चालू घडामोडी - २ सप्टेंबर २०१५ [Current Affairs - September 2, 2015]

गुगलच्या लोगोचे मेकओव्हर

  • नेटविश्वातील आघाडीचे सर्ज इंजिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘गुगल’च्या लोगोचे मेकओव्हर करण्यात आले असून, हा लोगो अधिक उठावदार बनविण्यात आला आहे. आता ‘सॅनसेरिफ’ फॉंटमध्ये हा लोगो अवतरला आहे.
  • १९९७पासून आतापर्यंत गुगलने सात वेळा लोगो बदलला आहे. गुगलने सर्वप्रथम १९९७मध्ये आपला लोगो जगासमोर आणला. त्यानंतर १९९८मध्ये लगेच त्यामध्ये बदल केला. त्याचवेळी त्यांनी गुगलच्या लोगोमध्ये उद्गारवाचक चिन्हाचा समावेश केला. मात्र, १९९९ मध्ये लगेच गुगलने लोगो बदलून त्यातून उद्गारवाचक चिन्ह हटविले. त्यानंतर आतापर्यंत दोन किंवा तीन वर्षांच्या अंतराने लोगो बदलण्यात आले आहेत.
 गुगल बद्दल ..... 
  • स्थापना : ७ सप्टेंबर १९९८
  • मुख्यालय : माउंटन व्ह्यू [अमेरिका (कॅलिफोर्निया)]
  • संस्थापक : लॅरी पेज व सर्जी ब्राऊन यांनी रोजी केली.
  • मुख्य कार्यकारी अधिकारी : सुंदर पिचई (११ ऑगस्ट २०१५ पासून भारतीय वंशाचे सुंदर पिचई यांची गुगलच्या सीईओपदी नियुक्ती झाली.)
  • गूगल (किंवा गूगल इनकॉर्पोरेटेड) नावाची अमेरिकन कंपनी गूगल शोधयंत्र, यूट्यूब, ॲडसेन्स व इतर अनेक सेवा पुरवते. गूगल कंपनी विशेषत: आंतरजाल-शोध व आंतरजाल-जाहिराती या क्षेत्रांत सेवा पुरवते.
  • ११ ऑगस्ट २०१५ रोजी गुगलने एक मोठा बदल करत 'अल्फाबेट इंक' नावाची नवी कंपनीही स्थापन केली आहे. नव्याने स्थापन झालेल्या या  कंपनीच्या छत्राखाली गुगल व इतर उपकंपन्या येणार असून त्याचे सीईओपद लॅरी पेज यांच्याकडे असेल तर सर्जी ब्रिन अध्यक्षपद सांभाळतील.

परदेशी गुंतवणूकदारांवरील

मॅट रद्द
    Ajit Prakash Shaha
  • भारतात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या विदेशातील संस्थात्मक गुंतवणूकदारांवर पूर्वलक्ष्यी प्रभावाने किमान पर्यायी कर (मिनीमम अल्टरनेट टॅक्स अर्थात मॅट) न लावण्याची उच्चस्तरीय समितीची शिफारस केंद्र सरकारने मान्य केली आहे. यामुळे विदेशी गुंतवणूकदारांना एप्रिल २०१५पासून हा कर द्यावा लागणार नाही.
  • कायदा आयोगाचे अध्यक्ष न्या. ए. पी. शहा यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने ‘मॅट’ लागू करण्याबाबतचा आपला अंतिम अहवाल जुलैमध्ये सादर केला होता. त्यांच्या या शिफारसी सरकारने स्वीकारल्या आहेत. 
  • शहा समितीनुसार परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी केलेल्या गुंतवणुकीवर मॅट लागू करण्यास कोणताही वैधानिक आधार नाही. या शिफारसी स्वीकारल्यामुळे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) लवकरच तशी सूचना जारी करणार आहे. सीबीडीटीच्या नोटिसीनंतर विविध कोर्टांत सुरू असलेल्या मॅट केसेस रद्दबातल ठरवण्यात येतील. 

२२ वर्षांनतर भारताचा संघाने श्रीलंकेत मालिका जिंकली

    India claimed Test series win against Sri Lanka after 22 years
  • विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताच्या युवा संघाने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी ११७ धावांनी विजय मिळवीत मालिका २-१ अशी जिंकली.
  • भारताने श्रीलंकेपुढे ३८६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने शतक झळकावत भारताला विजयसाठी झगडवले खरे, पण त्याला दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ मिळाली नाही.
  • पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या चेतेश्वर पुजाराला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. तर या मालिकेत नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या आर. अश्विनला मालिकावीराचा पुरस्काराने गौरविण्यात आले.
विराटचा पहिला मालिकाविजय
  • महेंद्रसिंग धोनीकडून कसोटी कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतल्यावर पहिल्याच मालिकेत विराट कोहलीने मालिकाविजय मिळवण्याची कामगिरी केली आहे.
श्रीलंकेत २२ वर्षांनी विजय
  • भारताने मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली १९९३ साली श्रीलंकेत १-० अशी मालिका जिंकली होती. त्यानंतर तब्बल २२ वर्षांनी भारताला श्रीलंकेला त्यांच्या मातील धूळ चारता आली आहे.
चार वर्षांनी देशाबाहेर विजय
  • भारताला गेल्या चार वर्षांमध्ये देशाबाहेर विजय मिळवता आला नव्हता. यापूर्वी भारताने जून २०११ साली वेस्ट इंडिजला पराभूत केले होते.
इशांत, चंडिमलवर एका सामन्याची बंदी
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या खेळाडूंसाठीच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी इशांत शर्मा आणि दिनेश चंडिमल यांच्यावर एका आंतरराष्ट्रीय सामन्याची बंदी घालण्यात आली आहे.
  • धम्मिका प्रसाद आणि लहिरु थिरिमाने यांच्या मानधनातून ५० टक्के रक्कम कापून घेण्यात येणार आहे.

एक हजार रुपयांच्या नोटेवर नवीन सुरक्षा मानके

  • रिझर्व्ह बॅंकेने नव्या सुरक्षा मानकांसह एक हजार रुपयांच्या चलनी नोटा सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या एक हजाराच्या नोटेवर रुपयाच्या चिन्हाच्या आत ‘एल’ (L) हे अक्षर छापण्यात येणार आहे.
  • तसेच बनावट नोटा तयार होण्याच्या प्रक्रियेला आळा घालण्यासाठी नंबर पॅनेलवरील आकड्यांची चढत्या क्रमाने मांडणी करण्यात येणार आहे. यामुळे नवीन नोट अधिक सुरक्षित होणार आहे. एक हजार रुपयांच्या नोटांचा वापर अधिक सुरक्षित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
  • या नव्या नोटा आल्यानंतर ग्राहकांना खऱ्या व बनावट नोटांमध्ये फरक करणे सोपे होणार आहे. यापूर्वी ५०० रुपयांच्या चलनी नोटा सुरक्षा मानकांसह मर्यादित स्वरूपात छापण्यात आल्या आहेत.

अॅग्रोवन स्मार्ट व्हिलेज प्रकल्प

  • शेती क्षेत्रात जगात आघाडीवर असलेल्या इस्राईलची मदत घेऊन महाराष्ट्रातील निवडक पाच गावांमध्ये कृषिकेंद्रित ‘अॅग्रोवन स्मार्ट व्हिलेज’ साकारण्याचा संकल्प ‘अॅग्रोवन’ आणि डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनने केला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
  • निकष आणि अटी पूर्ण करणाऱ्या सर्व गावांना प्रकल्पात सहभागासाठी प्रस्ताव पाठवण्याची संधी आहे. प्रत्यक्ष पाहणी करून इस्राईलच्या तज्ज्ञांच्या मदतीने गावांची अंतिम निवड केली जाईल. जादा गावे पात्र ठरली, तर लॉटरी पद्धतीचा अवलंब केला जाईल.
  • परदेशी गुंतवणुकीतून साकारला जाणारा हा कृषी प्रकल्प पूर्णपणे व्यावसायिक पद्धतीने चालवला जाईल. त्याचबरोबर सरकारच्या सहकार्याने गावात आवश्यक त्या पायाभूत सोयी-सुविधा पुरवण्याचेही नियोजन आहे.
  • आपल्या गावाचा कायापालट करण्याबरोबरच शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवण्याची ही अनोखी आणि दुर्मिळ संधी ‘अॅग्रोवन’ उपलब्ध करून देत आहे. ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना ज्ञान-तंत्रज्ञान पुरवून सन्मानाने आणि प्रतिष्ठेने उभे करणे हा या प्रकल्पाचा गाभा आहे.

सीआयएचा वादग्रस्त अहवाल

  • १९८० मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या, तेव्हा त्यांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्र आस्थापनांवर लष्करी हल्ले करण्याची योजना आखली होती, त्यात पाकिस्तानने अण्वस्त्र सज्ज होऊ नये हा हेतू होता, पण प्रत्यक्षात त्यांनी तसा निर्णय घेतला नाही, असे सीआयएने 'इंडियाज रिअ‍ॅक्शन टू न्यूक्लियर डेव्हलपमेंट्स इन पाकिस्तान' या शीर्षकाच्या अहवालात म्हटले आहे.
  • अमेरिका त्या वेळी पाकिस्तानला एफ १६ विमाने पुरवण्याच्या पुढच्या टप्प्यात होती व त्या परिस्थितीत इंदिरा गांधी यांनी हा धाडसी विचार केला होता, असे असे या अहवालात म्हंटले आहे.
  • बारा पानांचा हा अहवाल सीआयएच्या संकेतस्थळावर जूनमध्ये टाकण्यात आला असून त्यात म्हटल्यानुसार त्यावेळी म्हणजे १९८१ च्या सुमारास पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पाकिस्तान अण्वस्त्र कार्यक्रमात करीत असलेल्या प्रगतीची चिंता वाटत होती.
Previous Post Next Post