Header Ads

चालू घडामोडी - २६ जून २०१५ [Current Affairs - June 26, 2015]

एकदिवसीय क्रिकेटमधील नियमांमध्ये बदल

  ICC Logo
 • एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नव्या नियम बदलांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मान्यता दिली आहे. 
 • आयसीसीची वार्षिक बैठक बार्बाडोस येथे पार पडली. आयसीसी क्रिकेट समितीने काही बदल करण्याच्या शिफारसी केल्या होत्या. त्या शिफारसी या बैठकीत आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीने स्वीकारल्या. 
 • आयसीसीचे चेअरमन एन. श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नवे नियम ५ जुलैपासून लागू करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
 • या नव्या नियमांमुळे बॅट आणि बॉलमध्ये समतोल राहणार असून, एकदिवसीय क्रिकेट आणखी रोचक होणार आहे. 

एकदिवसीय सामन्यांच्या नियमावलीत करण्यात आलेले महत्त्वपूर्ण बदल पुढीलप्रमाणे

 • पहिल्या १० षटकांमध्ये आता कॅचिंग पोझिशनवर क्षेत्ररक्षक ठेवणे अनिवार्य नाही.
 • १५ ते ४० षटकांमध्ये आता बॅटिंग पॉवरप्ले मिळणार नाही.
 • ४१ ते ५० षटकांदरम्यान आता ३० यार्डांच्या सर्कलबाहेर चारऐवजी आता पाच क्षेत्ररक्षक ठेवण्याची परवानगी.
 • कोणत्याही नो-बॉलवर आता फलंदाजाला फ्री हिटची संधी देण्यात येईल.

२००५ पूर्वीच्या नोटा बदलण्यास मुदतवाढ

 • सन २००५ पूर्वीच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी सध्या असलेली ३० जून ही अंतिम मुदतीत रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांनी वाढवली आहे. 
 • आता नागरिकांना ३१ डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा बदलता येणार आहे. जुन्या नोटा बदलण्यासाठी त्या संबंधित ग्राहकांनी आपल्या बँक खात्यात जमा कराव्यात किंवा कोणत्याही जवळच्या बँक शाखेत जाऊन बदलून घ्याव्यात, असे रिझर्व्ह बँकेने सुचवले आहे. 
 • दिलेल्या मुदतीत २००५पूर्वीच्या नोटा बदलून घेणे शक्य न झाल्यास त्यानंतरही या नोटा चलनात राहतील, असेही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.

एशियन ग्रां. प्रि. अॅथलेटिक्स सीरिज स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यात

 • एशियन ग्रां. प्रि. अॅथलेटिक्स सीरिज स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यात भारताने तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि पाच कांस्यसह एकूण दहा पदकांची कमाई केली. बँकॉकमध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यात भारताने एकूण ८ पदके मिळवली होती.
 • भारताच्या इंदरजित सिंग आणि जिन्सन जॉन्सन यांनी स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातही सुवर्णपदकावर नाव कोरले. भारताला तिसरे सुवर्ण अरोक्या राजीवने मिळवून दिले. 
 • दुसऱ्या टप्प्यात गोळा फेकमध्ये इंदरजितसिंगने १९.८५ मीटर अशी कामगिरी नोंदवून सुवर्णपदक जिंकले. पहिल्या टप्प्यात त्याने १९.८३ मीटर अशी कामगिरी नोंदवली होती. इंदरजितचे हे या महिन्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील तिसरे सुवर्णपदक आहे. 
 • पुरुषांच्या ८०० मीटरच्या शर्यतीत जॉन्सनने १ मिनिट ४९.८५ सेकंद अशी कामगिरी नोंदवून अव्वल क्रमांक मिळवला. 
 • लांब उडीमध्ये अंकित शर्माने रौप्यपदक मिळवले. त्याने ७.८० मीटर अशी कामगिरी नोंदवली. पहिल्या टप्प्यातही अंकितने रौप्यपदक मिळवले होते.
 • महिलांच्या ८०० मीटरच्या शर्यतीत एम. गोमंतीने २ मिनिटे ६.२५ सेकंद अशी वेळ नोंदवून रौप्यपदक पटकावले. 
 • महिलांच्या १०० मीटर अडथळा शर्यतीत गायत्री गोविंदराजने (१३.६६ से.), १०० मीटर स्प्रिंटमध्ये एस. नंदाने (११.७२ से.), ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत एम. आर. पूर्वम्मा (५२. ७२ से.) ब्राँझपदक मिळवले. 
 • भारताला दोन ब्राँझपदके पुरुष आणि महिला ४ बाय १०० मीटर रिलेत मिळाली. पुरुष संघाने ३९.६० सेकंद अशी, तर महिलांनी ४५.३३ सेकंद अशी वेळ नोंदवली.

जलतरणपटू रोहन मोरेला ‘हॉल ऑफ फेम’चा बहुमान

 • पुण्याचा जलतरणपटू रोहन मोरे याने इंग्लिश खाडी, कॅटेलिनाखाडीपाठोपाठ मॅनहॅटन आयलंड (न्यूयॉर्क) मोहिम फत्ते करत वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग फेडरेशनच्या ‘हॉल ऑफ फेम’चा बहुमान मिळविला. 
 • अशी कामगिरी करणारा रोहन दुसराच भारतीय ठरला आहे. ३० वर्षांपूर्वी तारानाथ नारायण शेनॉय यांनी अशी कामगिरी केली होती.
 • न्यूयॉर्कमधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या भोवतीची ४५.८ किलोमीटर अंतराची मॅनहॅटन आयलंड मोहिम रोहनने ७ तास ४३ मिनिटांत फत्ते केली. 
 • यापूर्वी रोहनने इंग्लिश खाडी (३३.६ कि.मी.) मोहिम १३ तास १३ मिनिटांत, तर दक्षिण कॅलिफोर्नियातील कॅटेलिना खाडी मोहिम (३३.७ कि.मी) १० तास १७ मिनिटांत फत्ते केली होती.

शेअर बाजारात फेसबुक वॉलमार्टच्या पुढे

  Facebook
 • शेअर बाजारात फेसबुकचे बाजारमूल्य वॉलमार्टपेक्षा वाढल्याने फेसबुक ही कंपनी आता वॉलमार्टपेक्षा मोठी ठरली आहे. 
 • जगातील सर्वांत मोठी सोशल नेटवर्किंग साइट असणाऱ्या फेसबुकच्या या कामगिरीमुळे शेअर बाजारात सर्वोच्च भागभांडवल असणाऱ्या पहिल्या दहा कंपन्यांच्या यादीतून वॉलमार्ट बाहेर पडली आहे. 
 • अमेरिकी शेअर बाजारात सध्या ऍपल, मायक्रोसॉफ्ट आणि गुगल सर्वाधिक भागभांडवल असणाऱ्या कंपन्यांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. आता फेसबुक त्यांना सामील होण्याच्या मार्गावर आहे. 
 • ‘फॅक्टसेट’च्या आकडेवारीनुसार फेसबुकचे बाजारमूल्य २३८ अब्ज डॉलर झाले आहे. वॉलमार्टचे बाजारमूल्य २३४ अब्ज डॉलर आहे.

व्हेअर बॉर्डर्स ब्लीड : ऍन इनसाइडर्स अकाउंट ऑफ इंडो-पाक रिलेशन्स

  Where Borders Bleed
 • १९९२ ते १९९४ या काळात कराचीमध्ये भारताचे वाणिज्यदूत म्हणून काम पाहिलेले राजीव डोग्रा यांनी त्यांच्या ‘व्हेअर बॉर्डर्स ब्लीड : ऍन इनसाइडर्स अकाउंट ऑफ इंडो-पाक रिलेशन्स’ या पुस्तकात दोन्ही देशांदरम्यानच्या अनेक वादग्रस्त मुद्यांविषयी भाष्य केल्यामुळे हे पुस्तक चेचेत आले आहे.
 • दोन्ही देशांदरम्यानच्या ऐतिहासिक, राजनैतिक आणि लष्करी मुद्‌द्‌यांचा समावेश असलेल्या सुमारे ७० वर्षांतील संघर्ष पुस्तकात मांडण्यात आला आहे. फाळणी, इतिहास, त्यामुळे झालेली भांडणे, लॉर्ड माउंटबॅटन आणि महंमद अली जीनांपासून अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहनसिंग यांच्यापर्यंतच्या आकडेवारीवर आधारित दोन्ही देशांच्या कथेवर प्रकाश टाकण्यात आला आहे. 
 • कारगिलसारखी लष्करी कारवाई करण्याची तत्कालीन डीजीएमओ मेजर जनरल परवेज मुशर्रफ यांची संकल्पना बेनझीर यांनी कशी मोडीत काढली हे डोग्रा यांनी बेनझीर यांच्याच एका मुलाखतीचा हवाला देत स्पष्ट केले आहे. 
 • ऐतिहासिक दिल्ली-लाहोर बसमध्ये बसून प्रवास केल्याबद्दल तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्वागत करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना पाकिस्तानी सैनिकांनी कारगिलच्या शिखरांवर कब्जा केल्याचे ठाऊक होते, असा दावा डोग्रा यांनी केला आहे. 
 • तसेच मुंबईमध्ये १९९३ साली झालेल्या साखळी बॉंबस्फोटांविषयी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना आधीच माहिती होती आणि प्रत्यक्षात त्यासाठी त्यांनीच मान्यता दिली होती, असा दावा लेखकाने केला आहे.
 • भारतीय विदेश सेवेच्या १९७४ च्या तुकडीचे अधिकारी असलेले राजीव डोगरा यांनी इटाली, रोमानिया, माल्डोव्हा, अल्बानिया आणि सॅन मरिनो या देशांमध्ये राजदूत म्हणून, तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या रोम येथील संस्थांमध्ये भारताचे कायम प्रतिनिधी म्हणूनही काम केले आहे. त्यांचे पुस्तक रूपा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.

लिअँडर पेसचा शंभर पुरुष सहकाऱ्यांसह खेळण्याचा विक्रम

 • चाळिशीतही ग्रँडस्लॅम जेतेपद नावावर करणाऱ्या लिअँडर पेसने शंभर पुरुष सहकाऱ्यांसह खेळण्याचा विक्रम नावावर केला आहे. हा विक्रम प्रस्थापित करणारा तो ४७वा खेळाडू ठरला आहे. सध्या ब्रिटनमधील नॉटिंगहॅमला सुरू असलेल्या ग्रासकोर्टवरील स्पर्धेत तो स्पेनच्या मार्सेल ग्रॅनोलर्स याच्या साथी सहभागी झाला आहे. ग्रॅनोलर्स त्याचा शंभरावा जोडीदार ठरला आहे.

सर्वाधिक यशस्वी जोड्या

  Leander Paes
 • या शंभर सहकाऱ्यांमध्ये पेसची सगळ्यात यशस्वी जोडी भारताच्या महेश भूपतीशी ठरली.  पेसने भूपतीच्या बरोबरीने खेळताना तीन ग्रँडस्लॅम जेतेपदांवर नाव कोरले. राडेक स्टेपानेक आणि ल्युकास डौल्ही या चेक प्रजासत्ताकच्या सहकाऱ्यांसह पेसने प्रत्येकी दोन तर मार्टिन डॅमसह एका ग्रँडस्लॅम जेतेपदावर नाव कोरले.
 • नुकत्याच झालेल्या फ्रेंच खुल्या स्पर्धेत पहिल्या फेरीतील विजयासह कारकीर्दीत ७०० विजय मिळवणारा पेस केवळ आठवा खेळाडू ठरला होता. मात्र ५० जेतेपदे आणि ७०० विजय हा विक्रम करणारा पेस एकमेव खेळाडू आहे.

आठ जणांसह अव्वल

 • जागतिक क्रमवारीत पेसने आठ जोडीदारांसह अव्वल स्थान मिळविले आहे. यात महेश भूपती, डॅनिएल नेस्टर, योनास ब्योर्कमन, मार्क नोल्स, बायरन ब्लॅक, डोनाल्ड जॉन्सन आणि जॅरेड पामर यांचा समावेश आहे. 

सर्वाधिक जोडीदारांबरोबर खेळण्याचा विक्रम

 • सर्वाधिक १६८ जोडीदारांबरोबर खेळण्याचा विक्रम नेदरलॅंड्‌सच्या सॅंडर ग्रोएनच्या नावावर आहे. त्यानंतर लिबॉर पीमेक (१५५), रॉजर वॅस्सेन (१५१) हे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत.

!!! जय महाराष्ट्र !!!