आणीबाणीची चाळिशी
- २५ जून : आणीबाणी लागू करण्याच्या घटनेला चाळीस वर्षे पूर्ण. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकारने २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली होती.
- नंतर आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण आणि समाजकारणात पुढील १२ महिन्यांत अनेक घटना घडल्या. एकूणच आणीबाणी लादण्याच्या इंदिरा गांधी यांच्या निर्णयामुळे अवघा भारत देश ढवळून निघाला. या घटनेमुळे देशाच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली.
सचिन तेंडुलकर २१व्या शतकातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू
- भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची २१व्या शतकातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.
- ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ या वेबसाईटतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात चाहत्यांनी सचिनला हा गौरव बहाल केला आहे.
- या सर्वेक्षणासाठी २१व्या शतकातील १०० सर्वोत्तम कसोटी खेळाडुंमधून एका खेळाडुची निवड करण्याचा पर्याय देण्यात आला होता. त्यामध्ये सचिन तेंडुलकरने सर्वाधिक मते मिळवत बाजी मारली. तर श्रीलंकेचा कुमार संगाकारा आणि ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले आहे.
- या सर्वेक्षणात तब्बल १६००० लोकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी २३ टक्के लोकांनी सचिन तेंडुलकर तर १४ टक्के लोकांनी कुमार संगाकाराच्या नावाला पसंती दिली.
- तब्बल दहा दिवस सुरु असलेल्या या सर्वेक्षणात २००० सालापासूनच्या कसोटी खेळाडुंचा समावेश करण्यात आला होता. मात्र, लिटील मास्टर सचिनने या सगळ्यांवर मात करत अग्रस्थान पटकावले.
- विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने केलेल्या स्वत: जाहीर केलेल्या यादीत सचिन पाचव्या क्रमांकावर होता. मात्र, सचिनने थेट पहिल्या स्थानावर झेप घेतल्याने रिकी पाँटिंग आणि जॅक कॅलिस या सर्वेक्षणात काहीसे पिछाडीवर पडल्याची माहिती वेबसाईटकडून देण्यात आली.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही प्रकारांमध्ये सचिनच्या नावावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे.
नागपूरसह सहा ठिकाणी आयआयएम
- नागपूरसह देशातील सहा ठिकाणी नव्याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची (आयआयएम) (भारतीय व्यवस्थापन संस्था) स्थापना करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
- विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश,) बोधगया (बिहार), सिरमौर (हिमाचल प्रदेश), संबळपूर (ओडिशा) आणि अमृतसर (पंजाब) येथे अन्य पाच आयआयएम असतील.
- येत्या शैक्षणिक वर्षापासूनच या संस्था विविध व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरू करतील.
- प्रत्येक संस्थेत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी १४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून कॅट (कॉमन ऍडमिशन टेस्ट) मार्फत प्रवेशप्रक्रिया पार पाडली जाईल. दरवर्षी विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ केली जाणार असून सात वर्षानंतर प्रत्येक संस्थेतील विद्यार्थ्यांची संख्या ५६० विद्यार्थ्यांपर्यंत वाढविली जाईल.
- देशात याआधी १३ आयआयएम आहेत.
नेपाळला भारताची १ अब्ज डॉलरची मदत
- नेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय दाता परिषद २५ जून रोजी पार पडली. या परिषदेत भूकंपामुळे उध्वस्त झालेल्या नेपाळच्या पुन:उभारणीसाठी भारत तब्बल १ अब्ज डॉलरची आर्थिक मदत देणार असल्याचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी जाहीर केले.
- आता एक अब्ज डॉलरची मदत करण्यात येणार असून, आणखी एक अब्ज डॉलरची मदत पुढील पाच वर्षांत करण्यात येणार असून, एकूण मदतीचा आकडा दोन अब्ज डॉलरवर गेला आहे. नेपाळच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या सुषमा स्वराज यांनी काही भागांची पाहणी केली.
- याच परिषदेत चीनने ४८.३ कोटी डॉलरची मदत जाहीर केली असून, नेपाळच्या शाश्वत विकासासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच, चीन ‘सिल्क रोड फंड’मधून वेळोवेळी मदत करणार असून, पुढील वर्षभरात दीड हजार नेपाळी नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येईल, असे चीनचे परराष्ट्रमंत्री वॅंग यी यांनी जाहीर केले.
- जपाननेही २६ कोटी डॉलरची मदत नेपाळसाठी जाहीर केली आहे. यातून घरे, शाळा आणि पायाभूत सुविधांची उभारणी करण्यावर भर देण्यात येणार आहे.
- २५ एप्रिल भूकंपामुळे नेपाळचे प्रचंड नुकसान झाले. सुमारे ९००० लोक मृत्यूमुखी पडले. त्यावेळी झालेल्या जीवित आणि वित्तहानीमुळे नेपाळ मोठ्या संकटात सापडले. पुरातन मंदिरे, वास्तू, सरकारी कार्यलय, हॉस्पिटल यांचेही प्रचंड नुकसान झाले.
- नेपाळच्या अर्थ व्यवस्थेत पर्यटनाचा मोठा वाटा आहे. पण भूकंपामुळे पर्यटकांनीही पाठ फिरवल्याने नेपाळला मोठ्या मदतीची गरज असताना भारताने पुढाकार घेतला आहे.
स्मार्ट सिटी आणि अमृत योजना
- शहरी भारताचा चेहरामोहरा बदलण्याच्या उद्देशाने चार लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या तीन महत्त्वाकांक्षी योजनांची घोषणा २५ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
- १०० स्मार्ट शहरांचा विकास, अटल शहरी पुनरुज्जीवन आणि परिवर्तन मिशन (एएमआरयूटी) तसेच पंतप्रधान आवास योजना, ही शहर विकासाची सुसाट इंजिने मानल्या जाणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीत राज्य सरकारे, स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.
- या योजनांबद्दल सविस्तर माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.
रिन्युएबल एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (रेकी)
- केंद्र सरकारने सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची (सेकी) नोंदणी व्यवसायिक कंपनी म्हणून करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. आता सेकीचे नाव रिन्युएबल एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (रेकी) असे होईल.
- यामुळे अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांना गती येण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे.
- सेकी ही सध्या कायद्यांतर्गत सेक्शन-८ प्रकारची कंपनी आहे. या विभागांतर्गत समाजासाठी काम करणाऱ्या कंपन्यांची स्थापना व नोंदणी करता येते. यामुळे अशा कंपनीला व्यवसाय करण्यास तसेच व्यावसायिक लाभ मिळवण्यास पूर्णपणे बंदी आहे.
- अपारंपरिक ऊर्जेसारखे क्षेत्र ही काळाची गरज असल्यामुळे सेकीची नोंदणी बदलून तिला व्यावसायिक कंपनीचा दर्जा देणे आवश्यक होते.
- आता सेकीची नोंदणी कंपनी कायद्याच्या सेक्शन-३ अंतर्गत होणार असल्यामुळे नव्याने स्थापन होणाऱ्या रेकी या कंपनीला स्वत:च्या मालकीचा सौरऊर्जा प्रकल्प उभारणे, त्यातून निर्माण होणारी वीज व्यावसायिक स्तरावर विकणे तसेच सौरऊर्जेवर चालणाऱ्या उत्पादनांची निर्मिती करणे शक्य होणार आहे.
- कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यामुळे सेकी ही कंपनी कंपनी रजिस्ट्रारकडे सेक्शन-३ अंतर्गत नोंदणी करून घेण्यासाठी अर्ज करेल आणि नाव बदलून रेकी हे नवे नाव धारण करेल.
- सेकीला संपूर्णत: व्यावसायिक कंपनी म्हणून वावरताना कोणतीली अडचण येऊ नये, यासाठीच या कॉर्पोरेशनची नोंदणी कंपनी कायदा सेक्शन-३ अंतर्गत नव्याने केली जाणार आहे.
- नवी रेकी ही कंपनी आपले कार्यक्षेत्र सौरऊर्जेपुरतेच मर्यादित ठेवणार नसून त्याखेरीज अन्य अपारंपरिक ऊर्जाक्षेत्रांमध्येही ही कंपनी काम करणार आहे. यामध्ये जिओथर्मल, ऑफशोअर विंड, टायडल अशा ऊर्जांचाही समावेश असणार आहे.
जोकोविच, सेरेनाला अव्वल सीडिंग
- सर्बियाचा नोव्हाक जोकोविच आणि अमेरिकेची सेरेना विल्यम्स यांना विम्बल्डन टेनिस स्पर्धेत अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात अव्वल सीडिंग देण्यात आले आहे.
- ही स्पर्धा दोन वेळा जिंकणाऱ्या रफाएल नदालला दहावे सीडिंग आहे. नदालने २००८ आणि २०१०मध्ये ही स्पर्धा जिंकली आहे.
सीडेड खेळाडूंची यादी (अव्वल दहा)
- पुरुष एकेरी:- नोव्हाक जोकोविच (सर्बिया), रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड), मरे (ब्रिटन), स्टॅनिस्लास वॉवरिन्का (स्वित्झर्लंड), निशिकोरी (जपान), बर्डिच (चेक प्रजासत्ताक), रॉनिक (कॅनडा), फेरर (स्पेन), चिलीच (क्रोएशिया), नदाल (स्पेन).
- महिला एकेरी:- सेरेना विल्यम्स (अमेरिका), क्विटोवा (चेक प्रजासत्ताक), हॅलेप (रोमानिया), मारिया शारापोवा (रशिया), कॅरोलिन वॉझ्नियाकी (डेन्मार्क), साफारोवा (चेक प्रजासत्ताक), अॅना इव्हानोविच (सर्बिया), एकतेरिना माकारोवा (रशिया), कार्ला सुआरेझ (स्पेन), अँजेलिक कार्बर (जर्मनी).
मानवी हक्क आयोगाची राज्य सरकारला नोटीस
- मुंबईतील मालवणी येथे घडलेल्या दारूकांडप्रकरणी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने (एनएचआरसी) महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलीस आयुक्तांवर नोटिसा बजाविल्या आहेत. या दारूकांडात आतापर्यंत १०० हून अधिक जणांचा बळी गेला आहे.
- विषारी दारू प्यायल्याने मालवणी येथे अनेक जण मृत्युमुखी पडल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच आयोगाने त्याची स्वत:हून दखल घेतली. माध्यमातील वृत्तांमध्ये तथ्य असल्यास हा मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याचा गंभीर प्रकार आहे, असे आयोगाने म्हटले आहे.
- राज्याचे मुख्य सचिव, अबकारी विभागाचे प्रधान सचिव आणि मुंबई पोलिसांवर नोटिसा बजाविण्यात आल्या असून, दोन आठवडय़ात वस्तुस्थिती सादर करण्यास सांगितले आहे.
- त्याचप्रमाणे बळींच्या नातेवाईकांना आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांना आर्थिक मदत करण्यात आली आहे का, त्याची माहितीही आयोगाने संबंधितांकडून मागविली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते, खासदार दिलीपसिंह भुरिया यांचे निधन
- भाजपचे ज्येष्ठ नेते व लोकसभेचे रतलाम-झाबुआ मतदारसंघातील खासदार दिलीपसिंह भुरिया (वय ७१) यांचे गुडगाव येथे निधन झाले. त्यांना मेंदूत रक्तस्राव झाला तसेच हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्यांचे निधन झाले.
- त्यांचा जन्म १९ जून १९४४ रोजी झाला व १९७२ मध्ये ते पेटलावद विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले.
- झाबुआ मतदारसंघातून ते १९८० मध्ये काँग्रेसकडून निवडून आले व १९८० ते १९९६ असे पाच वेळा ती जागा जिंकली.
- काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांच्याशी मतभेदांमुळे त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला व भाजपात प्रवेश केला. १९९८ मध्ये त्यांना काँग्रेसचे कांतिलाल भुरिया यांनी पराभूत केले पण २०१४ मध्ये दिलीपसिंह भुरिया परत निवडून आले.
- त्यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना काम केले होते.
शाहीर लीलाधर हेगडेंना बालसाहित्य सन्मान
- साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी एक असलेले व उत्तुंग आमुची उत्तर सीमा, माझे राष्ट्र महान यांसारख्या देशभक्तिपर गीतांनी राष्ट्रप्रेम जागवणारे शाहीर लीलाधर हेगडे यांना साहित्य अकादमीचा २०१५चा राष्ट्रीय बालसाहित्य सन्मान जाहीर झाला आहे. त्याचबरोबर वीर राठोड यांना मराठीसाठीचा अकादमी युवा साहित्य सन्मान जाहीर झाला आहे.
- येत्या १४ नोव्हेंबरला मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण होईल.
- साहित्य अकादमीतर्फे यंदा २४ भाषांतील लेखकांना बालसाहित्य, तर २३ भाषांतील ३५ वर्षांखालील लेखकांना युवा साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले.
- बालसाहित्य पुरस्कार मिळालेल्यांमध्ये शाहीर हेगडे यांच्यासह निवेदिता सुब्रह्मण्यम (इंग्रजी), शीरजंग गर्ग (हिंदी) व रामनाथ गावडे (कोकणी) यांचाही समावेश आहे. युवा साहित्य पुरस्कार विजेत्यांमध्ये निशा नाईक यांना कोकणीसाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
- हेगडे यांना बालसाहित्यातील समग्र योगदानाबद्दल साहित्य अकादमी सन्मान मिळाला आहे. आपल्या गीतातंतून राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग जागविण्याबरोबरच उमलत्या पिढीत सुसंस्कारांची रूजवात व्हावी यासाठी अखंड धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये शाहीर हेगडे अग्रस्थानी आहेत. मुलांसाठी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.
- ठाणे जिल्ह्यात जन्मलेले शाहीर हेगडे यांनी १९४२च्या चले जाव आंदोलनात सहभाग घेतला; तसेच साने गुरुजींच्या पंढरपूर मंदिर सत्याग्रहातही ते सहभागी झाले. चुनाभट्टीतील साने गुरुजी आरोग्य मंदिराचे काम ते गेली किमान ४५ वर्षे सांभाळत आहेत.
- त्यांना यापूर्वी महाराष्ट्र फाउंडेशन न्यूयॉर्क व केशव गोरे स्मारक ट्रस्ट आदी संस्थांचे सन्मान मिळाले आहेत.
ईस्टर्न तसेच वेस्टर्न डेडिकेटेड फ्रीट कॉरिडोर (डीएफसी)
- केवळ मालवाहतुकीच्या उद्देशाने बांधण्यात येत असलेल्या ईस्टर्न तसेच वेस्टर्न डेडिकेटेड फ्रीट कॉरिडोर (डीएफसी) प्रकल्पासाठी ८१,४५९ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने मंजुरी दिली.
- महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, गुजरात आणि राजस्थान ही नऊ राज्ये या प्रकल्पाद्वारे जोडली जाणार आहेत.
- यातील पूर्वेकडील राज्यांमध्ये असलेल्या ‘इस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’ची अंमलबजाणी तीन टप्प्यांत केली जात आहे, तर पश्चिमेकडील राज्यांसाठीच्या ‘वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’ची दोन टप्प्यांत अंमलबजावणी केली जात आहे.
- या प्रकल्पाचे सर्व टप्पे २०१७ ते २०१९ दरम्यान पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. यासाठी ८४ टक्के जमिनीचे संपादन झाले असून, त्यासाठी ६९०० कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे.
झहीर अब्बास ‘आयसीसी’चे अध्यक्ष
- पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार झहीर अब्बास यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या (आयसीसी) अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली आहे. बार्बाडोसमधील आयसीसीच्या वार्षिक परिषदेत हा निर्णय घेण्यात आला असून अब्बास पुढील एका वर्षासाठी आयसीसीचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील.
- बांगलादेशचे मुस्तफा कमाल यांनी विश्वचषक स्पर्धेदरम्यानच्या वादानंतर आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्त होते.
- एहसान मणी यांच्यानंतर आयसीसीच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे झहीर अब्बास हे दुसरे पाकिस्तानी असतील.
- आयसीसीने या बैठकीदरम्यान सर्बिया क्रिकेट फेडरेशनलाही मान्यता दिली.
- आयसीसीचे चेअरमन : एन. श्रीनिवासन
झहीर अब्बास यांच्याबद्दल
- शैलीदार फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या अब्बास यांनी १९६९ ते १९८५ या आपल्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांनी ७८ कसोटी आणि ६२ एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे ५०६२ आणि २,५७२ इतक्या धावा केल्या आहेत.
- याशिवाय त्यांनी १९७५, १९७९ आणि १९८३ या तीन विश्वचषक स्पर्धांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच १४ कसोटी आणि १३ एकदिवसीय सामन्यांमध्ये ते पाकिस्तानी संघाचे कर्णधार होते.
- प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १०८ शतके झळकवणारा एकमेव आशियाई खेळाडुचा बहुमानदेखील त्यांच्या नावावर जमा आहे.
- आपल्या दुसऱ्याच कसोटी सामन्यात अब्बास यांनी इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात २७८ धावांची खेळी केली होती.
!!! जय महाराष्ट्र !!!