मृत्युदंडाची शिक्षा रद्द करण्याची विधी आयोगाची शिफारस
- मृत्युदंडाची शिक्षा घटनात्मकदृष्टय़ा कायम राहण्यासारखी नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्या. ए. पी. शाह यांच्या अध्यक्षतेखालील विधि आयोगाने (लॉ कमिशन) सरकारला सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.
- दहशतवादाशी संबंधित गुन्हे आणि देशाविरुद्ध युद्ध पुकारणे ही प्रकरणे वगळता इतर सर्व प्रकरणांमध्ये मृत्युदंडाची शिक्षा रद्द केली जावी, अशी शिफारस विधि आयोगाने बहुमताने केली आहे.
- मृत्युदंडाच्या शिक्षेमुळे गुन्ह्यापासून प्रवृत्त होण्याचा जन्मठेपेहून अधिक काही उद्देश साध्य होत नाही, तथापि दहशतवादाशी संबंधित गुन्हे आणि देशाविरुद्ध युद्ध पुकारणे यासाठी असलेली फाशीची तरतूद रद्द केल्यास राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम होईल याबाबतची चिंता सार्थ आहे, असा निष्कर्ष आयोगाने काढला आहे.
- एकूण ९ सदस्यांपैकी ६ जणांनी मृत्युदंड रद्द करण्याच्या बाजूने कौल दिला, तर कायदा व न्याय मंत्रालयाचे प्रतिनिधित्व करणारे विधि सचिव पी. के. मल्होत्रा व विधिमंडळ सचिव संजय सिंग या दोघांसह दिल्ली उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश उषा मेहरा या तीन सदस्यांनी आपली असहमती नोंदवून ही शिक्षा कायम ठेवण्याची शिफारस केली.
- ५३ वर्षांपूर्वी आयोगाने ही शिक्षा कायम ठेवण्यासाठी कौल दिला होता. जगातील ज्या ५९ देशांमध्ये अजूनही न्यायालये मृत्युदंडाची शिक्षा सुनावतात, त्यात भारताचा समावेश आहे.
भोपाळमध्ये आंतरराष्ट्रीय हिंदी परिषद
- भोपाळमध्ये १० ते १२ सप्टेंबर दरम्यान तीन दिवसांची आंतरराष्ट्रीय हिंदी परिषद आयोजित करण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेचे उद्घाटन करणार आहेत.
- जागतिक पातळीवर हिंदी भाषा लोकप्रिय करणे, हा या परिषदेचा उद्देश असून त्यामध्ये २७ देशांचे प्रतिनिधी आणि भारतातील विद्वान सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
- मध्यप्रदेश सरकारच्या सहकार्याने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ही परिषद आयोजित केली असून ‘हिंदी जगत : विस्तार एवम् संभवनाए’ अशी परिषदेची संकल्पना आहे.
- गुगल आणि आयफोन बनविणाऱ्या कंपन्या परिषदेतील प्रदर्शनास सहभागी होऊन हिंदी भाषा लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
- या परिषदेच्या समारोपप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि महानायक अमिताभ बच्चन यांची भाषणे होणार आहेत. परिषदेत हिंदी भाषेबद्दल एकूण २८ परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहेत.
- अमिताभ बच्चन चित्रपटांमधून हिंदी भाषेचा प्रचार करण्याची प्रेरणा आहेत त्यामुळे ते ‘आओ अच्छी हिंदी बोले’ या विषयावर भाषण करणार आहेत.
पालमिरा शहरामधील ‘टेम्पल ऑफ बेल’ इसिसने उध्वस्त केले
- सीरियातील ऐतिहासिकदृष्टया अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या पालमिरा शहरामधील ‘टेम्पल ऑफ बेल’ हे प्राचीन मंदिर इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने उध्वस्त केले आहे.
- उपग्रहाद्वारे मिळविण्यात आलेल्या छायाचित्रामधून हे मंदिर जवळजवळ पूर्णत: उध्वस्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्य मंदिराच्या इमारतीसहच येथील स्तंभही इसिसने उध्वस्त केले आहेत.
- पालमिरा शहर हे युनेस्कोने आंतरराष्ट्रीय वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. परंतु इसिसने या शहरासहित इराकमधीलही काही अत्यंत महत्त्वपूर्ण वारसास्थळे उध्वस्त केली आहेत.
- हे मंदिर सुमारे २ हजार वर्षांपूर्वी बांधण्यात आले असून यामध्ये फोनेशियन संस्कृतीच्या देवता आहेत. ही मंदिरे इस्लामच्या शिकवणुकीविरोधी असल्याची इसिसची भूमिका आहे.
शोलेचा रिमेक बनवल्यामुळे राम गोपाल वर्मा यांना दंड
- शोले या १९७५ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा रिमेक बनवून दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्याकडे असलेल्या स्वामित्वहक्काचा (कॉपीराइट्स) जाणीवपूर्वक भंग केल्याप्रकरणी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना दिल्ली उच्च न्यायालयाने दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
- 'शोले'चे स्वामित्वहक्क या चित्रपटाचे मूळ दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्याकडे आहेत. मात्र, वर्मा यांनी सिप्पी कुटुंबातील कोणाशीही सल्लामसलत वा बोलणी न करता 'राम गोपाल वर्मा की आग' नावानं मूळ 'शोले'चा रिमेक बनवला.
- त्यामुळे शोले चित्रपटाचे मूळ निर्माते जी. पी. सिप्पी यांचे नातु असलेल्या सश्चा सिप्पी यांनी यासंदर्भात फिर्याद न्यायालयात दाखल केली होती.
- “मूळ शोले चित्रपट व राम गोपाल वर्मा यांच्या चित्रपटामधील पटकथा, संगीत व संवादांमध्येही सारखेपणा आढळून येत असल्याने या प्रकरणी निश्चितच स्वामित्वहक्क कायद्याचा भंग झाला आहे”, असे निकाल सुनाविताना न्यायाधीश मनमोहन सिंग यांनी सांगितले.
डॉ. श्रीकर परदेशी यांना संचालकपदी पदोन्नती
- महाराष्ट्रातून एप्रिल महिन्यात पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) बढती मिळालेले सनदी अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांना अवघ्या चार महिन्यांत संचालकपदी पदोन्नती मिळाली आहे.
- ‘पीएमओ’मध्ये सामान्यतः पाच संचालक असतात. मात्र याला अपवाद करताना डॉ. परदेशी धरून आता ही संख्या सहा वर पोचली आहे.
- पिंपरी-चिंचवड व पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी लक्षणीय काम करणारे डॉ. परदेशी यांना दहा एप्रिलपासून ‘पीएमओ’मध्ये उपसचिव म्हणून खास बोलावून घेण्यात आले होते.
- २००१च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले परदेशी यांच्याकडे केंद्राच्या नऊ मंत्रालयांच्या समन्वय व संवादाची जबाबदारी आहे.
- विशेषतः सामाजिक क्षेत्राशी संबंधित मंत्रालयांचे विविध विषय हाताळण्याचे काम त्यांच्याकडे देण्यात आले आहे. यात ग्रामविकास, अल्पसंख्याक, समाजकल्याण, आरोग्य, महिला व बालकल्याण आदी मंत्रालयांचा समावेश आहे.
‘आयओए’चे रामचंद्रन यांचा पुरस्कार रद्द
- भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष एन. रामचंद्रन यांना २०११चा देण्यात आलेला राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार दिल्ली हायकोर्टाने रद्द केला आहे. योग्य चौकशी आणि प्रक्रिया विचारात न घेताच या पुरस्कारावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते, असे कोर्टाने म्हटले आहे.
- येत्या चार आठवड्यात क्रीडा मंत्रालय, भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि तामिळनाडू क्रीडा विकास प्राधिकरणाने आदेश काढून हा पुरस्कार रद्द करावा असे आदेश कोर्टाने दिले आहेत. २०१६च्या पुरस्कारांसाठी आघाडीच्या क्रीडापटूंचा समावेश निवड समितीत करावा अशी सूचनाही कोर्टाने केली आहे.
- २००९मध्ये क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाने क्रीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्ती, संस्था, कंपन्या यांच्यासाठी हा पुरस्कार सुरू केला. रामचंद्रन यांना क्रीडा अकादमीच्या व्यवस्थापनासाठीचा पुरस्कार सरकारतर्फे देण्यात आला होता.
- कोर्टाने यासंदर्भात असे नमूद केले की, रामचंद्रन यांचे योगदान काय याचा गांभीर्याने विचार न करताच सरकारने त्यांना हा पुरस्कार देऊ केला. निवड समितीच्या शिफारशींनुसार करण्यात आलेल्या या निवडीचे म्हणूनच समर्थन करता येत नाही.
इस्लामिक स्टेटचे स्वत:चे चलन
- इस्लामिक स्टेट ऑफ सिरिया अँड इराकने (इसिस) आम्ही आमचे स्वतंत्र चलन तयार केले असून ९/११ नंतरचा हा अमेरिकेला दुसरा फटका असल्याचा दावा केला आहे.
- इसिसने नुकताच माहितीपटाच्या रूपातील व्हिडिओ जारी केला असून त्यात हे त्यांचे स्वत:चे सुवर्ण चलन (नाणे) टाकसाळीत तयार करून वितरित केल्याचे म्हटले आहे.
- हे चलन म्हणजे अमेरिकेला व गुलामगिरीत ठेवू पाहणाऱ्या तिच्या भांडवलदारी व्यवस्थेला ९/११ नंतरचा दुसरा मोठा फटका आहे, असे या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
- २९ ऑगस्ट रोजी जारी झालेल्या या व्हिडिओचे नाव ‘राईज ऑफ द खिलाफत अँड रिटर्न ऑफ द गोल्ड दिनार’ असे आहे. इसिसची ही नवी नाणी सोने, चांदी व तांब्याची आहेत, असे वृत्त ‘जेरूसलेम पोस्ट’ने दिले.
- या नाण्यांवर इस्लामिक चिन्हे असून शरिया कायद्यानुसार त्यावर मानवी किंवा प्राण्यांच्या प्रतिमा नाहीत. नाण्याच्या दुसऱ्या बाजूवर गव्हाच्या सात ओंब्या आहेत. या ओंब्यांचा अर्थ ही नाणी खर्च करताना अल्लाहचा आशीर्वाद त्याला आहे, असे व्हिडिओचा निवेदक सांगतो.