२९ ऑगस्ट : राष्ट्रीय क्रीडा दिन (मेजर ध्यानचंद जन्मदिवस)
बाबासाहेबांच्या स्मरणार्थ १२५ रूपयाचे विशेष नाणे
- पुढील वर्षी १४ एप्रिल रोजी बाबासाहेबांची १२५वी जयंती साजरी केली जाणार असून त्यानिमित्त केंद्र सरकारकडून बाबासाहेबांच्या स्मरणार्थ १२५ रूपये मुल्य असणारे विशेष नाणे जारी केले जाणार आहे. या नाण्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असेल.
- याशिवाय, त्यांच्या स्मरणार्थ केंद्र सरकारकडून एका टपाल तिकिटाचे लोकार्पणही करण्यात येणार आहे. तसेच १४ एप्रिल 'राष्ट्रीय बंधुत्व व समरसता दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.
सानिया मिर्झाला प्रतिष्ठेचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान
- भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाला प्रतिष्ठेचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळविणारी ती दुसरी टेनिसपटू ठरली. यापूर्वी लिअँडर पेसला १९९६ मध्ये या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
- काही दिवसांपूर्वी क्रीडा मंत्रालयाने खेलरत्न पुरस्कारासाठी सानियाचे नाव निश्चित केले होते. मात्र, कर्नाटक उच्च न्यायालयाने क्रीडा मंत्रालयाला नोटीस पाठवत या निर्णयाला स्थगिती दिली होती.
- पॅरालिंपियन लंडन २०१२ पॅरालिंपिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱ्या एच. एन. गिरीशा याने आपणच या पुरस्कारासाठी लायक असल्याचे सांगून क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले होते.
- यावेळी अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार तसेच ध्यानचंद पुरस्कारही प्रदान करण्यात आले.
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेता | ||
---|---|---|
सानिया मिर्झा | ||
अर्जुन पुरस्कार विजेते | ||
जितू राय (नेमबाजी) | पी. आर. श्रीजेश (हॉकी) | रोहित शर्मा (क्रिकेट) |
दीपा कर्माकर (जिम्नॅस्टिक्स) | अनुप कुमार (रोलरस्केटिंग) | अभिलाषा म्हात्रे (कबड्डी) |
मनजीत चिल्लर (कबड्डी) | एम.आर. पूवम्मा (अॅथलेटिक्स) | शरथ गायकवाड (पॅरासिलिंग) |
सन्थोई देवी (वुशू) | सतीश शिवलिंगम (वेटलिफ्टिंग) | स्वर्णसिंग विर्क (रोइंग) |
के. श्रीकांत (बॅडमिंटन) | मनदीप जांगरा (बॉक्सिंग) | बजरंग (कुस्ती) |
बबिता (कुस्ती) | संदीप कुमार (तिरंदाजी) | |
द्रोणाचार्य पुरस्कार विजेते | ||
अनुप सिंग (कुस्ती) | नवल सिंग (पॅरालिंपिक) | स्वतंत्रसिंग (मुष्टियुद्ध) |
हरबन्स सिंग (ऍथलेटिक्स) | निहार अमीन (जलतरण) | |
ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार | ||
रोमियो जेम्स (हॉकी) | प्रकाश मिश्रा (टेनिस) | टी. पी. पी. नायर (व्हॉलिबॉल) |
कन्नड साहित्यिक डॉ. कलबुर्गींची हत्या
- कन्नडमधील ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक आणि हंपी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची ३० ऑगस्ट रोजी राहत्या घरात अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. ते ७७ वर्षांचे होते.
- डॉ. कलबुर्गी हे कन्नड साहित्य विश्वातील महत्वाचे लेखक होते. त्यांच्या पुस्तकांना राज्य आणि केंद्र साहित्य अकादमीचे पुरस्कार लाभले आहेत.
- परखड मतांमुळे डॉ. कलबर्गी नेहमीच वादात राहिले होते. हिंदुत्ववादी संघटनांविरोधात त्यांनी अनेकदा मत प्रदर्शीत केले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात विश्व हिंदु परिषद, बजरंग आदी संघटनांनी निदर्शनेही केली होती.
- डॉ. कलबुर्गी यांच्या ‘मार्ग ४’ या संशोधनात्मक लेखांच्या पुस्तकाला २००६ सालचा केंद्रिय साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला होता. याशिवाय त्यांना राज्य साहित्य अकादमी, पंप पुरस्कार आणि यक्षगान पुरस्कार लाभला होता.
- डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हल्लेखोरांना पकडण्यासाठी हुबळी-धारवाड पोलिसांनी विशेष तपासणी पथकाची स्थापना केली आहे.
भारतीय महिला हॉकी संघ ऑलिम्पिकसाठी पात्र
- भारतीय महिला हॉकी संघ हा २०१६ साली होणाऱ्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. त्या स्पर्धेत निवडक १२ संघांना खेळण्याची संधी मिळते, यामध्ये भारताने आपले स्थान कमावले.
- ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारा भारताचा हा पहिलाच महिला हॉकी संघ आहे. १९८०मध्ये मॉस्को, रशिया येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघ सहभागी झाला होता. त्यावेळी त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
- भारतीय महिला हॉकी संघाने 'हॉकी वर्ल्ड लीग'च्या उपांत्य फेरीत जपानचा १-० पराभव करत पाचवे स्थान पटकाविले होते. त्यामुळे ऑलिम्पिकसाठी हा संघ पात्र ठरण्याच्या आशा बळावल्या होत्या.
- रिओ ऑलिंपिकसाठी भारतासह नऊ संघ पात्र झाले आहेत. यामध्ये दक्षिण कोरिया, अर्जेंटिना, ब्रिटन, जर्मनी, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अमेरिका यांचा समावेश आहे. या स्पर्धेमध्ये भारताचे महिला आणि पुरुष हे दोन्ही संघ खेळताना दिसणार आहेत.
अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धा
- इंग्लंडच्या मोहम्मद फराहने जागतिक अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक साजरी केली. त्याने १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीपाठोपाठ पाच हजार मीटर धावण्याची शर्यतही जिंकली.
- फराहने २०१२मध्ये लंडनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत याच दोन्ही शर्यती जिंकल्या होत्या. पाठोपाठ त्याने २०१३मध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत याच दोन्ही शर्यतींचे विजेतेपद मिळवले होते.
- उसेन बोल्टने १०० आणि २०० मीटर धावण्याच्या शर्यतीमधील सोनेरी यशानंतर रिले शर्यतीत सांघिक सुवर्णपदक प्राप्त करून तिहेरी धमाका साजरा केला.
- त्याच्या कामगिरीच्या जोरावर जमैकाने ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीचे अजिंक्यपद मिळविले. बोल्टचे जागतिक स्पर्धेच्या कारकीर्दीतील हे ११वे सुवर्णपदक आहे.
उर्जा मंत्रालयाकडून महाराष्ट्राला ५ हजार कोटींची मदत
- ग्रामीण तसेच शहरी भागात वीज वितरण यंत्रणेचे जाळे विस्तृत आणि सक्षम करण्याबरोबरच वीज ग्राहकांना चोवीस तास वीजपुरवठा करण्यासाठी केंद्रीय उर्जा मंत्रालयाने महाराष्ट्रासाठी पाच हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे.
- दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना आणि एकात्मिक उर्जा विकास योजना यांच्याअंतर्गत ही मदत केली जाणार आहे.
- केंद्राच्या दोन्ही योजनांमुळे मिळणाऱ्या निधीचा उपयोग राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील वीज यंत्रणांचा आधुनिकीकरण, वीज वितरण प्रणालीचे विस्तारीकरण तसेच सक्षमीकरण आणि इतर मुलभूत सुविधांसाठी करण्यात येणार आहे.
- दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या निधीतून ६७ ग्रामपंचायती आणि ६९ गावांना फायदा होणार आहे. तर एकात्मिक उर्जा विकास योजना २५४ प्रस्ताविक शहरांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
- या योजनेसाठी केंद्राकडून मिळणारी साठ टक्के रक्कम ही अनुदान स्वरूपात मिळणार असून त्यासाठी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन यांची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
इसिसवर पाकिस्तानात बंदी
- पाकिस्तानने 'इस्लामिक स्टेट' म्हणजेच अरबी भाषेत दाएश असे नाव असलेल्या इसिस या दहशतवादी गटावर बंदी घातली आहे.
- इराक व सीरिया दरम्यानच्या पट्ट्यात या गटाने ताबा मिळवला असून, अनेक ठिकाणी खिलाफतची स्थापना केली आहे. इसिसचे पाकिस्तानात अस्तित्व नाही असेही पाकिस्तानने वारंवार सांगितले असले तरी त्या संघटनेवर बंदी घातली आहे.
लैंगिक चॅटिंगच्या मोबदल्यात लष्कराच्या माहितीची देवाणघेवाण
- एका महिलेशी स्पष्टपणे लैंगिक संभाषण करण्याच्या मोबदल्यात काही अधिकारी लष्कराच्या तळांच्या ठिकाणांची माहिती देत असल्याची बाब उघड झाली आहे.
- याबाबत लष्करी गुप्तचर यंत्रणेने ११ ऑगस्ट रोजी लष्कराच्या सर्व कमांड मुख्यालयांना आणि स्ट्रॅटजिक फोर्सेस कमांड अॅण्ड इंटिग्रेटेड संरक्षण कर्मचाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये आणखीही काही अधिकारी गुंतलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारची कृत्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हानिकारक आहेत, त्याचप्रमाणे वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना आणि आदेशांचे सरळसरळ उल्लंघन आहे.
- युद्धाच्या व्यूहरचनेबाबतची माहिती सदर अधिकारी फेसबुकवरून पुरवीत होते, असे प्रथमदर्शनी सिद्ध झाले आहे. कर्नल पदावरील अधिकाऱ्याची मध्य प्रदेशातील महू येथील लष्कर युद्ध महाविद्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे, तर दोन राजपूत तुकडीचा एक मेजर आणि तीन राजपूत आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्सचा एका लेफ्टनंट यांचीही ओळख पटली असून त्यांच्या नावांचा उल्लेख लष्करी गुप्तचर यंत्रणेने पाठविलेल्या पत्रात करण्यात आला आहे.
'ग्रेट एस्केप'मधील पॉलचा मृत्यू
- 'ग्रेट एस्केप' या १९६३ साली प्रदर्शित झालेल्या प्रसिद्ध हॉलीवूड चित्रपटात दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनांच्या ताब्यातील पोलंडमधील छळछावणीतून निसटलेल्या दोस्त राष्ट्रांच्या सैनिकांची रोमहर्षक सत्यकथा मांडलेली आहे.
- त्या घटनेतील ज्या अखेरच्या दोन व्यक्ती जिवंत होत्या त्यातील पॉल रॉयल या वैमानिकाचा ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे वयाच्या १०१व्या वर्षी मृत्यू झाला.
- ऑस्ट्रेलियाचे नागरिक असलेले पॉल रॉयल दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश हवाई दलात फ्लाइट लेफ्टनंट पदावर कार्यरत होते. युद्धकाळात ते नाझी जर्मनीच्या तावडीत सापडले आणि त्यांची रवानगी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या पोलंडमधील स्टालाग लुफ्त-३ नावाने ओळखल्या जाणाऱ्या युद्धकैद्यांच्या शिबिरात करण्यात आली.
- नाझींकडून त्यांचे अतोनात हाल केले गेले. त्यापैकी ७६ युद्धकैद्यांनी तुरुंगातून गुप्तरीत्या बोगदा खणून पलायन केले होते. त्यातील ७३ जण पुन्हा पकडले आणि त्यातील बहुतेकांना नाझींनी गोळ्या घालून ठार केले.
- त्यातील केवळ २३ जणांना अॅडॉल्फ हिटलरच्या आज्ञेवरून आश्चर्यकारकरीत्या सोडून मृत्युदंडातून वगळण्यात आले होते. त्यातील पॉल आणि स्क्वॉड्रन लिडर (निवृत्त) डिक चर्चिल हे दोघेच आजवर जिवंत होते. आता त्यातील पॉल यांचे निधन झाल्याने या घटनेचे डिक हे एकमेव साक्षीदार उरले आहेत.
युएफाचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू पुरस्कार लिओनेल मेस्सीला
- युएफा अर्थात युरोपियन फुटबॉल संघटना युनियनतर्फे देण्यात येणाऱ्या २०१४-१५ वर्षांसाठीचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू पुरस्कारासाठी लिओनेल मेस्सीची निवड करण्यात आली.
- ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लुईस सुआरेझ यांना मागे टाकत मेस्सीने या पुरस्कारावर नाव कोरले.
- बार्सिलोनाचे प्रतिनिधित्त्व करताना चॅम्पियन्स लीग, ला लिगा तसेच स्पॅनिश चषकाचे जेतेपद मिळवून देण्यात मेस्सीने निर्णायक भूमिका बजावली होती.
- मेस्सीने दुसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावला. २०१०-११ वर्षांत मेस्सीची या पुरस्कारासाठी निवड झाली होती.