Header Ads

चालू घडामोडी - २६ व २७ जुलै २०१५ [Current Affairs - July 26 & 27, 2015]

२६ जुलै : कारगिल विजय दिन

 • पाकिस्तानी लष्करानं कारगिलमध्ये १९९९ मध्ये मे महिन्यात अचानक घुसखोरी केली. भारतीय लष्करानं पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलं आणि २६ जुलैला संपूर्ण विजय मिळविला. हा दिवस ‘कारगिल विजय दिन’ म्हणून साजरा होतो.

पंजाबमध्ये दहशतवादी हल्ला

 • पाकिस्तान सीमेपासून अवघ्या १० ते १२ कि.मी. अंतरावर असलेल्या गुरदासपूरमधील दिनानगरमध्ये २७ जुलै रोजी सकाळी ६ च्या सुमारास चार पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केला. जम्मूकडे जाणाऱ्या एका बसवर हल्ला चढविल्यानंतर दहशतवाद्यांनी पोलीस ठाण्यातही घुसून अंदाधुंद गोळीबार केला.
 • हल्ल्यानंतर पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर लपून बसलेल्या दहशतवाद्यांमध्ये व पंजाब पोलिसांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू होती. तब्बल अकरा तास उलटल्यानंतरही ही धुमश्चक्री सुरूच होती. अखेर दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी पंजाब पोलिसांनी हातबॉम्बचा वापर केला. पोलिसांच्या या प्रतिहल्ल्यात तिन्ही दहशतवादी मारले गेले आहेत.
 • या हल्यात दोन पोलिसांसह आठ ठार तर चार जण जखमी झाले आहेत.

७०० प्रजातीय औषधांच्या विक्रीवर युरोपियन युनियनची बंदी

 • प्रजातीय औषधांच्या (जेनरिक) भारतातील वैद्यकीय चाचण्यात जीव्हीके बायोसायन्सेस या कंपनीने घोटाळे केल्याने युरोपीय समुदायाने अशा ७०० प्रजातीय औषधांच्या विक्रीवर बंदी घातली आहे.
 • ही बंदी युरोपमध्ये घालण्यात आली असून ती २१ ऑगस्टपासून अमलात येईल व २८ सदस्य देशांत लागू राहील, असे जर्मनीच्या ‘फेडरल इन्स्टिटय़ूट फॉर मेडिसीन अँड मेडिकल प्रॉडक्ट्स’ या औषध नियंत्रण संस्थेने म्हटले आहे.
 • विक्रीवर बंदी घालण्याच्या या निर्णयावर औषध कंपन्या अपील करण्याची शक्यता आहे मात्र ही बंदी लगेच उठण्याची शक्यता नाही.
 • जीव्हीके बायोसायन्सेस या हैदराबादच्या संस्थेने या चाचण्या फ्रेंच मेडिसीन एजन्सीच्या परवानगीने केल्या होत्या पण त्यातील माहितीत अनेक गडबडी करण्यात आल्या. इलेक्ट्रो-कार्डिओग्रॅम हवे तसे बदलण्यात आले, इतरही औषधांच्या चाचण्यातील माहितीत अनुकूल माहिती घुसवण्यात आली असा आरोप आहे.

पत्रकार, चित्रपट निर्माते व सामाजिक कार्यकर्ते यांना तुरुंगामध्ये प्रवेशबंदी

 • दिल्ली बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या तुरुंगातील मुलाखतीमुळे उठलेल्या वादळावरून बोध घेतलेल्या सरकारने देशातील तुरुंगांमध्ये पत्रकार, चित्रपट निर्माते व सामाजिक कार्यकर्ते यांना प्रवेशबंदी केली आहे.
 • विशेष विनंतीद्वारे घेतलेल्या परवानगीचा अपवाद वगळता कैद्यांच्या मुलाखती घेण्यासाठी किंवा लेख लिहिण्यासाठी कैद्यांच्या भेटीवर यामुळे र्निबध आले आहेत.
 • ब्रिटिश चित्रपट निर्माते लेस्ली उद्विन याने दिल्लीतील १६ डिसेंबरच्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींची दिल्लीच्या तिहार कारागृहात मुलाखत घेऊन तयार केलेल्या वृत्तचित्रासह पत्रकारांनी तुरुंगात मुलाखती घेतल्याच्या अनेक घटनांमुळे वाद उद्भवल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
 • संशोधन करणे, वृत्तचित्र तयार करणे, लेख लिहिणे किंवा मुलाखती घेणे या कारणांसाठी कुणीही खासगी व्यक्ती, पत्रकार, स्वयंसेवी संस्था किंवा कंपनी यांना सर्वसामान्यपणे परवानगी दिली जाणार नाही, असे गृहमंत्रालयाचे संयुक्त सचिव कुमार आलोक यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांना पाठवलेल्या सूचनांमध्ये नमूद केले आहे.
 • तथापि, असे लेख, संशोधन किंवा वृत्तचित्र तुरुंग सुधारांबाबत सकारात्मक सामाजिक जागृती करण्यासाठी आहे असे वाटल्यास राज्य सरकारे संबंधितांना त्या कामासाठी तुरुंगात प्रवेशाची परवानगी देऊ शकते, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या संकेतस्थळांवर बंदी

 • धार्मिक असहिष्णुता निर्माण करण्यासाठी अतिरेकी समूहांकडून इंटरनेटचा वापर वाढत असतानाच, सरकारने अल्पसंख्याक समुदायास चिथावणी देणारी वा धार्मिक तेढ निर्माण करणारी संकेतस्थळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 • या निर्णयामुळे सोशल मिडिया तसेच व्हिडिओ शेअरिंग संकेतस्थळासह अल्पसंख्यांक समुदायाशी संबंधित ४० संकेतस्थळ बंद होणार आहेत. 
 • ‘सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा २००९’नुसार अल्पसंख्यांक समुदायाला चिथावणी देणारे व्हिडिओ ब्लॉक करण्याचा आदेश दिला आहे.
 • २९ जून रोजीच्या या आदेशानुसार बहुतेक इंटरनेट सेवा पुरवठादारांनी अशी व्हिडिओ ब्लॉक केली आहेत. मात्र, त्यापैकी काही व्हिडिओ अद्यापही दिसत असून ते ‘सिक्युअर इंटरनेट प्रोटोकॉल’वरून अपलोड केली असल्याने ब्लॉक करता येत नसल्याचा दावा सेवा पुरवठादारांनी केला आहे.
 • दूरसंचार नियामक मंडळानेही ८ जुलै रोजी सोशलमिडियासह व्हिडिओ शेअरिंग साईटस्‌वरील काही खाती तसेच पोस्ट हटविण्याचे आदेश दिले आहेत.

बाह्यकर्जांच्या बाबतीत विकसनशील देशांमध्ये भारत चौथा

 • जागतिक बँकेच्या ‘इंटरनॅशनल डेट स्टॅटिस्टिक्स २०१५’नुसार, बाह्यकर्जांच्या बाबतीत २० विकसनशील देशांमध्ये भारताचा क्रमांक चौथा आहे.
 • विकासदराला गती देण्यासाठी विकासात्मक कामांसाठी केलेल्या खर्चामुळे २०१४-१५ या आर्थिक वर्षात दरडोई कर्जामध्ये २ हजार ९६६ रुपयांनी वाढ होऊन ते माणशी ४४ हजार ९५ रुपये झाले. आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये हे कर्ज ४१ हजार १२९ रुपये होते. दरडोई कर्जामध्ये अंतर्गत व बाह्य कर्जे, तसेच अन्य जबाबदाऱ्यांचा समावेश आहे.
 • ३१ मार्च २०१५ पर्यंत, सरकारचे एकूण थकित कर्ज ६८.९५ लाख कोटी रुपये आहे. आर्थिक वर्ष २०१५-१६ पर्यंत वित्तीय तूट ३ टक्क्यांपर्यंत आणण्यासाठी सरकारने आर्थिक नियोजन जाहीर केले आहे.
 • देशांतर्गत कर्जावरील व्याजापोटी २०१२-१३ मध्ये ४.०४ लाख कोटी, २०१३-१४ मध्ये ४.८५ लाख कोटी आणि २०१४-१५ मध्ये ५.५६ लाख कोटी रुपये खर्च केले. या तीन आर्थिक वर्षात विदेशी कर्जावरील व्याजापोटी क्रमश: ३७.२ कोटी डॉलर, ३६.६ कोटी डॉलर आणि ३८.९ कोटी डॉलर खर्च करण्यात आले.

प्रा. रंगनाथ तिवारी यांना ‘हिन्दीरत्न’ पुरस्कार

  Prof. Rangnath Tiwari
 • मराठी व हिंदीतील ज्येष्ठ कादंबरीकार प्रा. रंगनाथ तिवारी यांना नवी दिल्ली येथील हिंदी भवन यांच्या वतीने देण्यात येणारा स्व. पुरुषोत्तमदास टंडन स्मृती ‘हिंदीरत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे. 
 • एक लाख रुपये रोख, शाल, सन्मानपत्र व वाग्देवीची प्रतिमा असे पुरस्काराचे स्वरूप असून दिनांक १ ऑगस्ट २०१५ रोजी नवी दिल्ली येथील हिंदी भवन येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल. 
 • सोलापूर येथे जन्मलेले प्रा. रंगनाथ तिवारी अंबाजोगाई येथे स्थायिक झाले आणि तेथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयातून १९९३ साली सेवानिवृत्त झाले आहेत.
 • हिंदी विषयाचे अध्यापन करतानाच त्यांनी मराठी व हिंदी दोन्ही भाषांतून विपुल ग्रंथरचना केली आहे. ऐतिहासिक कादंबरी हा त्यांचा मुख्य लेखनप्रांत असून देवगिरी बिलावल, बेगम समरू, उत्तम पुरुष एकवचन, अनन्वय आणि संपल्या सुरावटी या त्यांच्या चर्चित मराठी कादंबऱ्या आहेत. काया परकाया आणि संगीत देवगिरी बिलावल हि त्यांची नाटकेही प्रसिद्ध आहेत.
 • त्यांच्या मराठी रचनांना राज्य शासनाचे विविध पुरस्कार, भैरुरतन दमाणी पुरस्कार व इतरही अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.
 • हिंदी भाषेत देवगिरी बिलावल आणि सरधाना की बेगम या लोकप्रिय कादंबऱ्यांच्या पाठोपाठ गतवर्षी प्रा. तिवारींची ‘उत्तरायण’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली.
 • यापूर्वीही या कादंबरीनिमित्त प्रा. तिवारींना महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे ‘छत्रपती शिवाजी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार’ प्रदान करण्यात आलेला आहे. 
 • ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ मराठी लेखक डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या बिढार या कादंबरीचा हिंदी अनुवाद प्रा. रंगनाथ तिवारी यांनी केला. त्यालाही केंद्रीय हिंदी निदेशालयाने उत्कृष्ट अनुवादाच्या पुरस्काराने (पुरस्कार राशी एक लाख रुपये) गौरवले होते.
हिंदीरत्न पुरस्कार
 • स्व. लाल बहादूर शास्त्रीजींनी स्थापन केलेली हिंदी भवन ही संस्था १९९८ पासून हा पुरस्कार हिंदीतर भाषी प्रदेशात राहून हिंदी भाषेची सेवा करणाऱ्या साहित्यिकास प्रदान करते.
 • पंडित गोपालप्रसादजी व्यास हे त्या संस्थेचे संस्थापक मंत्री असून कर्नाटकचे माजी राज्यपाल त्रिलोकीनाथ चतुर्वेदी हेही तेथील एक सन्माननीय सदस्य आहेत. 
 • यापूर्वी ज्या महनीय व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांमध्ये बी. एस. शांताबाई (कन्नड), आचार्य राधागोविंद थोडाम (मणिपुरी), बालशौरी रेड्डी (तेलुगु), साईजी माकीनो (जापानी), ज्येष्ठ हिंदी रंगकर्मी इब्राहीम अलकाजी (इराणी), पद्मा सचदेव (डोगरी), डॉक्टर सरोजिनी महिषी (कन्नड), हिंदी समालोचक जसदेव सिंग (पंजाबी) तसेच प्राध्यापक ए. अराविन्दाक्षन (मल्याळम) यांचा समावेश आहे.

गंगा नदीत सुमारे ५० डॉल्फिन आढळले

  Gangetic-river-Dolphin
 • उत्तर प्रदेशातील गारमुक्तेश्वर आणि नरोरा दरम्यानच्या ८० किलोमीटरच्या भागात गंगा नदीत सुमारे ५० डॉल्फिन असल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे हा भाग विशेष संरक्षित भाग म्हणून घोषित करण्यात आला आहे.
 • नदीतील डॉल्फिनची प्रजाती सध्या दुर्मिळ झाली आहे. त्यामुळे गंगा नदीत एवढ्या मोठ्या प्रमाणात डॉल्फिन आढळल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. डब्ल्यूडब्ल्यूएफ आणि पर्यावरण मंत्रालयाने संयुक्तपणे केलेल्या पाहणीत सुमारे ५० डॉल्फिन या भागात आढळून आले आहेत.

परदेशी नागरिकांना मालदीवमध्ये भूखंड खरेदी करण्यास परवानगी

 • परदेशी नागरिकांना मालदीवमध्ये भूखंड खरेदी करण्यास परवानगी देणारा कायदा तेथील सरकारने केला आहे. या पार्श्वभूमीवर चीनने मालदीवमध्ये हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.
 • परदेशी नागरिकांना ठराविक ठिकाणी भूखंड घेण्यासाठी एक अब्जांपेक्षा अधिक गुंतवणूक करण्यास परवानगी देणारा कायदा मालदीवने केला आहे. मात्र, या भूखंडाचा ७० टक्के भाग हा समुद्रात भराव टाकून विकसित केलेला (रिक्लेमेनेशन) असावा, अशी अट आहे.
 • परदेशी नागरिकांना भूखंड घेण्यास परवानगी देणाऱ्या कायद्यामुळे इतर देशांच्या संभाव्य लष्करी विस्ताराची शक्यता मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यांनी फेटाळून लावली आहे. हिंदी महासागर हा बिगरलष्करी भाग राहील, असे आश्वासन यामीन यांनी भारत आणि इतर शेजारी देशांना आश्वासन दिले आहे. 

भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी रोएलंट ओल्टमन्स

 • भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदावरून पॉल वॅन ऐस यांना काढून टाकल्यानंतर संघाचे हाय परफॉर्ममन्स संचालक रोएलंट ओल्टमन्स यांच्याकडे रियो ऑलिम्पिकपर्यंत प्रशिक्षकपदाची सूत्रे सोपविण्यात आली.
 • हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई - स्पोर्ट्स अथोरीटी ऑफ इंडिया) महासंचालक इंजेती श्रीनिवास यांच्यात झालेल्या बैठकीनंतर ६१ वर्षांचे ओल्टमन्स यांना पुरुष हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदाचा प्रभार सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला.

दिलशानच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत १० हजार धावा पूर्ण

  Tilakratne Dilshan
 • श्रीलंकेचा सलामीवीर तिलकरत्ने दिलशान याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत १० हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो जगातील ११वा फलंदाज बनला.
 • दिलशानने पाकिस्तानविरुद्ध ६३ धावा करून १० हजार धावांचा टप्पा गाठला. आता त्याच्या नावावर १०००८ धावा नोंदवल्या गेल्या आहेत. त्यात २२ शतके आणि ४५ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सरासरी ३९.७१ अशी आहे. त्याने सर्वाधिक धावा या भारताविरुद्ध २२५५ केल्या आहेत.
 • झिम्बाब्वेविरुद्ध १९९९ मध्ये बुलावायो येथे आपल्या एकदिवसीय कारकीर्दीस सुरुवात करणारा दिलशान हा १० हजार धावा पूर्ण करणारा श्रीलंकेचा चौथा फलंदाज आहे. याआधी सनथ जयसूर्या, माहेला जयवर्धने, कुमार संगकारा यांनी ही कामगिरी केली आहे.
 • दिलशानने श्रीलंकेकडून सर्वात कमी डावात ही कामगिरी करण्याचा नवा विक्रम केला आहे. आपला ३१९ वा वनडे सामना खेळणाऱ्या या ३८ वर्षीय फलंदाजाने २९३ डावात ही उपलब्धी प्राप्त केली आहे. त्याने संगकाराचा विक्रम मोडीत काढला. संगकाराने २९६ डावात १० हजार धावा पूर्ण केल्या होत्या. जयसूर्याने ३२८ आणि ३३३ डावात ही कामगिरी केली होती.
 • सर्वात कमी डावात १० हजार धावांचा पल्ला गाठण्याचा विक्रम भारताच्या सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. त्याने १० हजार धावा फक्त २५९ डावात केला होता.
 • दिलशानने वनडेत आणखी एक अनोखा विक्रम केला आहे. तो वनडेत १० हजार धावा आणि १०० विकेटस् घेणारा पाचवा खेळाडू बनला आहे. त्याआधी तेंडुलकर, जयसूर्या, गांगुली, कॅलिस यांनी ही कामगिरी केली आहे. ऑफस्पिनर दिलशानच्या नावावर १०४ विकेटस् आहेत.
 • दिलशानने श्रीलंकेकडून २६ सामन्यांत कर्णधारपदही भूषवले आहे. तसेच तीन सामन्यांत त्याने यष्टिरक्षकाची भूमिका बजावली आहे. वर्ल्डकपमध्ये त्याने २७ सामन्यांत ११९६ धावा केल्या आहेत.
वनडेत १० हजार धावांपेक्षा जास्त धावा करणारे फलंदाज
सचिन तेंडुलकर (१८,४२६)कुमार संगकारा (१४,२३४)
रिकी पाँटिंग (१३,७०४)सनथ जयसूर्या (१३,४३०)
महेला जयवर्धने (१२,६५०)इंजमाम उल हक (११,७३९)
जॅक कॅलिस (११,५७९)सौरव गांगुली (११,३६३)
राहुल द्रविड (१०,८८९)ब्रायन लारा (१०,४०५)
दिलशान (१०,००८)

विफाच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल

 • आशियाई फुटबॉल महासंघाचे (एएफसी) उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या (विफा) अध्यक्षपदी तर, साऊटर वाझ यांची सचिवपदी बिनविरोध निवड झाली आहे. 
 • नुकत्याच पार पडलेल्या या निवडणुकीत उपाध्यक्षपदाच्या पाच जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये पुण्याच्या विश्वजीत कदम, कोल्हापूरचे मालोजी राजे छत्रपती, औरंगाबादचे सय्यद हुसेन, नागपूरचे हरेश व्होरा आणि समीर मेघे यांनी बाजी मारली.

MT Gyaan
 • बृहन्महाराष्ट्र मंडळाचं १७वे अधिवेशन ३ ते ५ जुलैच्या दरम्यान लॉस एंजेलिसमध्ये पार पडले. या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 • मराठी संस्कृतीची ओळख अमेरिकेत जन्मलेल्या मराठी पिढीला व्हावी म्हणून बृहन्महाराष्ट्र मंडळ अर्थात 'बीएमएम'द्वारे गेली सोळा वर्षे अमेरिकेत मराठी अधिवेशन भरवण्यात येते.