सानिया आणि मार्टिना ओपन डब्ल्यूटीए स्पर्धेच्या उपांत्यफेरीत
- भारतीय टेनिस तारका सानिया मिर्झा आणि स्वीत्झर्लंडची मार्टिना हिंगीस या जोडीने ओपन डब्ल्यूटीए स्पर्धेची उपांत्यफेरी गाठली.
- अव्वल मानांकित सानिया आणि हिंगीस यांनी उपांत्यपूर्व फेरीत पाचव्या मानांकित प्राप्त अमेरिकेच्या राकेल कोप्स जोन्स आणि एबिगेल स्पीयर्सचा ६-२, ६-२ असा पराभव केला.
- दुसऱ्या फेरीत त्यांनी क्लाउडिया जान्स इग्नासिक आणि अनास्तासिया रोडियोनोव्हा यांचा ६-३, ६-२ असा पराभव केला होता, तर पहिल्या फेरीत त्यांना बाय मिळाला होता.
- सानिया-हिंगीस जोडीने या वर्षी विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन विजेतेपद पटकावलेले आहे.
देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी राष्ट्रीय धोरण
- देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी पुढील वर्षी नवे सर्वंकष राष्ट्रीय धोरण आणण्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरणमंत्री थावरचंद गहलोत यांनी ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त येथे आयोजित कार्यक्रमात केली.
- लवकरच नवे राष्ट्रीय धोरण अवलंबले जाईल.
- समाजाने वृद्धांकडे लक्ष देण्याची आवश्यकता लक्षात घेता नवे धोरण त्या दिशेने ठोस पाऊल टाकणारे ठरेल.
- समाजातील बदलत्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीमुळे नव्या राष्ट्रीय धोरणाची गरज प्रतिपादित करताना त्यांनी वृद्धांना अधिक सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले.
- सरकारने याआधीच स्वयंसेवी संस्था आणि अन्य घटकांकडून सूचना आणि शिफारशी मागितल्या आहेत.
- १९९९ मध्ये अवलंबण्यात आलेल्या राष्ट्रीय धोरणाची जागा नव्या सर्वसमावेशक धोरणाने घेतलेली असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
वरूड तालुक्यात राज्यातील पहिला डिहायड्रेशन प्रकल्प उभारला :
- विदर्भाच्या कॅलिफोर्नियातील संत्रा उत्पादकांची ससेहोलपट थांबविण्यासाठी वरूड तालुक्यात राज्यातील पहिला डिहायड्रेशन प्रकल्प उभारला जाणार आहे.
- तसेच मोर्शी तालुक्यात संत्रा रस प्रक्रिया केंद्रही सुरू केली जातील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे आयोजित राष्ट्रीय कृषी व संत्रा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केली.
- युती शासन जलयुक्त शेतशिवाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संरक्षित सिंचन देण्याचा प्रयत्न करीत आहे.
- सहा हजार गावांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे.
- संत्र्याला बाजारपेठ मिळाली पाहिजे, याकरिता राज्यातील १० शहरांमध्ये जागा उपलब्ध करुन देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अभिनेते प्रशांत दामले यांनीही दुष्काळग्रस्तांना मदत
- मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर, अक्षय कुमार यांच्यापाठोपाठ आता अभिनेते प्रशांत दामले यांनीही दुष्काळग्रस्तांना मदत दिली आहे.
- प्रशांत दामले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त केला असून जलयुक्तशिवार योजनेसाठी ही मदत वापरली जाणार आहे.
- पावसाने पाठ फिरवल्याने राज्यात भीषण दुष्काळाचे सावट असून दुष्काळग्रस्तांसाठी सिने व क्रीडा क्षेत्रातील मंडळी सरसावली आहेत मकरंद अनासपुरे व नाना पाटेकर यांनी 'नाम' संस्थेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना मदत करायला सुरुवात केली आहे.
- अक्षय कुमारनेही दुष्काळग्रस्तांना ९० लाख रुपयांची मदत करण्याचे आश्वासन दिले होते.
- या यादीत आता प्रशांत दामले यांचाही समावेश झाला आहे. दामले यांनी एक लाख रुपयांची मदत दिली आहे.