँकेचे उद्घाटन
देशातील पहिल्या सूक्ष्म वित्त संस्थेचे वाणिज्यिक बँकेतील परिवर्तन अखेर २३ ऑगस्ट रोजी झाले. तिसऱ्या पिढीतील पहिली बँक म्हणून बंधन बँकेचा शुभारंभ पहिल्याच दिवशी ६० हजार खाती व ८० कोटी रुपये ठेवींसह झाला.
'आपका भला, सबकी भलाई'या ब्रिदसह सुरू झालेल्या बंधन बँकेचे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते कोलकता येथे झाले. त्याचबरोबर बँकेच्या देशभरातील ५०१ शाखांची सुरुवातही झाली.
येत्या सात महिन्यात बँकेच्या शाखांची संख्या ६३२ पर्यंत तर एटीएमची संख्या २५० पर्यंत वाढविण्याचा बँकेचा मनोदय आहे. तसेच चालू आर्थिक वर्षअखेपर्यंत बँकेचे अस्तित्व देशभरातील २७ राज्यांमध्ये निर्माण होणार आहे.
देशातील विविध २४ शहरांमध्ये पहिल्याच टप्प्यातील ५०१ शाखांसह २,०२२ सेवा केंद्रे, ५० एटीएम कार्यरत झाले. १.४३ कोटी बँक खाती व १०,५०० कोटी कर्ज याद्वारे बँकेच्या व्यवसायाला सुरुवात झाली आहे.
२,५७० कोटी रुपये भांडवलासह बँक व्यवसाय सुरू करणाऱ्या बंधनने लवकरच ३,०५२ कोटी रुपयांच्या भांडवलाचे ध्येय पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी रिझर्व्ह बँकेची भांडवल मर्यादा ५०० कोटी रुपयांची आहे.
बँकेत सध्या १९,५०० कर्मचारी असून ७१ शाखा ग्रामीण तर ३५ शाखा बँक नसलेल्या भागात असतील. राज्यांमध्ये सर्वाधिक २२० शाखा या बंधनचे वर्चस्व असलेल्या पश्चिम बंगालमध्ये असतील. महाराष्ट्रात तिच्या २१ शाखाआहेत.
कोलकाता येथे लघु वित्त पुरवठा करणाऱ्या बंधन फायनान्स सर्व्हिसेसला गेल्या वर्षी रिझर्व्ह बँकेकडून सामान्य बँक सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली होती.
बँकेचे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी : चंद्रशेखर घोष
‘डीआरडीओ’ची पतंजली आयुर्वेद कंपनीसोबत भागीदारी
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीने अधिकृतरित्या भागीदारी जाहीर केली असून, आता डीआरडीओने विकसीत केलेल्या आयुर्वेदिक सप्लीमेंट्स आणि अन्न पदार्थांची देशात व परदेशात विक्री तसेच जाहिरात रामदेव बाबा करणार आहेत.
यासाठी सरंक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग, डीआरडीओ प्रमुख एस. क्रिस्तोफर आणि रामदेव बाबा यांच्या उपस्थित एक करार करण्यात आला.
पतंजली योगपीठ आणि ‘डीआरडीओ’च्या डिफेंस इन्स्टिट्युट ऑफ हाय अल्टिट्युड रिसर्च (DIHAR)मध्ये हा करार झाला. या करारानुसार ‘डीआरडीओ’च्या लेह येथील ‘डीआयएचएआर’ या प्रयोगशाळेत उत्पादनांची चाचणी होणार आहे.
या प्रयोगशाळेत शेती व प्राण्यांवर आधारित उत्पादनांचे विकसन केले जाते. उत्पादनांच्या तपासणीसाठी या प्रयोगशाळेचा वापर होईल आणि तयार होणाऱ्या उत्पादनांची विक्री व जाहिरातीसाठी पतंजली योगपीठ मदत करेल.
याशिवाय ‘डीआयएचएआर’ आणि पतंजली यांच्यात तांत्रिक देवाण-घेवाण देखील होणार आहे. ‘डीआयएचएआर’ रामदेव बाबांच्या पतंजली योगपीठाला आपली पाच उत्पादने कशी तयार करायची याची तांत्रिक माहिती देणार आहे.
पतंजली मार्फत अनेक आयुर्वेदिक उत्पादने तयार करण्यात येतात. त्यास मोठी मागणी देखील आहे. या करारामुळे ‘डीआरडीओ’च्या उत्पादनांनासुद्धा मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
५० शहरे सोलर सिटी म्हणून विकसित करण्यास मंजुरी
राष्ट्रीय राजधानी दिल्ली, महाराष्ट्रातील नागपूर, ठाणे, औरंगाबाद, शिर्डी तसेच गोव्यातील पणजीसह देशातील एकूण ५० शहरांना ‘सौर शहरे’ अर्थात ‘सोलर सिटी’ म्हणून विकसित करण्यास नवीन आणि नविनीकरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत माहिती दिली गेली आहे. एकूण प्रस्तावित ६० शहरांपैकी ५० शहरांना सौर शहरे म्हणून विकसित करण्यास मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. ५० शहरांपैकी ४६ शहरांसाठी ‘मास्टर प्लान’ही तयार करण्यात आला आहे.
यात नागपूर, ठाणे, औरंगाबाद, शिर्डी या महाराष्ट्रातील चार शहरांसह आग्रा, गांधीनगर, राजकोट, सुरत, इम्फाळ, चंदीगड, गुडगाव, फरिदाबाद, बिलासपूर, रायपूर, आगरतळा, गुवाहाटी, जोरहाट, म्हैसूर, सिमला, हमीरपूर, जोधपूर, विजयवाडा, लुधियाना, अमृतसर, डेहराडून, पणजी आणि नवी दिल्ली (एनडीएमसी क्षेत्र) या शहरांचा समावेश आहे.
याशिवाय पाच शहरांना मंत्रालयाने सैद्धांतिक मंजुरी दिली आहे. यात थिरुवनंतपुरम, जयपूर, इंदूर, लेह आणि महबूबनगर यांचा समावेश आहे.
‘प्रो कबड्डी लीग २०१५’चे जेतेपद यु मुंबाकडे
अनुप कुमारच्या नेतृत्वाखालील यू मुंबा संघाने प्रो कबड्डी लीगच्या दुसऱ्या हंगामातील विजेतेपद प्राप्त केले. अखेरच्या काही मिनिटांपर्यंत उत्कंठा टिकवणाऱ्या अंतिम सामन्यात यू मुंबाने बंगळुरू बुल्सचा ३६-३० असा पराभव केला.
प्रो कबड्डी लीगच्या दुसऱ्या हंगामातील विजेत्याला १ कोटी रुपये आणि चषक देण्यात आले. तसेच उपविजेत्याला ५० लाख तसेच तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघाला अनुक्रमे ३० आणि २० लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
तेलुगू टायटन्सला तिसरे स्थान : राहुल चौधरीच्या दिमाखदार चढायांच्या बळावर तेलुगू टायटन्सने पाटणा पायरेट्सचा ३४ :२६ असा पराभव केला आणि तिसरे स्थान प्राप्त केले.
यिप्पी नूडल्समध्येही शिशाचे प्रमाण जास्त
उत्तर प्रदेश अन्न व औषध प्राधिकरणाने (एफडीए) केलेल्या तपासणीत यिप्पी नूडल्स या आयटीसी लि. कंपनीच्या नूडल्समध्येही शिशाचे प्रमाण जास्त आढळून आले आहे. या प्रकरणी अन्न आयुक्तांच्या परवानगीने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
२१ जूनला अधिकाऱ्यांनी स्थानिक मॉलमधून वेगवेगळ्या अन्नपदार्थाचे ८ नमुने गोळा केले होते त्यात यिप्पी नूडल्सचाही समावेश होता. नंतर ते नमुने तपासणीसाठी लखनौ व मीरत येथे पाठवण्यात आले.
या नमुन्यांच्या तपासणीच्या अहवालानुसार यिप्पी नूडल्समध्ये शिसे १.०५७ पीपीएम एवढे सापडले आहे, ते १ पीपीएम पर्यंत घातक मानले जात नाही.
जादा शिशामुळे मुलांना रोग होतात तसेच प्रौढांनाही मेंदूचे आजार होतात, असे संशोधनात स्पष्ट झाले आहे.
याआधी नेस्ले कंपनीच्या मॅगी नूडल्समध्ये जादा शिसे सापडले होते तसेच मोनो सोडियम ग्लुटामेटचे प्रमाणही अधिक होते.
इटालियन नाविकांविरोधातील खटले मागे घेण्याचे भारताला आदेश
संयुक्त राष्ट्रसंघाच्या लवादाकडून भारत आणि इटली या दोन्ही देशांना इटालियन नाविकांच्या प्रकरणासंदर्भात एकमेकांविरोधात दाखल केलेले खटले मागे घेण्याचा आदेश देण्यात आला आहे.
दोन इटालियन नाविकांवर भारतीय मच्छिमारांच्या हत्येचा आरोप आहे. मात्र, अशा प्रकारच्या खटल्यांमुळे हा मुद्दा अधिक चिघळू शकतो, असे सांगत लवादाकडून हे आदेश देण्यात आले आहेत.
लवादाने येत्या २४ सप्टेंबरपर्यंत दोन्ही देशांना आपापली बाजू मांडणारे अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.
तंबाखूसेवनाने होणाऱ्या मृत्यूमध्ये भारत आघाडीवर
ब्रिटनमधील ‘हुलयॉर्क मेडिकल स्कूल’च्या सार्वजनिक आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणात समोर आलेल्या माहितीनुसार जगभरात तंबाखूसेवनाने जितके मृत्यू होतात, त्याचे सर्वाधिक प्रमाण भारतात आहे.
जगभरात दरवर्षी सात कोटींहून अधिक नागरिक तंबाखूसेवनाने होणाऱ्या विकारांमुळे मृत्युमुखी पडतात आणि त्यापैकी ७५ टक्के नागरिक भारतातील आहे.
जगभरात तंबाखूच्या सेवनाने सर्वाधिक म्हणजे ८५ टक्के मृत्यू दक्षिण आशियात होतात. त्यापैकी सर्वाधिक मृत्यू भारतात आणि त्यानंतर बांगलादेशमध्ये होत आहेत.
तंबाखूमुळे कर्करोग व हृदयविकार बळावत आहेत. तंबाखूचा धोका मोठा असून, त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या व्यसनापासून नागरिकांना परावृत्त करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
जागतिक अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धा : बोल्टला सुवर्णपदक
जमैकाच्या उसेन बोल्टने आपणच जगातील सर्वात जलद व्यक्ती असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. जागतिक अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेत बोल्टने९.७९ सेकंदात १०० मीटरचे अंतर पूर्ण करून जेतेपद कायम राखले.
अमेरिकेच्या जस्टीन गॅटलीनकडून त्याला कडवी टक्कर मिळाली. गॅटलीनने ९.८० सेकंदाज शर्यत पूर्ण केली. अवघ्या ०.१ सेकंदाच्या फरकाने गॅटलीनचे सुवर्णपदक हुकले.
कॅनडाचा अॅड्रे डे ग्रासे (९.९२ से.) आणि अमेरिकेचा ट्रायव्हॉन ब्रोमेल (९.९२ से.) यांनी समान वेळ नोंदविल्यामुळे संयुक्तरित्या कांस्यपदक देण्यात आले.
निर्भया फंडा’तून २० हजार रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे
रेल्वेगाड्यांमधील सुरक्षा वाढविण्याच्या हेतूने भारतीय रेल्वेने ‘निर्भया फंडा’च्या ७०० कोटी रुपयांतून २० हजार रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान कार्यालयात झालेल्या एका बैठकीत नव्या मार्गांचे काम, रेल्वे ओव्हरब्रिज, अंडरब्रिजचे बांधकाम, तसेच प्रवाशांना उत्तम सुविधा आणि सुरक्षा पुरविणाऱ्या योजनांना गती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
यात रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या कामास प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे ‘निर्भया’ फंडातून लवकर निधी मिळविण्यासाठी महिला व बालकल्याण मंत्रालयासोबत समन्वय. बहुतांश रेल्वेगाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची रेल्वेची योजना आहे; मात्र आतापर्यंत फार थोड्या गाड्यांमध्ये हे कॅमेरे लावण्यात आले आहेत.
इराण व इंग्लंडचे एकमेकांच्या राजधानीत दूतावास पुन्हा सुरु
मागील आठवड्यामध्ये अमेरिका व क्युबाने आपले संबंध सुधारत एकमेकांच्या राजधानीत दुतावास सुरू केले होते. त्याप्रमाणेच आता इराण व इंग्लंडने गेली चार वर्षे ठप्प झालेले संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी दूतावास सुरू केले.
२०११ साली तेहरानमधील दूतावासासमोर निदर्शने होऊन हल्लाबोल केल्यानंतर तेथील दूतावास बंदच करण्याचा निर्णय इंग्लंडने घेतला होता.
अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, चीन यांच्याबरोबर इराणचा करार झाल्यांनतर दोन्ही देशानी एकमेकांच्या राजधानीमध्ये दूतावास पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला.